त्यांचं काय चुकलं??

© सौ.गौरी गिरीश पटवर्धन
दीड दोन वर्षांपूर्वी बरेच दिवसांनी, म्हणजे जवळजवळ सात आठ वर्षांनी आजोळी जाणं झालं. रेल्वे स्टेशन येणार म्हणून सामान घेऊन दरवाज्यापाशी येत होते, तेवढ्यात एक पन्नाशीच्या आसपास वय असणारे गृहस्थ मागच्या कोच मधुन आले आणि माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे, मुलगा सांगा असं सगळ्यांना सांगत होते, अगदी डोळ्यात पाणी येत होतं त्यांच्या.
नीट बारकाईने पाहिले तेव्हा ते आमच्या आजोबांच्याच आळीतील काका वाटले. पण खात्री नव्हती म्हणून काही बोलले नाही.
स्टेशन आलं, आम्ही म्हणजे मी आणि माझी  दोन मुलं खाली उतरलो, ते काका पण उतरले.

रिक्षा स्टँडवर प्रत्येकाला परत तेच माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे मुलगा सांगा असं सांगत होते.
सगळेजण त्यांना धुडकावून लावत होते.
मी रिक्षेत बसले , रिक्षा चालू झाली आणि मी त्या रिक्षा दादांना विचारलं की हे कोण होते, ते असं का वागत होते?
तेव्हा त्यांनी जे मला वाटलं होतं तेच नांव सांगितले , ‘अहो ताई ते गणपती मंदिरा जवळ राहतात ते जोशी काका आहेत. बायको , आणि दोन्ही मुलींनी फसवून सगळं लुबाडून यांना घराबाहेर काढले. तेव्हा पासून हे असेच भटकत असतात.’
मग मी काही जास्त विचारलं नाही.

घरी आल्यावर संध्याकाळी आजीला विचारले तर तिने सांगितले ते सत्य एवढे भयंकर होते की ऐकून विश्वासच बसत नव्हता.
हे जोशी काका चांगले कमवत होते. भरपूर ओव्हरटाईम करत होते. घरात सुबत्ता होती, दोन घरं ,शेती वाडी अशी मालमत्ता होती. आमच्या आळीत त्यांना एक श्रीमंत कुटुंब म्हणून ओळखले जायचे. शिवाय स्वभावाने पण अतिशय दयाळू होते, अडल्या नडल्याला चटकन मदत करायला तयार असत .
त्यामुळे त्यांना सगळे मान ही देत होते. दोन मुली होत्या.

कॅन्सरचं निमित्त होऊन बायको वारली. मुली अडणेड्या वयाच्या होत्या त्यामुळे सगळ्यांनी त्यांच्या मागे लागून त्यांचे दुसरे लग्न लाऊन दिलं आणि इथेच गडबड झाली.
ती दुसरी बायको खराब चालीची निघाली.
तिचे आधीच कोणाशी तरी प्रेम होते, पण घरच्यांनी पैशाच्या मोहात या वयस्कर माणसाशी लग्न लावून दिले होते.
हे काका नोकरी वर गेले की बायकोचा प्रियकर घरी यायचा आणि संध्याकाळी यांच्या येण्यापूर्वी परत जायचा.
त्या दोघी मुलींना पण खूप राग यायचा त्या दोघांचा. पण काय करणार, गप्प बसायच्या दोघी.हळूहळू

त्या मुलीही वाया जाऊ लागल्या. मोठीने पळून जाऊन लग्न केले. काकांना खूप वाईट वाटले.
दरम्यान काकांच्या बायकोला पण मुलगा झाला, अर्थात तो काकांचा होता की प्रियकराचा हा एक प्रश्नच होता.
सगळ्या गोष्टी काकांच्या कानावर येत होत्या,पण नाईलाजाने ते रहात होते. बायको ही अशी आणि मोठी मुलगी पळून गेली त्यामुळे सगळ्या नातेवाईकांनी त्यांच्याशी संबंध तोडले.
मित्र सुद्धा जेवढ्यास तेवढंच बोलायचे. असे सगळीकडून गांजून गेले होते काका.

एके दिवशी दोन्ही मुलींनी संगनमताने नोकरी साठी अर्ज करण्याच्या निमित्ताने त्यांच्या कडून प्रॉपर्टी च्या पेपर वर सह्या करून घेतल्या. दोन्ही घरं स्वतः च्या नावावर करून घेतली. हे कळल्यावर त्यांच्या बायकोने धमकी देऊन शेती वाडी स्वतः च्या नावावर करून घेतली व मुलाला घेऊन कायमची प्रियकरा कडे पळून गेली.
हे सगळं असं घडल्या वर काकांच्या मनावर आणि पर्यायाने डोक्यावर परिणाम झाला.
ते वेड्यासारखे वागू लागले. दिवसभर भटकत फिरु लागले. पण तशाही अवस्थेत त्यांना लहान मुलीच्या लग्नाची काळजी वाटत होती. ते सगळ्यांना मुलगा सांगा मुलगा सांगा असं बोलू लागले पण अशा मुलीला कोण पत्करणार .

शेवटी परिस्थिती अगदीच हाता बाहेर गेली आणि ते ठार वेडे झाले. बोलणं चालणं बंद झालं ,खाण्या पिण्याची शुद्ध नसायची. कोणी कधी काही दिलं तर खायचे, कधी नाही पण खायचे.
खूप चांगला माणूस होता म्हणून लोक खायला द्यायचे, कपडे द्यायचे. पण त्यांना तर कसलेच भान राहिले नाही.
आता ते असेच इकडे तिकडे फिरत असतात व मुली साठी मुलगा शोधत असतात.
लोकांनी त्यांना मुलीं विरूद्ध केस करायला पण सांगितले पण ते म्हणाले मुलींच्या विरोधात काय जाऊ. जे आहे ते ठीक आहे.

आजी पुढे सांगू लागली की एकदा तर त्यांच्या बायकोने घरेलु हिंसाचार करतात, मारतात, उपाशी ठेवतात अशी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अटक केली होती. खोटं खोटं मारलेलं दाखवलं होतं तिने. चार खोटे साक्षीदार ही उभे केले होते.
पण तुझे आजोबा, गावातले सरपंच आणि इतर लोकांनी कोर्टात काकांच्या बाजूने साक्ष देत ते किती चांगले आणि सज्जन आहेत आणि ते असं काही करूच शकत नाहीत हे समजावून सांगितले त्यामुळे त्यांना निर्दोष सोडण्यात आले.
त्या नंतर तर काकांनी स्वतः ला घरात कोंडून घेतले होते.
मोठ्या प्रयत्नांनी गावातल्या लोकांनी त्यांना यामधून बाहेर काढले.

थोडं कुठे नीट होतंय तर मुलींनी रंग दाखवले. एका नंतर एक अशा घटना घडल्या आणि ते जास्तच मानसिक आजारी होऊ लागले. बायको घर सोडून निघाली तेव्हा यांनी मुलाला माझ्याकडेच ठेवून जा असं सांगत होते तर चक्क म्हणाली की तो तुमचा मुलगा नाही. काय बोलणार बिचारे ते.
घर सोडून गेली तेव्हा घरातील एकेक वस्तू घेऊन गेली ,साधा पिठलं भात करायला सुद्धा सामान नाही ठेवलं गं घरात.
मध्यंतरी ते बरेच आजारी होते. दवाखान्यात ऍडमिट होते तर मुली सुद्धा भेटायला आल्या नाहीत.
तरीही त्यांना लहान मुलीच्या लग्नाची काळजी वाटत होती, वधुवर संशोधन केंद्रात नांव नोंदवलं, किती तरी लोकांना सांगितले की मुलगा सांगा.

पण घराची आणि मुलींची एवढी बदनामी झाली आहे तर मुलगा मिळत नाही. कोणीही लग्नाला तयार होत नाही. त्यामुळे ते सैरभैर झाले आहेत. एकदा तर रेल्वे रूळावर जाऊन बसले होते, पण कोणा भल्या माणसाने त्यांना वाचवलं.
अशा वागण्याने कामावरून पण काढून टाकले त्यांना. गावातल्या लोकांनी त्यांना वेड्यांच्या दवाखान्यात दाखल केले. बरेच महिने ते तिकडे होते. इलेक्ट्रिक शॉक वगैरे दिले त्यांना तिकडे असं ऐकायला आलं होतं.
पण त्या उपायांमुळे ते जास्तच बिथरले.जास्तच बेभान होऊ लागले. मग दिवस दिवस त्यांना बांधून, कोंडून ठेवत असत.

जवळ जवळ सहा सात महिन्यात थोडे निवळले व शांत शांत राहू लागले. हल्ली हल्लीच त्यांना दवाखान्यातून बाहेर सोडले.
आता तसे बरे आहेत पण मुलीच्या लग्नासाठी मुलगा मात्र सतत शोधत असतात.
असे हे जोशी काका, देवमाणूस होते पण त्यांची अशी दैना झाली.
ऐकून खूप वाईट वाटलं.पण मनात आलं नुसतं वाईट वाटून चालणार नाही. काहीतरी करायला पाहिजे.
आजी कडून जेव्हा परत आले तेव्हा एकच विचार मनात घोळत होता की त्या काकांच्या साठी काय करता येईल.
मग मी ही सगळी कहाणी माझ्या मिस्टरांना सांगितली .ते म्हणाले बघतो काय करता येईल ते.

दोन दिवसांनी माझे मिस्टर म्हणाले की त्यांच्या मित्राचा भाऊ वकील आहे, त्याला विचारून बघतो. मला थोडी आशा वाटू लागली. तीन चार दिवसांत च ते मित्र आणि त्यांचा भाऊ आमच्या कडे आले. सगळी हकीगत ऐकून म्हणाले की त्यांची प्रॉपर्टी परत मिळू शकते, कारण हल्ली मुलांच्या नावे केलेली प्रॉपर्टी जर मुलं आई वडिलांना सांभाळत नसतील तर ती त्या पालकांना परत घेता येते.
लगेच ते दोघे आणि माझे मिस्टर गावाला गेले.
आजोबांना मी कळवले होते त्या प्रमाणे त्यांनी जोशी काकांना आणि गावातील मान्यवर माणसांना बोलावून घेतले होते.

मग दोन दिवस तिकडे राहून सगळी माहिती काढून वकिलांनी दोन्ही मुलींना आणि काकांच्या बायकोला रितसर नोटीस पाठवली. सुरूवातीला हो – नाही करत होते पण कायद्याची भाषा आणि गावातील लोकांनी धमकवल्या वर सगळ्यांनी मुकाट्याने सह्या केल्या.
महिना भरात सगळी कायदेशीर कारवाई होऊन काकांची प्रॉपर्टी त्यांच्या नावावर परत मिळाली.
प्रॉपर्टी हातातून निसटून जाते असं पाहिल्यावर मुली क्षमा मागत म्हणाल्या की चुकलं आमचं,आता यापुढे आम्ही नीट सांभाळू बाबांना, कसलाही त्रास होऊ देणार नाही.
पण लोकांनी त्या दोघींवर विश्वास ठेवला नाही.

पण काकांना जगाची शुद्ध च राहिली नव्हती, मग ते त्या प्रॉपर्टी चं काय करणार हा प्रश्न होता. मग गावचे पंच , सरपंच आणि वकील या सर्वांनी हळूहळू करून ती सगळी प्रॉपर्टी विकून त्याचे पैसे काकांच्या नावावर करून काकांना एका उत्कृष्ट वृद्धाश्रमात ठेवले. जिथे त्यांचा शारीरिक व मानसिक दोन्ही गोष्टींचा इलाज होणार होता.
आणि पुढेमागे काका गेल्यावर राहिलेली संपत्तीत्याच आश्रमाला दान मिळणार होती. अशी सगळी व्यवस्था करण्यात आली.
आज या गोष्टीला दीड वर्ष झालं. अधुन मधुन माझे आजोबा किंवा गावातील कोणी काकांना भेटायला जात असतात.
आता काका बरेच भानावर येत आहेत असे कळते.

तरीही त्यांना मुलीचं लग्न करायचं होतं, सारखं सारखं एकच बोलायचे, मुलगा सांगा. मग यावर तोडगा म्हणून गावकऱ्यांनी एका गरीब मुलीचं लग्न काकांच्या हातून लाऊन दिलं, त्यांच्या पैशातून त्या गरीब जोडप्याला संसारोपयोगी काही वस्तू ही दिल्या.
मुलीची पाठवणी करताना काका खूप रडले. पण मुलीचं लग्न झालं हे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. पण आता काका त्या कडू आठवणी तून हळूहळू बाहेर येत आहेत. थोडे नॉर्मल वागत आहेत. त्या वृद्धाश्रमातील इतर सदस्यां बरोबर थोडं बोलू लागले आहेत. कधीकधी असंबद्ध बोलतात पण तिथली मंडळी त्यांना समजून घेतात व त्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करतात.

हे ऐकून मनाला खूप समाधान मिळते की चला आपण कोणा साठी तरी काही करू शकलो. आणि हो, विशेष म्हणजे त्या वकील मित्राने हे सगळं करण्याचा एक रूपया ही घेतला नाही. 
परत कधी तरी आजी कडे जाईन तेव्हा काकांना नक्की भेटून येईन आणि मला खात्री आहे की काका हळूहळू नक्कीच पूर्ववत होतील.
पण तरीही मनाला राहुन राहुन वाटतं की त्यांचं काय चुकलं!!
© सौ.गौरी गिरीश पटवर्धन
सदर कथा लेखिका सौ.गौरी गिरीश पटवर्धन यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
दीपस्तंभ
जाणीव

5 thoughts on “त्यांचं काय चुकलं??”

Leave a Comment

error: Content is protected !!