स्वीकार

© स्मिता मुंगळे
“नेहा,अग एकटीच काय करतीयेस इथे?बघ अंधारायला लागलंय,चल आत.”……आजी म्हणाल्या तशी नेहा गडबडीने आंब्याच्या झाडाखालून उठली आणि आजींकडे न बघताच खाली मान घालून आत जावू लागली.
आज नेहाचे काहीतरी बिनसले आहे हे आजींच्या लक्षात आले. कारण दुपारपासून त्यांना नेहा गप्प गप्प आहे हे त्या बघत होत्या. नेहमी अखंड बोलत राहणारी ती आज कोणाशीच फारशी बोलत नाहीये हे त्यांना जाणवले होते.
नेहा घरात गेली तश्या तिच्या पाठोपाठ आजीसुद्धा आत गेल्या. त्यांनी देवापुढे दिवा लावला,उदबत्ती लावली तसा उदबत्तीचा सुगंध घरभर दरवळला आणि वातावरण प्रसन्न झाले.

नेहा किचन आणि हॉलमध्ये नाही हे बघून त्या तिच्या खोलीत गेल्या. ती खिडकीशी उभी राहून बाहेर बघत होती. आजीच्या हाकेसरशी ती भानावर आली.आजींनी तिला हाताला धरून बेडवर बसवले. तिच्याशेजारी बसत तिच्या डोक्यावरून त्यांनी मायेने हात फिरवला आणि म्हणाल्या,”नेहा,काय झाले बाळा?”
आजींच्या या प्रेमळ बोलण्याने नेहा हळवी झाली. डोळ्यात येऊ पाहणारे पाणी तिने महत्प्रयासाने रोखले आणि म्हणाली, “आजी बघाना हा निल कसा वागतो ते. तीन महिन्यांसाठी म्हणून कॅनडाला गेला आणि आता सहा महिने होत आले तरी परत कधी येणार हे सांगता येत नाही म्हणतोय.”
आता आजींना नक्की नेहाचे काय बिनसले आहे ते कळाले.

त्या म्हणाल्या,”अग, पण हेच तर दिवस आहेत ना त्याचे काम करण्याचे आणि नवनवीन अनुभव घेण्याचे आणि लागले परत भारतात यायला आणखी काही महिने तर बिघडले कुठे? तू एकटी थोडीच आहेस इथे? आम्ही सगळे आहोत ना तुझ्या सोबत. आणि तुझे माहेर पण गावातच तर आहे. मनात येईल तेव्हा तू आई बाबांकडे पण जातेसच की राहायला.
शिवाय तुमचे सारखे व्हिडीओ कॉल,चॅट का काय ते सुरू असतेच ना ग. रहा की ग तू पण थोडी निवांत. नील तर कायम तुझ्याबरोबर असणारच आहे ना. तुझे ऑफिस, मित्रमैत्रिणी हे सगळं आहेच ना”
आजी आणखी काहीबाही बोलत राहिल्या.

शेवटी न राहवून नेहा म्हणाली,”आजी, एक विचारू का?”
“तू काय विचारणार याचा अंदाज आला आहे मला पण तरीही विचार तू,काही हरकत नाही.”
आता नेहा थोडी सैलावली.
आजींना म्हणाली,”आजी,माझ्या आणि निलच्या लग्नाला दोन वर्षच तर झाले आहेत तरी काही महिन्यांचा हा विरह मला जीवघेणा वाटतो आहे आणि तुमचा आणि आजोबांचा तर तब्बल साठ वर्षांचा सहवास आणि संसार, तरीही तुम्ही आत्ता वर्षभरापूर्वी झालेला आजोबांचा मृत्यू कसा काय शांतपणे स्वीकारलात?

सॉरी…म्हणजे तुम्हाला नक्कीच खूप यातना झाल्याच असणार हे नक्की. आजी,पण मी बघितले ना…तुम्ही खूप धीराने घेतले सगळे. कसे जमवता याचे खरचं खूप आश्चर्य वाटते मला.”
नेहा एका दमात बोलली खरी पण नंतर तिलाच अपराधी वाटले.
आजी मात्र शांतच होत्या. नेहा कानकोंडी झाली आहे हे जाणून आजीनी नेहाचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या,”अग वेडाबाई, एवढं घाबरायला काय झाले? तुझा प्रश्न काही अगदीच चुकीचा नाहीये. तू निदान मला स्पष्ट विचारलेस तरी,पण गेल्या वर्षभरात मी हाच प्रश्न अनेकांच्या डोळ्यात वाचला आहे.”

आता नेहाला थोडे हायसे वाटले. तिच्या डोळ्यातील या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याची उत्सुकता जास्त ताणून न धरता आजी सांगू लागल्या,”नेहा,तुझ्या प्रश्नातच उत्तर दडलंय बघ. तू विचारलेस ना….’परिस्थिती कशी स्वीकारली’ म्हणून? खरं सांगते तुला, कोणतीही परिस्थिती ही आधी मनाने स्वीकारली ना की मग सोपं होतं. त्यासाठी “स्वीकार” महत्वाचा. आमच्या पिढीला या गोष्टीची बऱ्यापैकी सवय आहे ग. अगदी लहानपणापासून आम्ही सगळ्या गोष्टी स्वीकारत आलो आहोत.”
“आजी,तुम्ही नक्की काय बोलताय माझ्या लक्षात येत नाहीये” नेहाच्या या बोलण्यावर आजींकडे उत्तर होतेच.
म्हणाल्या,”तुम्ही आजकालच्या शिकलेल्या, स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या, तुमचं ते करिअर का काय म्हणता त्याच्या मागे धावणाऱ्या, स्वतःची ठाम मतं असणाऱ्या मुली आहात.

आई वडिलांना हल्ली एक किंवा जास्तीत जास्त दोन मुली असतात ग. आमच्या वेळी आम्ही सहा सात भावंड असायचो. बऱ्याच वेळा पाच सहा मुलींच्या पाठी झालेला मुलगा असेल तर तो खूप लाडका असायचा. बाकी मुलींचे लाड करण्याचा तो काळच नव्हता. त्यावेळी मुलींची लग्नसुद्धा खूप लहान वयात व्हायची. त्यामुळे आपोआपच आयुष्यातील माणसं, परिस्थिती याचा स्वीकार केला जाई. आमच्यापुढे दुसरा चॉईसच नव्हता ना. आजकाल तुम्हाला ‘ऑप्शन्स’ खूप असतात. तुम्हाला तुमची ‘स्पेस’ का काय म्हणता ती लागते. आम्हला या गोष्टींचा गंधच नव्हता.”
आजींच्या तोंडून ‘स्पेस’,’चॉईस’,’ऑप्शन्स’…असे शब्द ऐकून नेहाला हसू आले. आजी होत्याच काळाबरोबर चालणाऱ्या. म्हणूनच कोणतीही परिस्थिती लिलया हाताळणाऱ्या.
“माझं बोलणं ऐकून तुला बोअर होत नाहीये ना ग?”,आजी म्हणाल्या तशी नेहा सरसावून म्हणाली,” नाही हो
आजी,किती छान बोलता तुम्ही,ऐकत रहावं वाटतं तुमचं बोलणं.”

तिच्या बोलण्याने आजींचा बोलाण्याचा उत्साह आणखी वाढला. म्हणतात कशा,” नेहा,पण हे स्वीकारणं वाटते तितके सोपे नाही ह. त्यासाठी मनाची तयारी हवीच आणि ही तयारी अशी लगेच होत नसते बरं. मनाला हळूहळू तयार करावे लागते. मनाला सकारात्मक, सारासार विचारांची जोड द्यावी लागते. देवावर किंवा कशावरही नितांत श्रद्धा असावी लागते तेव्हा कुठे हा स्वीकार थोडाफार जमू लागतो.”
आता मात्र नेहा आजींच्या बोलण्यात रंगून गेली. बोलतानाचा आजींचा सात्विक चेहरा तिला तेजस्वी दिसू लागला.
तिच्या मनात आले, खरंच या चेहऱ्यामागे खूप काही सोसलेपण, दुःख, वेदना नक्कीच असणार. उगाच का आजी प्राप्त परिस्थिती स्थितप्रज्ञपणे स्वीकारू शकतात.
“नेहा,ऐकतीयेस ना ग?”,आजीच्या प्रश्नाने नेहा भानावर आली.

“हो,हो,आजी.सांगा ना तुम्ही.ऐकतीये मी.”
आजी पुढे बोलू लागल्या.”अग, माझं लग्न झाले तेव्हा मी अवघी बारा वर्षांची होते. माझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगा होते तुझे आजेसासरे. त्यामुळे आता कसे तुमच्यासमोर ‘ऑप्शन’ असतात तसे मला काही न देता वडिलांनी सरळ माझे लग्न ठरवून टाकले. मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता कारण मला काही विचारलेच नव्हते तर सांगितले होते. तोच माझा पहिला स्वीकार. मी त्यांना नवरा म्हणून सहज स्वीकारले. खूप लहान होते ग मी तेव्हा. काहीच कळत नव्हते.लग्न होऊन मोठ्या एकत्र कुटुंबात आले आणि सगळ्यांशी जमवून घेत इथेच रमून गेले. घरात भरपूर माणसं, प्रत्येकाचे वेगळे स्वभाव, चालीरीती सगळ्याचा स्वीकार केला. ‘हे’ तर एवढे रागीट पण त्याचीही नंतर सवय होऊन गेली.

प्रत्येकाची मुलं, त्यांचे हट्ट,आजारपणं हे सगळं निभावताना प्रौढत्व कधी आलं कळाले देखील नाही. मात्र या सगळ्यात माझं तरुणपण आणि मुलांचं बालपण मात्र हातातून निसटून गेले याची आता खंत वाटते.” आता मात्र आजींचे डोळे त्या आठवणींनी पाणावले.
“आजी….” म्हणत नेहाने त्यांचा हात हातात घेतला.”पाणी देऊ का तुम्हाला प्यायला?” या नेहाच्या प्रश्नावर गोड हसत आजी म्हणाल्या, “नको ग….ठीक आहे मी.जुन्या आठवणींनी होते असे कधीतरी. हे निसटलेले क्षण नाहीत परत हाताला लागत.चालायचंच”…असे म्हणत आजींनी दीर्घ सुस्कारा सोडला.
“नेहा,पण माझी लेकरं मात्र गुणाची ग,हुशार निघाली. कालानुरूप आमची घरं विभक्त झाली आणि मुलं शिकायला शहरात निघून गेली. एवढ्या हुशार मुलांना त्या खेड्यात ठेवून तरी काय उपयोग होता म्हणा. त्यावेळी मात्र खूप वाईट वाटले.

मुलांची आठवण यायची. पण सवयीने ती परिस्थिती देखील मी स्वीकारली. यथावकाश मुलांना नोकरी लागल्यावर त्यांनीच वडिलांच्या मागे लागून आम्हा दोघांना शहरात आणले. खेड्यातून शहरात येऊन तिथे रुळायचे म्हणजे देखील नव्या जीवनशैलीचा स्वीकारच होता. पण सवयीने जमवले आणि सुरू केले नवे आयुष्य.”
“अरे…नातसुनेचे आणि आजेसासूबाईंचे काय गुफ्तगू सुरू आहे? गप्पा मारूनच पोट भरणार आहात की जेवण पण करायचे आहे?” नेहाच्या सासूबाई सरीताताई खोलीत येत म्हणाल्या.
तशी नेहा एकदम उठून उभी राहिली आणि “सॉरी आई,अहो बोलण्याच्या नादात घड्याळाकडे लक्षच गेले नाही. तुम्ही एकटीनेच स्वयंपाक केला सुद्धा.”

“अग नेहा….हो,हो… एवढं घाबरायला काय झाले? आणि केला एखाद्या दिवशी मी एकटीने स्वयंपाक तर बिघडले कुठे? फक्त आता मात्र तुमच्या दोघींच्या गप्पात मला सामील करून घ्या म्हणजे झाले. नाहीतर आधी जेवणं उरकू आणि नंतर राहिलेल्या गप्पा मारू.” सासूबाईंच्या अशा प्रेमळ बोलण्याने नेहाला धीर आला.
आजींना त्यांच्या बोलण्यात व्यत्यय यावा असे वाटत नव्हते. त्यामुळे त्या सुनेला म्हणाल्या,”सरिता, एक दिवस थोडं उशिरा जेवले तर काय बिघडणार आहे. ये तू पण आमच्या गप्पात सामील हो.”
सरीताताई बसल्यावर नेहा हसत म्हणाली,”आणि बरं का आजी,अजून एक प्रश्न मला कायम पडतो तो म्हणजे मी या दोन वर्षात तुमच्यात आणि आईमध्ये कधीच विसंवाद पाहिला नाही.कसं जमवता हे?”

आजींचे हुकमी उत्तर तयारच होते….”स्वीकार”. “अग, एकदा का एखाद्या माणसाला आपलं म्हणून स्वीकारले ना की त्याला त्याच्या
गुणदोषासह स्वीकारावं हे माझं तत्व. सुनेला घरात आणतानाच मी स्वतःला हे बजावले होते आणि ते तत्व मी कायम पाळले. पण शेवटी आपण सगळी माणसंच ना ग. होतात काही कुरबुरी, पण ते तिथल्या तिथे सोडून द्यायचे आणि हेच मी माझ्या सुनेला देखील सांगून ठेवले आहे बरं का. आणि खरचं गुणाची आहे ग माझी सून,अगदी समजूतदार. तिनेही मला आहे तशी स्वीकारलेच ना ग. आज तुला जसे स्वीकाराचे महत्व सांगितले तसे तिलादेखील तिचे नवीन लग्न झाले असताना सांगितले होते.” असे म्हणत आजींनी एक प्रेमळ कटाक्ष सरीताताईंकडे टाकला.

“काहीतरीच ह आई तुमचं.बास झाले आता माझे कौतुक चला जेवायला.” सरीताताई असे म्हणाल्या खऱ्या पण त्यांनादेखील आज मन मोकळं करावंसं वाटत होतं. त्या नेहाला म्हणाल्या,”नेहा,एक लक्षात ठेव,प्रत्येक माणूस वेगळा असतो. त्याला तो आहे तसे स्वीकारले की आपल्यालाच सोपे जाते. मी माझ्या सासूबाईंचे हे तत्व अंगिकारले आणि माझा संसार सुखाचा झाला. मी तुला सक्ती नाही करणार पण तुही हे केलंस तर नक्की सुखी होशील. आयुष्य खूप सोपं आणि छान असतं ग,आपणच ते अवघड,गुंतागुंतीचे करून ठेवतो.”
“हो आई,मी हे नक्की लक्षात ठेवेन”,असे म्हणत आणि गोड हसत नेहा सरीताताईना बिलगली.
“चला…..” म्हणत दोघी निघाल्या तश्या आजी म्हणाल्या,”थांबा, अजून मला नेहाच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे.”

आता काय राहिले राहिले…असा भाव आता नेहा व सरीताताईंच्या चेहऱ्यावर आजींना स्पष्ट दिसत होता.
“नेहा,अग जाणारा जातो, मागे राहणाऱ्याला तो विरह सहन करणे अवघड असतेच पण म्हणून रडत बसण्यात काय अर्थ आहे? उगाच आपल्याला आणि घरातील इतर लोकांनाही त्रासच होतो ना मग त्याचा. त्यापेक्षा आपल्या जोडीदारासोबतच्या सुखद स्मृतींसोबत उर्वरीत आयुष्य कसं आनंदात जगावं या मताची मी आहे.बरोबर ना?”
“आजी……” म्हणत नेहाने आजींना मिठी मारली.
“मग आज काय धडा घेतला मॅडम तुम्ही?”….सरीताताईनी विचारले तशी नेहा हसत म्हणाली, “आता मी नीलला कधी येतोस, लवकर ये असे अजिबात म्हणणार नाही आणि त्याच्या विरहात तोंड पाडून बसणार नाही.”
नेहाच्या या उत्तरावर तिघीही मनापासून हसल्या.
© स्मिता मुंगळे

सदर कथा लेखिका स्मिता मुंगळे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
किती ही मोठे झालो तरी
या वळणांवर
नकार

Leave a Comment

error: Content is protected !!