मृगजळ

©सौ. प्रतिभा परांजपे
फ्लॅटचं लॅच बंद करून, किल्ली पर्समध्ये टाकत संध्या बाहेर निघाली. तेव्हा नुकताच सूर्यास्त झाला होता. जून महिन्याची ती प्रसन्न संध्याकाळ. बाहेर बागेतील मधुमालती भरगच्च फुलली होती.
त्याचा मंद सुवास कडुलिंबाच्या मादक सुगंधाशी स्पर्धा करू पाहत होता. तो मादक सुगंध श्वासात खोल साठवत संध्या मार्केटला आली.
मॉलमध्ये बरीचशी खरेदी झाल्यावर तिचे लक्ष सी.डी.ज ठेवलेल्या रॅककडे गेले.
पं. रविशंकरजींच्या सतारीच्या दोन सीडी घेऊन तिने बिल पे केले.

घरी पोहोचताच संध्याने हात पाय धुऊन देवापुढे दिवा लावला व सीडी प्लेयरवर नवीन सीडी लावली.    
आज‌ शरद, तिचा नवरा,दोन दिवस ऑफिस टूरवर गेल्याने ती आज एकटीच घरी होती. मुले तर जवळ नव्हतीच. त्यामुळे जेवणाचाही फार उत्साह नव्हता.
एक कप कॉफी घेऊन ती बाल्कनीत झूल्यावर येऊन बसली. रविशंकरजींच्या सतारीतून मधुवंतीचे मोहक स्वर झिरपत होते.
त्या स्वरांचे एक वलय तर आठवणींचे दुसरे वलय संध्याच्या भोवती पसरले.
कितीतरी वेळ ती स्वतःला त्या धुंद स्वरलहरींमधे लपेटून बसली होती.

अचानक उठून ती बेडरूममध्ये आली. कोपर्‍यात ठेवलेली सतार तिने काढली.
गवसणी काढून कपड्याने पुसून संध्याची नाजूक बोटे सतारीच्या तारा छेडू लागली.
सूर नीट लागत नव्हते, मध्ये कितीतरी वर्ष  सतार नुसतिच कोपऱ्यात ठेवलेली होती.
एकेक सूर नीट लावत तिची बोटे सराईतपणे फिरू लागली.
ते दर्द भरे स्वर ग॑मपनिंसा, निधपमधप मऺगमपमगरेसां रात्रीचे वातावरण आणखीनच गडद करू लागले.

कानात नीताच्या  गाण्या चे स्वर घुमायला लागले. संध्याचे मन आपल्या तरुण वयात शिरले.
संध्याची नीताशी ओळख अश्याच एका सी.डी. पार्लर मध्ये झाली.
दोघी एकाच कॉलेजमध्ये शिकत होत्या. नीता सायन्स घेऊन बीएससीला तर , संध्या बी कॉमवाली.
नीता आणी  तिच्या स्वभावाचा एकच सूर जुळत होता, तो म्हणजे संगीत. दोघी भातखंडे मध्ये, संध्या सतार शिकत होती तर नीता गायनाचा परीक्षा देत होती.
गोरी, उंच, स्मार्ट श्रीमंत घरची नीता, तर सावळी सतेज, मध्यम उंची, मध्यम वर्गीय संध्या.

दोघीही अगदीच आगळ्यावेगळ्या असल्या तरी त्यांची मैत्री छान जुळली.
नीता सुगम संगीत गाण्याच्या स्पर्धेची तयारी करत होती. बरीचशी गाणी शोधून ‘रस्मे उल्फत को निभाए तो निभाएं कैसे’ गाणे निवडले.
त्यात संध्याने सतारीने तिला साथ केली. गाणे उत्तम झाले व शिल्ड नीताच्या हाती आले. अशा तऱ्हेने मैत्री हळूहळू घट्ट होत गेली.
त्याच सुमारास  नीताचे काका ,काकू ,बदली झाल्याने संध्याच्या कॉलनीतच रहायला आले. त्यामुळे आता नीताचे येणे जाणे ही वाढले.
एक दिवस दिवस अशीच नीता घाईघाईने आली. 
सीडीची देवाण-घेवाण झाली. बाहेर स्कूटरचा हॉर्न जोरजोरात वाजत होता.

नीता व संध्या बालकनीत आल्या. मधुमालतीच्या भरगोस फुललेल्या वेलीच्या आडून संध्याने श्रीला तेव्हा प्रथमच पाहिले.
“अगं हा माझा चुलत भाऊ श्रीरंग! श्री येते रे…” म्हणताच श्रीने वर पाहिले.
संध्याची व त्याची नजरानजर झाली. नजर काही क्षण गुंतुनच राहिली. ते क्षण संध्याला युगायुगाचा सारखे वाटले.   
नीता बसताच स्कूटर निघून गेली तिकडे संध्या पहातच राहिली.
“कोण होत ग?” आईचा आवाज ऐकून संध्या भानावर आली.
“तो न अगं नीताचा भाऊ…” नांव घेताना संध्या अडखळली.

“अच्छा, तो कां? पाहिलाय मी. मुलगा खूपच छान आहे पण त्याची ती आई – महाशिष्ठ, तोरेबाज , श्रीमंतीचा फार गर्व आहे त्यांना. इथे कां राहतात कोणास ठाऊक.” आई बडबडत होती.
संध्याला आता रोजचा  चाळा लागला. श्रीच्या स्कूटर चा आवाज ती बरोबर ओळखायची. धावत बालकनीतून वेलींच्या आडून  श्रीला निरखत असे.
श्रीने कधी तरी वर पाहिले असे वाटले की मग पूर्ण दिवस ती त्या त्याच धुंदीत असायची.

नीताच्या वाढदिवसाची पार्टी होती. तिथेही श्री होता. पार्टी संपून घरी यायला रात्र झाली.
त्यात संध्याची स्कूटर स्टार्ट होईना संध्याला नर्वस झालेले पाहून नीता म्हणाली, “अगं ‌ श्री आहे ना, तो सोडेल तुला घरी.”
श्रीच्या मागे बाईक वर बसताना संध्याला खूपच धक- धक होत होते.
मनातून वाटत होते की हा प्रवास कधी संपूच नये, अगदी” चांद के पार चलो” असे वाटत होते.
घरी पोहोचताच तिने श्री ला थँक्स म्हटले  ‘इट्स ओके म्हणत तो निघून गेला’. त्या धुंदीतच संध्याने पूर्ण रात्र जागून काढली.

संध्यात झालेला हा बदल आईच्या लक्षात बहुतेक आला असावा. एक दिवस आई व बाबांच्यात तिच्या लग्ना बाबत चाललेला संवाद संध्याच्या कानावर आला.
आई-बाबांना श्री बद्दल सांगत होती. “अहो तो मुलगा कंप्यूटर इंजिनियर, फॉरेन ला जाणार आहे बडे प्रस्थ आहे ते. आपण आपल्या तोलामोलाचे पाहिलेलं बरं.”
आपल्या लग्नाविषयी झालेली चर्चा एकूण संध्या मनातून घाबरून गेली .
आईजवळ श्री बद्दल बोलण्यात काहीच अर्थ नाही .मुख्य म्हणजे अजून श्रीच्या मनात काय आहे हे तरी कुठे ठावूक आहे.

नीताला विश्वासात घेऊन तिच्याजवळ आपले मनोगत सांगावेअसा विचार करत असतानाच, एक दिवस अचानक नीता स्वतः घरी आली.
आली तीच श्रीच्या लग्नाची बातमी घेऊन. श्रीचा साखरपुडा ठरलेला आहे, एक महिन्याने तो साखरपुडा करुन यु एस ला जाणार आहे. निता खूप आनंदात होती. म्हणून मग संध्याने आपल्या मनातले मनातच राहू दिले. 
आई-बाबांनी संध्यासाठी शरद चे स्थळ पाहिले.
एल.आय.सी मध्ये कार्यरत शरद त्यांच्या दृष्टीने संध्या साठी योग्य होता आणि मुख्य म्हणजे शरद ला संध्या पसंत होती.

संध्याला काहीच सुचत नव्हते. श्रीला ती विसरु शकत नव्हती.
रात्री खिडकीतून दिसणाऱ्या चंद्राकडे पहात  संध्या विचार करत होती चंद्र कसा कोणाचाच नसून ही सर्वांचाच आहे, कोणी केंव्हाही  त्याला आपले मानावे.
तिचे मौन हा तिचा होकार समजून साखरपुडाही ठरला.  श्रीचे प्रेम सुगंधी कुप्पीसारखे मनात खोल ठेवून, ती संध्या शरद झाली.
रुखवतात संध्याचा एस व शरद चा ही एस पाहून, ‘अरे वा नावातही एकरूपता आहे’ अशी मांडवात कोणी तरी तिची थट्टा करत होते. तिच्या मनात मात्र श्रीचा ही एस असे शब्द तरंगत गेले. 

पुढे लग्न झाल्यानंतर नंतर मात्र शरद ने तिला श्री चा विचार करायची वेळच येऊ दिली नाही. आपल्या प्रेमात तिला चिंब भिजवून दोन मुलांचा आहेर देऊन पूर्णपणे आपलीशी केली.
एकांतात नेहमी तो तिला म्हणे, “तू अगदी त्या शरद चंद्रांच्या बंगाली नायिकेच्या सारखी दिसते, जणू अनुपमाच.”
संध्याही त्याच्या प्रेमात श्रीला विसरून गेली . 
आयुष्याचा बराच काळ पुढे गेला.
माहेरी गेल्यावर कधीमधी नीता भेटल्यावर समजायचे कि, श्री बायको सोबत यु एस  लाअसतो, नंतर पुढे नीताचे लग्न झाले आणि संध्याचे माहेरी जाणे ही कमी झाले.

अचानक एक सूर बेसूर लागला आणि संध्या विचारांच्या भोवऱ्यात तून बाहेर आली. 
रात्र बरीच झाली होती सतार जागेवर ठेवून संध्या बिछान्यात येऊन पडली. 
आज तिला श्रीची खूप खूप खूप आठवण येत होती कोवळ्या वयातले ते पहिल्या नजरेतील प्रेम खरे होते कि, त्या वयातील कल्पना.  शरद बरोबरचे तिचे वैवाहिक जीवनातिल प्रेम, कोणते प्रेम खरे.
मन भोवऱ्यात सापडलेले वाटू लागले. विचार करता करता झोप लागली .

जाग आली तेव्हा जाणवलं, श्री हे एक मृगजळ होते, शरदचं प्रेम ही एक वास्तविकता आहे.
संध्या उठून बसली आणि शरदची वाट पाहू लागली. पहाटे दाराची बेल घणघणताच तिने धावत दार उघडले व समोर शरदला पाहतात त्यांना घट्ट मिठी मारली !
“अरे अरे आत तर येऊ दे ना काय झाले?”
काही न बोलता संध्या जणू स्वतःभोवती  शरदच्या प्रेमाचे घटृ कवच घालून घेत होती. कुठूनही तिला त्यात श्रीचा प्रवेश नको होता.
समाप्त
©सौ. प्रतिभा परांजपे

सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
किती ही मोठे झालो तरी
बी माय व्हॅलेंटाईन
ओव्हरलोड

 

Leave a Comment

error: Content is protected !!