गजरा

©मनोज कुलकर्णी
” नीलू, ये नीलू हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय? ” राम आजोबांनी नीलू आज्जीला प्रेमाने आवाज देत म्हटलं. 
“अहो, काम पडलीयेत ना, तुमचं काय मध्येच. चहा ठेवलाय तुमचा. आणलं का दूध तुम्ही?” नीलू आज्जीने चहाचा गॅस कमी करत विचारलं. 
“अगं हो आणलय ना हे घे, पण त्या बरोबर अजून काहीतरी आणलय तुझ्यासाठी, बघ तरी तु” राम आजोबांचा बाल हट्ट.
” अहो दूध टाकते आणि चहा घेत बघते पण आणि आपण गप्पा पण मारू, चालेल ना तुम्हाला?” नीलू आज्जीने चहात दूध टाकत सांगितले.

“काय ग नीलू आपल्या राजकुमाराचा प्रशांत चा काही फोन आला का? आपल्या म्हाताऱ्या आई बापांची आठवण झाली की नाही सुपुत्राला, आजतरी?” राम आजोबांनी जरा नाखूष स्वरात विचारले.” हो आला होता, तुमच्याबद्दल विचारत होता.” नीलू आज्जीने थोडासा स्वर दबका करत सांगितलं. 
” नीलू, अग मान्य आहे मी म्हातारा झालो, पण तुझ्या राजकुमाराला आणि माझ्या सुपुत्राला चांगला ओळखतो मी. फोन नाही आला त्याचा, माहित आहे मला.आता आपण म्हातारे झालो, नकोशे झालो. असो पण आपण आहोत ना एकमेकांसाठी, एवढं पुरेसं आहे” राम आजोबांनी प्रेमळ आवाजात आज्जीला सांगितल. 

“बरं नीलू, मी काय म्हणतो पुढच्या महिन्यात आपला बाबर भाई आहे ना माझा गजरेवाला त्याच्या मुलीचं लग्न आहे, काहीतरी घ्यावं लागणार आपल्याला” राम आजोबांनी आदेशवजा आवाजात आज्जींना सांगितलं. 
” हो जाऊया ना, म्हणजे जावच लागेल. आज इतकी वर्ष न चुकता तुम्ही त्याच्याकडूनच रोज गजरा आणता ना माझ्यासाठी.” आज्जी थोड्या प्रेम भावनेने बोलत होत्या, ” का हो, तुम्हाला कंटाळा येत नाही का रोज रोज गजरा आणायचा? म्हणजे आधी ठीक होतं, आता काय आपण मेले म्हातारे झालो. अर्धी लाकडं आपली सरणावर गेली आहेत. आता गजरा बघितला तर लोक काय म्हणतील म्हणून मी बाहेर जातांना हातात घेते गजरा.

पण खरं सांगू का रामजी मला पण सवय लावली हो तुमच्या गजऱ्याची. म्हणजे तुमचं जितकं माझ्या आयुष्यात स्थान आहे ना तितकच ह्या गजऱ्याचं.” नीलू आज्जीने चहाचा घोट घेत घेत राम आजोबांना सांगितले. 
” अगं नीलू, मला कसा कंटाळा येईल, मुळात हा गजराच आहे ज्यामुळे आपण आज एकत्र आहोत. तुला आठवत का नीलू? कॉलेज मध्ये असताना तु म्हणजे राजकुमारी होतीस, अगदी तुझ्या दिमतीला कायम तुझ्या 2-3 मैत्रिणी असायच्या आणि मी तो असा..आणि ” राम आजोबा आणि आज्जी त्यांच्या पुर्वकाळात चहाचा घोट घेत रमले.

राम आजोबा बोलत होते आणि नीलू आज्जी ऐकत होत्या. 
” म्हणजे आम्ही काही दिसण्यात किंवा श्रीमंतीत तुझ्या बरोबरीचे नव्हतोच मुळी. तरी तुला आठवतं आपल्या कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्याला निवेदक म्हणून घेतलं होत आणि तिथूनच खऱ्या अर्थाने मला माझ्या आयुष्याची दोर मिळाली होती, माझी नीलू. ” 
” छे, तुमचं आपलं काहीतरीच” नीलू आज्जी लाजून बोलल्या. 
राम आजोबा बोलत होते ” निवेदनाची जेव्हां आपण प्रॅक्टिस करायचो, तेव्हां मला कळालं की तुला मोगऱ्याचा गजरा खुप आवडतो. मग काय तुमची आवड ती आमची आवड, आम्ही सुद्धा मोगऱ्याच्या फुलाला आपलंसं केलं, आणि प्रॅक्टिसच्या तिसऱ्याच दिवशी येतांना अहमद भाई कडून म्हणजे बाबरच्या वडिलांकडून मोगऱ्याचा गजरा घेऊन आलो. गजरा बघून तु म्हणाली होती, कुणासाठी आणला? का तुम्हाला आवडतो गजरा? पण माझी सांगायची हिंम्मत नाही झाली. ”

नीलू आज्जी गालातल्या गालात हसत म्हणाल्या.” हो, माहिती आहे. त्या एसी हॉल मध्ये तुम्हाला घाम फुटायचा, मी तुम्हाला काही विचारलं की, हो ना..?”” पण खरं सांगू का, तुमचा साधेपणा मला खुप भावला आणि माझ्या लहानसहान गोष्टी लक्षात ठेवून तुम्हीं पूर्ण करायचायत ना तो तुमचा प्रेमळ स्वभाव.” नीलू आज्जीने अगदी भावनामय होवून सांगितलं.
“नीलू, मला आज तुला सांगावस वाटत मी जे आजपर्यंत बोललो नाही, की तुझी सोबत होती म्हणून मी आजपर्यंत उभा आहे. तु प्रत्येक क्षणी मला खंबीर साथ दिलीस, कित्येक वेळेस मी डगमगलो पण तु मात्र कायम स्थिर. प्रत्येक सुख: दुःखात आणिआयुष्याच्या चढ उतारात माझ्या पाठीशी कायम तु खंबीर उभी.. मुलं लहानाची कधी मोठी झाली खरंच तुझ्यामुळे कळलंच नाही ,नीलू.

माझा फिरतीचा जॉब त्यामुळे घराकडे आणि तुमच्याकडे मला लक्षच देता नाही आलं.पण तु मात्र घर आणि आपल्या कुटुंबाला सांभाळस. ह्यामुळे तुझ्यावरच प्रेम तसूभरही कमी नाही झालं. नीलू खरं तर माझी इच्छा होती, तुला खुप खुप सुख द्यायचं पण नाही झालं. ” आणि आजोबांचे डोळे पाणावले.
ते पाहता नीलू आज्जीने डोळे पुसत आजोबांना सांगितले, ” अहो, रामजी, मला सारं मिळालं मी खुप खुश आहे आपल्या ह्या जीवनात. आपला संसार, मुलं आणि त्यांचं सारं काही छान झालं. आता आपलं म्हातारपण छानच चाललंय. मुळात माझं सुख हे तुमच्यात आहे हो. आणि खरं सांगायचं तर सर्वात मोठं माझं सुख तुम्ही. मी नशिबवान समजते ते ह्यासाठी की माझा प्रिय नवरा मला गजरा आवडतो ह्यासाठी निरंतर एकही दिवस न चुकता माझ्यासाठी गजरा आणतो. ह्यापेक्षा काय सुख लागतं हो, आपल्या छोट्याश्या इच्छा पुर्ण होतात, हेच ते काय आपलं सुख.

आताही अहमद भाईंचा मुलगा बाबर म्हणतो ” अब्बाजान जाते समय एकीच बोले, राम जोशी साब के घर पे बिना एक दिन भी खाडे के मोगरे का गजरा लेके जाने का, क्युंकी उनो इत्ते सालों में एक दिन भी खाडा नही किये, उनो बोले थे मै रहूं या ना रहुं भाबिजी के लिये गजरा पोचना चाहीये. इसलिये अब्बा बोले वैसा कर रहा हुं बस, राम चाचा भी मुझे बेटा मानते ना, तो एक मां के लिये इतना तो कर सकता ना मैं”
“बघ तो बाबर इतका विचार करतो पण आपल्या पोटच्या पोराला काही देणंघेणं नसतं” राम आजोबा जरा रागातच बोलले. 
“बरं नीलू ह्या महिन्याच्या 20 तारखेला काय आहे माहित आहे ना?” राम आजोबांनी अपेक्षित उत्तरादाखल आज्जीला विचारलं. 
” हो तर 20 एप्रिल आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, मी कशी विसरेल, आणि तुम्ही मला कधी विसरू दिलात का आजपर्यंत.” आज्जीने सांगितलं.

“कसा विसरू देऊ, बरं मी काय म्हणतो आपला हा 50 वा लग्नाचा वाढदिवस आहे जरा स्पेशल करूया का? आपल्या सुपुत्राला बोलूया. सगळे असतील तर अजून छान वाटेल. आजच फोन करूया त्याला. कारण एक आठवडा राहिला फक्त, त्यालाही यायचं म्हटलं तर सगळी व्यवस्था करावी लागेल. आज रात्रीच बोलूया त्याच्याशी.
मी जरा बाहेर जावून येतो, तु सुनीताला आज आज छान काहीतरी बनवायला सांग, भजे कढी करायला सांग, मी श्रीखंड घेऊन येतो. ” आजोबा पिशवी घेत म्हणाले. सुनिता त्यांच्याकडे 15 वर्षापासून काम करत होती. 
“अहो तुम्हाला डायबेटिस आहे ना मग कशाला श्रीखंड आणता, थोडंसं दही साखर खा” आज्जीने थोडं रागातच सांगितलं. 
“अगं श्रीखंड खायचं मन होतंय आज. खाऊ दे‌ना आजपुरत. रोजरोज का खातो मी. आज इन्सुलिन थोडं जास्त घेईल मग तर झालं” आजोबांनी समजावत सांगितलं.

आजोबा खाली सोसायटी मध्ये गेले तशी सोसायटीची मुलं जमा झाली. आजोबांना म्हणाली ” आजोबा ह्या वेळेस तुमच्या लग्नाचा वाढदिवस मोठा करूया. दरवेळेस तुम्ही घरी बोलावता, ह्यावेळेस आम्ही तैयारी करतो. तुम्ही सांगा काय थीम हवी आहे. आपल्या सोसायटीच्या हॉल मध्ये करू.” मुलांनी राम आजोबांना हक्कवजा शब्दात सांगितलं. 
” अरे मुलांनो नका काही त्रास करून घेऊ, मी करतो, तुम्ही फक्त या सर्व. मी मिस्टर गोगटे आपले चेअरमन आहेत ना त्यांच्याशी शी बोललो. 20 तारखेला हाॅल उपलब्ध आहे म्हणाले. ” आजोबांनी सांगितलं
“आजोबा ते काही नाही ह्या वेळेस आम्हीच सगळं करणार, तुम्ही बघाच आम्ही कसं करतो ते अगदी आठवणीत राहील असं सेलिब्रेट करूया” मुलंही हट्टाला पेटली होती. 

“बरं मुलांनो तुम्ही म्हणाल तसं” आजोबांना मुलांच्या हट्टापुढे नमतं घ्यावं लागलं.
आजोबांनी त्यांचा निरोप घेतला आणि बाजाराकडे निघाले.
थोड्या वेळाने घरी येऊन आज्जी आणि आजोबांनी जेवण केलं, आजोबांच्या आवडीची कढी आणि भजे होतेच. थोडंसं श्रीखंड खाल्लं एक डब्बा त्यांनी सूनितासाठी पण आणला होता. तो आणि काढलेला डब्बा दोन्ही तिला दिले आणि वामकुक्षी साठी पलंगावर आडवे झाले. पण आज आजोबांना झोप येत नव्हती काहीतरी चलबिचल चालू होती मनात. 
“अहो काय झालं, आज झोप येत नाहीये का, डोकं दुखतंय का?” आज्जीने काळजीने विचारलं. 
“अगं काही नाही, असच” म्हणत आजोबांनी वेळ मारून नेली. आज्जीने आजोबांना कपाळाला बाम लावून दिला.
थोड्या वेळाने आजोबांना झोप लागली. 

आता सोसायटी मध्ये मुलांची गडबड सुरू झाली सर्वांच्या आवडत्या कपल च्या लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची. बापटांच्या राकेशने पुढाकार घेतला, सर्वांना जमवून कामे वाटून दिली.
सर्वांनी मिळून थीम ठरवली ती मोगऱ्याच्या गजराची. बाबर लाही मुलांनी टीम मध्ये घेतलं. त्यालाही खुप आनंद झाला. 
इकडे आजोबांची झोप झाली, फ्रेश होऊन चहा घेतला आणि नीलू आज्जीला आवाज दिला. 
“नीलू, उठ. मी आपल्या दोघांसाठी चहा टाकतोय. आपल्या सुपुत्राशी बोलायचय ना ?” आज्जी पण उठल्या, फ्रेश होऊन दिवा बत्ती केली.
दोघे चहा घेत बोलत होते. 

“नीलू, किती सर्रकन ही 30 वर्षे गेली ना ह्या सोसायटी मध्ये येऊन. आपला मुलगा, सोसायटी मधली मुलं कधी लहानाची मोठी झाली कळलंच नाही. ह्या सोसायटी ने आपलंसं करून टाकलंय ना आपल्याला. ना कधी सोसायटी सुटली ना सोसायटी ला आपण” हसत राम आजोबा बोलत होते. बसल्या बसल्या राम आजोबांनी प्रशांतला फोन लावला.
” हॅलो प्रशांत बेटा, मी काय म्हणतो, तुला ह्यावेळेस तरी यायला जमणारे का 20 तारखेला?” राम आजोबानी नाखूष स्वरातच विचारलं जणूकाही उत्तर माहित होतं. 
आज्जींनी आजोबांच्या हातून फोन घेतला आणि प्रशांतशी बोलायला लागल्या.

“काय रे प्रशांत, कसा आहेस बाळा? बरं जमव रे बाबा ह्यावेळेस 20 तारखेचं. अनु, वेदांतला बघून खुप दिवस झाले रे. बरे आहेत ना ते, तब्येत ठीक आहे ना. बघावंस वाटतंय रे, ह्या निमित्ताने भेट होईल सर्वांची. काय म्हणतो मग?”
“आई, आम्ही बरे आहोत. तुम्ही नीट आहात ना, आई, ह्यावेळेस जमेल असं काही वाटत नाही. खुप काम आहे ऑफिसच, नवीन प्रोजेक्ट पण सुरू केलाय. खरच सॉरी ह्यावेळेस, बाबांना समजावून सांग. काळजी घ्या तुमची. जमेल तसं येऊन जातो. चल ठेवतो मी” असं बोलत त्याने फोन ठेवला
“अरे ..अरे..पण ऐक तरी…” नीलू आज्जी आशेने बोलत होत्या. पण फोन कट झाला. त्यांनी आजोबांकडे बघून नकारार्थी मान हलवली. 

“मला माहित होतं नीलू, तो येणार नाही म्हणून. तु नाराज होऊ नको. तो आला नाही म्हणून काय झालं, आपली सोसायटीची मुलं आपलीच आहेत ना. करू सगळ्यांबरोबर सेलिब्रेट. काळजी करू नको सगळं नीट होईल”. आजोबांनी आज्जीला समजावलं.
पाहता पाहता दिवस गेले आणि 20 तारीख उजाडली.
तशीही आज्जी आजोबांना आदल्या रात्री झोप सुद्धा लागली नव्हती, आठवणींच्या विश्वात रमली होती.
आज 50 वर्षे एकत्र. सोसायटी मध्ये सकाळपासूनच गडबड चालू होती. बापटांचा राकेश सकाळीच आजोबांकडे आला. त्याने सर्वात आधी आजोबा आज्जीला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि पुढच्या कामासाठी निघून गेला. आजोबा आज उठले ते मुळातच खुप फ्रेश. 

लवकर तैयार झाले, चहा घेतला आणि वॉक ला निघून गेले. आजची सकाळ आणि त्याच माधुर्य काही औरच होतं.
येता येता आजोबा बाबर कडे गेले आणि त्याला सांगितलं आज स्पेशल गजरा बनवून दे.
बाबर ने लगेच त्यांना शुभेच्छा दिल्या ” राम चाचा शादी की सालगिरह की आप दोनों को बहोत बहोत शुभकामनाऍ. अल्ला करे आप दोनों को सबकी उमर लगे, और किसी की नजर ना लगे. मैं अल्ला को दुवा करता हूं आपके लिये” आजोबांच्या डोळ्यांनी आसवांना जागा दिली आणि बाबाला मिठी मारली.
आजोबांनी लगेच सावरून डोळे पुसले आणि बाबर चे धन्यवाद केले. आज बाबर ने खुप छान गजरा बनवला होता. मोगऱ्याच्या गजरात अबोली ची शेंदरी फुलं मध्ये मध्ये माळत होता, खुप छान दिसत होता गजरा. आजोबा एकदम खुश.

इकडे आज्जी उठल्या, स्वतःच आवरलं, सगळं घर सूनिताकडून आवरून स्वच्छ करून घेतलं, धूप दीप करुन, देवाची मनोभावे पूजा केली, आज धुपाचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. चहाचं आदन ठेवलं, चहासाठी आज्जी, आजोबांची वाट पाहत गॅलरीत उभ्या होत्या. 
दुरूनच आजोबा येताना दिसले. आज्जीने चहात दूध घातलं आणि वाट पाहत होत्या. 
तेवढ्यात आजोबा आले. आज आजोबा मध्ये तारुण्य संचारलं होत. हातात रोजच्या सारखा गजऱ्याचा पुडा होता. आजोबांनी रोजच्याप्रमाणे फ्रीज मध्ये गजरा ठेवला

“नीलू, ए नीलू. हे घे… आज स्पेशल आहे सगळं. मी आवरतो लगेच. आपण चहा घेऊया. ” आजोबांनी हर्षित आवाजात आज्जींना सांगितलं. हातातलं बाकीचं सामान दिलं आणि बाथरूम कडे वळाले.
फ्रेश होऊन आले आणि चहा घेता घेता आज्जीला म्हणाले. “नीलू, आज तु आपण नवीन घेतलेली काठा पदराची मरून कलर ची साडी घाल, छान दिसतेस तु आणि त्यावर मी आणलेला आजचा स्पेशल गजरा केसात माळ. नीलू, खरं सांगायचं तर,जेव्हां प्रशांत US ला गेला तेव्हां मला खरी नीलू मिळाली माझी ती जुनी. नाहीतर तु कायम कामात, आणि सर्वाँना शिस्त लावण्यात बिझी होती.” आजोबा मन मोकळं करत बोलत होते.
तेवढ्यात राकेश, सुकन्या, बबन्या, कीर्ती, सुहास, विजय आणि तान्या आले आणि सर्वांनी एक स्वरात आज्जी आजोबांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

आज्जी आजोबांनी त्यांचे मनोमन आभार मानले आणि त्यांना बसण्यास सांगितले पण कोणीही थांबल नाही. राकेश तेवढा थांबला कारण त्याला आजोबांशी बोलायचं होत. तो म्हणाला “आजोबा, थीम कोणती?”
आजोबांनी राकेश ला जवळ बोलावून त्याच्या कानात काहीतरी सांगितले. राकेशने पण ” डन आजोबा, होवून जाईल. आणि आजोबा दोघांनी बरोबर 7:30 वाजता हॉल मध्ये यायचं आहे.” म्हणून निरोप घेतला. 
“काय हो, काय सांगितल त्याच्या कानात. माझ्यासमोर सांगितलं असतं तर मी काय त्याचे कान धरले असते का?” आज्जीने खोचट स्वरात विचारले. 
” अरे तुला सरप्राइज आहे,कळेल लवकरच” आजोबांनी शांत करत सांगितलं.

“काय हो, तुम्ही पण आज क्रीम कलर चा झब्बा कुर्ता घाला ना, छान दिसेल. मी काढून ठेवते”अस म्हणत आज्जी कापाटाकडे वळल्या आणि झब्बा कुर्ता काढून ठेवला. 
आजोबांनी होकारार्थी मान हलवली आणि “हो हाच ड्रेस घालतो” म्हटलं. आणि आजोबा वामकुक्षी साठी बेडरूम मध्ये  गेले.
संध्याकाळचे 6 वाजले तसे जागे होऊन फ्रेश झाले , दोघांसाठी चहा टाकला आणि नीलू आज्जीला उठवले.
तेवढ्यात राकेश चा फोन आला. “आजोबा तैयारी पूर्ण होत आली तुम्ही वेळेवर तैयार रहा. आम्ही घ्यायला येतो”. असे सांगून फोन ठेवला.
7 वाजले तसे सोसायटी मधील रहिवाशांची पावलं सोसायटीच्या हॉल कडे वळत होती.
सर्वत्र मोगऱ्याचा सुगंध पसरला होता . राम आजोबा आणि नीलू आज्जी तैयार  झाले.

आज नीलू आज्जी खूपच सुंदर दिसत होत्या तर राम आजोबा एकदम हँडसम, डॅशिंग. राम आजोबा पटकन फ्रीज कडे गेले आणि त्यांनी मोगऱ्याच्या गजराचा पुडा काढला आणि नीलू आज्जीला विचारले. 
“नीलू, मी आज गजरा मळू का तुझ्या केसात.”
तसे नीलू आज्जी म्हणाल्या ” अरे व्वा, रामजी गजरा खूपच सुंदर आहे. आज मोगऱ्या बरोबर अबोली पण. खुप छान दिसतोय. आज तुम्हीच मळा गजरा माझ्या केसात. आज तर तुमचाच हक्क. आजच्या दिवशीच तर गजरा आणि तुमाच्यारुपी सुगंध माझ्या आयुष्यात आला होता.” आजोबांनी प्रेमाने नीलू आज्जीच्या केसात गजरा मळला. 
थोड्याच वेळात राकेश, कीर्ती, सुहास आणि सुकन्या राम आजोबा आणि आज्जीला घ्यायला आले. 

“आजोबा आज्जी चला आता हॉल मध्ये” राकेश म्हणाला. त्याने दोघांच्या डोळ्यावर पट्टी बांधली.
त्यांनी का विचारले तर सरप्राइज आहे म्हणाला. दोघांना पट्टी बांधून सर्व जण त्यांना हॉल कडे घेऊन येत होते. जसं जसा हॉल जवळ येत होता तसा तसा सुगंध वाढत होता तशी आजोबा आज्जींची उत्कंठा वाढत होती.
जसही त्यांना हॉलच्या दाराशी आणलं राकेश ने दोघांच्या डोळयावरच्या पट्ट्या काढल्या.
समोरच दृश्य बघून दोघानाही गहिवरून आलं. मुलांनी पूर्ण हॉल मध्ये मोगऱ्याच्या फुलांच डेकोरेशन केलं होत. सर्वत्र सुगंध पसरला होता. मध्ये दोन राजेशाही खुर्च्या मांडल्या होत्या आणि तिथपर्यंत जाण्यासाठी पायघड्या सुद्धा टाकल्या होत्या.

राम आजोबा आणि नीलू आज्जीला मोठ्या अदबीने पायघड्या वरून चालवत खुर्च्यांवर बसवण्यात आले.
तेवढ्यात राकेश ने इशारा करताच वाजंत्री सुरू झाली. समोर पूर्ण सोसायटी ची लोक, मुलं, बाबर आणि त्याच कुटुंब आणि आजोबांचे सहकारी सुद्धा उपस्थित होते. 
सर्वांंंना बघून जणू काही डोळ्याचे पारणे फिटावे अश्याच काहीशा भावना होत्या दोघांच्या. 
थोड्याच वेळात पाच ज्येष्ठ सवाष्नींनी आज्जीचं आणि आजोबांचं औक्षण केलं, आणि दोघांना गिफ्ट दिले. दोघांचे पाय परातीत घेऊन धुतले. लहान होते त्यांनी दोघांच्या पाय पडून आशीर्वाद घेतले तर त्याच्या बरोबरच्यांनी त्यांना मनःपुर्वक शुभेच्छा दिल्या.
खरंच खूप बोलक्या भावना आज्जी आणि आजोबांच्या डोळ्यातून दिसत होत्या. जे मनी असे ते समोर दिसे त्याप्रमाणेच.

दोघांना मोठे हार देण्यात आले आणि सर्वांच्या शुभेच्छांच्या वर्षावात दोघानी एकमेकांना हार घातले तेवढ्यात त्यांच्या कानावर “बाबा, आजोबा, आज्जी” असे आवाज आले. बघतात तर काय समोर त्यांचा मुलगा प्रशांत, सून अनु आणि नातु वेदांत होते.
आता तर आज्जी आजोबांना आनंद गगनात मावेनासा झाला. प्रशांतने आई बाबाला घट्ट मिठी मारली,नातु ही आज्जी आजोबाला बिलगला.. एक कुटुंबाने आपल्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. 
सर्वांच्या गाठीभेटी झाल्या, जेवणे झाली. आज्जी आजोबांनी सर्व मुलांना आणि सोसायटी च्या सर्व सदस्यांचे आणि विशेषतः बाबर आणि त्याच्या कुटुंबीयांचे मनापासून आभार मानले. 
हा छोटेखानी पण तितकाच भावनिक सोहळा संपला.

सोहळ्यानंतर जेव्हां राम आजोबांचं कुटुंब घरी आलं तेव्हां आज्जी आजोबांनी आपल्या आनंदाश्रू नी देवाचे आभार मानले. सर्व जण आपआपल्या रूम मध्ये गेले.
झोपतांना आजोबांनी नीलू आज्जीचा हाथ हातात घेऊन म्हटले;
” तुझ्या असण्याने आयुष्यात माझ्या
सुखाची उधळण होत आहे
तुझ्या नावाचेच श्वास मी
नीलू आज घेत आहे..
जोडले आपणांस जीवनी ज्याने
आहे हाच तो मोगरा
असेन मी नसेन मी जीवनी जरी
असू दे केसात कायम तुझ्या मोगऱ्याचा हा गजरा”
नीलू आज्जीने प्रेमाने तो गजरा हातात घेतला आणि दोघांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्म हाच नवरा मिळू दे म्हणून देवाकडे हाथ जोडले. 
©मनोज कुलकर्णी

Leave a Comment

error: Content is protected !!