जाणीव

©सौ. प्रतिभा परांजपे
सकाळी सकाळीच ह्यांचा फोन? सुलभाताईना आश्चर्य वाटले.
“गुड मॉर्निंग– , आज सकाळी सकाळी ?
“हो- तसेच कारण आहे.”
‘ काय झाले?’
“अगं साने काकू गेल्या.”
‘कोण साने ?’
‘शोभा.. तुझी मैत्रीण.” 

“गेल्या म्हणजे ?”
“डेथ झाली त्यांची .वाट्स एप वर मैसेज होता.”
“काय? कसे शक्य आहे?” म्हणेपर्यंत फोन बंद झाला.
सुलभाताई हातातल्या फोनकडे पाहतच राहील्या. मजकूर डोक्यात शिरतच नव्हता.
“कोणाचा फोन होता आई?” साक्षीचा आवाज ऐकून त्या भानावर आल्या.

“अगं ह्यांचा, शोभा गेली ग !” म्हणत त्या रडू लागल्या.
“आई, आई. काय झालं नीट सांग बरं” साक्षी म्हणाली.
“अगं शोभा साने माझे मैत्रीण गेली गं आज तिला देवाज्ञा झाली म्हणत होते.”
साक्षी आईला जवळ घेत तिचे सांत्वन करु लागली.
थोड्याच वेळात छकुलीचा रडण्याचा आवाज आला “उठली वाटतं भूक लागली असेल “–म्हणत साक्षी आत गेली.

सुलभाताई अजून त्याच विचारात होत्या. काय झाले असेल शोभाला? सगळं तर छान होतं.
शोभा नी त्या, दोघींची घट्ट मैत्री होती. एकाच वयाच्या, एकाच काॅलनीत घरं होती दोघींची.
सुलभाची  मुलगी साक्षी तर शोभाचा सुबोध मोठा, सुलभाची पूर्वा तर शोभाची प्राची एकाच वयाच्या.
साक्षीच्या बाळंतपणासाठी म्हणून पुण्याला आली होती सुलभा , इतक्यात परत जाणे शक्य नव्हते.
मागच्याच वर्षी सुबोध चे लग्न झाले ,.शोभा खूप आनंदात होती. सुबोधची बायको नयना सावळी, सतेज, स्मार्ट पाहिल्या बरोबर आवडेल अशी खूप छान..

शोभाला तिचे खूप कौतुक होतंं.
नयना तिच्या माहेरी एकुलती एक  लाडाची लेक. इकडे एकुलती एक सून म्हणून इकडेही लाडाची.  शोभाची मुलगी प्राची ,गोरी घारी, जरा बुटकी , अजून पीएच.डी पूर्ण व्हायचे होते अभ्यासात खूपच हुशार, प्राची घरातला लाडोबा .
प्राचीची प्रत्येक गोष्टीत नैनाशी बरोबरी. नयनाचे नी तिचे सतत खटके उडत.
अगदी रंगरुपा वरुनही
“काय पाहिलं माहिती नाही हिच्यात? आपल्या घरात सर्व गोरेपान अगदी सुबोध दादा ही,आणी ही अशी सावळी.”

“सावळी नाही निमगोरी आहे मी. माझी त्वचा किती सतेज आहे. तुझ्यासारखी पांढरी पाल नाहीये मी.” नयनाने प्रतिटोला दिला.
एकदा सुलभा सहजच शोभा कडे दुपारी गेली होती.
नयनाला कॉफी करायला सांगून शोभा सुलभाशी गप्पा मारत बसली.
स्वयंपाकघरातून नयना व प्राचीचे जोरजोरात बोलणे बाहेर ऐकू येत होते.
“तुला कॉफीही धड करता येत नाही. काळी ढुस्स करते तुझ्यासारखी म्हणून मला तुझ्या हातची कॉफी नकोय” प्राचीचा आवाज आला.

” असं काय? मग कर तुझी तूच तुझ्या सारखी पांढरी फटक मला मुळीच हौस नाही.”   नयना तितक्यात जोरात बोलली.
आतले संवाद ऐकुन सुलभाने चमकून शोभा कडे पाहिलं .
शोभा हसली अगं ” नणंदा भावजया दोघीजणी घरात नव्हतं तिसरं कोणी. आठवतात का ग तुला लहानपणी ची भुलाबाईची गाणी”.
‘ हो पण–
” अगं इथे तोच प्रकार आहे, दोघींचे मुळीच पटत नाही प्राचीला वाटते मी नयनाला डोक्यावर बसवते आहे. आणि नयनाला  वाटते ही फटकळ डोक्यावर बसलेली एकदा लग्न होईल तेव्हा कळेल.

खूप भांडतात ग दोघी. पण मी लक्ष देत नाही कधी मधी मी बोलते पण मला दोन्ही सारख्याच ग.”आतले संवाद ऐकून सुलभा गार पडली, तिने आश्चर्याने शोभा कडे पाहिलं
“मला आश्चर्य वाटतय शोभा कशी शांत राहू शकते  तू ?आणि ह्या दोघी अशाच भांडत असतील तर घराचे कुरुक्षेत्र होत असेल.”
त्या दिवसभरात दोघींमध्ये बऱ्याच चकमकी झाल्या.
हे सर्व आठवून सुलभाला आता या दोघी नणंद भावजय एकत्र कशा राहतिल हा विचार मनात आला.

पुढे सव्वा महिना झाल्यावर सुलभा इंदौरला परतली तेव्हा दुसरे दिवशी शोभाच्या घरी भेटायला गेली.
नयना बाहेर गेली होती. प्राचीला पाहून सुलभाला भरून आले.
खूप बदललेली वाटत होती. आई विना पोरगी !
नयनाचे आणि प्राचीचे आता कसे होत असेल?
भाऊजींशी बोलता बोलता सुलभाने विचारले “कसं काय भाऊजी? प्राची आणि नयना या दोघींनाही आता तुम्हाला सांभाळावे लागत असेल ना?”

भाऊजी म्हणाले, “शोभा गेल्या पासुन हिचा अल्लडपणा बराच कमी झाला आहे. तरी पण मधुन मधुन दोघीजणीं मध्ये वादविवाद होतात.”
त्यानंतर काही दिवसांत सुलभाताईंनी सिव्हिल लाइन्स मध्ये नवीन फ्लॅट घेतला.  त्यामुळे त्यांना आता या कॉलनीत येणे सारखे जमत नव्हते.
एक दिवस नवीन घरात सत्यनारायण केला तेव्हा बोलावणे करायला म्हणून त्यांनी शोभाच्या घरी फोन केला..
प्रसाद घ्यायला सुबोध घरी आला होता.
बोलता बोलता सुलभाने विचारले “घरी कसे काय “?

त्यावर सुबोध म्हणाला “ठीक आहे काकू आता  मी नयनाला समजावले.  आई गेल्या पासून तिच्याही स्वभावात एक समजूतदारपणा दिसायला लागला आहे. प्राची आणि नयना चे आता बरेच पटते,दोघीही एकमेकींना समजून ,सांभाळून घेतात.”
सुलभाच्या मनात आल, खरंच तशा दोघीही लहानच आहेत. शोभाच्या अचानक जाण्याने दोघींवर जबाबदारी आली. विशेष करून नयनावर जास्त.
चैत्राच्या हळदीकुंकवाला काॅलनीत जाणे झाले. वेळ काढून सुलभा शोभाकडे गेली.

घरी नयना होती तिने हसत स्वागत केले , “कशा आहात मावशी? किती तरी दिवसांनी आलात” म्हणाली.
सुलभाने घरात सगळीकडे नजर फिरवली घर खूप छान आणि स्वच्छ ठेवले होते.
“वा खूपच छान घर ठेवल आहे ग. प्राची कशी आहे दिसली नाही ती ” 
“कॉलेजला गेली आहे..  येईलच.”
“शोभा अचानक गेल्याने तुझ्यावर खूपच जबाबदारी आली ग”

” हो काकू आई गेल्या त्यानंतरच मला आपल्या जबाबदारीची जाणीव झाली. प्राचीला आईची कमतरता जाणवू न देण्याचा मी प्रयत्न करते.
पूर्वी आम्ही दोघीजणी आईं समोर खूप भांडत असू .आई अचानक गेल्याने प्राचीची मानसिक अवस्था खूप वाईट झाली होती. धक्का तर आम्हा सर्वांनाच बसला होता पण प्राची आईंची लाडू बाई तिला खूप संभाळावे लागत होते. 
तिला मानसिक आधाराची गरज होती. तिला संभाळता संभाळता मी जणू तिची आईच झाले, हळूहळू ती सावरली. तिच्याही स्वभावात नरमाई येत गेली.”

नयनाच्या या बोलण्याने सुलभाच्या मनातली काळजी कमी झाली.
नयनाला दिवस गेले होते. अश्या वेळी कौतुकाने हवं नको पहाणार कोणी नव्हते. आज जर शोभा असती तर  किती कौतुकाने केलं असत, काय हवं नको ते. .
थोड्याच वेळात प्राची घरी आली मावशी म्हणून पाया पडली व वहिनीला हातातले पॅकेट देत म्हणाली, “वहिनी तुझ्या आवडीची पाणीपुरी येताना  घेऊन आले आहे.”
सुलभाकडे पाहत म्हणाली, “वहिनीला डोहाळे लागले तिखट आंबट खूप आवडत म्हणून घेऊन आले.”

नयना म्हणाली  “चहा घेणार?”
“चहा नको. कॉफी घेईन. बस तू मी करते. पण आधी खाऊन घे” म्हणत तीन प्लेट मध्ये पाणीपुरी घेऊन आली,
“मनसोक्त खा वहिनी” खाऊन होताच मस्त काॅफी ही आणली.
मग सुलभाच्या हातावर मिठाई ठेवत नयना म्हणाली, “एक अजुन आनंदाची बातमी आहे  मावशी. प्राचीचे पीएच.डी पूर्ण झाले. थिसीस सबमिट केलाय. लवकरच आपल्या प्राचीला डॉ . ची पदवी मिळणार.”

दोघींमध्ये हा झालेला बदल पाहून सुलभाला खूप आनंद झाला.
एक काळ होता जेव्हा दोघींमध्ये आडवा विस्तव होता. पण आज त्या इतक्या समंजसपणे नी प्रेमाने वागत होत्या.
तिच्या डोळ्यासमोर शोभा उभी राहिली.
शोभा असताना किती भांडत असत आणि आता जणू शोभाच्या जाण्याने दोघींना नात्याची जाणीव झालीये. 
आईचे छत्र हरवलेल्या प्राचीला नयनाने आईच्या मायेने वागवायला सुरुवात केली. तिच्या भावनांचा आदर करून प्राची ही तिची काळजी घेत होती.

दोघीजणी आता भुलाबाईंच्या गाण्यातील नणंद भावजय या ईमेज मधून बाहेर निघून प्रेमळ बहिणींसारख्या राहत होत्या. 
शोभाच्या फोटोकडे पाहताना सुलभाला वाटले आपला शांतपणा लेकीला आणि समजूतदारपणा सुनेला देऊनच शोभा गेली.
एक दिवस नयना आणि सुबोध प्राचीच्या लग्नाची पत्रिका द्यायला आले.
सांगताना चेहर्‍यावर आनंद आणि डोळ्यात पाणी होते नयनाच्या.
प्राची आणि नयनाच्या नात्यात प्रेमाच्या विणलेल्या रेशीम धाग्यांनी  नणंद भावजय या नात्याच्या भरजरी वस्राला आता जरतारी किनार लाभली होती.
©सौ. प्रतिभा परांजपे

सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
परतफेड
सासूबाईंचे माहेर

Leave a Comment

error: Content is protected !!