नकार

© सायली जोशी
आज तो अचानक समोर आला आणि तिला काय बोलावं हेच सुचेना. त्याच्या हाताशी दोन चिल्लीपिल्ली होती अन् पलीकडे बायको! 
क्षणभर तिच्या मनात आलं, ‘आज त्याच्या बायकोच्या जागी आपण असतो आणि ही दोन चिल्लीपिल्ली मला ‘आई ‘म्हणाली असती. खरचं किती गोंडस आहेत ही मुलं!’
‘पण तू आपल्या लग्नाला नकार दिला नसतास तर हे शक्य होतं. अगदी अखेरपर्यंत मला कळालचं नाही रे, मी कुठे कमी पडले? आपलं नातं टिकवण्याचा मी मनापासून प्रयत्न केला होता. हे अनोखं नातं मी हृदयात जपलं होतं, आपली मैत्री जीवापाड जपली होती.
तू असं का वागलास? हे विचारायची संधी देखील मला मिळाली नाही. मला नकार दिल्यानंतर जेमतेम पंधरा दिवसांतच तू लग्न करून मोकळा झालास.’ ती मनात म्हणाली.

“अहो, असे काय पाहता? मैत्रीण आहे ना ती तुमची? अनेक वर्षांनी भेटला असाल एकमेकांना! आपण कॅफेमध्ये बसून बोलूया का?” त्याची बायको म्हणाली.
“हम्म.” 
“अजूनही सवय बदलली नाही तर? तुझी संभाषणाची सुरुवात नेहमी ‘हम्म’ यानेच होते.” ती हसून म्हणाली.
“हो ना. हे पहिल्यापासूनच असे आहेत का? म्हणजे जास्ती कोणाशी बोलत नाहीत. शांत असतात नेहमी.” त्याची बायको गोड हसून म्हणाली.

‘पण तिला काय माहित? नेहमी किती उत्साही राहायचास तू? सगळ्या गोष्टीत आनंद शोधायचास. तुला सरप्राईज खूप आवडायचं, खास करून मी दिलेलं.  आता हे मी तिला कसं सांगणार? आधी तू प्रचंड बडबडायचास आणि मी शांत असायचे. किती हुशार होतास तू! एकपाठी होतास आणि मी..दिवस दिवस अभ्यास करत असायचे.  तू मला नेहमी चिडवायचास, हळूबाई म्हणायचास. मग मी रुसून बसायचे. 
माझा रुसवा काढायला तुला पुरते दोन दिवस लागायचे. आताही मी तुझ्यावर रुसले आहे. पण हा रुसवा आयुष्यभरासाठी आहे. जो तू काढायला पुन्हा कधीच यायचा नाहीस. हे पक्क ठाऊक आहे मला. तुझं अंतरंग मी अनुभवलं आहे रे. मनापासून प्रेम केलं आहे तुझ्यावर.’

“बाबा, भूक लागली. आईस्क्रीम खाऊया का?” त्याची चिल्लीपिल्ली दंगा करायला लागली आणि ती भूतकाळातून बाहेर आली.
मुलांचा ताबा आता त्याच्या बायकोने घेतला.
“येताय ना दोघे? समोर बसून बोलू आपण.” असे म्हणत ती समोरच्या कॅफेमध्ये शिरली.
आरोही तिच्या पाठोपाठ नाईलाजाने आत आली. तो नेमका तिच्यासमोर येऊन बसला. कारण तीच एकमेव जागा शिल्लक होती. त्याच्या मनातली चलबिचल नेहमीप्रमाणेच डोळ्यातून व्यक्त होत होती. आळीपाळीने तो बायको आणि मुलांकडे पाहत होता.

“तुम्ही काय घेणार?” अचानक त्याच्या बायकोने हाक मारली.
“काहीही चालेल आणि मला तुम्ही म्हणू नको गं. एकेरी नावानेच हाक मार. ते जास्त छान वाटेल.” आरोही म्हणाली. तशी त्याची बायको, बेला छान हसली.
“तुम्ही दोघे बोला. मी मुलांना घेऊन पलीकडे बसते.”  
बेला मुलांना घेऊन पलीकडे जाऊन बसली खरी. पण तिचे सारे लक्ष या दोघांकडे होते.

“कसा आहेस?” 
“मस्त..” तो तिची नजर चोरत म्हणाला.
“बाकी? आई -बाबा कसे आहेत?”
“सगळं छान आहे.”
“तुझी मुलं किती वर्षांची आहेत? फारच गोड आहेत ती.”
“चार आणि तीन.” 

त्याचे सगळे लक्ष आपल्या बायकोकडे होते. कदाचित ती घरी जाऊन कशी रिॲक्ट होईल, याचा अंदाज त्याला लावता येत नसावा. 
“ऐक, तुला तुझ्या बायको समोर ऑकवर्ड फिल होईल असे प्रश्न मी अजिबात विचारणार नाही. तू नको काळजी करू.” हे ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचा ताण सैल झाला. 
“घे.” त्याच्या पुढ्यातला आईस्क्रीमचा कप त्याने तिच्या पुढ्यात सरकवला.
“तुझी बायको खूप छान आहे रे. अगदी तुला शोभेल अशी!” ती एकटक त्याच्याकडे पाहत म्हणाली.

“हम्म. खरचं खूप समजूतदार आहे ती. तिचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे.” इतक्या वेळात पहिल्यांदाच तो सलग मोठं वाक्य बोलला होता.
“बायकोचं आपल्या नवऱ्यावर प्रेम असणं साहजिकच आहे. पण तुझं प्रेम आहे तिच्यावर?” बोलता बोलता तिने आईस्क्रीमचे तीन -चार घास एकदम तोंडात कोंबले. त्यामुळे तिला ठसका लागला.
“आरोही, अगं हळू..” बेला जवळ जवळ ओरडलीच. 
“अहो, नुसते पाहता काय? पाणी तरी द्या तिला आणि तू..गं, आवडतं म्हणून कोणी असं घाईला येऊन खातं का?” बेला तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली.

“डोन्ट वरी. मी ठीक आहे बेला. आपल्या आवडीचं सगळंच आपल्याला वेळेवर मिळतं असं नाही. मग जेव्हा ते समोर आहे तेव्हा त्याचा आनंद का नाही घ्यायचा?” आरोहीच्या डोळ्यात पाणी होतं. ते पाहून बेला दोन पावलं मागे सरकली.
“मी तुमच्या मधे आले का?” बेला त्या दोघांकडे पाहत म्हणाली.
“म्हणजे? तुला माहिती..” आरोही आपले डोळे पुसत म्हणाली.
“हो. मला माहिती आहे. यांनीच तर सांगितलं आहे सारं. एक बोलू का? मला वाटतं आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. जुन्या आठवणी उगाळण्यात काहीच अर्थ नाही. त्या मनाच्या कप्प्यात छान जपून ठेवा.

आरोही, मी तुला समजून घेऊ शकते. मात्र आता तुला, मला समजून घ्याव लागेल.” या वाक्याने आरोही एकदम भानावर आली.
“बेला, चुकलं माझं. इथून पुढे मी तुला त्रास होईल असे अजिबात वागणार नाही. अचानक हा समोर आला आणि जुन्या आठवणी नव्याने जाग्या झाल्या इतकंच.
पण..या आठवणींची तुझ्या संसारात लुडबुड होऊ देणार नाही मी. तुझं मन मोठं आहे गं, खूप मोठं. बघ, जे झालं ते झालं..मला वाटतं, आता मी निघायला हवं आणि थँक्स मला समजून घेतल्याबद्दल.” आरोही उठून पुढे आली.

“यांनी तुला नकार का दिला? याचं कारण विचारणार नाहीस?” बेला पुढे येत म्हणाली
.”नाही. काही ठोस कारण असल्याविना तो असाच नकार द्यायचा नाही. पण हा..त्याला ते सांगावं वाटत असेल तर जरून सांगावं त्याने.” आरोही त्याच्याकडे पाहत म्हणाली.
बराच वेळ शांततेत गेला. तो काहीच बोलत नाही हे पाहून बेला म्हणाली, “तुझी काही हरकत नसेल तर आपण छान मैत्रिणी होऊ शकतो. तू फक्त खुश राहा. तुझ्या माणसांना जप. तुझ्या नवऱ्यावर मनापासून प्रेम कर. या जुन्या नात्याकडे नव्या दृष्टीकोनातून बघ.” बेला आरोहीचा हात हातात घेत म्हणाली.

“नक्कीच. कोणीही तुझ्या प्रेमात पडावं, तू इतकी छान आहेस बेला. फक्त तू याला जप. मला बाकी काही नको आणि लग्नाचं म्हणशील तर मी लग्नच केलं नाही तर नवऱ्यावर प्रेम कसं करणार?” आरोही किंचित हसून म्हणाली.
“काय? तू..तू लग्न नाही केलंस अजून?” त्याच्या स्वरात आश्चर्य होतं आणि खिन्नता देखील.
त्याला आठवलं, दोघांनी वचन दिलं होतं एकमेकांना, एकमेकांशी लग्न करण्याचं. ते तिने राखलं होतं आणि त्याने ते मोडलं होतं. ते आठवून त्याला कसंतरीच वाटलं. 

“नाही. मी लग्न करणारही नाही. कारण मी ज्याच्यावर प्रेम केलं, त्याच्या तोडीचा दुसरा कोणी मिळाला नाही. कदाचित मिळणारही नाही आणि मिळाला तरी मी त्याच्यावर मनापासून प्रेम करू शकणार नाही. याची खात्री आहे मला.” 

इतके बोलून आरोही त्या कॅफेमधून बाहेर पडली आणि तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बराच वेळ पाहत राहिला. 
आपण तिचं प्रेम कमावलं की गमावलं हेच त्याला उमगत नव्हतं. 
“आरोही, थांब.” अचानक तो पळत बाहेर आला.
“आता काय आहे?”
“खरं सांगू? तुझ्या बाबांनी माझ्याकडून वचन घेतलं होतं. तुझ्याशी लग्न न करण्याचं. कारण त्यांना मी आवडत नव्हतो.”

“काय? ते असं कसं करू शकतात?” आरोहीचा विश्वास बसत नव्हता.
“हे खरं आहे. यातलं तुला काही कळता कामा नये म्हणून त्यांनी बजावलं होतं मला. आता ते सगळं जाऊ दे. तू लग्न कर. तुझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात कर. ” 
त्याचे डोळे भरून आले आणि तिची खात्री पटली.  
“मी उगीच इतकी वर्षे तुझ्यावर राग धरला. पण मी लग्न मुळीच करणार नाही. कारण आता माझं तुझ्यावरच प्रेम कैक पटीने वाढलं आहे. ते तसंच राहू दे.” तिने मागे वळून एकवार त्याच्या डोळ्यातले पाणी आपल्या हाताने पुसले आणि ती मागे वळून न पाहता निघून गेली..अगदी कायमची.
समाप्त.
© सायली जोशी
सदर कथा लेखिका सायली जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
कोंडी
त्यांचं काय चुकलं??
संसारावर आलेले सावट

Leave a Comment

error: Content is protected !!