© डॉ निशिगंधा कुलकर्णी
आशुतोष आज खूप उत्साहात होता. आत्मविश्वासाने त्याचे मन भरून गेले होते. अर्थात कारणही तसेच होते.. आज ‘फुलोरा’ संस्थेतर्फे दर तीन वर्षांनी नव साहित्यिकांसाठी घेण्यात येणाऱ्या कथा स्पर्धेचा निकाल जाहीर होणार होता.
होतकरू लेखकांमध्ये ह्या स्पर्धेत बक्षीस मिळणे हे अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाई. या स्पर्धेत आशुतोषला नामांकन मिळालं होतं. आशुतोषला पूर्ण खात्री होती की त्याच्या ‘आभास ‘ह्या कथेलाच पहिलं बक्षीस मिळणार.
हे बक्षीस मिळणं म्हणजे त्याच्यासाठी दिग्गज लेखकांच्या यादीत त्याचं नाव येण्याची नामी संधी होती.
पूर्ण आत्मविश्वासाने आशुतोषने ‘प्रांगण’ सभागृहात प्रवेश केला. सभागृह स्पर्धकांनी भरून गेले होते.
एखाद दुसरे ‘सेलिब्रिटी लेखक’ सुद्धा उपस्थित होते. पण कोणाशीही स्वतःहून बोलायला जायचं सौजन्य आशुतोषने दाखवलं नाही. नामांकन मिळालेल्या स्पर्धकांची यादी सभागृहात लावली होती. आशुतोषने त्या यादीतील नावं पाहिली. स्वतःचं नाव त्या यादीत पाहून तो पुन्हा एकदा सुखावला.
एखाद- दोन ओळखीची नावंही त्या यादीत होती. काही मासिकांच्या कथा स्पर्धेत आशुतोषला दुसरा किंवा तिसरा क्रमांक मिळालेला, त्याच स्पर्धांमध्ये यादीतील 1-2 लेखकांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळालेले.
ती नावं पाहून आशुतोषला क्षणभर इनसिक्युअर वाटलं.. पण लगेचच त्याने स्वतःच्या मनाला समजावलं.
पहिली सगळी अध्यक्षीय भाषणं संपल्यानंतर एकदाची ती वेळ येऊन ठेपली… विजेता स्पर्धक घोषित होण्याची.. परिक्षकांनी विजेत्या स्पर्धकाचे नाव घोषित करायच्या आधीच आशुतोष स्वतःच्या खुर्चीतून उठून जवळपास स्टेजच्या दिशेने चालायला लागला होता.. आणि परिक्षकांनी विजेत्याचे नाव प्रकारले आणि….
विजेत्या लेखकाचे नाव आहे.. अवंतिका… संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणले…
त्याक्षणी आशुतोष आहे त्या जागी स्तब्ध झाला.. आपण कोणाचे नाव ऐकले.. कोण ही अवंतिका.??
आपल्याला घेरी येतीये असं वाटून त्याने पटकन जवळच्या खुर्चीचा आधार घेतला.
प्रचंड रागाने आणि अपमानाने आशुतोष लालबुंद झाला होता. कोणाशीही न बोलता ह्या क्षणी सभागृहातून निघून जाण्यासाठी तो ताडकन उठला.
तो निघणार इतक्यात त्याच्या कानांवर निवेदकाचे शब्द आले..अवंतिका ह्या नावाने लेखन करणाऱ्या ह्या लेखिकेचे खरे नाव आहे सुषमा अभ्यंकर..
सुषमा अभ्यंकर हे नाव ऐकल्यावर आशुतोष स्वतःच्याही नकळत पटकन थांबला.. स्टेजवर बक्षीस घेण्यासाठी येणाऱ्या लेखिकेला आशुतोषने पाहिले.. ही तर .. सुषमा.. आपली कॉलेजमधली मैत्रिण.. ही इथे काय करतीये.. हिला मिळालंय बक्षीस ??
नक्कीच काहीतरी घोळ असला पाहिजे.. सुषमासुद्धा छान लिहिते हे तो जवळजवळ विसरून गेला होता..
सुषमा अभ्यंकर यांनी बक्षीस स्विकारले.. आणि त्या फक्त एवढंच म्हणाल्या “आपण मनापासून लिहिलं की वाचकांना ते आवडतंच.”संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेलं.
आशुतोषला क्षणभर वाटलं ही अगदी आधी होती तशीच आहे.
आशुतोषला भूतकाळातल्या गोष्टी आठवू लागल्या.. ” आशु, हे बघ ना, मी हा एक ललितलेख लिहिलाय.. जमलाय का बघ जरा..”
“ए सुषमा.. काहीही काय.. तू आणि काहीतरी लिहिलंयस..तूला जमणार तरी आहे का असं छान काहीतरी लिहायला.. परीक्षेतले पेपर्स आणि फारतर वाण्याची यादी या पलिकडे तुझी मजल जाऊच शकत नाही.
का आता मला माझ्या उत्तम लिखाणामुळे मिळणारं यश बघून तूलाही लिहावसं वाटतंय?? पण कसं आहे ना..प्रत्येकाने आपल्याला जमतील अशाच गोष्टी कराव्यात.. छान लिहिणं is not your cup of tea madam”
किती घालूनपाडून बोललेलो आपण सुषमाला !
एकदा मराठीच्या परचुरे सरांनी तिच्या निबंधाचं खूप कौतुक करून तिला कॉलेजच्या मासिकासाठी लेख लिहिण्याविषयी सुचवलं आणि लेख लिहिण्यासाठी ती तयारही झाली तेंव्हा किती चिडलेलो आपण तिच्यावर.
परचुरे सरांना मुलींवर इम्प्रेशन पाडायचं असतं म्हणून उगाच तुला हरभऱ्याच्या झाडावर चढवतायंत असं काहीबाही बोललेलो आपण तिला.. राग येण्यापेक्षाही इनसिक्युअर झालेलो बहुधा आपण..खरं म्हणजे सुषमा चांगलं लिहीते असं आपल्यालाही वाटायचंच..पण कदाचित आपल्यातली इनसिक्युरिटी आणि प्रियकराचा पुरूषी अहंकार आपल्याला ते उघडपणे मान्य करू देत नव्हता.
आपण कॉलेजमध्ये लिहिलेल्या कथा-ललितलेख हे सुवाच्य अक्षरात जसंच्या तसं लिहिण्या पलिकडे सुषमाला साहित्य लेखनातील काहीही जमणार नाही हेच आपण जाणीवपूर्वक सुषमाच्या मनावर सतत बिंबवत राहिलो.
कॉलेजमध्ये आपल्याला अनेक कथा स्पर्धांमध्ये बक्षीसं मिळाल्यावर आंतरमहावाद्यालयीन एकांकिका स्पर्धेत आपल्या कॉलेजसाठी एकांकिका लिहिण्याची संधी आपल्याला मिळू लागली.
त्यावेळीही जिथेजिथे आपण अडलो तिथे प्रत्येक वेळी सुषमाच आपल्या मदतीला आली होती.. तिला सहजपणे सुचलेल्या कल्पना, स्क्रिप्टचा ग्राफ आपण एकांकिकेमध्ये वापरू लागलो अर्थात त्यासाठी कोणत्याही प्रकारचं क्रेडिट तिला न देता.. आणि ती सुद्धा ते क्रेडिट मागायची नाही.
नंतर नंतर तर आपल्याला कोणीही काहीही विषय द्यावा आणि आपण त्याच्यावर फारसा विचार न करता संहिता लिहावी असंच होऊ लागलं. दोन- तीन वेळातर दिग्दर्शकाशी ह्यावरून वादही झाला.. पण आपण करतोय तेच बरोबर आहे ह्यावर आपण ठाम होतो..
आपलं वागणं सुषमालाही पटत नव्हतं.
ह्यावरून खूप हिंमत करून एकदाच सुषमा आपल्याला बोललेली-
“आशु,अरे असं लिहायला बसलं की लगेच कसं सुचेल नेहमीच? थोडा वेळ द्यायला हवा, त्यासाठी मन शांत असायला हवं.मनात हजारो विचार येत असताना आणि केवळ डेडलाईन जवळ आली आहे म्हणून भराभर लिहित गेलास तर ती संहिता कधीच फुलणार नाही.. अशाप्रकारे लिहित राहिलास तर तुझं लेखन रसिकांच्या हृदयाला भिडणारच नाही. लेखकाने त्याला सहजपणे सुचलेल्या कल्पना निर्मळपणे रसिकांच्या स्वाधीन कराव्यात. त्यात जर खरेपणा असेल तर रसिक मायबाप नक्कीच त्या कल्पना स्विकारतात. अशा लेखनावर भरभरून प्रेम करतात.” इति सुषमा.
“वा.. आता तुझ्याकडून शिकावे लागेल मला चांगलं कसं लिहावं ते.. इतकेही वाईट दिवस नाही आले माझ्यावर…म्हणे शांतपणे विचार करायला हवा, शांतपणे विचार करत बसलो तर माझ्या हातातली कामं जातील” इति आशुतोष.
तिचे हे असले विचार किती बालीश वाटायचे आपल्याला…
आपण कोणत्याही विषयावर उत्तमच लिहू शकतो अशा गुर्मीत असणाऱ्या आपल्याला सुषमाचे हे असले विचार पटणे शक्यच नव्हते. किती भांडलो आपण तिच्याशी.
आणि आपण स्वतःहून तिच्याशी ब्रेक-अप केले.. किती रडली होती ती.. पण आपल्यावर कशाचाच परिणाम झाला नाही.
आशुतोष एकदम भानावर आला.
त्याला वाटलं..खरंच बरोबर आहे का आपलं ?? का चुकतंय आपलं काहीतरी ?? गेले कित्येक महिने यश हुलकावणी देतं आहे. हा सतत यश मिळवण्याचा अट्टहासच आपला घात करतो आहे का? काहीतरी छान उत्स्फुर्तपणे सुचलं आहे, एखाद्या कथेचा विषय आपसुक सुचला आहे आणि मग सहजरित्या ती कथा आपण लिहिली आहे.. असं शेवटचं कधी झालं आहे.. गेली काही वर्षं कुठली तरी स्पर्धा जिंकायची म्हणूनच आपण लिहित राहिलो..सतत जिंकायचं प्रेशर घेऊनच लिहायला लागलो.. आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम होऊ लागला आहे.. आपल्या लेखनातला सहजपणा हरवत चालला आहे.. म्हणूनच हल्ली आपलं लेखन हलकं फुलकं न होता ओढून ताणून लिहिल्यासारखं होत असावं.. सुषमाचा कल बक्षीस मिळण्यापेक्षाही तिचं लेखन जास्तीत जास्त प्रगल्भ कसं होईल ह्याकडे असायचा, आणि म्हणूनच
अशाप्रकारचं दर्जेदार लेखन निर्मळपणे केल्यानेच तिला यश मिळालं. आशुतोषला पुन्हा जाणवलं… उत्स्फुर्तपणे एखादी कल्पना सुचल्यानंतर ती कल्पना फुलवत नेण्याचा आनंद कैक पटींनी अधिक असतो.. अशावेळी जे लेखन होतं ते निर्भेळ, प्रगल्भ आणि अत्यंत सात्विक होतं.. आणि हे असंच लेखन वाचकांना आवडतं..
त्या क्षणी आशुतोषने ठरवलं.. केवळ यश मिळवायचं म्हणून उगाचच ओढून ताणून लिहायचं नाही.. उत्स्फूर्तपणे सूचेल तेंव्हाच लिहायचं..आपल्या लेखनातून हे ‘सात्विकतेचं देणं’ वाचकांना द्यायचं..
जणू एका प्रगल्भ लेखकाचा आता जन्म नव्याने होणार होता..
आशुतोषने ठरवलं-तो मनापासून सुषमाची माफी मागणार होता,तिच्यामुळे आपल्याला शहाणपण आलं हे स्वच्छ मनाने तिच्यापुढे कबूल करणार होता.
© डॉ निशिगंधा कुलकर्णी
सदर कथा लेखिका डॉ निशिगंधा कुलकर्णी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
दीपस्तंभ
जाणीव