किती ही मोठे झालो तरी

© शुभांगी मस्के
सुमेधा आणि आयुष दोघे ही एकाच कॉलेजमध्ये सोबत शिकलेले..  मैत्रीचं रूपांतर प्रेमात आणि नंतर दोघांनी लग्न करायचं ठरवलं. दोन्ही घरच्या सहमतीने दोघांचं लग्न ठरलं.
अग्नीला साक्षी मानून दोघे ही लग्नाच्या पवित्र बंधनात बांधल्या गेले. 
आशा आणि अनुपरावांचा एकुलता एक मुलगा आयुष आणि आता लक्ष्मीच्या पावलांनी सुमेधा ही घरात आली होती.
घरात आल्या आल्या तिच्या मनमिळावू स्वभावाने तिने थोड्याच दिवसात सर्वांना आपलंसं केलं.
सुमेधाच्या रुपात जणू दोघांना मुलगीच मिळाली होती. लेकीची उणीव सुमेधाने भरून काढली होती. 

आयुष आणि सुमेधा दोघे ही, मोठ्या multinational कंपनीत चांगल्या पोस्टवर होते. पगाराच्या बाबतीत, महिन्याला, लाखात खेळत होते असं म्हणायला हरकत नव्हती. 
घरखर्च आजवर जसा अनुपराव आणि आशाताई करायच्या त्यात काहीच बदल झालेला नव्हता. सुमेधा आल्याने असा  काही फार फरक पडला नव्हता.
“बाई ग, खाण पिण असो की घरात बाकी काही, मी माझ्या परीने… पूर्वीपासून जे करत आले तेच करतेय. आता तू आलीस, यापुढे ही तसच चालू रहाव असा माझा काही अट्टाहास नाही. तुला तुझ्या पद्धतीने, काही बदल करायचा असल्यास करू शकतेस.

हे घर जेवढं माझं, तेवढं तुझं ही आहे बरं का ! उद्या, या घरात तुला परकेपणा वाटायला नको. आम्ही पाहिली, रात्रीचा भात सकाळी दोन मिनिटात आवडीने सातळून खाणारी माणसं, तुमचे ते टू मिनिट्स वाले नूडल्स आम्हाला काही पचनी पडत नाही. म्हणून तुम्ही ते खायचं नये, असं माझं म्हणण नाही. टू मिनिट्स वाले नूडल्स, आम्हला तुमच्या जिभेचे चोचले, तुमच्यातला आळशीपणा वाटत असला तरी, ती तुमच्या पिढीची सोय आहे खर तर. तुमच्या आमच्या आवडी निवडीमध्ये बदल असणारच.. उद्या जनरेशन गॅपच.. तुणतुणं नको ग बाई, आपल्या घरात. सुमेधा,तुला, आवश्यक ते बदल तु केलेले चालतील बर का.
आम्हाला तेवढं, तुमच्या प्रमाणे बदलायला जमायच नाही, पण तुला या घरात पूर्ण स्वतंत्र आहे.” नव्याच्या नवलाईतच आशाताईंनी सुमेधाला आश्वस्त केलं.

सुमेधा तशी माहेरची श्रीमंत.. चागल्या पॉश एरियात मोठा प्रशस्त बंगला होता तिच्या आईवडिलांचा. थोडा बदल करून घेऊन रीनोवेट करून सगळ्या आधुनिक सुखसुविधा त्यांनी घरात बदलाच्या दृष्टीने करवून घेतल्या होत्या.
श्रीमंत घरातली मुलगी, उगा आपल्यामुळे तिला अडचण नको म्हणून.. आशाताईंनी पूर्वीपासूनच, सुमेधा आणि आयुषला त्यांची त्यांची स्पेस दिली होती. 
राहणीमान.. कपडे लत्ते, घरात वावरताना कुठलीच आडकाठी नव्हती. सण समारंभ, कुळाचार.. या गोष्टीचं ही कुठलच दडपण सुमेधाला नव्हत. 

इकडे आयुष म्हणजे, या राहत्या घरातली चवथी पिढी होती. त्यामुळे घर जुन्या पद्धतीने बांधलेलं होतं. घरात प्रत्येक पिढीने आपआपल्या परीने थोडे फार बदल सोईनुसार करवून घेतले होते.
आयुषच्या लग्नाच्या वेळीसुद्धा काही बदल आणि थोडी डेंटिंग पेंटिंग करवून घेतली होती. एवढ्या वर्षाच्या जुन्या घरात, डागडुजी करण्याला पण मर्यादा होत्या.
शहरात अगदी मध्यवर्ती भागात, “वृंदावन सिटी” म्हणून जवळच खूप मोठं कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट सुरू होत… उंचच उंच गगनाला भिडणाऱ्या मोठमोठ्या बिल्डिंग या प्रॉजेक्टच प्रमुख आकर्षण होतं.

उत्सुकता म्हणून सुमेधा आणि आयुष वृंदावन सिटीमध्ये, फ्लॅट बघायला गेले. फ्लॅट अगदीच प्रशस्त आवडण्या सारखे होते.. दोघेही सक्षम असल्याने, बँकेचं लोन घेऊन, फ्लॅट घेणं सहज शक्य होतं.
खूप उत्साहात, त्यांनी फ्लॅटच चकचकीत ब्रॉशर घरी येऊन आईबाबांना दाखवलं. 
“आई वृंदावन सिटीमधला, एक फ्लॅट बुक करायचा म्हणतोय”.. आयुषने सांगताच आशाताईंच्या पायाखालची जमीन सरकली. 
“अरे पण गरज काय आहे? आपलं घर छान आहे की. इथे काय प्रॉब्लेम आहे? हवं असेल तर, पूर्ण घर तोडून आणि पुन्हा नव्याने बांध हवं तर पण, दुसरीकडे कशाला?” आशाताई बोलतच होत्या तोच अनुपरावांनी, आशाताईंना पुढे बोलता बोलता थांबवलं..

“छान आहे…. घेताय का तुम्ही?” अनुपरावांनी, ब्रॉशर वरून नजर फिरवली.
“हो.. हा फ्लॅट आवडला आहे. अकराव्या मजल्यावर आहे. खूप प्रशस्त आहे, मोठमोठ्या खोल्या, प्रत्येक खोल्यांना अटॅच टॉयलेट बाथरूम, मोड्युलर किचन, चिमणी, मोठमोठ्या बालकण्या, हिटर, गिझर, सीसी टीव्ही कॅमेरा, सोलार सिस्टीम, इन्व्हर्टरची सोय… सुरक्षेच्या दृष्टीने पण खूप चांगला वाटला.  महत्वाचं म्हणजे, हवेशीर आहे, सर्वच सुखसुविधा आहेत सोसायटीमध्ये.
मोठे क्लब हाऊस, जिम आहे, मंदिर, प्ले ग्राउंड आहे, समोरच मोठ गार्डन आहे. लांबच लांब मॉर्निंग ईविनिंग वॉकसाठी ट्रॅक सुद्धा असणार आहे छान.आईबाबा.. फ्लॅट खूप छान आहे.

आपल्या घराच्या आजूबाजूला सगळ्यांनीच आपली घर बिल्डरला विकलीत. बघताय ना, आजूबाजूच्या उंचच इमारतींमुळे उन्ह सुद्धा येत नाही,  सर्व बाजूने, कस बंद बंद वाटतेय.” आयुष बोलत होता.
सुमेधा तर फ्लॅटच्या कौतुकात पार हुरळून गेलीं होती.
“घ्या तुम्हाला हवा असला तर.. पण आम्ही आमचं हे घर सोडून येऊ अशी निदान आमच्याकडून काही अपेक्षा ठेऊ नका म्हणजे झालं. आमचं उभ आयुष्य गेलं या घरात.. आमचा शेवटचा श्वास ही याच घरात घरून अनंताच्या प्रवासाला जीव निघून जावा अस वाटतं. आम्ही नाही जायचो इथून कुठे ही”… आशाताई ठसक्यात बोलत होत्या. 

“आजूबाजूला फ्ल्टस स्कीम झाल्यात. आपल एकट घर राहिलय आई. नो डाऊट, आपल्या सर्वांचा जीव अडकलाय घरात पण… आम्ही आमच्या भविष्याच्या दृष्टीने पण विचार करतोय, जरासा. या घराच्या डागडुजी वर कमी खर्च केले का आपण. त्यालाही मर्यादा आहेच ना ग. आजूबाजूच्या बिल्डिंगच्या सावलीतच राहणार आता हे आपलं घर”…. आयुष बोलत होता.. 
“आई अग, आपलं हे घर जुनं झालंय. या घरातली ही चवथी पिढी आणि लवकरच पाचव्या पिढी चा सदस्य ही येणार आहे घरात”…..  त्या दृष्टीने विचार नको का करायला?”
नवीन पाहुणा घरात येण्याची, गूड न्यूज, अशी बोलण्यात गुंतवून ठेवत आयुषने सांगितली.

“खरंच!!”.. त्यांनी सुमेधाकडे बघितलं.. 
तिने ही.. हलकेच मान हलवत, होकार दिला. आशाताईंच्या डोळ्यात पाणी तरळलं… 
“समू अगं एवढी गोड बातमी”.. त्यांनी सुमेधाला जवळ घेतलं. लगेच जावून देवापुढे साखर ठेवली.
काही काळासाठी, आनंदात त्या सगळं काही विसरून गेल्या तर दुसऱ्याच क्षणी एकुलता एक मुलगा सून घरात येणारं नातवंडं… आपल्या ला सोडून, नव्या घरात शिफ्ट होणार या विचाराने अस्वस्थ ही झाल्या…
आशाताई सुमेधाची सर्वोतोपरी काळजी घ्यायच्या. खूप आवडीने तिचे डोहाळे पुरवायच्या. 

शेवटच्या दिवसात… सुमेधाला, डॉक्टरांनी संपूर्ण बेड रेस्ट सांगितली.  घरात बेडरूमला अटॅच टॉयलेट नव्हतं. शेजारी फ्लॅट स्कीमच काम सुरू असल्याने, कर्णकर्कश आवाज आणि जिकडे तिकडे धुळीच सम्राज्य पसरलं होतं. हवा खेळती नव्हती
सुमेधाला खूप त्रास होत होता. अखेर शेवटच्या दोन महिन्यात सुमेधा माहेरी निघून गेली…..
सुमेधाला मुलगी झाली.. “सारा” 
सारा चार महिन्याची झाली होती तरी, सुमेधा माहेरीच होती.  त्यांनी घेतलेल्या फ्लॅटच बांधकाम एव्हाना आटोपलं होतं. त्यामुळे लवकरच फ्लॅटच पझेशन मिळणार होतं. 

“वृंदावन सिटीचा” …..फ्लॅट पझेशन सोहळा, बिल्डर ने खूप थाटामाटात साजरा करण्याचं नियोजन केलं होतं. त्यासाठी त्यांनी सर्व फ्लॅटधारकांना आग्रहाच निमंत्रण दिलं होतं. 
अखेर तो दिवस उजाडला.. 
“चार महिने झाले, लेकराने अजून घर नाही पाहिलं. आज डायरेक्ट, बाळाला त्यांच्या नव्या घरात घेऊन जाणार आहेत वाटत.” विचारात आशाताई बेचैन होत्या.  
सुमेधा आणि आयुषच स्वप्नातलं, त्यांच्या हक्काचं घर होतं.. स्वतःच्या मिळकतीवर, हिमतीवर घेतलेलं.. पाहिलं घर… आईवडिलांच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट होतीच. पण…म्हणून काही आपल्या घराचं महत्व कमी होत नाही अशी काहीशी फिलिंग आशाताईंना होत होती.

“आई, बाबा तुम्ही तयारी करून ठेवा. सारा आणि सुमेधाला घ्यायला जातोय मी, येतो लवकरच..” म्हणत आयुष सासरी निघून गेला.
आयुषने बाहेरूनच कारचा हॉर्न वाजवला. या लवकर उशीर होतोय…. आयुष ने जोरात हाक मारली.
“अरे साराला घर तरी दाखव आपलं, की असा अंगणातूनच निघालास तिला घेऊन?”.. आशाताई थोड्या तिरकसच बोलल्या.. 
“हो.. हो..” म्हणत सुमेधा कार बाहेर उतरली…. 
भाकर तुकडा ओवाळून, औक्षण केलं..  दोघींवरून बोटं फिरवून कपाळावर नेर दृष्ट काढली.

“बाळा.. हे आपलं घर आणि आता.. साराच दुसरं घर.. आज मिळणार,”दोन दोन घर”… सुमेधा लडिवाळपणे सारा सोबत बोलत होती.. ती ही ओSS ओSS हुंकार देत.. प्रतिसाद देत होती.
“घर कसं… आनंदून गेलंय…. आयुष नंतर, सत्तावीस वर्षाने घरात असा, तेलापाण्याचा, त्या बेबी पावडरचा गंध दरवळणार” आणि आशा ताईंच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.
“चला चला.. उशीर होतोय”.. आयुष घाईघाईत बाहेरून जोरात ओरडत होता.
“वृंदावन सिटी” जणू नवरीसारखी सजली होती. खूप मोठा मंडप उभारला होता. बिल्डर एका एका.. फ्लॅट धारकाला स्टेजवर बोलवून फ्लॅटच्या चाव्या त्यांच्या हवाली करत होता. 

“Mr. And Mrs खरे”….. नाव अनाऊंस झाल तसे सुमेधा आणि आयुष दोघेही उभे झाले…. 
‘आई बाबा चला!”  सुमेधा बोलली.
आशाताईंच्या चेहऱ्यावर… आश्चर्याची लकेर उमटली.  
“आम्ही.. आणि कशाला? तुम्ही जा”…… “तुमच आहे तुमच्या मेहनतीचं, तुमच्या हक्काचं.” आशाताई म्हटल्या..
“आई अहो, आमचं तुमचं काय? आपलं घर असणार आहे ना हे! तुम्ही आम्ही वेगळे आहोत का? किती ही मोठे झालो तरी, घर चालवायचं धाडस काही आमच्यात नाही. आम्ही फक्त, तुम्ही दिलेल्या संस्कारांच्या बळावर, तुम्ही सांगितलेल्या मार्गावर चालत राहिलो म्हणून च आज इथवर पोहचलो.”

“भविष्यात गुंतवणुकीच्या दृष्टीने, स्वतःच घर घेण्याचा निर्णय आमचा असला तरी, ती कुवत ती पात्रता, तुमचीच देणं आहे”.. सुमेधाने आई आणि सासूबाईंकडे बघितलं.
“आम्ही सक्षम व्हावं त्या दिशेनं, पहिलं पाऊल तुमच्या सोबत सोबतच तर टाकलं होतं ना! आता या वळणावर तुम्ही सोबत हवेच आहात आम्हाला. चला, आपल्या घराच्या किल्ल्या घ्यायच्यात ना!”.. म्हणत सुमेधाने हात पुढे केला..
सुमेधाच्या हाती हात देत, आशाताई उभ्या झाल्या.
“चला बाबा,” आयुषने म्हणताच, अनुपराव कुर्त्याला झटका देत, दिमाखात उठले.. 

दोघांची छाती अभिमानाने भरून आणि उर दाटून आला होता… 
“चला, सुमेधाची आई..तुमच्या लेकीच्या यशात सहभागी व्हायला चला. दोघांना एकमेकांची साथ असल्याशिवाय, हे यश अशक्य होतं” 
“हे यश या जोडीच. लेकरांनी हिमतीवर बनवलेला आशियाना. चला भाऊसाहेब तुम्ही पण चला,” म्हणत आशाताईंनी, सुमेधाच्या आईबाबांना सोबत चालण्याची विनंती केली.
सगळे स्टेजवर गेले आणि फ्लॅटच्या किल्ल्या घेतल्या. 

घराच्या किल्ल्या घेताना…. आशीर्वादासोबत… मोठ्यांची अनमोल साथ मिळाली होती.. 
“मी काही माझं घर सोडून येणार नाही. तुम्हाला कुठे जायचं ते जा. मी काही इथून हलायची नाही”…. आजवर अट्टाहास धरून बसलेल्या आशाताई… वृंदावन सिटीमधल्या वातावरणाने एवढ्या प्रभावित झाल्या की…. इथे राहायला आल्यानंतर काय? डोळ्यादेखत स्वप्नांमध्ये एकावर एक इमले रचू लागल्या. 
“सुमेधा आयुष खरे”
“आयुष अनुप खरे”… दारावरची पाटी बघून.. अनुपराव आणि आशाताईंनी दोघांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

“आई बाबा, घरावर नाव आमचं असल तरी, हे घर आपलं आहे. कितीही मोठे झाले तरी  आई-वडिलांची साथ लागतेच. असालं ना सोबत”.. म्हणत सुमेधा नमस्कार करायला खाली वाकली…
“अगं अगं.. एवढी खाली वाकू नकोस, ओली बाळंतीण आहेस अजून”.. म्हणत दोन्ही हाताने खांदे पकडुन तिला उभ केल..
“चावी मिळाली, कधी शिफ्ट करणार आहात सामान”.. आशाताईंनी विचारलं..
“तुम्ही सांगा, कधी ते? कारण शिफ्टींग तर तुमच्यावर अवलंबून आहे.. तुम्ही जिथे आम्ही तिथे” .. सुमेधा बोलली.

“मी काही माझ्या, लेकाला आणि सुनेला आणि आता तर या चिमणीला सोडून राहायची नाही… जिथे माझी चिमणी पाखरं तिथे मी”.… आशाताई हसत हसत बोलल्या.
“अरे, असे आश्चर्यचकित होऊन काय बघताय माझ्याकडे.. भूत बघितल्यासारखे,  खरं तेच बोलतेय मी… 
“किती ही मोठे झालो तरी आईवडिलांची साथ लागतेच…….!” हे आईवडील गमावलेल्या आमच्या सारख्यांशिवाय अधिक कुणाला कळणार!” 
आज सगळेच खूप आनंदी होते.
समाप्त
© शुभांगी मस्के
सदर कथा लेखिका शुभांगी मस्के यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
नकार
कोंडी
त्यांचं काय चुकलं???

2 thoughts on “किती ही मोठे झालो तरी”

  1. खूपच छान!
    प्रगती करताना मोठ्यांचा धरून पुढे जाणं आणि मोठ्यांनीही मोठेपणाने सहयोग करणं खूप महत्वाचं.
    छान लिहिलय.

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!