वटपौर्णिमा

©️ कृष्णकेशव
लताकाकू आज काहींशा चिडलेल्या आणि अस्वस्थ  होत्या.
समोर गॅसवर ठेवलेल्या कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या तरी त्यांचं लक्ष नव्हतं.
त्यांची लाडकी सुन..सविता..लग्न झाल्यापासून  आज पहिल्यांदाच त्यांच्या मनाविरुद्ध वागली होती.
त्यांच हवं नको ते रोज प्रेमानं बघणारी.. रोज ऑफिसला जाताना ‘येते हं आई’ असं न विसरता सांगून जाणारी सविता आज काहीं न बोलता  तशीच  गेली होती..आणि त्याला कारणही  तसचं  होतं..!

काल रात्री  टीव्हीवर ‘लग्नाची बेडी’ ही सिरियल बघता बघता एकदम त्यांना एकदम आठवलं आणि त्या सविताला म्हणाल्या..”सविता.. अग माझ्या लक्षातच नव्हतं. उद्या वटपौर्णिमा आहे. उद्या  लवकर उठ बाई..! ऑफिसला जायच्या आधी तुला पूजेची तयारी  करावी लागणार आहे आणि  आपल्या इथ जवळपास वडाचं झाड नाहीये. आपल्याला  पेठेत जावं लागेल..!”
“आई, मी नाही  येणार, तुम्ही  जा पाहिजे  तर..मला उद्या लवकर जायचं आहे.. ऑफिस  आहे..” समोरच्या टीव्हीवरची नजर न काढता  सविता म्हणाली..!

“अगं अस काय करतेस ? वटपौर्णिमा  आम्हा बायकांसाठी महत्वाचा सण आहे..आपल्याला सगळ्यांना सत्यवान सावित्रीची कथा माहीत  आहेच. पतीच्या दिर्घायुष्यासाठी वटवृक्षाची प्रार्थना  करायची असते कारण वडाचं झाड सगळ्या वृक्षात दीर्घायुष्यी असतं आणि शिवाय वटवृक्षाचं वैज्ञानिक महत्व पण आहेच.”
“हो मला ते माहित आहे. पण आई आजकाल वटपौर्णिमा हा दिवस बऱ्याच बायकांच्या दृष्टीनं विशेषत: नवीन लग्न झालेल्या मुलींच्या दृष्टीनं नुसता ‘इव्हेंट’ झालेला आहे.. अंगावर इरकली शालू किंवा साडी, नाकात नथ आणि हातात चांदीचे पुजेचं  तबक घेऊन नटून थटून पुजेला जाणं यालाच महत्व आलं आहे..माझ्या काहीं मैत्रिणी तर पार्लरला पण जाऊन  येतात..!

अर्थात ते चुकीचं आहे असं मी म्हणत नाही.. पण ज्या पतिप्रेमाचं प्रतिक म्हणून.. त्याला दिर्घायुष्य लाभावं..  म्हणून आपण वटवृक्षाची पूजा करतो ते ‘फॉर्मल’ झालंय  आणि दिखाऊपणा मात्र वाढलाय.. 
अर्थात वडाच्या झाडाचं पर्यावरणाच्या आणि जीवसृष्टीच्या दृष्टीने  महत्व मला माहित आहे आणि त्याच संवर्धन आणि पूजन केल पाहिजे  हेही मला मान्य आहे. पण ते पारंपारिक  पद्धतीनं, आंधळेपणानं अर्थ न समजता वडाच्या झाडाला केवळ दोरे गुंडाळून करणं आणि  फूलं हळदीकुंकू वाहून नमस्कार करणं म्हणजे ना त्यातून पुजेचं समाधान ना प्रार्थनेची फलश्रुती..!” कधी नव्हे ते एवढं एका दमात बोलून  सविता उठली आणि  झोपायला निघून गेली..

लताकाकूंना धक्काच बसला होता. एकीकडे त्यांना सविताचं म्हणणं काहींस पटलं होतं तर दुसरीकडे आपल्या पारंपारिक रूढी आणि धार्मिक संस्कारामुळ वटवृक्षाची पुजा न करणं त्यांना आतून अस्वस्थ करत होतं..
एवढा वटपौर्णिमेचा आनंदाचा दिवस असूनही त्यांना उत्साह वाटतं नव्हता..
आणि बघता बघता त्यांच मन तीस वर्षांपूर्वी लग्न झाल्यानंतर आलेल्या पहिल्या वटपौर्णिमेच्या ‘त्या’ प्रसंगात रंगून गेलं.. 
लताकाकूंच माहेर तसं सोलापूरचं.

नुकतीच  वडाची पूजा करून आलेली गोरीपान लता नऊ वारी हिरवा शालू आणि लालसोनेरी बांगड्यामध्ये खुलून दिसत होती आणि तशाच त्या वेशभूषेत उशीर झाल्यामुळे घाईघाईत जेवायला बसलेल्या वसंताच्या ताटात  तिनं सासरी आल्यावर पहिल्यांदाच बनवलेली शेंगा दाण्याची चटणी वाढली होती… आणि लताच्या हातची  उखळात कांडलेली त्या चवदार चटणीची चव जिभेला लागताच तो उत्स्फूर्तपणे  बोलून गेला होता ” लता.. क्या बात है..! अशी चटणी मी आयुष्यात आजपर्यंत कधी खाल्ली नाहीय..! अफलातून ..!!

बस्स… आजपासून रोज तुझी ही चटणी ताटात आली पाहिजे प्लीज..!  वाटल्यास मीच तुझ्या त्या वडाच्या झाडाची पूजा करतो आणि प्रार्थना करतो हीच बायको मला जन्मोजन्मी  मिळू दे आणि तिच्या हातची ही दाण्याची चटणी मला खायला मिळू दे म्हणून..!”आणि आजुबाजुला कोणी नाही हे पाहून त्या चटणीचा एक घास त्यानं तिला भरवला होता.. 

आणि त्या वटपौर्णिमेपासून ते आजपर्यंत वसंतरावांच्या ताटात ती चटणी आली नाही असा एकही दिवस गेला नव्हता. आपल्या पतिची आवड पूर्ण करण्याचं  त्या वटपौर्णिमेच्या दिवशी घेतलेलं हे व्रत तिनं त्याच्या प्रेमापोटी आयुष्यभर सांभाळलं होतं..किंबहुना  वटवृक्षाची अजाणता केलेली ती एक पूजा होती..! 
लताकाकू गतकाळातल्या त्या प्रसंगातून बाहेर आल्या..
सविताच्या बोलण्याचा आणि वटपौर्णिमेच्या पूजेचा एक वेगळा अन्वयार्थ त्यांना आता उमगला होता… 

सवितावर आलेल्या रागाची जागा आता कौतुकानं घेतली होती.
सविताच्या ऑफिसमधून येण्याची त्या आतुरतेनं वाट पाहू लागल्या.. 
आणि संध्याकाळी सविता लवकरच घरी आली.
घाई घाईनं आपली पर्स सोफ्यावर टाकून म्हणाली..”आई, तुमच्या साठी मी एक सरप्राईज  आणलंय.. मी आणि माझ्या गृपमधल्या पाच मैत्रीणीनी आजची वटपौर्णिमा वेगळ्या पद्धतीनं साजरी करायचं ठरवलं होतं आणि आई मनापासून सॉरी हं..तुम्हाला आधी सांगितलं नाही.

आज मी ऑफीसला गेले नव्हतेच.. आम्ही सगळ्या मिळुन आज कात्रजला महापालिकेची नर्सरी आहे तिथे गेलो होतो आणि तेथून वडाच्या काड्या लावलेल्या पाच कुंड्या आणि बीजाची पाच पाकीट घेऊन आलोय..
आणि आम्ही  आज  त्या कुंड्यातल्या रोपाचं आणि बीजाचं आपापल्या सोसायटीच्या  आवारात किंवा आजुबाजुच्या परिसरात योग्य ठिकाणी  रोपण करणार आहोत.

बर का.. आई, सविता उत्साहानं सांगायला लागली..”एवढंच नाही तर त्याला लागणार कुंपणाची खर्च पण आम्ही करणार आहोत. आमचं  सोसायटीच्या चेअरमनशी आधीच बोलणं झालंय आणि त्यांनी आनंदानं आम्हाला संमती दिलीय आणि सांगायचं राहिलंच..नर्सरीतून येताना तिथल्या वटवृक्षाच्या खाली पडलेल्या पाच फांद्या आणि पाच पानं तुम्हाला पूजेसाठी घेऊन  आलोय.

झाडावर असलेल्या निरपेक्षपणे सगळ्यांना अविरत सावली देणारया हिरव्या पानांना न तोडता,  सगळ्यांना सावली देऊन गळून पडलेल्या पानांची पूजा करणं हीच खरी कृतज्ञता असणार आहे.. हीच खरी ‘वटपौर्णिमे’ची पूजा असणार आहे..!! ..हो की नाही..?”
ती वटवृक्षाच्या पानं असलेली पिशवी सवितानं लताकाकूंच्या हातात दिली आणि साडी चेंज करायला ती बेडरूम मध्ये निघून  गेली..!

लताकाकूं सविताकडे बघतचं राहिल्या.. 
लताकाकूंचं ऊर आज भरून आलं होतं..
डोळ्यात आनंदाश्रूनी दाटी केली होती..!
जणू काहीं  ‘सावित्रीची लेक’ आज प्रत्यक्ष त्यांच्या घरी  अवतरली  होती..!!
समाप्त
वटपोर्णिमा साजरी करण्याची सविताची ही नवी पद्धत कशी वाटली ते कमेंट्समधून आम्हाला जरूर कळवा.
©️ कृष्णकेशव

सदर कथा लेखक कृष्णकेशव यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
दृष्टी
जाणीव

Leave a Comment

error: Content is protected !!