बंधन नात्याचे

©️ सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
शाळेतले दिवस संपून कॉलेजचे दिवस सुरू झाले होते. बी.कॉमच्या फर्स्ट इयरला असताना उनाड मुलांच्या यादीत सुयशचं नाव अग्रणी होतं. रस्त्यावर स्टंट करणे, कॉलेज कॅम्पसमध्ये मारामारी करणे यासाठीच सुयश ओळखला जायचा.
या सगळ्या गोष्टींसाठीच त्याला वेळ पुरायचा नाही तर मुलींकडे पाहणंच सोडा. पण या सगळ्यात त्याला एक खूप साधी सरळ आणि अभ्यासू मुलगी आवडू लागली होती.
स्वरा च्या प्रेमात तो कसा पडला हे त्याचं तोही सांगू शकत नव्हता. पण त्याला स्वरा आवडू लागली होती हे मात्र नक्की. स्वरा आणि सुयश एकाच वर्गात होते.

तिच्याशी मैत्री करावी म्हणून कित्येक महिन्यांनी सुयशने वर्गाचं तोंड पाहिलं होतं. आता तो तिच्यासाठी का होईना वर्गात बसू लागला होता. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि स्वराने त्याच्या त्या रावडी स्वभावाला स्वीकारले, तिला त्याच्यातला रांगडे पणा आवडू लागला. तिच्या सांगण्यावरुन तो अभ्यासही करु लागला होता. त्याचं कट्ट्यावर बसणं कमी झालं असलं तरी पूर्णपणे बंद झालं नव्हतं.

स्वराला त्याचा तो स्वभावच आवडला होता.  दोघंही एकमेकांची कंपनी चांगली एन्जॉय करत होते. सगळीकडे एकत्र फ़िरत होते. बघता बघता फायनल इयरची परीक्षाही जवळ येऊन राहिली होती.
परीक्षेला काही महिनेच राहिले असताना सुयशला काविळ आणि टायफाइड झाला. या आजारात सुयश फारच अशक्त झाला होता.

डॉक्टरांनी त्याला अ‍ॅडमिट करण्याचा सल्ला दिला होता. १५-२० दिवस रुग्णालयात गेल्यामुळे तो फार थकला होता. घरी आल्यावर अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे त्याने ठरवले.
या दरम्यान त्याने स्वरा ला अनेक फोन करण्याचा आणि तिला भेटण्याचा प्रयत्न केला पण स्वराने त्याच्या कोणत्याच कॉलचे उत्तर दिले नाही.
आपण असे नेमके काय केले की स्वरा रागवली? या प्रश्नाचे उत्तर तो आपल्यापरिने शोधत होता. पण तरीही त्याला त्याचे उत्तर मिळाले नव्हते.

प्रिलिम दरम्यान त्याने स्वराला कॉलेज बाहेर गाठले आणि थेट विचारले, ‘नक्की झालंय काय स्वरा ? तू अशी का वागतेस?… किमान मला तरी कळू दे…’ यावर स्वरा म्हणाली ‘मला तुझ्याशी काहीच बोलायचे नाही. प्लीज मला कॉल करु नकोस मला माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करु दे…’
अभ्यासाच्या ताणामुळे कदाचित स्वरा अशी वागत असेल असे सुयश ला सुरूवातीला वाटले.
परीक्षेनंतर सगळे नीट होईल या आशेवर त्याने परीक्षेचा तो वेळ जाऊ दिला.

प्रिलीयम नंतर त्याने पुन्हा तिला तेच प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. पण तिच्याकडून कोणतंच उत्तर आलं नाही. प्रिलिमनंतर कॉलेजमध्ये जाणं बंद होत असल्यामुळे त्यांचं भेटणंही बंद झालं होतं. मनातून तिचा विचार काही केल्या जात नव्हता. असं काय झालं असेल की ती माझा एवढा राग करायला लागली या प्रश्नाचं उत्तर त्याला काही केल्या मिळत नव्हतं.

आधीच आजारपणामुळे तब्येत खराब झाली असताना त्याच्या डोक्यात सतत हेच विचार असल्यामुळे त्याची तब्येत जास्तीच खराब होत चालली होती.
प र्यायाने त्याला बी.कॉमच्या फायनल एक्झामला मुकावे लागले होते.
प्रिलियमच्या परीक्षेनंतर स्वरा त्याला कधीच भेटली नाही आणि तिने अचानक बोलणं का टाकलं? तिने काहीही कारण न देता नातं का तोडलं? या प्रश्नांची उत्तरं त्याला शेवटपर्यंत मिळाली नाहीत.

स्वरा च्या त्या धक्यातून सावरायला सुयश ला बरीच वर्षे लागली. या मधल्या काळात त्याच्या आणखीही मैत्रिणी झाल्या पण आजही स्वरा तसं का वागली हा प्रश्न त्याला सतावतो.
सुयश आजही स्वरा मध्ये गुंतला आहे असं नाही. तो केव्हाच पुढे निघून गेला पण निरुत्तर राहिलेले प्रश्न जास्त सतावतात. सुयशच्या बाबतीतही तेच झाले.
असाच काळ पुढे जातं राहिला आणि सुयश ला या गोष्टीची पूर्ण जाणीव होती की काही गोष्टी या जगण्यासाठी करायच्या असतात, तर काही गोष्टी जगणं सुकर करतात.
तो करत असलेली नोकरी त्याचं आयुष्य सुकर करत होती. मात्र त्याला असणाऱ्या वाचनाच्या  छंदामुळे तो खरा जगत होता.

पण त्याला सारखं वाटत राहायचं, ‘का स्वरा सर्व चांगल चाललेलं असताना मला सोडून गेली?’
कालांतराने सुयशच लग्न झालं साक्षी नावाच्या मुलीशी.
त्याच्या आई ने पसंत केलेली मुलगी होती ती, सर्व गुणांनी चांगली, संसार नीट करणारी, पहिले 6 महिने नीट गेले पण नंतर नंतर
त्यांच्यात खटके उडू लागले. छोट्या छोट्या गोष्टीनवरून भांडण होऊ लागली.
सुयशच्या आईलाही कळेना कि ह्या दोघात भांडण का होऊ लागली? पण असंच वर्ष निघून गेलं.

त्यात सुयशच्या बायकोला दिवस गेले व एक गोड मुलगी झाली, पण तरीही रोजची भांडण ही चालूच राहिली आणि एक दिवस साक्षी मुलीला घेऊन माहेरी निघून जाते, सुयश ला मुलीची खूप आठवण  येत असते पण साक्षी सासरी यायला तयार  नसते. सुयश  सर्व गोष्टींचा विचार करत असतो, का सारखी भांडण होतात!
आणि एक दिवस तो असच एका कामासाठी पुण्याला गेलेला असताना त्याला त्याची आणि स्वरा ची कॉमन फ्रेंड रिया भेटते.

ते दोघे खूप कॉलेज पासून च्या गप्पा मारतात आणि तेव्हाच सुयश  रिया ला विचारतो, ‘तुला माहिती आहे का रिया, मला स्वरा का अशी अचानक सोडुन गेली ते?’
त्यावर रिया हॊ म्हणाली.
रिया सांगू लागली, “अरे सुयश खरंच तुझ्यावर स्वराच खूप प्रेम होतंं. पण तुझं तिच्या बाबतीत असलेलं वागणं तिला पटत नव्हतं.” त्यावर सुयश म्हणतो, “अगं कसलं वागणं?”

सुयश तुझं सारखं तिला इथे, जाऊ नको तिथेच जाऊ नको, ह्या मुलाशी बोलू नको त्या मुलाशी बोलु नको, तसेच ती कुठे गेली असली कि सारखं तिला कॉल करून कधी येणार आहेस, किती वेळाने येणार आहेस, तुझा कॉल उचललायला उशीर  झाला कि तिच्यावर ओरडण, तिला भेटायला यायला उशीर झाला कि तिला सारखं इतका का वेळ होतो तुला? कुठे असतेस तू? असे प्रश्न सतत विचारत राहणं ह्या सर्वाला ती फार कंटाळली होती.

आणि जेव्हा तू आजारी असताना हॉस्पिटल ला ऍडमिट झालास  तेव्हाच तू त्या 8 दिवसात तिला तू आजारी असल्यामुळे काहीच विचारले नाहीस त्यामुळे तिला तुझ्या ह्या सर्व बंधनातून मुक्त झाल्या सारखं वाटल 8 दिवस. मग तिने ठरवलं कि सुयश असंच आयुष्यभर आपल्याला वागवत राहणार त्यापेक्षा आताच ह्या नात्यात इथेच थांबलेलं बरं. आणि तिने तुला सोडून जाण्याचा निर्णय घेतला.
तुला तिने सांगितलं असतं कारण –  पण तुझ्या लेखी तू वागत आहेस ते योग्य च होत तुला त्यात काहीच चुकीचं वाटत नव्हतं म्हणून काहीच कारण न देता ती तुझ्या आयुष्यातून निघून गेली…

सुयश ह्या सर्व च गोष्टींचा विचार करू लागला तेव्हा त्याला उमगले कि अरे आपण साक्षी बरोबर पण असच वागलो नेहमीच. स्वतः चं मत सर्व गोष्टीत पुढे करत राहिलो, मी म्हणेन तसेच साक्षी ने ड्रेसिंग कराव, जास्त फॅशन करू नये आणि ह्या सर्व च गोष्टीचा साक्षी ला सतत राग येऊ लागला आणि आमच्या दोघांमधली भांडण वाढत गेली आणि रागात साक्षी माहेरी निघून गेली.

पण आता वेळ निघून गेली होती, सुयश ला त्याची चूक कळल्यावर तो साक्षी ला आणायला गेला तिच्या माहेरी पण साक्षी ने त्याला साफ नकार दिला. ती म्हणाली, “आयुष्यभर मला तुमच्या बंधनात राहायचं नाही आणि माझ्या मुलीला पण मला असलं जगणं द्यायचं नाही आहे त्यामुळे मी सासरी येणार नाही.”
सुयशची चूक त्याला कळली पण वेळ हातातून निघून गेली होती, सुयश च्या वागण्यामुळे तो मुलीच्या आणि बायकोच्या प्रेमाला ही कायमचा मुकला…
©️ सौ. सोनल गुरुनाथ शिंदे

सदर कथा लेखिका सौ. सोनल गुरुनाथ शिंदे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
सासर माझं सुरेख बाई
ओव्हरलोड
मनस्वी

Leave a Comment

error: Content is protected !!