© अपर्णा राजेश देशपांडे
सरणावर जशी जशी लाकडे रचली जात होती तशी तशी आईची एक एक आठवण सुधीरच्या डोळ्यासमोर येत होती. एक महिन्यापूर्वी याच दिवशी आई त्याच्याशी पहिल्यांदाच खुप मोकळेपणाने बोलली होती, एवढा धाडसी निर्णय तिने घेतला होता आणि पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते, त्यादिवशी..बाबांच्या फोनमुळे सुधीर ऑफिसमधून तसाच निघाला वाटेतच सानवी ने म्हणजे त्याच्या बायकोने त्याची बॅग आणून दिली आणि तो घाईघाईत निघाला, डोक्यात विचारांचं थैमान होतं, आईने असा निर्णय का घेतला असेल आणि असा अचानक?
काही कुरबुर झाली असेल का आई बाबा मध्ये ? तशी नेहमीच चालू असते पण आई कधी या कानाचं त्या कानाला कळू देत नाही मग काय झालं असेल?
तुफान वेगाने गाडी चालवत तो गावी पोहोंचला, कधी एकदा आईला भेटतो अस झालं होतं त्याला घरी आला आज बाबांनीच टॉवेल पुढे करत “तू फ्रेश होऊन घे मी चहा टाकतो म्हटलं” आणि सुधीर ला एकदमच भरून आल्यासारखे झालं.
नेहमी तो आला म्हटलं की आई तुळशी जवळ पाणी आणि भाकरीचा तुकडा घेवून यायची, पायावर पाणी घालून अगोदर नातीला म्हणजे स्वराला कडेवर घेऊन पापी घ्यायची, आज त्याला एकदम कोरडं कोरडं वाटलं.
विचारांना आवर घालत सुधीरने बाबांनी केलेला चहा घेतला, जुजबी चौकशी केली आणि जाऊन येतो असं म्हणून पटकन निघाला. रात्री ७ वाजेनंतर आश्रमात कुणालाच प्रवेश मिळत नाही हे त्याला माहीत होते.
घरापासून फार तर फार तासभर लागत होता आश्रमात पचायला वेगात गाडी चालवत अखेर पोंचला.
गेटबाहेरच गाडी सोडली चावी सेक्युरिटीकडे देत न बोलताच मध्ये पळाला. दरवेळी प्रेमाने चौकशी करणारे सुधीरदादाआज असे का पळाले? याचं आश्चर्यच वाटलं त्याला.
पळतच सुधीर आईच्या केबिनमध्ये आला. नेहमीप्रमाणे वसुधाताई म्हणजेच सुधीरची आई कामात मग्न होत्या.
अचानक आलेल्या आवाजाने त्यांनी चमकून वर पाहिले तर सुधीर दिसला.
हळूच चष्मा काढत हसत बोलू लागल्या” धावत आलास की काय? बस हो.. किती ही घाई ? असंच असतं तुझं जरासुद्धा चैन नाही जीवाला” असं म्हणत पाण्याचा ग्लास समोर केला.
सुधीरने एका दमात सगळा ग्लास संपवला.
“चल आई तुला घरी न्यायला आलोय” ग्लास खाली ठेवत सुधीर म्हणाला.
“स्वरा कशी आहे? हट्ट नाही केला का तुझ्यासोबत येण्याचा? आणि सानवी कशी आहे? अशात नाहीच झाले बघ बोलणे दोघींशी ही तुझे काय चालू आहेसध्या खूप काम असतं ?”
“हो ग आई पण मी काय म्हणतोय हे सगळं आपण घरी जाऊन बोलू, चल बरं कुठे आहे तुझी बॅग ? थांब मी आणतो” असं म्हणून उठला तोच आश्रमातील जेवणाची घंटा ऐकू आली.
वसुधाताईनी सर्व फाईल, पेपर्स जागेवर ठेवत सुधीरला म्हणाल्या ” चला जेऊन घेऊ, तुला आवडेल इथलं जेवण”
“आई. …अगं असं… काय…? नाही नाही चल बरं, आपण घरी जाऊन जेवू, चल… चल”असं म्हणून त्याने आई चा हात धरला आणि जवळपास ओढतच दरवाज्याच्या दिशेने निघाला.
तसं वसुधाताईने त्याला थांबवलं.
सुधीरला जरा वेगळंच वाटलं आई आज नेहमी सारखी वाटत नव्हती “काय झालंय आई? सांगशील का ?”
“काही नाही रे असंच, जेऊन घेऊ एकदा वेळ संपली की नंतर नाही मिळत इथे जेवण, तसा नियम आहे, चल” असं म्हणून दोघेही जेवायला गेले.
जेवणानंतर आश्रमाच्या मागील बाजुला असणाऱ्या लॉनवर शतपावली साठी दोघेही आले.
“छान झालाय न परिसर आश्रमाचा?” सुधीर म्हणाला.
“हो न ! तुला आवडला न ! खूप सुधारणा करून घेतल्या इथे या लॉन वर बरेच कार्यक्रम होऊ लागले आता सकाळी सगळ्या जणी योगा करतात, कुणाचे वाढदिवस आणि सणवार पण साजरे होऊ लागले आहेत. नवीन पिढीही आहे इथे त्यामुळेत्यांच्या नुसार ही काही नवीन गोष्टी शिकाव्या लागतात”.
खूप भरभरून बोलत होती आई, आश्रम तिच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय, तिला खूप काही करायचं होतं त्यासाठी. सुरुवातीपासूनच जसा वेळ मिळेल तसं ती आश्रमाचं काम करायची त्यात माझं शिक्षण, घरातील जबाबदारी, बाबांचं ऑफिस, दुखणी भाणी , सणवार, पैपाहुणे, ही जबाबदारी तिने अगदी चोख पार पाडली.
घराची रचना तर इतकी शिस्तबद्ध, सगळ्या वस्तूच्या जागा ठरलेल्या, काहीही झालं तरी ती वस्तू त्या जागीच सापडणार, सगळं कसं छान आपलं म्हणून तिने ते सगळं मनापासून घडवलेलं तिने घडवलेल्या साम्राज्याची तीच महाराणी. ते फक्त माझ्या दृष्टीने, बाबांना कधीच या गोष्टीत रस नव्हता.
आई विषयी कौतुकाने बोलताना मी कधी त्यांना बघितलेच नाही. ते मात्र सतत तिचा अपमान होईल अशा पध्दतीनेच वागायचे, मी जसजसा मोठा होऊ लागलो तशा या गोष्टी माझ्या लक्षात येऊ लागल्या पण मध्ये बोलायची मला आईने कधीच परवानगी दिली नाही. अगदी ” हा आमच्या दोघांचा प्रश्न आहे, ते सोडवण्या इतका मोठा तू कधीच होऊ नको, बाबा म्हणून तुला ते खूप जपतात, तेंव्हा या भानगडीत अजिबात पडायचं नाही” असं खडसावलं देखील होतं.
आणि त्यानंतर मला कधीच त्यांच्यात वाद झालेले आठवत नाहीत किंवा मला ते आईने कळू दिले नसतील.
माझ्यासाठी तर किती झटली, प्रत्येक गोष्ट अगदी मला हवी तशीच अगदी लहानपणापासून खूप लाड केले माझे पण प्रसंगाला तितकीच कठोरही झाली म्हणूनच तर मी आज या पदाला पोहोंचलो..
खिशात फोन व्हायब्रेट होऊ लागताच तो भानावर आला बघितलं तर बाबांचा कॉल, घाईने रिसिव्ह केला म्हणाला “हो बाबा, झालं जेवण आताच, ओ, सॉरी मी कळवायला हवं होतं, तुम्ही जेऊन घ्या”
” घाईत विसरलो ग बाबांना सांगायचं वाट पाहात बसले जेवणाची” वसुधाताई त्याच्याकडे बघून कोरडं हसल्या.
फोन खिशात ठेवत सुधीर पुन्हा मूळ मुद्द्याला हात घालत म्हणाला “आई, काय झालंय? तू सांगशील मला? ये आपण इथे बसून बोलू, मला कळू दे न तू अशी अचानक इकडे आश्रमात बाबा तिकडे घरी एकटे, ते सांगत होते की तू कायमची घर सोडून आलीस म्हणून हे खरंय का? बोल न आई, असं काय घडलं की तू असा निर्णय घेतला? सकाळी बाबांचा फोन आल्यापासून माझ्या डोक्यात हेच चक्र चालू आहे काही सुचतच नाहीये”
सुधीरचा हात हातात घेत वसुधाताई बोलू लागल्या” मला माहित होतं ते तुला फोन करून सांगणार माझ्यावर प्रेशर आणणार घरी येण्यासाठी पण पण तुला खरं सांगू माझी अजिबात इच्छा नाही त्या घरात वापस जाण्याची. ज्या गोष्टींचा आपल्याला राग येतो, विलक्षण चिड येते, परत तिथेच जाऊन तेच चेहरे पाहण्याची इच्छा नाही मला”
“अगं पण आई असं या वयात! तुझीही तब्बेत ठीक नसते असं दोघांनी दोन्हीकडे राहून कसं भागेल ? आपण काहीतरी मार्ग काढू, घरी जाऊन बोलू चलना प्लिज” सुधीर तळमळीने बोलत होता, “माझं बाळ किती मोठ झालंय आईला समजावून सांगतंय” असं म्हणत त्यांनी नकळत डोळे पुसले.
“चलायचं का?” सुधीरचं पुन्हा तेच.
“….. नाही, दिर्घ उसासा सोडत वसुधाताई बोलल्या. मी नाही येऊ शकत वापस, आता मी इथेच राहणार. माझी बरीच कामे राहिली आहेत ती मार्गाला लावायची आहेत, काही जगायचं राहिलं आहे, ते आता मी जगणार. आजपर्यंत स्वतः साठी जगताच नाही आलं रे मला, सदैव हे घर, तुझे बाबा, त्यांचा स्वभाव, घरचे बाहेरचे, पै पाहुणा हे करता करता माझी कधी साठी उलटून गेली कळलंच नाही. या काळात आजूबाजूची सगळं बदललं, बदलले नाहीत तर ते तुझे बाबा आणि तेही फक्त माझ्यासाठी! असो.
आमच्यामध्ये जे काही नातं आहे होतं ते आता फक्त दाखवण्यासाठीच असेल, मला तुला ताण नाही द्यायचा , जास्त काही सांगण्यासारखं पण नाही म्हणून तू आग्रह नको करू. फक्त एकच गोष्ट तुला मागणार आहे ती म्हणजे मी घेतलेल्या निर्णयावर तुझी साथ.”
“अगं पण आई! “सुधीर मधेच आईला थांबवत म्हणाला “पण तुझा हा निर्णय मला टोकाचा वाटतोय, आपण सगळे मिळून घरी जाऊन बोलू काहीतरी मार्ग नक्कीच सापडेल.”
सुधीरने हातात घेतलेला हात सोडवत वसुधाताई खिन्नपणे हसल्या आणि उत्तरल्या “हे बघ बाळा माझा निर्णय झालाय आणि मी तो तुझ्या बाबांना सांगून आलेय आणि आज नाही मला इथे येऊन चांगले आठ दिवस झालेयत, सगळे अस्त्र संपल्यावर शेवटी ते तुझा वापर करणार हे मला माहित होतंच, तेंव्हा तू जास्त टेंशन नको घेऊ म्हणूनच या दरम्यान मी कुणालाच नाही बोलले, जे जसं चाललंय तसं चालू दे, आणि तुझ्या बाबांचंच म्हणत असशील तर मी ते सगळं व्यवस्थित करून आलेय.
सकाळच्या चहा पासून रात्रीच्या जेवणापर्यन्त सगळं करते आपली रमा आणि मी तिला सगळ्या सूचना देऊन ठेवल्या आहेत, आणि काही अडलं तरी माझी आश्रमाची माणसं आहेतच न मदतीला , तसंही त्यांना एकटं राहायला आवडतं मग राहू दे न, तसंही आतापासून सवय करून घ्यायला हवीच, मलाही आता या सगळ्यांपासून थोडी सुटका हवीय थो थोडी म्हणता खूप जबाबदारी आहे माझ्यावर आश्रमाची.
दिवसही अपुरा पडतो मला या सगळ्या गोष्टी दुसऱ्या ला समजावून सांगताना पण माझ्या हाताखाली तयार झाल्यान काही मुली तर आश्रमाची चिंता नाही राहणार. तशी सुलू मावशी असतेच मदतीला तिला तर मी स्पष्टपणे सांगितले आहे की आता तिची प्रॅक्टिस तिने आश्रमातच जास्त करायची.
पण कसं आहे न तिचे काही जुने पेशंट आहेत न त्यांना तिला नाही सोडता येत विश्वास असतो न डॉक्टर वर प्रत्येकाचा. काय तर… मी पण ना! एकदा आश्रमाचा विषय सुरू झाला की बोलतच राहाते, असो….”
खाली मान घालून बसलेल्या सुधीरच्या डोक्यावरून हात फिरवत वसुधाताई म्हणाल्या ” तुझी तगमग मला समजतीय बाळा, पण …पण…. मी नाही करू शकत काहीच खूप विचार करून हा निर्णय मी घेतला आहे. त्या घरात मी कधीच पाऊल नाही ठेवणार, आणि मला माहितीय की तू मला या माझ्या निर्णयात तू साथ देशील.
तुला नक्कीच तुझी आई स्वार्थी वाटत असेल किंवा हा माझा वेडेपणा ही समज पण वयाची साठी उलटल्यानंतर मला जाणीव झाली आहे की माझं पण एक अस्तित्व आहे.
मला माझे राहिलेले आयुष्य समाधानाने सन्मान जगायचे आहे, तुझ्या डोक्यात खूप प्रश्न घोळत असतील पण यावेळी मी कशाचीच उत्तरे नाही देऊ शकत, तुझा कोंडमारा होतोय मला माफ कर” असं म्हणत त्यांनी हात जोडले.
“आई अगं असं काय करतेस? आईचे दोन्ही हात हातात घेत पाणावलेल्या डोळ्यांनी सुधीर म्हणाला.
त्याचे डोळे पुसत वसुधाताई उत्तरल्या” तुला माझं आणि तुझ्या बाबांचं नातं कसं आहे हे चांगलं ठाऊक आहे याबाबत आपण बोलत नसू तरी तुला याची चांगली जाणीव आहे, माझ्या ते मी हा निर्णय फार उशिरा घेतला, थोडा लवकर घेतला असता न तर ही वेळ नसती आली माझ्यावर एखादं माणूस तुमच्यावर जीवापाड प्रेम करतेय आणि तुम्ही फक्त त्याचा दुस्वास करताय आणि ते ही फक्त तुमचा पुरुषी अहंकार मिरवण्यासाठी, सहनशीलतेलाही अंत असतो आणि माझ्यातील सहनशीलता आता संपली.
म्हणून मी हा निर्णय घेतला आहे, तुमच्यासाठी हे सगळं मान्य करणं जरा अवघड जाईल पण होईल हळूहळू सवय. किती स्वार्थी झालेय न मी पण कधी असं वाटतं की ह्या जन्मातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करूनच जायचं म्हणजे आत्मशांती साठी काहीच नको करायला.”
पाणावलेल्या डोळ्यांनी हसत सुधीरकडे पाहात वसुधाताई पुढे बोलू लागल्या” ये.. बाळा अरे इतकं काय रडायचं हे बघ जास्त विचार नको करू तुझ्याकडे पाहूनच तर इतकी वर्षे गप्प बसले, तू समजून घेशील अशी आशा आहे फक्त तूच आणि तू असा ढासळलास तर…”
बराच वेळ दोघांनी मनमोकळेपणाने रडून मनावरचा काही ताण हलका केला.
खूप वेळाने सुधीर म्हणाला “आई असं करू तू माझ्या सोबत चल. तिकडे रहा. तुला जे करायचं आहे न ते तिथे राहून कर. तुला कशाचीच अडचण नाही येणार. अगदी सानवीचीही. मी वचन देतो तुला. फक्त इथे नको राहू. मी असताना तुला असं एकटं वाऱ्यावर सोडणं मला नाही पटत, चल सकाळीच निघू आपण मी सांगतो बाबांना.”
“नाही सुधीर माझा निर्णय झालाय आणि मी तो तुला सांगितलाय, जसं चाललंय तसं चालू दे, काही अडचण आलीच तर पहिला फोन तुलाच करेल, तुझ्या बाबांची ही काळजी करू नकोस सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतायत त्यांच्या ही बाकी काही लागलं तर मी लगेच पोचवते घरी ऑनलाइन. माझ्या सुनेने यात खूप तरबेज केलेय मला. त्याचा फायदा झाला बघ.”
“पण…आई” त्याचे वाक्य मधेच तोडत त्या म्हणाल्या “आजपर्यंत मी तुझे सगळे हट्ट पुरवले, आता तू माझा हा हट्ट पुरवणार… ok… ठरलं.”
बोलता बोलता सकाळ झाल्याचं ही नाही लक्षात आलं दोघांच्या.
” आई मला जावं लागेल खूप घाईत आलो सकाळी, ऑफिसमध्ये जाणं गरजेचं आहे”
“हो रे बाळा, नाश्ता कर, चहा घे मग निघ चल जाऊ आपण” असं म्हणत त्याच्या हाताला धरून कँटीनमध्ये गेल्या.
आपल्या हाताने त्याला नाश्त्याची प्लेट आणून दिली. आग्रहाने पोटभर खाऊ घातले. चहा दिला, आणि निघताना “हळु गाडी चालव बाबा, तुम्ही पोरं इतकी सुसाट ड्रायव्हिंग करता न की बस्स भिती वाटते रे हल्ली ” असं म्हणत अंगावरून प्रेमाने हात फिरवला.
” हो ग आई किती काळजी करशील ? येऊ मी? काळजी घे, जास्त विचार करू नको “असं म्हणत आईला नमस्कार करून सुधीर गाडीत बसून निघाला.
का कुणास ठाऊक पण आज त्याचे पाय जड झाले होते तिथून निघावं असं वाटत नव्हतं, तो दूर वळणावर येईपर्यंत आई हात हलवून निरोप देत होती, आज असं काय होतंय ?का नको वाटतंय जायला पण जावं तर लागणारच असा स्वतः शी विचार करत घरी आला बाबांशी भेटून परतीच्या प्रवासाला निघाला.
त्याला जाऊन साधारण आठ एक दिवस झाले असतील, रोज व्हिडीओ कॉल करून बोलणं, दिवसातून चार ते पाच वेळा बोलणं व्हायचं.
आठच दिवसात तिने खूप सारे काम उरकून घेतले होते. आपला चार्ज दुसऱ्याकडे सुपूर्द केला होता, सगळं काही तिला जे करायचं होतं ते पूर्ण केलं, खूप दगदग करत होती चेहऱ्यावर चांगलाच थकवा जाणवत होता, मी म्हणलं देखील की किती काम करतेस, हळूहळू करना त्रास होईल अशाने” पण ती झपाटून कामाला लागली होती.
एके दिवशी सुलू मावशी चा मेसेज आला “थोडा वेळ काढून आलास तर बरं होईल तुझ्या आईची तब्बेत जर बिघडली आहे” काळजीचे कारण नाही पण आलास म्हणजे तिला चांगलं वाटेल”
सुधीर चांगलाच घाबरला काय झालं असा का मेसेज केला हिने फोन करून विचारण्यापेक्षा जाऊनच येऊ तसंही विकेंड असल्याने दोघांनाही सुट्टी म्हणून सगळेच निघाले, आज घरी न जाता तो थेट आश्रमातच पोहोचला, त्याची नजर आईला शोधत होती पण आई आज चक्क तिच्या रूम मध्ये बेडवर झोपलेली पाहून त्याला एकदम भरून आले.
त्याने आईला कधीच असं नव्हतं पाहिलं. कितीही त्रास असेल तरी झोपून राहणे तिला कधीच नाही आवडले.
जवळ जाऊन त्याने हाक मारली “आई” पटकन डोळे उघडून बघितले” आलास राजा, असं म्हणत त्याच्या गालावरून फिरवला “कशा आहात आई” असं म्हणत सानवीने तिचा हात हातात घेतला.
“ठीक आहे ग,घाबरण्यासारखं काही नाही, ही सुलू जर जास्तच घाबरवून टाकते, तिला म्हणलं होतं नको सांगू लेकरं घाबरून पळत येतील पण तिला ऐकायचं माहीतच नाही, परेशान झाले माझे लेकरु, पिल्लू कुठाय? किती दिवस झाले भेटून ये रे बाळा ” असं म्हणलं की स्वरा एकदम पळतच आजीला बिलगली.
किती आनंद दिसत होता चेहऱ्यावर तिच्या, “काय झालंय आई?”
“अरे काही नाही खोकला येतोय जरा आणि अधूनमधून थोडा ताप, बाकी काळजीसारखं काही नाही, सुलू करते औषधपाणी कमी होईल आता” एवढं बोलताना देखील किती धाप लागत होती तिला.
“सुलुमावशी कुठेय? तिला बोलून येतो जरा” असं म्हणून सुधीर गेला.
सुलुमावशी केबिनमध्येच होती पाहताच म्हणाली ” ये ये आताच आलास का? बस हं, कसा आहेस? एकटाच आलास का?”
“नाही अग मावशी सगळेच आलो सुट्टीच आहे न दोन दिवस म्हणलं तेवढीच भेट सगळ्यांची, पण तुझा मेसेज …? काय झालंय आईला? खूपच अशक्त दिसतेय आम्ही रोज बोलतो तिच्याशी पण काहीच नाही कळलं आणि तिनेही नाही सांगितले.”
“म्हणूनच मी बोलावले तुला “मावशी उत्तरली. इथे आल्यापासून तिला सारखा त्रास होतोय आणि ही काम सोडायला तयार नाही म्हणून मी इथेच सगळ्या टेस्ट केल्या, रिपोर्ट नुसार असं लक्षात येतेय की..” एक एक रिपोर्ट त्याला दाखवत सुलू म्हणाली “हे बघ सुधीर मन घट्ट करून ऐक वसुला कॅन्सर झालाय “
“काय??’ सुधीर जोरात ओरडला “काय बोलतेयस तू मावशी? कधी, कसं मला काहीच कसं माहीत नाही? तुला कधी कळलं ? मला का नाही सांगितलं?”
“अरे हो हो एवढं पॅनिक नको होऊ, शांत राहूनच निर्णय घ्यावे लागणार आहेत तुला. नीट लक्ष देऊन ऐक, गेल्या वर्षभरापासून तिला त्रास होतोय तिने ते सगळं अंगावर काढलंय, अधून मधून मी चौकशी करायचे पण मलाही नाही पत्ता लागू दिला तिने.
वसुचा आजार शेवटच्या टप्प्यात आहे, मला जसं कळालं की ही लक्षणे काही वेगळीच आहेत तसंच मी तिला बोलले पण आश्रम सोडून कुठेच नाही जायचं, अगदी डॉक्टरकडेही खुप समजावलं, बोलले, रागावले पण ती काहीच नाही ऐकत. म्हणून मग माझ्यापद्धतीने तिचा सगळा चेकअप करून घेतला कालच रिपोर्ट आले म्हणूनच तुला मेसेज केला, आणि हो अमेरिकेतील माझे सर या आजारातील स्पेशालिस्ट आहेत त्यांना मी मेल केला होता की पुढे काय ट्रीटमेंट देता येईल म्हणून तर त्यांचं असं म्हणणं आहे की की वसू थोड्या दिवसाची सोबत आहे, अगदी थोड्या.
त्यामुळे कुठल्याही ट्रिटमेंट चा तिच्यावर असर नाही होणार फक्त थोडा त्रास कमी होईल एवढीच औषधं घ्यावी असं त्यांच म्हणणं आहे” सुलुमावशी चा एक एक शब्द सुधीर च्या कानात तप्त शि ओतल्याप्रमाणे घुसत होता.
डोळ्यातून अश्रूंचा जणू काही पुरच आला होता. हमसून हमसून रडत होता कितीतरी वेळ. “हे काय झालं, असं का, त्यादिवशी मी तिला घेऊन जायला हवं होतं, का ऐकलं मी तिचं? मला वाटलं कधी नव्हे ती स्वतःसाठी जगायचं म्हणते तर असू दे काय हरकत आहे थोड्या दिवसांनी तिला घेऊन जाणार होतो पण हे काय घडलं, असं तिने कुणाचं कायवाईट केलं की तिला असं व्हावं?” रडत रडत सुधीर फक्त स्वतःला दोष देत होता.
काही नाही मी तिला माझ्यासोबत घेऊन जातो चांगल्या डॉक्टर ला दाखवून तिचा इलाज करूनच घेतो, मेडिकल सायन्स एवढं पुढे गेलेय काहीच अशक्य नाही आणि तो परमेश्वर एवढा निर्दयी नाही, त्याला तिला बरं करावंच लागेल, बरं झालं तू लवकर लक्ष दिलेस मावशी, मला रेफरन्स लेटर दे मी घेउन जातो आईला.”
“हे बघ, एक डॉक्टर म्हणून मी तुला एकच सजेशन देते की तिला आता फक्त तुमची गरज आहे, म्हणजे तुमच्या आधाराची प्रेमाची जेवढी होईल तेवढी सेवा करा, विनाकारण तिचे हाल नका करू कारण त्याचा काहीच उपयोग होणार नाही, पण तुला तुझ्या समाधानासाठी जर न्यायचं असेल तर ने. मी लेटर तयार करून देते.”
“असं का बोलतेयस ग?” सुधीर हताशपणे म्हणाला.
“काय करू? माझं कामच असं आहे की तिथे मला प्रॅक्टिकल राहावंच लागतं. तिचे रिपोर्ट स्पष्टपणे सांगतायत की तिच्याकडे जास्त वेळ नाही. तेव्हा तिला जास्तीत जास्त वेळ द्या तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करा. तिला आनंदी ठेवा एवढंच आपल्या हातात आहे.” इतकावेळ खंबीरपणे बोलणारी सुलुमावशी आता मात्र एखाद्या लहान मुलासारखी मुसमुसुन रहू लागली.
“बाबांना माहीत आहे का?” बऱ्याच वेळाने सुधीरने विचारले.
“हो, मी सांगितलंय त्यांना. आले होते इथे तिला घेऊन जाण्यासाठी, खूप विनवणी करत होते चल म्हणून. त्यांना प्रायश्चित करण्याची संधी हवी होती पण वसुने नाही दिली. एका दृष्टीने तिचं बरोबरच आहे आयुष्यभर तिला मनाप्रमाणे जगता नाही आले. शेवटचे काही दिवस तरी तिला तिच्या मनाप्रमाणे वागता येईल. नाहीतरी घरी जाऊन तरी काय होणार? परत पहिले पाढे पंचावन्न. या आश्रमासाठी खूप काही केलंय तिने. तुझ्या बाबानी खूप त्रास दिला तिला पण कधी ही गोष्ट बाहेर नाही येऊ दिली पण जेंव्हा हे प्रकरण तिच्या सहनशक्ती च्या पलीकडे गेले तेंव्हा तिने घर सोडले.
पण त्याआधीच तिला तिच्या आजाराची कल्पना आली होती, तिने डॉक्टरला दाखवले होते पण एकही औषध नाही घेतलं. तुझ्या बाबांनी ही यात लक्ष नाही घातले. उलट तिच्या वर हात उचलला हे तिला नाही सहन झाले.
एकतर आजार आणि त्यावर हा आघात, तिची घुसमट होत होती, स्वाभिमानी आहे ती कधीच तिने कुणाकडे तक्रार नाही केली पहिल्यांदाच एकटीने निर्णय घेतला आणि त्यात ती खूप समाधानी वाटली. इथे आल्यानंतर तिला खूप खोदून विचारल्यावर तिने सांगितले. वर तुला सांगू नको म्हणून धमकी दिलीय पण मला नाही रहावले. माझी बाल मैत्रीण अशी मला सोडून जाणार मला सहनच होत नाहीये. मला खूप प्रॅक्टिकल राहावे लागतं तिच्यासमोर रडता ही नाही येत आणि तिला वाचवताही नाही येत कायकरू?” सुलू मावशी हे सांगताना खूपच रडत होती.
“सुधीर…… चल…..तुला अग्नी द्यायचा आहे” बाबांनी आवाज देताच सुधीर त्याच्या विचारचक्रातून बाहेर आला.
किती कठीण प्रसंग असतो हा मनावर दगड ठेऊन त्याने सर्व विधी केले व सगळे घरी परतले. जरावेळाने सुलुमावशी काहीतरी घेऊन सरळ सुधीरकडेच आली.
कसलीतरी बॅग होती सुधीरच्या हवाली केली आणि म्हणाली “हे बघ तुझ्या आईने हे माझ्याकडे ठेवायला दिले होते आणि मी गेल्यावरच दे असं बजावलं होतं, बघ काय आहे ते, मी जाते” असेम्हणून डोळे पुसत मावशी घराबाहेर पडली देखील.
जड अंतकरणाने त्याने बॅग उघडली त्यात एक डायरी आणि एक डबा होता. डबा बाजूला ठेऊन डायरी उघडली त्यात आई ने लिहिलेलं पत्र तो वाचू लागला.
‘बाळ… असं नाही रडायचं, शोक नाही करायचा, मला माहित आहे की तुला खूप त्रास होतोय. आपलं नातं वेगळंच न. आई मुलापेक्षा जास्त आपण एकमेकांचे मित्रच आहोत. सगळ्या गोष्टी एकमेकांना सांगतो. पण मी मात्र तुझ्यापासून काही गोष्टी लपवून ठेवल्या त्याबद्दल खरंच सॉरी. तुझ्यावर आता मोठी जबाबदारी आली आहे. तुला ती पार पाडण्याची शक्ती तुला परमेश्वर देवो, मनामध्ये कोणताही किंतु न ठेवता तुझ्या बाबांना सांभाळ.
त्यांनी तुझ्या बाबतीत कधीच काही कमी पडू दिलं नाही, माझ्यासाठी दहा दिवस शोक करत नाही बसायचं, चौदावा वर्षश्राद्ध असा कुठलाच विधी नाही करायचा. मृत्यू कुणाला चुकला आहे. त्यामुळे उद्यापासूनच कामाला लागायचं.
माझे काही दागिने आहेत ते माझ्या पिल्लू स्वरासाठी तिच्या आज्जीकडून तिला छोटीशी भेट. बाकी माझे कपडे वगैरे मी आधीच दान केले आहेत. त्यामुळे माझं असं आवरण्यासारखं तिथे आता काहीच नाही. मला सांगणं खूप सोपं आहे पण काय करू ? अधूनमधून आश्रमात चक्कर कर म्हणजे तुला जसा वेळ मिळेल तसा, बाकी मी तेथील व्यवस्थाही केली आहे, फक्त एकच इच्छा आहे की माझ्या अस्थी आश्रमातच विसर्जित कर. हे बघ राजा, वाईट वाटून घेऊ नकोस, तू खूप सेवा केलीस माझी, जिवापलीकडे जपलेस एखादे लहान मूल सांभाळावे न तसं मला खाऊपिऊ ही घातलंस, आयुष्याचा शेवट आपल्या माणसात व्हावा हीच इच्छा असते आणि माझी ती पूर्ण झाली त्यामुळे यानंतर चे सगळे विधी निरर्थक, बाकी काय लिहू? आनंदात राहा सगळी सुखं तुमच्या पायाशी लोळण घेवो हीच इच्छा”
तुझी आई
सुधीरच्या डोळ्यातून अश्रूंचा जणू काही महापुरच आला होता. आईने किती व्यवस्थितपणे सगळी कामं आटोपली होती !आपला मृत्यू समोर असताना रडत बसण्यापेक्षा तिने तिची कर्तव्य पार पाडली, आईच्या आठवणींच्या महासागरात तो आकंठ बुडाला होता. त्यामुळे सकाळ कधी झाली हे ही त्याला नाही समजले, आईच्या इच्छेनुसार शोक न करता तिच्या अस्थी आश्रमातच विसर्जित केल्या, बाबांना घेऊन तो परतीच्या प्रवासाला निघाला नेहमीप्रमाणे मागे वळून पाहिले नजरेआड होईपर्यंत हात हलवून निरोप देणारी माय माऊली आज नव्हती.
समाप्त
© अपर्णा राजेश देशपांडे
सदर कथा लेखिका अपर्णा राजेश देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
परतफेड
सासूबाईंचे माहेर