वास्तू

© मृणाल शामराज.
किलबिल.. किलबिल.. हलकीशी चाहूल… हळूहळू तो रव वेगवेगळ्या नादात पसरू लागतो. ढगांची कड हळूहळू उजळू लागते..
तो कोकीळचा कहूकहू, कावळ्यांचे ओरडणे, तो चिमण्यांचा चिवचिवाट.. त्या निःशब्द काळोखाला चिरत पसरू लागलाय. घड्याळाचा अलार्म वाजतोय.. मी पण आळसावण सोडून सावरून बसलोय.
ती उठली आहे. हात जोडून तिने प्रार्थना केलीये. मलाही वास्तू देवतायेन नमः म्हणून भक्तीभावाने नमस्कार केलाय. मी बघतोय. तिनं दात घासून, प्रतिविधी आटोपलेय.. पूर्ण घरभर फिरून तिनं मला डोळ्यात साठवून घेतलंय.
रात्रीचं नीटनेटकं करून ठेवलेलं घर बघून ती प्रसन्न झालीये.

एकीकडे चहाचं आधण ठेवत तिनं बाल्कनीच दार उघडलंय.
सूर्याची कोवळी किरणं झाडाच्या फानंदयातून आत डोकावू पाहताहेत. मोगरा डवरलाय चाफा घगमगतोय. तुळशीच्या मंजिऱ्या मंद दरवळताहेत. तीने तो सुगंध मनभरून घेतलाय .. चहा उकळलाय.. तो सुगंध मलाही तरतरी आणतोय.
तिनं आता त्याला उठवलंय.. तो चहा घायला आलाय.. दारात पेपर टाकल्याचा आवाज आलाय.. मी गंमत बघतोय..
आता दोघ ही धावत येणार.. पहिला पेपर दोघांनाही वाचायचाय.. पेपर घेऊन दोघेही एकमेकांकडे बघतात.. शेवटी एका कडे पहिली पान.. दुसऱ्याकडे पुरवणी.. अशी वाटणी होते .
पुरवणी संपून पहिला दुसऱ्याकडे आशेने बघतोय.. तो ही मुद्दामुन वेळ काढतोय..

पेपर मधल्या घडामोडीवर चर्चा होऊन आज काल पेपर मधे काही नसतं या निकषावर दोघेही येतात.. आता ती पेपर ची घडी नंतर बघू म्हणून बाजूला पडलीये. आता बहुतेक उदया पर्यन्त ती तशीच असेल.आता दोघेही आपल्या उद्योगाला लागतात.
ती ओट्यावर भाजी, डाळ, तांदूळ काढून ठेवते. दाढी करता करता त्याच तिकडेही लक्ष आहे..
आज ही भाजी… भेंडी..तो पुटपुटतो.
तिला ते पुटपुटण ऐकू येतं.
“हॊ, आज हीच भाजी.. मला आवडते..”
“पण, मला नाही ना आवडत…”

“काल तुमची आवडती वांग्याची भाजी खाल्लीना मी.. मग आज भेंडीचीच भाजी..” ती जरा चढया आवाजातच म्हणते.
“बघ, तुझ्या मुळे माझी मिशी जास्त कापली गेली..” तो वैतागतो.
“तुम्ही असे वेंधळे, कुठलं काम नीट नाही.”
मला वाटलं झालं सुरु आता… पण बाईसाहेबांनी आटोपतं घेतलं.
बाथरूममधे तांब्या आपटल्याचा जोरात आवाज आला मात्र.. मी खुसखुसलो…
आता पूजा सुरु झाली हॊती.. तिच गडबड दोघांची…

“अहो, आटपा.. मिक्सर चालू करायचा आहे.. स्वयंपाक खोळंबलाय.”
त्याचे स्तोत्र अजून चढया आवाजात सुरु झालं.. आणि पूजा मुद्दाम हळू..
तिनं गॅस वर चहाचं पातीलं चढवलं.
आलं खळबत्त्यात जरा जोरातच कुटलं … त्याच्या कडे बघत बघत…
चहाचा मस्त दरवळ सुटला..
त्यानी गॅस कडे बघितलं..
“झालयं ग गाळ चहा…”
ती गालातल्या गालात हसली..

मिक्सर चालू झालं…
“डब्बा झाला का.. उशीर होतोय..”
“तयार आहे सगळं..उपमा केलाय.. खाल्ल्या शिवाय जावू नका..औषधं घेतली का..”
“हॊ.. बाबांना उपमा दिला का..”
“अहो, त्यांना सोडून खातो का आपण…”
“निघतो.. मी… डॉक्टरकडे जावून ये.. न विसरता…” तो बजावून ऑफिसला जातो.
आता आजोबांकडे मोर्चा तिचा…

मी मगापासून बघतोय…आजोबा शांतपणे ऐकताहेत
सगळं…त्यांना हॆ रोजचचं आहे..
“बाबा.. खाऊन झालं का..औषधं घ्या ही..”
ती जरा विसावते..
दुखऱ्या गुढघ्यावरून हात फिरवते ..
मी बघतो… आजोबांचा चेहरा…ते व्याकुळ होतात..
“सुनबाई.. दुखतयं का खूप.. तुझा तुला व्याप आणि अजून या म्हाताऱ्याची ब्याद.. डॉक्टर कडे जा बरं आधी..”
“बाबा, असं म्हणू नका…”

“जय कसा आहे आपला? कधी यायचं म्हणतोय..”
“तो कसला येतोय लवकर.. रमला आता परदेशात..” ती कातर होते…
मला जय आठवतो..लबाड पिल्लू… तो होता तेव्हा किती चहलपहल हॊती..
मी नुसता उल्हासांनी नाहून निघायचो..
नुसती धमाल…आता तो मोठा झाला. नोकरी लागली.. भुर्रर्र उडून गेला..
आता मला सोबत तो, ती, आणि आजोबा..
नकळत प्रौढ झालो मी..
आजोबा जेवून झोपी गेले.. तिचं ही जेवण झालं.. छानस पुस्तकं घेतं तिनं हुश्श केलं..

आता पाच वाजेपर्यंत निवांत.. मी पण विसावलो.. गॅलरीमधल्या मधूनच येणाऱ्या कावळ्याच्या आवाजाशिवाय आवाज नव्हता…
विचार आला.. त्यानं डबा उघडला असेल..
भेंडीची भाजी.. चेहऱ्यावर दोन आठ्या…
खालचा डब्बा.. त्याला आवडणारी मोकळी मुगाची डाळ..
छोटया डबीत गुळंबा.. त्याला आवडणारा…
मला माहिती आहे खुदकन हसला असेल तो..
कशी मनकवडी आहे ही…त्याला लहानपणापासून ओळखतो मी…

दुपारची वामकुक्षी झालीये. आजोबानी आणि तिनं चहा घेतला.. आजोबा क्लबहाउस मधे कॅरम खेळायला गेलेत.. ती भाजी आणायला.. मी आळसावून पडलोय अजून… उन्ह कलतीला आलीत… त्याची रेंगाळणारी किरण मला वाकुल्या दाखवताहेत..
टिंग टॉंग.. टिंग टॉंग.. बेल वाजतेय..
आला वाटतं हा.. बायको उगाचच वेंधळा म्हणत नाही..
माहिती आहे ना.. या वेळेला latch लावलेलं असतं.. किल्लीनी दार उघडावं…
लहानपणापासून हा असाचं.. मी जाम वैतागतो…

हा येतो.. फ्रेश होतो… सोफ्यावर पाय पसरून बसतो, music system ऑन करतो..
घरभर मदमस्त सूर पसरतात..
ये तेरा घर.. ये मेरे घर..
मी पण त्याच्या बरोबर गुणगुणू लागतो..
अंधारतं.. आजोबा घरी येतात..
बापलेकच्या गप्पा रंगतात..
मी चार पिढ्या पाहतोय.. पण विषय थोडया फार फरकांनी सारखेच..
ती येतें… हवेच्या हलक्या झुळकीसारखी…
परत चहा.. परत त्याच.. वाफासारख्या विरून जाणाऱ्या तिघांच्या गप्पा…

वा.. सुंदर चंदनी सुगंध…ती देवघरात शांतपणे तेवणारी समई..
ते साजूक तुपात तेवणार निरांजन… तिघांनी म्हटलेली गुरवारची आरती..
आशीर्वादासाठी जोडलेले हात…स्वस्ति अस्तु…
अनाहुतपणे मी उदगारतो…
सुखी भव.. सुखी भव…
ती शांतता.. मधूनच होणारा एखादा भांड्याचा आवाज.. संथ लयीतल त्यांचं जेवण..
हळूहळू रेंगाळणारी रात..

फोन खणखणतो…
‘आई.. पप्पा..’
“अगं, ये लवकर.. जयचा फोन आलाय..” तो आनंदाने चितकारतो..
“आले..” ती जवळपास पळतच येतें..
“अगं सावकाश,…” इति आजोबा..
“पिल्लू..” ती जोरात म्हणते..
तो,मी, आजोबा,.. गालातल्या गालात हसतो..
“अगं, पिल्लू काय.. मला पिल्लू होईल आता…”

“काय !… ती आनंदानी किंचाळतेच..
तिकडून जाई जयला ओरडत असते, “तुझ्या तोंडात तीळ भिजत नाही मला सांगायचं होतं ना..”
आता त्याला ही फोन वर बोलायचं असतं.
तु… तु.. मी.. मी.. सुरु होतं.
शेवटी जय सांगतो.. व्हिडिओकॉल करतो..
त्याचा फोन तासभर चालतो..
आजोबाना पण ऐकायचं असतं..
ही गोड बातमी तासभर रंगते..
बाय.. नाईलाजाने फोन ठेवला जातो..

तो ते गोजीरवाण बाळ कसं असेल विचारात असतो.. ती हात जोडून बाळकृष्णापुढे उभी असते.. आजोबानी काठीच्या ऐवजी तो कोवळा हात हातात धरला असतो..
आणि मी वास्तू…
दुडुदूडू घरभर रंगणारी ती पाचव्या पिढीची इवली इवली पावलं न्याहाळत असतो..
रात्रं चढते..दोघं शांत झोपतात.. त्यांच्या चेहऱ्यावरचे तृप्त भाव मला सुखावतात. आजोबा मधूनच कूस बदलत मला निरखत असतात.. काही तरी सांगतात मला हळूच.. मी मात्र जागा असतो..
सुखाचं आगर असलेलं माझं तृप्त रूप बघून.. ती झोपत पुटपुटत
असते.. कुलदेवता नमः वास्तू देवता नमः… देव्हाऱ्यात देवं आणि मी जागत असतो..
मंद ज्योतीच्या साक्षीने…. तथास्तु.. तथास्तु.. म्हणत..
© मृणाल शामराज.

सदर कथा लेखिका मृणाल शामराज यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
त्यांचं काय चुकलं??
या वळणांवर
गजरा

1 thought on “वास्तू”

Leave a Comment

error: Content is protected !!