या वळणांवर

©सौ. प्रतिभा परांजपे
आज शाळेतून पियूला घ्यायला जात असताना प्राजक्ताला वाटेत तिची मैत्रीण पूनम भेटली.
पूनम समोरच्याच बिल्डींगमधे राहायची.
“एक काम करशील प्राजक्ता? आज माझ्या निनादला घेऊन येशील ?” प्राजक्ताला पाहून पूनमने विचारले.
” हो चालेल..निनाद कोणत्या सेक्शनला आहे?”
“के.जी टू बी मध्ये , पियू ओळखते त्याला.”
” पण ते स्कूलवाले पाठवतील का त्याला माझ्याबरोबर?’
“हो पाठवतील..अगं मीच गेले असते पण आज कामवाली आली नाही, आणि निनादचे बाबाही इथे नाहीत.”
“बरं आणते.” म्हणून प्राजक्ता निघाली.

पियू  तिची वाटच पाहत होती.
‘निनाद कोण गं ‘ असं विचारताच पियू धावत जाऊन निनादला घेऊन आली.
मग प्राजक्ताने मॅडम आणि पूनमच फोनवर बोलणं करून दिलं व पियूसोबत निनादला घेऊन निघाली.
निनादला पाहून प्राजक्ता जरा चमकलीच.
ह्याचे डोळे— कुठेतरी पाहिल्यासारखे कां वाटतात आहे? घरी पोहचेपर्यंत प्राजक्ता हाच विचार करत होती.
“पुढच्या आठवड्यात आमची पिकनिक आहे मम्मा”,  पियूने सांगितलं आणि बरोबर काय काय द्यायचे याची लिस्ट दिली.

पिकनिकहून आल्यावर पियूची मनीष जवळ  बडबड चालू होती, “बाबा आम्हाला शाळेत निनादचे पप्पा घ्यायला आले होते .त्यांचे नाव प्रशांत आहे”.
प्रशांत हे नाव कानांवर पडताच प्राजक्ताला निनादचे डोळे आठवले. तिच्या मनाचा डोह ढवळून निघाला.  जुन्या आठवणी  वर येऊन तिच्या समोर फेर धरून नाचू लागल्या.
प्राजक्ता बराच वेळ झाला प्रशांतची वाट पाहत तलावाकाठी बसली होती. आज ती जरा लवकर आली होती.
सूर्य पश्चिमेकडे नुकताच झुकला होता. पक्षी गण थव्याथव्याने घरट्याकडे परतत होते.

बराच वेळ ती बसून होती. प्रशांत आजही आला नव्हता. गेले तीन-चार दिवस ती  तलावाकाठी त्याची वाट पाहत होती. हे त्यांचे भेटण्याचे स्थान होते. बसल्या बसल्या तिने पाण्यात एक खडा टाकला तशी पाण्यात एका मागून एक वलय येऊ लागली त्यांकडे पहात प्राजक्ताला तिची आणि प्रशांत ची पहिली भेट आठवली.
कॉलेजच्या पहिल्या वर्षाला प्राजक्ता होती. एक दिवस वाटेल तिच्या सायकलची चेन निघाली.
खाली बसून ती चेंन फ्री व्हीलमध्ये अडकवायचा प्रयत्न करत होती पण ते काही जमत नव्हते. 
त्यात ओढणी पण व्हील मध्ये अडकली होती.

‘मी काही मदत करू का?’ आवाजाच्या दिशेने तिने पाहिले मोटरसायकल वर एक तरुण उभा होता  स्मार्ट सावळा ,कुरळ केसांचा.
‘नको ,मी करते’ म्हणत प्राजक्ता परत सायकलचे पेडल उलट फिरवू लागली, तेवढ्यात सायकल स्टॅन्ड वरून घसरली व तिच्या अंगावर पडली.
तिच्यावर पडलेली सायकल त्या तरुणाने  उभी करून तिची ओढणी अलगद सोडवली व चेन लावून प्राजक्ताला हात देऊन उभ केलं.
झाल्या प्रकाराने प्राजक्ता भांबावून गेली तिला साधं थँक्स म्हणायचं ही सुचलं नाही. तो गाडी घेऊन निघूनही गेला.

दोन-चार दिवसांनी कॉलेजला  मैत्रिण सोनाली सोबत कॉरिडोर मध्ये बोलत असताना प्राजक्ताला तो दिसला.
तिने पुढे जाऊन त्याला त्या दिवशीच्या मदतीसाठी थॅंक्स म्हटले.
“अरे वा– बरीच मजल मारलीस की” सोनाली ने तिला चिमटा काढत म्हटले.
“अगं मी ओळखत नाही त्याला, त्याचं नांवही नाही ठाऊक मला.”
“प्रशांत आहे तो, फायनल ईयरचा , बऱ्याच मुलींचा डोळा आहे त्याच्यावर. बडे बाप का बेटा, पण चांगला आहे.” सोनालीने प्रशांतची माहिती पुरवली.

पुढे पुढे तिची व प्रशांतची भेट होत गेली . लवकरच दोघांना जाणवलं की प्रशांत प्राजक्ताच्या घाऱ्या डोळ्यात बंदिस्त आहे तर प्राजक्ता त्याच्या कुरळ केसांच्या झुपक्यांमध्ये आपले मन हरवून बसली आहे.
दोघं आता नियमित भेटत असत.
एक वर्ष असेच निघून गेले.
प्रशांतचे फायनल झाले. त्याला पुढच्या शिक्षणाकरता बाहेर जावे लागणार होते, जायच्या आधी घरी बोलून ठेवतो म्हणाला होता .
आज चार दिवस झाले पण भेटायला आला नाही त्याचा फोन ही ऑफ होता, प्राजक्ता ने मॅसेज ही केला पण काहिच रिप्लाय नाही. वाट पाहून प्राजक्ता जड पावलाने घराच्या वाटेकडे निघाली.

 एक छोटा मुलगा समोरून येताना दिसला “तू प्राजक्ता ताईं ना ?”
“हो”
“ही चिठ्ठी  दिलीये प्रशांत दादाने” म्हणत तो निघून गेला. 
प्राजक्ता घरी पोहोचली तेव्हा आई दारातच उभी होती.
“कुठे होती प्राजु इतका वेळ आणि चेहरा का असा उतरलाय? काही झाले कां?”
डोळ्यातलं पाणी लपवत “काही नाही” म्हणत प्राजक्ता आपल्या खोलीत गेली.
दार लावून धडधडत्या हृदयाने तिने चिठ्ठी उघडून पाहिले “सॉरी मला विसर माझ्यासाठी थांबू नको”.
बस्– एवढाच मजकूर होता, खाली प्रशांत अशी सही. 

प्राजक्ताचे डोळे परत परत त्या मजकुरावर फिरत होते. त्यातला आशय समजूनही कळत नव्हता.
काहीही कारण न देता सहजपणे तोडून टाकलं प्रशांतने. अचानक मोठा घाव घातला आणि प्राजक्ता मुळासकट कोलमडली.
“प्राजू दार उघड, जेवायला येतेस ना” म्हणत आई दार वाजवू लागली.
प्राजक्ताने डोळे पुसून दार उघडलं, आईने काहीही न विचारता पान वाढलं.
रात्री आईने प्राजक्ताला जवळ घेताच तिच्या मनाचा बांध फुटला व डोळे वाहू लागले.

“हे बघ प्राजु हे सर्व विसर आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. मला अंदाज आला आहे काय झाले असावे.”
“आई त्यानी काहीही कारण न सांगता.”
“असेल  काहीतरी न सांगण्यासारखं ….”
“हो पण मला विश्वासात न घेता असा कसा जाऊ शकतो?”
“हे बघ ती मोठी लोकं आहेत. आपण तशीही त्यांची बरोबरी नाही करू शकत . आता सर्व लक्ष अभ्यासाकडे लाव.” आईने प्राजक्ताची समजूत काढायचा प्रयत्न केला. .

हळूहळू प्राजक्ता सावरली .ग्रॅज्युएट होताच बाबांनी तिच्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली .
मनीषचे पहिले स्थळ होते आणि तिकडून पसंती आली.  बेंगलोर सारख्या मोठ्या शहरात मनीषची नोकरी होती.
एकुलता एक मुलगा, एक बहीण, सासू-सासरे गावी होते.
सर्वांच्या मतानुसार खूपच उत्तम स्थळ होते. सावळ्या स्मार्ट उंच मनीषला गोरी घारी प्राजक्ता खूपच आवडली.
लग्नाची तारीख अजून नक्की झाली नव्हती आईने प्राजक्ताला या काही दिवसात समजुतिचे धडे द्यायला सुरुवात केली, ” हे बघ प्राजक्ता मागचं सर्व विसरून पुढे जा. मनीष हा आता तुझा नवरा, त्याला  सर्वस्व अर्पण करायच्या आधी मनापासून त्याचा स्वीकार कर तरच सुखाचा संसार होईल.”

आईचे बोलणे प्राजक्ताला समजत होते पण उमजत नव्हते. मनीष नेमका स्वभावाने कसा असेल? तिचे व त्याचे विचार जुळतील कां?
प्रशांतला विसरून त्याची जागा मनीष ला ती देऊ शकेल कां?
अचानक तिकडून लग्नाची तारीख नक्की केली गेली कारण नंतर बरेच दिवस मुहूर्त नव्हता .
मनीषला सुट्ट्या घेणे शक्य नव्हते त्यामुळे लग्नानंतर लगेच कंपनी जॉईन करावी लागणार होती. बाहेर फिरायला जाण्याऐवजी सरळ  बेंगलोरलाच जावे लागले.
नवीन शहर, भाषा अनोळखी.. प्राजक्ता  बावरुनच गेली.
मनीष ला यायलाही खूप उशीर व्हायचा. दिवसभर घरात राहून तिला कंटाळा यायचा.

एक दिवस मनीष म्हणाला “जरा एकटीने बाहेर पडशील तर बाजार रस्ते कळतील. स्कूटर आहेच.”
“पण मला स्कूटर नाही येत चालवता’.
“काय?”
“हो कॉलेजमध्ये सायकलने जायचे. बाबा घेऊन देणार होते स्कूटर पण्…”
“बरं मी शिकवतो” म्हणत एक दिवस मनीषने तिला स्कूटर वर पुढे बसवले व मागे बसून तिला समजावू लागला.
हळूहळू का होईना प्राजक्ता शिकायला लागली.

त्याचे ते कानाशी येऊन बोलणे, तो कंबरेभोवतीचा हात,  तो स्पर्श.. हळु हळु आवडायला लागला .
स्कुटी बरोबरच प्रेमाची गाडीही सुसाट धावायला लागली आणि प्राजक्ता  मनिषमय झाली.
वर्षभरातच  पियूचा जन्म झाला.
दिवस आपल्या गतीने पुढे जात होते. प्रशांत आता तिच्यासाठी एक सुखद आठवण म्हणून उरला होता.
दहा-बारा दिवस झाले पुनम गावाला गेली होती ती आज परत आली.
प्राजक्ताने विचारले तेव्हा म्हणाली, “सासरे वारले म्हणून जावे लागले प्रशांत खूप डिस्टर्ब आहे.”

 “हो बरोबर आहे वडील होते ना त्याचे.”
“तुला सांगू प्राजक्ता, आमचे लग्न यांच्या वडिलांनी परस्पर ठरवून टाकलं याला न विचारता. प्रशांतला अजून कोणीतरी आवडत होती, प्रेम होते तिच्यावर. पण नाईलाज झाला त्यांचा. पण तरीही माझ्याशी नीट वागले. कधी कधी म्हणतात मी तिला फसवले.
अजून त्या गोष्टीवरून मनात गिल्ट धरून बसले आहे, अशा वेळेस त्यांना खूप समजून घ्यावे लागते,
खूप हळवा आहे ग माझ्या नवरा. म्हणतो तिची क्षमा मागायची होती.”

प्राजक्ताच्या सर्व लक्षात येत होते. मागें तिने पूनमच्या स्टेट्स वर प्रशांत बरोबर चा फोटो पाहिल्यानंतर तिने प्रशांतला ओळखलं.   प्राजक्ता मागचे सर्व विसरून  मनीष बरोबर सुखात आहे, पण तो अजून तिला विसरला नाही .
प्राजक्ता एक दिवस पुनम कडे गेली. पुनम घरी नाही हे तिला ठाऊक होते.
“कोण आहे निनाद ?”
“बाबा, पियू आणि तिची मम्मा.”
“तू?  पुनम घरी नाहीये.”

 “ठाऊक आहे मला म्हणून मुद्दामच आले आहे.”
बऱ्याच वेळ प्राजक्ता प्रशांत कडे पाहत होती. तो मात्र नजर चुकवून इकडे तिकडे करत होता.
निनाद आणि पियू खेळायला गेले.
“मला बस नाही म्हणणार?”
” बस, मीन्स– बसा.”
“काही बोलणार नाही प्रशांत ?”
“काय बोलू?? कोणत्या हक्काने?’
“कां माफी ही मागणार नाही?”

 “कुठल्या तोंडाने माफी मागू? आणि तू करशील मला माफ? आलो होतो मी तुला शेवटचं पाह्यला पण तुझं लग्न झालं असं कळलं त्यामुळे तोही मार्ग खुंटला.”
“मग आता मागून घे.”
“करशील ?”
“ते कधीच केलं रे ! मनीष खूप प्रेम करतो माझ्यावर आणि मी पण त्याच्यावर. तेव्हा आता मनात गिल्ट धरू नको. पूनम खूप चांगली आहे .आम्ही मैत्रिणी आहोत तिने मला सर्व सांगितलं .तुझा नाईलाज होता. आता तू माझ्यासाठी पूनमचा नवरा आणि निनाद चा बाबा आहेस. मनीष बरोबर मी ते वळणं केव्हाच पार केले. आता तुझा  नी माझा मार्ग वेगळा आहे.”

तेवढ्यात पूनम येताना दिसली तशी प्रशांतने घाईघाईने पूनमच्या हातातल्या पिशव्या घेतल्या.
त्या आत ठेवत म्हणाला “पुनू माझे कपडे  –“
“अरे कपडे त्यांच्या जागेकरच आहेत…” पुनम त्याला हसून म्हणाली आणि ” हा पण ना… तुला सांगते प्राजक्ता……” म्हणत पुनमची प्रशांतच्या सवयींबद्दलची टेप सुरू झाली.
त्या दोघांच्या संवादातून प्राजक्ताला जाणवले की प्रशांतने ही ते वळणं केव्हाच पार केलं आहे….तिच्यासारखंच….
समाप्त
©सौ. प्रतिभा परांजपे

सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
किती ही मोठे झालो तरी
बी माय व्हॅलेंटाईन

Leave a Comment

error: Content is protected !!