सासर माझं सुरेख बाई….

© शुभांगी मस्के
राधिकाचं लग्न प्रथमेश सोबत, अगदी कांदेपोह्याच्या साग्रसंगीत कार्यक्रमात, एकमेकांच्या घरातल्या सर्वांच्या पसंतीचे जुळलं. घरात प्रथमेश, प्रथमेशचे आई वडील, लग्नाची बहीण, बरोबरीचा भाऊ, एकंदर भरलं कुटूंब होतं..
घरदार, गाडीघोडी आहे. मुलगा शिकलेला, संस्कारी, होतकरू आहेच शिवाय घराणंही सुशिक्षित आहे.
राधिका बरोबरच सगळे खूप खूश होते, राधिकाने नशिब काढलं अशातली फिलिंग होती.  
“घरात कोण कोण?” घरात लग्नाची नणंदआहे म्हटल्यावर मात्र, बऱ्याचदा अनेकांच्या कपाळावर आठ्या उमटायच्या..
“बघ बाई, नणंद घरात असणे म्हणजे डोक्याला ताप निव्वळ!”.. 

“गोगलगाय आणि पोटात पाय”
“करुन सवरुन नामानिराळी असते नणंद”
“कितीही गोडबोली असली तरी नणंदेच्या स्वभावात तिखटपणा, तुरटपणा, कडूपणा राहातो ना तो राहातोच,  काही केल्या तो जात नाही”..
“नणंद, वहिनीला.. सहजासहजी आपलंसं करून घेतच नाही” वगैरे वगैरे…..
“बघ बाई हुशार रहा, शेवटी सासू, लेकीकडून, नवरा बहिणीकडूनच बोलणार”.. “सासरी सतर्क रहा हो”… “साधं भोळ राहून फायदा नाही”….

“शेवटी ती मुलगी असणार त्या घरची, तिच्या बाजूने सारेच आणि तू काय आताआताशी उंबरठा ओलांडून घरात गेलेली नवखी, तूला कोण मोजतोय, बघ बाई सांभाळून, एकटी पडली नाहीस म्हणजे झालं”
“लेकी बोले सुने लागे” जगाची रितच ती… 
“तू न केलेल्या गोष्टीचं खापरही तुझ्या डोक्यावर फुटू शकतं बर का!” …. “तेव्हा या सगळ्यासाठी सज्ज रहा”..
लग्न ठरल्या पासून तर लग्न होईपर्यंत च्या काळात, नातेवाईक, शेजारी पाजारी सगळेचं एक ना अनेक बाजूंनी नणंद नावाचं अवघड समीकरण सोडवण्यासाठी जणू राधिकाला तयार करु पहात होते..
मैत्रिणी तर नणंद नावाच्या गणिताला सोडवण्याच्या एकशे एक टिप्स देत होत्या…

अनेकदा राधिकाला दडपणही येत होतं. मात्र, लग्न म्हणजे शेवटी तडजोड आणि ती पोरीबाळीच्या जातीला करावीच लागते म्हणत जे काहीबाही सांगून कान भरायचे तेच सगळे नणंद या विषयावर, शालजोडीतले टोमणे मारून झाले की.. सारवासारव करायचे, राधिकाला समजवायचे ही. 
लग्नाचा एक एक दिवस जवळ जवळ येत होता.. अखेर तो दिवस उजाडलाच……
“बरोबरीची लेक आहे म्हणे घरात, तीचं पहिले नाही का उरकायचं होतं लग्न, मग आणायची होती दूस-याची पोर घरात”, रुखवत सजवताना, उमामामी आणि क्षमा काकूंमध्ये आपआपसात खुसुरपूसूर सुरु होती..

“त्यांना म्हणे…. सून आणून, घरातल्या गृहलक्ष्मीचे पहिले स्वागत करुन मगच लेकीची पाठवणी करायची होती. घर सूनसून होवू नये म्हणून मुलाचं लग्न पाहिले करतायत”, 
क्षमाकाकू बोलता बोलता बोलून गेल्या.
“बरोबर आहे त्यांचं म्हणणं, मला तर पटलं.. लेकीसुनांनी घर कसं भरल्या भरल्या सारखं वाटतं.”…. “पोरीबाळी घराचं सौदर्य असतात”…  सासरी निघून गेल्या की, घर सूनं होतं… बोलता बोलता क्षमा काकूंनी डोळ्याला पदर लावला.
“तरी सुद्धा, नणंद भावजयीच्या नात्याला एका घरात सांभाळणं काही सोप्प नव्हेच,” अनुभवातून आलेलं शहाणपण… ” क्षमा काकू आणि उमा मामी, दोघींच्या बोलण्याचा ओघ फक्त न फक्त राधिकाच्या नणंदेच्या म्हणजेच पल्लवीच्या दिशेने होता..

अग्नी आणि देवा ब्राम्हणांच्या साक्षीने राधिका आणि प्रथमेशची लग्नगाठ बांधल्या गेली.
सासरचा उंबरा ओलांडून राधिकाचा गृहप्रवेश झाला. 
पल्लवी तर वहिनीच्या येण्याने खूपच खूश झाली. सतत  राधिकाच्या स्वागतासाठी, समोर समोर नाचत होती.
घराच्या गेटपासूनच सुंदर फुलांची आरास.. फुलांच्या पायघड्या घालत, राधिकाच्या सासरी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं.
पल्लवी तशी खूपच चूलबूली होती, दोघीही जवळपास सारख्याच वयाच्या होत्या.
त्यामुळे राधिका आणि पल्लवीची फार कमी दिवसात चांगली गट्टी जमली..

प्रथमेश आणि राधिका रूममध्ये एकटे असले की, उगाच त्यांना डिस्टर्ब नको म्हणून, दोघांच्या रूमकडे पल्लवी साधी फिरकत ही नव्हती. 
दादा-वहिनी रुममध्ये असले की रुमकडे न फिरकणारी पल्लवी, दादा नसला की मात्र वहिनीसोबत तिच्या रुममध्ये ठाण मांडून बसायची. 
तिच्या मेकअप किटपासून तर तिच्या कपाटातल्या नविन साड्यांपर्यत सगळ्या सगळ्याकडे पल्लवीचं बारिक लक्ष असायचं.
पल्लवीमुळे राधिकाला नवीन घरात रुळायला सोप्प जात होतं. 
दोघी ही, गोडगुलाबीने राहायच्या, काम सोबत करायच्या, एकमेकींची मदत घेऊन स्वयंपाक करायच्या.

तशी राधिका फार तरबेज नव्हतीच, त्यामुळे घरातल्या सर्वांच्या खाण्यापिण्याच्या आवडी निवडी, सवयी.. घरातले सन समारंभ, चालीरिती सगळं राधिकाच्या सासूबाई व्यवस्थित समजावून ही सांगायच्या.
तसं पाहिलं तर अनेकदा, तिघीही एकाच वेळी स्वयंपाक घरात रमायच्या. त्यामुळे राधिकाला स्वयपाकाचं फार दडपण येत नव्हतं. एवढ्या लोकांचा, स्वयंपाक ही लवकर खेळीमेळीने उरकत होता. राधिका हळूहळू सगळंच शिकुन घेत होती.

एक दिवस भाजीत जरा मिठ जास्तीच पडलं.. सगळे एकाच वेळी जेवायला बसले.
भाजीचा पहिला घास तोंडात टाकता क्षणी, सासूबाई पल्लवीकडे बघून जोरात रागावल्या, “लक्ष कुठे असतं तुझं,भाजीत मिठ जास्ती पडलयं, खारट किती झालीय भाजी”.. 
राधिकाला चटकन सिरियलमधली, भाजीत वरुन मिठ भूरभूरवणारी नणंद आठवली. 
खरं तर भाजी दोघी मिळूनच केली होती.. ओरडा मला ही पडायला हवा होता. पण सासूबाई फक्तच पल्लवीला रागावल्या, ” लेकी बोले सुने लागे” असं तर नसेल ना!… राधिकाला वाटलं..

राधिकाचं लक्ष उलट दिशेला धावलं. आपल्याला ओरडा बसावा म्हणून मुद्दाम पल्लवीनेच तर मुद्दाम भाजीत मीठ जास्ती टाकलं नसेल कशावरून… जाऊ दे, मला थोडीच काही ओरडा पडला, म्हणून त्यावर तिने जास्ती विचार केला नाही.
फळीवरच्या नकट्या कपाकडे बघून, सासूबाईं एकदा म्हणाल्या… काम हळूहळू आणि शांततेत… वस्तूंची तोडफोड न करता करत जा, उगाच आदळआपट करून वस्तूंची तोडफोड नको.. पल्लवी आणि राधिका सोबत स्वयंपाक घरात, असूनही त्या फक्तच पल्लवीकडे बघून बोलल्या होत्या..
राधिका आणि पल्लवी, सोबतच स्वयंपाक करायच्या, एक भाजी चिरायची तर एक भाजीला फोडणी द्यायची.. एक कणिक मळून पोळ्या लाटायची तर एक गोळे करुन पोळ्या शेकायची…

मात्र अनेकदा, करपलेल्या पोळींवरुन किंवा पोळ्यांचा पातळ, जाड वरून.. काही चुकलं – मुकलं तर सासूबाई पल्लवीलाच रागवायच्या.
कधी ती हसण्यावारी नेई तर कधी नाकावरच्या रागाने लाल झालेल्या शेंड्यासह, एकटीलाच रागावल्याबद्दल जाब ही विचारायची…
दूस-याची पोरं नांदायला घरी आणली.. तिला रागावणार कसं? असं सांगण्यापेक्षा.. 
“आता तुला सासरी जायचंय नांदायला, तिकडे आम्ही नसू, पोरीला उगा बोल नको ऐकायला म्हणून…. काळजी पोटी, आईच कर्तव्यच ते” राधिकाच्या सासूबाई पल्लवीची समजूत काढायच्या
एक दिवस दोघी नेहमीप्रमाणे स्वयंपाक करत होत्या, गप्पा गप्पांमध्ये कुकरमध्ये पाणी टाकायचचं विसरल्या.. आणि कुकर तसाच झाकण लावून गॅसवर चढवला.

लगेच काही वेळात, काही कळायच्या आत, धडाSSम.. धुSSम कर्कश आवाज करत.. कूकर छतापर्यत वर जावून खाली जोरात आपटला..
कुकरमधलं अन्न.. स्वयंपाक घरात पसरलं. सगळीच नुसतीच दाणादाण झाली होती. 
“काय आणि कसं घडलं” धक्क्यातून न सावरलेली पल्लवी.. स्वयंपाक घराची हालत आणि तो कुकरचा आवाज ऐकून,  वहिनीला पकडून हमसून हमसून रडत होती..
“लक्ष कुठे असतं तुझं?” कसलाही मागचा पुढचा विचार न करता, सासूबाईंनी पल्लवीच्या जोरात थोबाडीत मारली.. 

राधिकाला मात्र त्यांनी दुसऱ्याच क्षणी जवळ घेतलं, “बरी आहेस ना!”.. ” कुठे भाजलं का? कुठे चटका तर नाही ना  लागला”.. गालावरून हात फिरवत त्या राधिकाला कुरवाळत होत्या, तिला कुठे इजा झाली तर नाही ना खात्री करून घेत होत्या. … 
राधिका सुखरूप असल्याची खात्री झाली तस त्यांनी पल्लवीलाही जवळ घेतलं.. खूप मोठा अनर्थ टळल्याच्या जाणिवेने, देवाचे आभार ही मानले.
“ती एक नवीन, तिला नाही कळत. तुझं लक्ष कुठे होतंं ? आत्ता काही झालं असतं म्हणजे, काय उत्तर दिले असतं मी तिच्या माहेरच्यांना ? दुस-याची लेक घरी नांदवायला आणायची म्हणजे सोप्प नसतं, जोखिम असते एक प्रकारे”.. 

“केवढा मोठ विघ्न टळलं, अनर्थच टळला”. बोलता बोलता त्यांच्या डोळ्यात ही पाणी दाटून आलं, दोघींना जवळ घेऊन त्या ही रडायला लागल्या.
“नवी लग्न झालेली पोर, धड हातावरची मेहंदी निघाली नाही अजून, लेकीला तरी काय म्हणणार.. तिला तर काय जबाबदारीच.. दोघींना एकटं स्वयंपाक घरात सोडून, दोघींवर स्वयंपाकाची संपूर्ण जबाबदारी टाकूच मी कशी इकडे तिकडे भटकू शकते…  त्या स्वत:लाच दोष देत होत्या..
आईने थोबाडीत मारल्यापेक्षा, वहिनी आज सुरक्षीत आहे. जाणिवेने पल्लवीला अजून अजून रडू येत होतं.. 

लग्नाच्या पोरीला, काही झालं नाही आणि मुळात नवीन  नुकतंच लग्न होऊन घरात आलेली सुन घरात सुरक्षित आहे. काळजी सासूबाईंच्या चेह-यावर राधिकाला स्पष्ट दिसली…
लग्नापूर्वी आणि लग्नानंतरही.. सासू आणि नणंदेबद्दल सगळे मनात काय काय भरवायचे… नणंद कशी  आहे, सासू कशी? विचारायचे… घरचे सगळे खूप छान आहेत, मुळात सासूबाई, नणंद मस्त आहे सांगितल्यावर… 
“चार दिवस… फक्त, नंतर बघ कसे रंग दाखवतील” म्हणत.. अनेकदा बरेच जण मनात धाक ही भरवतच होते. 

सासूबाई आणि नणंदेबद्दल, मी किती चुकीचा विचार करत होते.. त्या तशा नाहीच… चांगल्या आहेत दोघीही,  राधिका मनोमन सुखावली होती….. 
आज ती, खऱ्या अर्थाने… बिनधास्त, निर्धास्त होऊन घरात रुळणार होती, वावरणार होती… 
खरचं, कधीकधी आपण सासू तसेच नणंदेच्या नात्याला कित्ती चूकीच ठरवतो. “लेकी बोले सुने लागे”, म्हणत अनेकदा नात्याची खिल्ली उडवली जात..
कुणी म्हटल म्हणून कुठलं एक नातं चुकीचं राहू शकतं का??..
नणंद ही कुणाची तरी भावजय म्हणजे वहिनी असते..

घरात लग्न करून आलेली वहिनी सुद्धा कुणाची तरी नणंद असतेच, हे मात्र आपण साळसूदपणे विसरुन जातो..
नणंद भावजयीच नातं…फक्त नव-याची बहिण किंवा भावाची बायको या दृष्टीने न बघता… नात्याला वेळ देणं गरजेचं.. 
नात्यावर विश्वास ठेवला.. तरचं नातं बहरतं..
अविश्वासाच्या सावटाखाली नातं खुंटतं…
तेव्हा नातं कुठलच असो, नात्याला बहरण्यासाठी..  नात्यात मैत्र शोधलं तर ते ही नातं मैत्रीच्या सुंदर आकृतीत बांधलं गेल्याचं दिसेल एवढं मात्र नक्की…
© शुभांगी मस्के

सदर कथा लेखिका शुभांगी मस्के यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
नकार
कोंडी
त्यांचं काय चुकलं???

Leave a Comment

error: Content is protected !!