कबीला

©️ मृणाल शामराज.
एक महानगर.. महाकाय विस्तारलेल … शिग लावून भरलेल्या धान्याचं मापं लवंडल्यावर जसे धान्य एकाला लागून एक पसरत ना तसं पसरलेलं. जिकडे बघावं तिकडे आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या गगनचुंबी बिल्डिंगी, दाटीवाटीनी राहणारी माणसं, सतत रिघ लावून धावणारी वाहनं, त्याचे होणारे कर्कश आवाज, सतत कशाच्या तरी मागे धावणारी माणसं.
आता शहर अपुर पडतंय जाणवल्यावर शहराबाहेर वाढणाऱ्या I. T industries..त्यामुळे वाढणारी नवीन वस्ती.. उपनगरच ते.. काळाच्या पुढे धावणारी एक जमात कारखानदार, बिल्डर, व्यापारी..स्थानिक रहिवाशी्यांकडून थोड्याश्या मोबदल्यावर खरेदी केलेल्या अमाप जमिनी.. आणि हळूहळू आकार घेणारं नवीन चकचकीत आणि झगमगीत जग अशी या उपनगराची व्याप्ती.

जलसा.. विशाल असा एक महाल वजा बंगाला मोठ्या रुबाबात उभा आहे. तुरळक अश्या वस्तीत तो खूपच उठून दिसतोय. कितीतरी एकराच्या प्लॉट वर तो दुमजली विस्तीर्ण बंगला लालजींनी बांधला आहे.
सुंदर आकर्षक वास्तू रचना, आधुनिक सोयी, मार्बलचा आणि सागवानी लाकडाचा सढळ हातानी केलेला वापर, उत्तम रंगसंगती वास्तू विशारदाची कौशल्य दाखवून देत होती. बंगल्यासमोरील फुल, वेलीनी बहरलेली बाग कारंज्या मुळे अजूनच उठून दिसत होती. गच्ची पण सुंदरश्या हिरवळीनी सजवली होती. मंद दिवे लावले होते तिथे.. बाकी बंगला तर आतून बाहेरून दिव्यांनी लखलखून निघे.. जलसा.. हॆ सार्थ नाव ठेवलं होतं लालजींनी..

लालाजी, गुजराथ मधील एका खेड्यातून काहीतरी करायच्या जिद्दीने आलेला मुलगा.परिस्थितीमुळे शिक्षण फारसं नाही. पण हुशार, प्रामाणिक आणि चुणचुणीत. मामांनी आपल्याला मदत होईल आणि बहिणीचही ओझं हलकं होईल म्हणून शहरात आणलेलं.
शहर कधी पहिलं नव्हतं. मामाच्या घरात वास्तव्य फक्त झोपण्यापुरत.. तेही घरापुढच्या निमुळ त्या जागेत.
पहाटे उठायचं. चटई गुंडाळून ठेवायची. चाळीच्या नळावर अंघोळ करायची. कपडे धुवून टाकायचे आणि पेपर टाकायला जायचं. आठपर्यंत घरी यायचं. मामीला मदत करायची. नऊला दुकानात.
दुकान झाडून स्वच्छ करायचं. माल जागेवर लावायचा. तोपर्यंत मामा यायचे. आता लाला आल्यामुळे त्यांचाही भार कमी झाला होता.

किराणा मालाच घाऊक दुकान होतं ते. अजून ही चार, पाच नौकर होतेच. तो मामा बरोबर सावली सारखा असे. मामा सांगतील ते नीट करे. बाकी नोकरांवर पण त्याचे लक्ष असे. मामाचे सर्व व्यवहार, त्यांच व्यापाऱ्यांशी, लोकांशी बोलणं तो बारकाईने बघे.
हळूहळू तो सरावला. मालाचा दर्जा कसा बघायचा,त्याच्या किंमती कश्या ठरवायच्या, शेतकऱ्याशी कसा व्यवहार करायचा, कुठल्या काळात सण बघून कुठला माल जास्त मागवायचा मामा शिकवत होते.. टिपकागदासारखा हा मनात टिपून घेतं होता.
सगळीकडे हयाच बारकाईने लक्ष असे. व्यापार वाढत होता. मामा खूष होता. लालाजीने स्वतःच्या गोड बोलण्याने आणि सत्शील वागण्यानी मामीला पण खूष केलं होतं. मामांनी त्याच्या एकुलत्या एक मुलीचं लग्न त्याच्याशी लावून दिलं.

बाजारपेठेत त्याचं चांगलं नाव झालं होतं. व्यापार वाढला होता.इथे पाय रोवले गेले होते.आता त्यानी वेगळी झेप घ्याची ठरवली.त्यानी आता एक मोठं डिपार्मेंटल स्टोर उघडलं. स्टेशनरी पासून सर्व वस्तू अगदी माफक दरात..
तो वेगवेगळ्या सरकारी खात्यात जाऊन भेटू लागला लोकांना मॅनेज कसं करायच हॆ तो आता पर्यंत नीट शिकला होता.
वागण्यातली आदब, गोड बोलणं, मालाचा उच्च दर्जा, माल वेळेवर पोचवण्याची तत्परता, सचोटी ह्या त्याच्या गुणामुळे ह्या ही व्यवसायात आता भरभराट आली. अजून दुकान झाली.
वेगवेगळ्या शहरात आता दुकान झाली.. लक्ष्मी कडे लक्ष्मी चालली.

आता शहरातल्या उच्चभ्रू वस्तीत त्याच मोठं घरं झालं. त्याची दोन मुलं शिकून व्यवसायात त्याला मदत करू लागली आणि मुलगी विदेशात शिक्षण घायला गेली.दारात दोन मोठया कार, ड्राइवर, कामाला
नोकर, चाकर.. त्याचे दिवस बदलले.
मुलांची लग्न झाली. मोठ्या घरातल्या मुली सुना म्हणून आल्या.. घर कमी पडू लागलं.
कधी काळी या उपनगरात घेवून ठेवलेल्या जमिनी कामाला आल्या. त्यानी दूरदृष्टीने इथे जलसा हा बंगला बांधला.. समोरच असलेल्या विस्तीर्ण जागेवर एक मोठा मॉल बांधायचं त्यानं ठरवलं.

खूप पुढचा विचार होता त्याचा.. इथे सगळे नोकरदार राहायला येणार.. बहुतेक सगळेच उच्चभ्रू, आणि परप्रांतीय.. त्यामुळे पैशाचा प्रश्न नाही. बरं सगळं एका ठिकाणी म्हणून ते ही खूष.
वास्तुतज्ञानी काढलेल्या प्लॅन मधला एक वेचक प्लॅन निवडला..
आता कामाला सुरवात करायची.. काम झपाट्याने करायचं होतं. पैशाचा प्रश्नच नव्हता.. कंत्राटदाराला कंत्राट दिलं.. गावाकडे मजूर स्वस्त म्हणून ट्रक भरून भरून त्याचे परिवार येऊ लागले.. आता काम झपाट्यानं सुरु होणार होतं..

ट्रक थांबला.. चार पाच जण खाली उतरली.. मागे वाळूच्या ढीगऱ्यावर बसलेली कच्ची, बच्ची त्यांच्या पाठोपाठ उतरायला झेपवाली. त्यांच्या आया त्यांना ओढायचा प्रयत्न करत होत्या. त्यांच्या पाठोपाठ वाळू बरोबरच त्यांची गाठोडी, भांडी, बादल्या सगळं सामान उतरत होती. असे चार पाच ट्रक येऊन रिते होतात.
सगळ्यांचा एकच गलका उठला.. मुकादम एकदम वसकला. सगळे शांत झाले.
आता तो झोपड्या कुठे उभ्या करायच्या, त्यांचं कामाचं स्वरूप, त्यांची मजुरी या सगळ्यांची कल्पना यांना देतो.. लालाजी जलसाच्या गच्चीतून सार पाहत असतात.

रात्रभर आवाज चालू असतात. जलसा मंद प्रकाशात गुडूप असतो. इकडे पुरुष खांब रोवत असतात. बायका त्यांना पत्रे चढवायला मदत करत असतात. तरणे येसा, शंभू, मन्या, शिवा हिरहिरीने पुढे होऊन ताकदीची काम करत असतात.
म्हातारी जीजी त्या तान्हा लेकराला जोजवत असते. युसुफ चाचा कोंबड्याचं टोपलं सांभाळत सगळ्या सामनावर लक्ष ठेवत असतो.. दांडगा गुज्या मात्र लांडग्यासारखा सगळ्यांचा माग काढत कुणावरतरी डाफरत इकडून तिकडे फिरत असतो.बनी जमिनीवर फतकल मारून आपल्या वेणीच्या रिबीनीशी खेळत उगाचच हसत असते.. गंगावा नवऱ्याला मदत करतांना आंधळ्या सासूजवळ झोपलेल्या आपल्या गुटगुटीत लेकराला न्याहळत असते. तांबडं फुटतो झोपड्या उभ्या ठाकतात.

सकाळी लालाजी खाली बागेत फेऱ्या घालण्यासाठी उतरतात आणि त्या झोपड्या बघून खुशीत हसतात. आता काम जोमानं होईल ह्याची त्यांना खात्री वाटते. झोपड्यातून सामान लागलेलं असतं..
असतंच काय म्हणा चार भांडी.. दोनचार चादरी.. पुरुष कामाला निघतात. बायका न्याहरी आटपून पाठोपाठ जाणारच असतात.. भूमिपूजनासाठी मोठा मांडव टाकलेला असतो. मान्यवर असामी आलेले असतात.
नगरसेवक, लालाजी, त्याची मुलं दाराशी थांबलेली असतात.
पॉ.. पॉ.. गाड्यांचे आवाज, पाठोपाठ पोलीस व्हॅन मागे ऍम्ब्युलन्स..

सगळे कामगार बिचकून मागे सरकतात.. खट.. खट फोटोग्राफर इकडून तिकडून पळत असतात.. मीडियावाले घोळक्याने आमदार साहेबांच्या मागे माईक घेवून चालले असतात.. आमदार साहेब बारीक सगळं बघत असतात. मधेच नगरसेवकांच्या कानात काहीतरी पुटपुटतात.. तो लालजींना काहीतरी सांकेतिक खूण करतो. लालाजी हसून हात वर करतात..
फित कापली जाते.. कुऱ्हाड पडते. आमदारांचा कुऱ्हाड घेतलेला फोटो निघतो..जाता जाता साहेब एका छोट्याला उचलून घेतात..कामगार टाळ्यांचा कडकडाट करतात.. बिचारे एवढा मोठा माणूस किती साधा आहे. ह्या चर्चेत रमतात.दुसऱ्या दिवसाच्या वर्तमानपत्रात हा फोटो आणि मॉल चे भव्य चित्र मुखपृष्टावर दिसते.

कामाला सुरवात होते. मुकदम दट्ट्या लावून कामगारांकडून काम करून घेतो.. काम लवकर उरकायचे असते.. हजेरी घ्यायला गेलं की अंगठा घायचा आणि पैसे दयाचे.. पैसे घेवून सरळ भट्टीवर जायचं. दिवसभर काम करून अंग आंबलेलं असायचं. थोडी चढवली की बरं वाटायचं. एकाच्या सोबतीने दुसरा.. रात्र चढायची.. चुली पेटलेल्या असायच्या.. जे असेल ते शिजवलं जायचं.. चढलेल्या दारूने लटपटणारे पाय, तरवटलेले डोळे घेऊन कसबस घरात येऊन पडायचं.. घरच्यांना हॆ रोजचंच झालं होतं.. सगळी वस्ती अशीच.. एखादाच अपवाद..
येसा आज गडबडीने आवरत होता. त्याला मुकादमाने लवकरच बोलावले होते. आज सिमेंटची पोती येणार हॊती. माल चेक करून घ्यायचा होता.

चुणचुणीत येस्यान मुकादमाची मर्जी संपादन केली हॊती.. ट्रक आल्याबरोबर मुकादम पुढे सरसावला. त्या ट्रकवाल्यानी त्याला खुणावलं. एक सिमेंटच पोत उघडलं गेलं. येसा बघत होता. त्याला काहीतरी वेगळं जाणवलं. आता पोती उतरू लागली.
येसा मोजत होता. 438.. त्यानं मुकादमला सांगितलं.. मुकादमने कारकूनाला सांगितलं 500 लिही. येसा चमकला.
मुकादमने त्याला केबिनमधे बोलावलं. 2000 रुपये पुढे केले.. तो म्हणाला, असू दे.. लक्ष्मी अशीच येईल तुझ्याकडे..
एक क्षण तो बिचकला. त्याच्या डोळ्यापुढे बा आला.. सच्च्याईन चालणारा.. सगळी शेती विकली तरी कर्ज फिटलं नव्हतं.. गावच राहतं घरं गहाण पडलं होतं.. त्यानी ते पैसे घेतले, ख़ुशीत घरी आला..

जीजी दारातच लेकराला खेळवत हॊती.. तिच्या पुढे त्यानं टोपपदरी लुगडं धरलं. ती विसफारलेल्या डोळ्यांनी ते बघत हॊती.. तिच्या ठिगळं लागलेल्या लुगड्या पुढे ते करकरीत लुगडं झगमगत होतं..
डोळ्यात आलेले अश्रू पुसत तिनं ते गालाला घासलं त्याचा करकरीत पोताच तिला भारी अप्रूप वाटलं.
येसा म्हणाला.. “आये,..” रखमा आतून बाहेर डोकावली.. तिच्या कडे मिस्किल बघत तो जीजीला म्हणाला, “आज राजाला थोडं बघशील का? आम्ही दोघं बाहेर जातो.”
जीजीनी रखमा कडे बघितलं ती आतुरतेने त्याच्या उत्तराची वाट बघत हॊती..
“जा रं पोरांनो, मी बघतो त्याला.” रखमा खुदकन हसली.

येसा झोकात राखमला घेवून शिनिमाला गेला.. जाताना रखमाला लई भारी वाटतं होतं.
गावाकडं उघड्या पिटावर शिनिमा बघावा लागायचा.. तो ही किती वर्षात पहिला नव्हता. ह्या वातानकुलीत थेटर मध्ये गुबगुबीत खुर्चीत ती अंग चोरून बसली.
हळूच बाजूला नजर टाकताच तिच्या लक्षात आलं सगळे आपल्यातच दंग आहेत, ती हळूच मागे सरकली. तिला खूपच भारी वाटलं. तिने हळूच खुर्चीच्या गुबगुबीत सीटवर डुलून पहिलं. ती मोहरली. असा तलम स्पर्श तिने पहिल्यांदाच अनुभवला.
झोपडीत त्या खडबडीत जमिनीवर वाक टाकून झोपलं तरी खडे रुतायचे. येसा तिची गंमत बघत होता.. ती मोठी स्क्रीन, तो गुंजणारा आवाज.. ती मनाच्या हिंदोळ्यावर झुलत हॊती. नंतर समोरच्या हॉटेल मधे जावून त्यानी डोसा खाल्ला.

आज ती तर आभाळात तरंगत हॊती. येसा आज खूप खुश होता.. आता तो सगळ्यांना असंच खूष ठेवणार होता.. दिवस पुढे सरकत होते. आता मॉलचं काम जोरात पुढे सरकत होतं.
इकडे जलसा आपल्याच धुंदीत होता. लालाजी कधीतरी आउटलेटना भेट देतं. मुलांना काही सुचना करत.. कागदपत्र बघ वकिलांशी डीलरशी बोल.. कॉन्ट्रॅक्टर बरोबर चर्चा कर. ह्यात त्यांचा वेळ जाई.
पण बां.. त्या नुसत्या खुर्चीवर असत. सगळ्या कामाच्या बायका कामात तरबेज झाल्या होत्या. त्यामुळे देखरेखीचही काम नसे. व्हीलचेअर वरून गच्चीत बसून दूरवर काहीतरी त्या न्याहळत असतं.

नाही म्हणायला त्यांना एकच विरंगुळा होता. देवघरातल्या बाळकृष्णाची मूर्ती मनात ठासवत त्या तासनतास त्याच्याशी बोलत..
सगळं वैभव पायाशी होतं पण ती घरभर दुडुदुडनारी इवलीशी पाऊल काही त्या घरात रांगत नव्हती.
सारं असून एक भकासपणा तिथे रेंगाळत होता. छोटया सुनेनी स्वतःला हॉबी क्लासेस, किटी पार्ट्यात गुंतवून घेतलं होतं, पण मोठी दिवसभर उदास खोलीत पडून असे.
कधी गच्चीवर गेली तर गंगाव्वा च्या रांगणाऱ्या तान्हूल्याकडे आसूसल्या नजरेने पाहत असे.
बां ना आता खुर्चीवरून हलणं सुद्धा अवघड झालं होतं. त्यांना मदतीला कुणीतरी हवं होतं.

मुकादमनी लालाजीच्या सांगण्यावरून एखादी विश्वासू बाई आहे का असं येश्याला विचारलं.
त्यानं रखमाचं नावं सांगताच मुकादम खूष झाला. विश्वासाच माणूस मिळणारं होतं.
रखमा जलसावर कामाला जावू लागली. मुळातच चटपटीतआणि प्रामाणिक असणाऱ्या रखमानं सगळ्यांना जिकूंन घेतलं. बां चं तर तिच्या शिवाय पान हालेना..
युसूफ चाचा च्या कोंबड्या कलकल करत. गंगाव्वाची आंधळी त्याला बडबड करत राही. गुज्या मात्र बनीवर लक्ष ठेवून होता. यमुना कामावर जाई. पण तिच सारं लक्ष आपल्या या अर्धवट लेकीकडे असे.
देवानं अश्या मुलीला इतकं देखणं रूप का द्यावं हा प्रश्न तिला सतत पडे.

गुज्या मात्र काही तरी कारण काढून बनी कडे जाई. संत्याला हॆ जाणवत होतं. त्यानं त्याला दाबही ही दिला होता.. माझ्या बहिणीच्या वाटेला जायचं नाही..
एकदा यमुना कामावर गेल्यावर चाहूल घेवून गुज्या घरात घुसला. उगाचच चाहटळपणा करू लागला. बनी फिदीफिदी हसत हॊती. अचानक संत्या घरात शिरला. त्याच डोकच हललं. त्यानं त्याच्या चारपाच कानशिलात दिल्या. गुज्या चरफडत तिथून बाहेर पडला. संतापात तो झाडाच्या पारावर येऊन बसला. समोरच पिठाच्या गिरणीचा पट्टा सटसट आवाज करत फिरत होता.. त्याच विचारचक्र त्याच वेगाने चाललं होतं.

बांधकाम वेगात चाललं होतं.. भिंतीचं काम चालू होतं. बायका विटा वहात होत्या. गंगावा जरा विसावली. आता तिचं लक्ष जेवणाच्या सुट्टी कडे लागलं होतं. तिची चोळी ओलावली हॊती. आपलं तान्हूल भुकेनी तळमळून रडतंय असा भास तिला होतं होता.
काही तरी आवाज येतोय वाटेपर्यंत भिंत सरसर खाली कोसळली. तो सिमेंटचा गिळावा त्या विटांबरोबर खाली आला.
गंगाव्वा सरकायच्या आतच सगळी भिंत कोसळली..
सगळीकडे एकच कल्ला उठला.. मेली.. बाई मेली.. मुकादम धावत आला.. लोकांनी भराभर विटा हलवल्या.. ऍम्ब्युलन्स आली.. गंगाव्वा रक्तबम्बाळ झाली हॊती..

तिला ऍम्ब्युलन्समध्ये ठेवेपर्यंत तिची आंधळी सासू बाळाला घेवून धडपडत तिथे आली. तिने जोरात आक्रोश केला. ते बाळं पण रडायचं थांबत नव्हतं. रखमानं त्याला जवळ घेऊन ती त्याला थोपटू लागली.
पोलीस आले.. तक्रार नोंदवली गेली.. कमी प्रतीचा माल वापरल्यानं हॆ झाल्याच सिद्ध झालं..
आता मात्र येश्याच्या पायाखालील जमीन सरकली.
पेपरात रकानेच्या रकाने भरून बातम्या येऊ लागल्या.. आणि अशातच एक दिवस लालाजीचा ड्राईव्हर गाडी वेगात चालवत आत येतं होता.. युसूफचाचा कोंबड्या टोपल्यात घालत होते एक पळाली म्हणून तिच्या मागे गेले आणि गाडीच्या खाली आले..

आता लालाजीच्या विरोधकांना हातात कोलीतच सापडलं.. मीडियानी ह्या गोष्टी उचलून घेतल्या होत्या. लालाजी रात्रं रात्रं जागे असत. बेचैन होऊन गच्चीत फेऱ्या घालताना आपसूक त्यांची नजर समोर जात असे.. झोपड्यातलं ते जग कष्ट करून अजगरासारखं सुस्तवून वेडवाकडं पहुडलं असे.. त्या मॉलचा उंचवून विस्तारलेला पसारा आज त्यांना केविलवाणा वाटतं होता..
आज गुज्या आडबाजूला मित्रानंबरोबर संत्याची वाट बघत होता. तो येतांना दिसताच त्यानं मित्रांना खूण केली सगळ्यांनी संत्याला धु धु धुतला. गस्तीच्या पोलिसानी हॆ पहिलं आणि त्यांना ठाण्यावर नेलं.
इकडे मुकादम आणि येशा जेल मधेच होते. पण त्यात एक जमेची बाजू म्हणजे येश्यानी मुकादमाच्या नकळत त्याचं आणि सिमेंटच्या डीलरचं बोलणं फोन मधे रेकॉर्ड केलं होतं. कोर्टात केस चालू हॊती. रखमा बां कडे रडून रडून येश्या साठी विनवणी करत हॊती..

लालजींनी युसूफच्या घरच्यांना पैसे देऊन, पोलिसांना पटवून केस मिटवली आहे. गंगाव्वा बरी होऊन घरी आली आहे. तिला आयुष्यभर दोनवेळच्या जेवणाला कमी पडणार नाही येवढी सोय लालजींनी केली आहे.
येश्या पुराव्या अभावी सुटलाय.. गुज्या जेल मधे अडकलाय..
मॉल दिमाखदारपणे उभा राहिलाय.. लालाजी तिकडे अभिमानाने बघत आहेत.
बां त्या बाळकृष्णाचे परत परत आभार मानताहेत. आपल्या सुनबाईची डोळ्यात तेलं घालून काळजी घेताहेत.

मॉलचा नवीन मालक थोडया दिवसात येणार आहे. जलसा वर जलसा चाललाय.. पाखराचं इथलं दाणा पाणी संपलंय..
ट्रक परत भरत आहेत.. तेवढ्याच लगबगीन सगळे वर चढताहेत.. कबीला निघालाय..
परत नवी वाट. नवी वस्ती.. फक्त कोंबड्या विखूरल्यात सगळीकडे बेबंद.. युसूफचाचाची तेवढीच आठवण इथे राहिलीय..
आता निघालाय कबीला .. दुर दुर.. पुढल्या मुक्कामाला..
©️ मृणाल शामराज.
सदर कथा लेखिका मृणाल शामराज यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
घुसमट
रेशमी पाश

Leave a Comment

error: Content is protected !!