मनस्वी ( भाग 1)

This entry is part 1 of 2 in the series मनस्वी

©️ सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
मनस्वी नुकतीच एकोणीस वर्षाची झाली होती. आता लग्न लावून द्यायचं म्हणून काकाने दडपून तिचं वय दोन वर्षांनी वाढवून सांगितलं. पण काकाच्या घरातून बाहेर पडायची लग्न ही एकच संधी होती मनस्वीला आणि तिने ती घेतली होती.
आता राजेशच्या साथीने आपण एक सुंदर जग उभं करु असं स्वत:ला सांगत तिने कालची रात्र गाडीत जागून काढली होती.
काल मनस्वी तिच्या काकाच्या घरून निघून गाडीत बसली होती ती मोठ्या अपेक्षेने,  ती राजेशच्या भेटीची स्वप्न रंगवत.
सकाळी सूर्य उगवला की मुंबई – या तिच्या कल्पनेला धक्का बसला तो सकाळीच.
पावसामुळे गाडी उशीर करत, रेंगाळत चालली होती. जी गाडी सकाळी सातला पोचायची तिला दुपारी एक वाजले होते ठाणे गाठायला.

मनस्वीकडे पैसे होते थोडेसे, पण ते खर्चायची तिला भीती वाटली होती म्हणून ती उपाशीच राहिली होती. मग बारा वाजता तिच्या सोबत असलेल्या एका अनोळखी मावशीबाईने तिला एक चपाती आणि चटणी दिली होती खायला.
दरम्यान राजेशने ही फोन करून “काळजी करू नकोस, मी येतो आहे स्टेशनवर घ्यायला’ असं सांगितलं होतं.
त्याचा फोन आला तेव्हा ती एकदम दचकलीच होती. हा फोन राजेशनेच दिलेला पाठवून.
तो कसा वापरायचा ते काकाच्या लहान मुलाने तिला शिकवलं होतं. 
दुपारी राजेश स्टेशनवर तिला घ्यायला आला खरा, पण तो तिला लगेच ‘घरी’ घेऊन गेला नाही.
“ऑफिसात तातडीची मीटिंग आहे, त्यामुळे लगेच गेलं पाहिजे” – असं काहीतरी तो बोलला ते मनस्वीची नजर चुकवतच.

मग त्याने सोबत आलेल्या एका माणसाची – लहानसाच दिसत होता तोही – ओळख करून दिली.
“हा अमोल . माझा जीवाभावाचा दोस्त. सख्ख्या भावासारखा आहे तो मला. त्याच्याबरोबर जा. काळजी करू नकोस. तो सांगेल तसं कर.“ राजेशच्या या बोलण्यावर काय म्हणायचं हे मनस्वीला कळलंच नव्हतं.
“कधी याल तुम्ही घ्यायला परत?” मनस्वी ने आशेनं विचारलं राजेशला.
“मला नाही माहिती” या त्याच्या उत्तरावर ती चकित झाली होती.
ती काहीतरी बोलणार हे ओळखून राजेश “उशीर होईल भरपूर. असं म्हणून  राजेश निघाला होता.

दोन पावलं पुढे गेल्यावर अमोल राजेशला काहीतरी म्हणाला इंग्रजीत, जे मनस्वी ला नीट कळलं नव्हतं.
त्यावर राजेश परत आला होता.
“माझा फोन बिघडलाय. तुझा दे मला. लागला तुला; तर अमोलकडे आहेच फोन, तो वापर,” असं म्हणाला.
मनस्वीने मुकाट्याने त्याला मोबाईल दिला. राजेशने तर दिलेला फोन होता तो, त्याला कसं नाही म्हणणार?
एकंदर मनस्वीला राजेशचं ते सगळं वागणं खूप खटकलं होतं पण काय करणार? ती गप्प बसली होती. विचारांत पडली होती.
“चल, जरा समुद्रावर जाऊन येऊ; म्हणजे तुला एकदम ताजतवानं वाटेल”, अमोल ने शांतपणे सुचवलं.

खरं तर मनस्वी अगदी काळजीत होती. तरी समुद्र ‘पहायच्या’ कल्पनेने ती एकदम भारावली. स्वत:ची द्विधा मनस्थिती ती विसरली. काळजीत असतानाही अमोल च्या बोलण्याने तिला एकदम आनंद झाला. 
मुंबईतल्या पहिल्याच संध्याकाळी तिला समुद्रावर घेऊन जायला राजेश नाही तरी निदान अमोल तयार होता.
ही एक मस्त संधी होती; पण घ्यावी का नाही ती? जावं का नाही समुद्रावर ह्याच्या बरोबर? राजेश ला काय वाटेल हे कळलं तर? नाराज तर नाही व्हायचा ना तो?
आपल्या नाराजीचं त्याला काही सोयरसुतक नाही पण आपण मात्र नव-याच्या नाराजीची चिंता करतोय याची मनस्वीला क्षणभर गंमत वाटली.

तशी मनस्वी अस्वस्थ होती. तिचं वय लहान आणि तिला जगाचा फारसा अनुभव नव्हता हे खरं. त्यामुळे तिची अस्वस्थता तिला शब्दांत नसती मांडता आली.
अमोल एक सज्जन माणूस दिसत होता. त्याने तिच्या सामानाचा ताबा घेतला, तिला भूक लागली असेल हे जाणून एका हॉटेलात नेऊन भरपेट खायला घातलं.
मुंबईतलं आयुष्य गावाकडल्या आयुष्यापेक्षा कसं वेगळ आहे हे आणि राजेश ला तिला असं सोडून जाणं कसं अटळ होतं हे अमोल तिला समजावून सांगत होता.
अमोलने आपल्या मित्राची बाजू घ्यावी हे स्वाभाविक होतं तरी अमोल जे काही सांगत होता ते तिला काही पटलं नव्ह्तं. पण राजेशचा राग या बिचा-यावर काढण्यात अर्थ नव्हता इतकी जाण तिला होती.

खरं तर आजचा दिवस मनस्वी आणि राजेश साठी खूप महत्त्वाचा होता. दोन महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. पण ते एकमेकांना भेटत होते ते आजच. त्यामुळे मनस्वीच्या मनात वेगळेच रम्य बेत होते या आजच्या भेटीचे.
मनस्वी खूप लहानपणीच तिच्या काकाच्या घरी राहायला आली. तिचे आई-वडील तिला आठवतही नाहीत. कसल्यातरी अपघातात ते दोघेही जागच्या जागी मरण पावले इतकं तिला माहिती होतं.
तेही “आईबापाला खावून आता आमच्या उरावर बसली आहे कार्टी” हे उद्गार काकी रागावली की तिच्या तोंडून हमखास बाहेर पडत.
पण काकाच्या घरी ‘नकोशी’ असूनही निलाजरेपणाने राहण्याशिवाय मनस्वी ला काही पर्याय नव्हता.

तिने अभ्यास जोरात केला, दहावीच्या परीक्षेत चांगले ऐंशी  टक्के मार्क मिळवले पण शिक्षणाचा पुढचा रस्ता तिच्यासाठी बंद झाला कारण काकाच्या गावात कॉलेज नव्हतं.
तालुक्याच्या गावी जाऊन शिकायचं तर ‘खर्च कोण करणार?
’दहावीनंतर तीन वर्ष मनस्वी घरातच होती. झाडझूड, धुणीभांडी, स्वैपाकपाणी आणि घरातली पडतील ती कामं करण्यात तिचा वेळ ती घालवत होती. 
काकाच्या मोजक्या पगारावर चालणा-या घरात आपला खर्च जडच आहे, हे तिला चांगलेच माहित होते, सर्व हौस-मौज मारून ती राहात होती.

म्हणून जेव्हा काकाने लग्नाचा प्रस्ताव मांडला – प्रस्ताव कसला म्हणा, हुकूमच होता तो – तेव्हा तिला लग्नाच्या आनंदापेक्षा ‘या घरातून सुटका होणार’ याचा जास्त आनंद झाला होता. 
नाहीतरी एक दिवस इथून जायचं आहेच – आज काय आणि उद्या काय – काय फरक पडणार? – असा विचार करून मनस्वी गप्प बसली.
जगायची एक नवी संधी देणारी ‘लग्न’ ही एक किल्ली होती मनस्वी साठी . शिवाय होणारा नवरा मुंबईत राहतो या बातमीचं अप्रूप वाटलं होत तिला. मुंबई मोठी आहे, राजधानी आहे हे तिला माहिती होतचं. 

काकाने अगदी साधेपणा ने तिच लग्न उरकायचं ठरवलं. त्याचं तिला फार काही आश्चर्य वाटलं नाही. 
आपल्या नशीबात लग्नाचा वेगळा मांडव नाही; हौस मौज नाही हे तिने समजून घेतलं होतं.
तिला जेव्हा बोलताबोलता काकीकडून समजलं की राजेश – तिचा भावी नवरा – अनाथ आहे, त्याचे आई-वडील त्याच्या लहानपणीच गेले आहेत – तेव्हा मनस्वीला आनंदच झाला होता.
आपला नवरा आपल्यासारखा अनाथ आहे म्हणजे आपण एकमेकांना जास्त समजून घेऊ शकू असं तिला वाटलं होतं. एकाच परिस्थितीतून गेलेले आणि एकमेकांशिवाय दुसरं कोणी नसणारे असे आपण दोघं – आपला संसार चांगला होईल अशी तिला मग राजेशला प्रत्यक्ष पाहण्यापूर्वी जणू खात्री वाटली होती.

पण आज मात्र काहीतरी विचित्र घडत होतं. लग्नानंतर दोन महिन्यांनी आणि तेही पहिल्यांदाच भेटलेला तिचा नवरा तिला स्वत:च्या घरी न नेता त्याच्या मित्राच्या हाती सोपवून गेला होता. काही फारसं न बोलताच. मनस्वीला त्यामुळे एक प्रकारची भीती वाटायला लागली होती.
पण तक्रार करायला मनस्वी ला काही जागा नव्हती. दुपारपासून अमोलने तिची व्यवस्थित काळजी घेतली होती. 
पण तरीही तो काही तिच्या ओळखीचा नव्हता, त्यामुळे तिला तितकंस मोकळं वाटत नव्हतं.
एक दोनदा तिने अमोलला आठवण केली ‘राजेश आले नाही फोन करून विचारा ना कधी येणार ते’.
पण त्यावर अमोल शांतपणे हसून दर वेळी ‘मीटिंगमध्ये फोन घ्यायला परवानगी नसते’ असं म्हणाला होता.

फोनची गरजच नव्हती तर राजेश तिचा फोन का घेऊन गेला हे एक कोडं वाटायला लागलं होतं मनस्वीला.
काय करावं हे मनस्वी ला सुचत नव्हतं…
मनस्वीच्या लक्षात आलं की या अफाट महानगरात राजेश शिवाय ती कुणालाच ओळखत नाही. आणि राजेश ची ओळख म्हणजे तरी काय? तर त्या छोट्या हॉल मध्ये भटजी नि दिलेल्या सूचनांवर एकमेकांना घातलेले हार आणि एकत्र केलेलं जेवण. 
त्या रात्रीच राजेश मुंबईला निघून गेला होता – तेही ठीकच म्हणा. नाहीतरी काकाच्या घरात कुठ राहणार होते ते दोघं ? त्यानंतर फक्त राजेश ने पाठवून दिलेल्या मोबाईलवर आठवड्यातून एकदा बोलणं – तेही जेमतेम चार पाच मिनिटांच.

मनस्वी  जवळ पैसेही नव्हते फारसे आणि समजा असते पैसे खूप तरी काय करणार होती ती? राजेशची तो येईपर्यंत वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं.
“तो आलाच नाही परत तर?” अशी एक शंका तिच्या मनात मधूनच डोकं काढते आहे मघापासून.
पण तिला माहिती आहे की काकाकडे परत जाण्यातही अर्थ नाही.
पैसे नाहीत तितके हे तर खरंच – पण तिकड जाऊन ती काय करणार? त्या घरात तिची जागा होती ती नाईलाज म्हणून. आता ती जागा तिची नाही – ती तिथं परत जाऊ शकत नाही..
क्रमश:
आपल्या नवविवाहीत बायकोला सोडून राजेश कुठे गेला असेल? तो परत येईल का? इतक्या मोठ्या शहरात पहिल्यांदाच आलेल्या मनस्वीचे पुढे काय होईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे वाचा पुढच्या आणि अंतिम भागात.
©️ सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
भाग 2 इथे वाचा

सदर कथा लेखिका सौ. सोनल गुरुनाथ शिंदे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
किती ही मोठे झालो तरी
या वळणांवर
नकार


Series Navigationमनस्वी ( भाग 2) >>

Leave a Comment

error: Content is protected !!