मनस्वी ( भाग 2)

This entry is part 2 of 2 in the series मनस्वी

भाग 1 इथे वाचा

©️ सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
आत्ता या क्षणी तिला फक्त एकाच माणसाचाच आधार आहे, तो म्हणजे ह्या अमोलचा. 
 “मी एक प्रश्न विचारू तुम्हाला?”
“राजेश , माझा नवरा – परत येणार आहे का मला घ्यायला?” .
“हुशार आहेस” अमोलच हसू आता रुंदावलं, त्याचे डोळे चमकले. मनस्वी च्या हृदयाचा ठोका चुकला. तिने एक पाउल मागे घेतलं. अमोल म्हणाला, “काय विचारात पडलीस एवढी? दमलीस का? चल, मग आता घरी जाऊ आपण.” त्याच शांतपणाने तो बोलत होता.
“घरी?” मनस्वी ने अविश्वासाने विचारलं. तिच्या मनातल्या आशेने परत उचल खाल्ली.

“हो, पण तुझ्या नव-याच्या घरी नाही, तर माझ्या घरी.” अमोल पुन्हा हसत हसत म्हणाला.
या वाक्याने मनस्वी च्या मनात पुन्हा वादळ निर्माण झालं. आपल्यावर एवढ संकट आलं असताना हा माणूस हसतो कसा आहे – असा विचार तिच्या मनात आला.
“तुमच्या घरी?” मनस्वी ने काहीतरी बोलायचं म्हणून विचारलं.
“आता तुझा तो नवरा तुला माझ्यावर सोपवून पळून गेला, म्हणून मी पण पळून जाऊ काय? जबाबदार माणूस आहे मी. तुझं आत्ता या क्षणी या मुंबईत माझ्याविना कुणीही नाही हे मला माहिती आहे.” …

ह्या बोलण्याचा काय अर्थ लावावा हे मनस्वी ला कळेना – तिची मती गुंग झाली होती. जे काही चाललंय बोलणं, त्यातून आपलं भवितव्य फक्त अंधारमय आहे हे तिला कळून चुकलं.
पण तरीही हा माणूस घरी न्यायचं म्हणतोय म्हणजे कदाचित भलं होणार असेल अजूनही. आशेचा एखादा किरण असेल का त्यात?
“घरी कोणकोण असतं तुमच्या? घरातले लोक रागावणार नाहीत का माझ्यासारख्या अनोळखी बाईला असं थेट घरी आणण्याने?” मनस्वी च्या स्वरांत परत एकदा शंका आणि कुतूहल याचं मिश्रण होतं.
एका बाजूने तिला अमोल चा प्रचंड राग आला होता.

राजेश आपल्याला घ्यायला परत येणार नाही हे या माणसाला आधीपासून माहिती – पण तरी त्याने ते सांगितलं नाही याचा तिला राग आला होता. अर्थात त्याने ते तिला सांगितलं असतं तरी तिने काय केलं असतं हा एक मोठा प्रश्नच होता म्हणा.
दुस-या बाजूने तिला अमोलबद्दल कृतज्ञताही वाटत होती – त्याने तिला खायला घातलं; तिची विचारपूस केली होती; तिची पिशवी मघापासून सांभाळली होती; …. या माणसावर कसं रागावणार होती ती? आणि तो सोडून तिला कोण ओळखीचे नव्हत इथे.
थोडं त्याच्या मर्जीने गेलं; तर काहीतरी वाट शोधता येईलही निदान.
“छे! रागावतील कसल्या त्या सगळ्याजणी? तू काय बाई आहेस थोडीच, तू तर लहान मुलगी आहेस. माझी मावशी तर तुला पाहून एकदम खुश होईल. काळजी करू नकोस.

तुला व्यवस्थित खायला-प्यायला मिळेल, चांगले कपडे मिळतील; राहायला जागा मिळेल …हं, तुला थोड काम करावं लागेल. मुंबईत महागाई फार आहे. माझी मावशी मनाने चांगली आहे पण पैसे लागतात ना सगळया गोष्टींना!!” अमोल समंजसपणे बोलत होता..
“काय काम करावं लागेल मला? जमेल ना मला ते?” मनस्वी चा ताण थोडा हलका होतो आहे या संवादाने.
“अगं, विशेष काही नाही. शिकशील तू. लहान आहेस अजून पण सगळ्या मुलींना जमेल असं सोप काम आहे. माझ्या बहिणी आहेत त्या शिकवतील तुला ते….” अमोल हे बोलताना स्वत:शीच पुन्हा एकदा हसतो आणि ते पाहून मनस्वी चरकते.

“राजेश ला विसरून जा, त्याला शोधायचा प्रयत्न करू नकोस, त्यातच तुझं भलं आहे. आणि तुला त्याच्यापेक्षा कितीतरी चांगले पुरुष भेटतील, एक नाही, अनेक भेटतील; ते तुझ्यावर जीव ओवाळून टाकतील. तुझं आयुष्य एकदम चैनीत जाईल. हं, तुला काकाच्या घरी जाता येणार नाही. पण नाहीतरी तिथं कोण तुझी वाट पहात बसलं आहे? …”
‘लग्न झाल्यावर स्त्रीने नव-याची सावली होऊन राहिलं पाहिजे ..’ हे कुठल्यातरी सिनेमातलं वाक्य तिला आठवलं.
पण नव-याला ती नकोशी आहे तर त्याची सावली होण्याला काय अर्थ राहिला?
तो जसा गायब झाला तसंच तिनेही नाहीसं व्ह्यायला पाहिजे आता!!

इतका सारा प्रवास करून हाती काय आलं? तर आयुष्यातल्या एका अंधा-या खोलीतून फक्त दुस-या अंधा-या खोलीत प्रवेश. पाहिलीतून बाहेर पडायची वाट पहात अनेक वर्ष गेली. आता इथं किती काळ जाणार? भूतकाळ निराशाजनक होता .. भविष्यकाळही तसाच दिसतो आहे. त्या अंधारात सावली कधीच पडणार नाही, दिसणार नाही इतका गर्द अंधार.
हा सूर्य, ……. एकदा इथून पाउल मागे फिरलं की हे सगळ संपणार. पुन्हा आयुष्यात ते कधीच येणार नाही.
मनस्वी पुढे दोनच पर्याय आहेत.
एकतर शरीरविक्रीच्या या अंधारात बुडून जायचं, 
दुसरं ..  …एका दिवसासारखं हे एक आयुष्य विनातक्रार संपवून टाकायचं …
सावली नाहीशी झाली की सगळे प्रश्न संपतील.

मनस्वीला आता काय करू असं झालं होतंं. ज्या राजेश बरोबर सुखी संसार करण्यासाठी ती गेले 2 महिने स्वप्न रंगवत होती तो तिला असा वेश्या व्यवसायात ढकलून निघून गेला होता, 2 क्षण तिने विचार केला आणि ती रस्त्याच्या दिशेने पळत सुटली.
पण थोड्याच वेळात अमोल ने तिला पकडले आणि एक कानाखाली वाजवली आणि बोलला सरळ मुकाट्याने चल माझ्याबरोबर आणि त्याने लगेच एक रिक्षा थांबवून जबरदस्तीने रिक्षात मनस्वीला ढकलले.
मनस्वी रिक्षात पण खूप ओरडत होती मला सोडा असं पण अमोल ने तिच्या हाताला घट्ट पकडून ठेवलं होत, त्यामुळे तिला निसटता येईना, रिक्षा वाला पण सारखा मागे वळून बघत होता, एकदा तो बोलला सुद्धा कि का ओरडत आहेत ह्या बाई, त्यावर अमोल बोलला तू सरळ रिक्षा मी सांगतोय तिथे घे जास्त प्रश्न विचारू नकोस, तरीपण त्या माणसाला संशय आला होता.

त्याने पुन्हा विचारल्यावर अमोल ओरडला ये सरळ ने रिक्षा… मग तो रिक्षावाला ही गप्प बसला. अमोल नुसता सारखा ‘ए मनस्वी ओरडू नकोस’ असच बोलत होता.
थोड्या वेळाने रिक्षा कुंटनखाण्यात पोचली, मनस्वीला त्या तिथे उभ्या असलेल्या बायकांना बघून च कसतरी झालं.
अमोल तिला ओढत आत घेऊन गेला, आणि तिथली एक बाई बाहेर आली.
अमोलला काहीतरी पैसे दिले आणि मनस्वीला एका रूम मध्ये नेवून टाकलं तिने.
मनस्वी खूप रडत होती पण कोणीच तिच्याकडे लक्ष देत नव्हतं.
मनस्वी ने 2 दिवस पूर्ण रडून च घालवले. ती बाई  सारखी मधून मधून येऊन मनस्वीला ओरडत असे कि, ‘ए नाटकं बंद कर तुझी.’

पण मनस्वी 2 दिवस जेवलीच नाही आणि त्यामुळे तिला चक्कर आली, तेव्हा त्या बाई  ने एक डॉक्टर आणला आणि त्याने तिला काही गोळया, औषधं दिली त्यामुळे मनस्वीला तिसऱ्या दिवशी औषधं घेण्यासाठी जेवावेच लागले.
आणि मग तिथे असणाऱ्या मुली तिला समजावू लागल्या कि रडून इथे काही होत नाही कोणीच आपलं ऐकत नाही,  मग मनू ने हार मानली आणि थोडंसं जेवली, डॉक्टर त्या बाईला सांगून गेले हिला चार दिवस आराम करू द्या.
त्यामुळे ते ऐकून मनस्वीला मनातून जरा बरं वाटलं कि चला अजून चार दिवस तरी शांतता आहे.
असेच चार दिवस निघून गेले आणि पाचव्या दिवशी सकाळी सकाळी मनस्वीला तिथे जोराजोरात कसला तरी आवाज आला.

सगळीकडे पळापळ होऊ लागली. मनस्वीला समजेच ना काय चालू आहे ते.
तेवढ्यात तिला पोलीस दिसले आणि तिला आशेचा किरण दिसला.
तिने जोरजोरात ओरडायला सुरवात केली, मनस्वी कोण असं, असं पोलीस विचारू लागले तेव्हा मनस्वी ओरडली “मीच, मला इथे जबरदस्तीने ठेवलं आहे.”
पोलिसांनी मनस्वी बरोबर अजूनही मुलींची तिथून सुटका केली.
मनस्वीला इथे अमोल बरोबर त्या दिवशी जो रिक्षा वाला आला होता त्याने धाडस करून पोलीस कंप्लेंट केली होती त्यामुळे आज मनस्वी आणि तिच्या सारख्या मुलींची तिथून सुटका झाली होती.

मनस्वीने बाहेर पडल्यावर त्या रिक्षा वाल्याचे अक्षरशः पाय धरले आणि म्हणाली, “दादा केवळ तुमच्यामुळे मी इथून सुटले.”
मनस्वीला पोलिसांनी विचारले कि तुझ्या घरून फोन करून तुला नेण्यासाठी कोणाला बोलवायचं त्यावर ती सरळ म्हणाली, “सर मी अनाथ आहे.”
त्यावर त्यातली एक लेडीज पोलीस म्हणाली, “मग कुठे जाणार आहेस?” आता त्यावर ती गप्पच बसली.
मग पोलीसच म्हणाले कि आम्ही सध्या तुझी सोय एका अनाथ आश्रमात करतो आहे. चालेल ना, त्यावर मनस्वी लगेच हो म्हणाली.

मनस्वीला आश्रमात जाणार ऐकून खूप बर वाटतं कारण तिने लहानपणापासून उपेक्षाच सहन केलेली असते. मनस्वी आश्रमातल्या रूमवर पोचल्यावर तिथल्या गणपतीच्या फोटोच्या पाया पडते आणि मनातल्या मनात म्हणते ‘आज त्या रिक्षा वाल्या च्या रूपाने माझा बाप्पाच माझ्या पाठीशी उभा  राहिला.’
मनस्वी ची लहानपणापासून गणपती वर खूप श्रद्धा होती, काकी काही वाईट बोलली कि मनस्वी जवळच्या गणपती देवळात जाऊन बाप्पाला सर्व  सांगत असे, आई वडील नसल्याने तिला बरेचदा असं एकाकी वाटत असे. तेव्हा ती देवळात जातं असे.
मनस्वी हळू हळू आश्रमात रूळत चालली होती. तिथलं वातावरण तिला आवडत होतंं.

पण सकाळची नेहमीची कामे आटपली कि तिला दिवसभर बसून वेळ घालवणे उचित वाटत नव्हते. म्हणून मग ती आश्रमातल्या वोर्डन मॅडमला जाऊन विचारते, “मॅडम मला कुठे नोकरीं मिळेल का?”
मॅडम तिला तू कपड्यांच्या गारमेंट मध्ये नोकरीं करशील का विचारतात आणि तिने तयारी दाखवताच मॅडम त्या गारमेंट मध्ये कॉल करून उद्यापासून आमच्या इथली एक मुलगी कामाला येईल असे सांगतात.
मनस्वी मनातून खूप खुश होते आणि मॅडम ना मनापासून ‘थँक यु’ म्हणते.

मनस्वी आता नोकरीमध्ये चांगलीच रूळत चालली होती तिथे तिच्या चार पाच मैत्रिणी पण होतात.
एक दिवस वोर्डन मॅडम येऊन मनस्वीला म्हणतात,” मनस्वी, गारमेंटमध्ये तुझं सगळे कौतुक करत असतात. मुलगी हुशार असं सांगत असतात, तर तूला पुढे शिकायची इच्छा आहे का? असेल तर आपण तुझा फॉर्म भरूया.”
मॅडमने असं विचारल्यावर मनस्वीला आनंदाने रडूच येतं आणि ती मॅडमला हो म्हणते.
त्यानंतर मनापासून अभ्यास करून मनस्वी तिचं शिक्षण पूर्ण करते व मग दुसऱ्या ठिकाणी नोकरींसाठी प्रयत्न करू लागते. तीन चार ठिकाणी इंटरव्ह्यू दिल्यानंतर तिचं एका चांगल्या ऑफिस मध्ये सिलेकशन होतं. ती सर्वात आधी ही गोष्ट वोर्डन मॅडमला जाऊन सांगते ज्यांच्यामुळे तिला शिक्षणाची संधी मिळते.
एका भल्या माणसाने म्हणजे त्यादिवशी भेटलेल्या त्या रिक्षावाल्याने दाखवलेल्या सतर्ककतेमुळे एका निष्पाप मुलीचं आयुष्य मार्गाला लागतं.
समाप्त
©️ सौ. सोनल गुरुनाथ शिंदे

सदर कथा लेखिका सौ. सोनल गुरुनाथ शिंदे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
किती ही मोठे झालो तरी
या वळणांवर
नकार

Series Navigation<< मनस्वी ( भाग 1)

Leave a Comment

error: Content is protected !!