जागर शक्तीचा

©सौ. प्रतिभा परांजपे
“ईशा, चहा गार होतो आहे, चल लवकर तुला क्लासला उशीर नाही होत आहे कां?
“पहा ग वंदना “मंगलाताई सुनेला आवाज देत म्हणाल्या.
वंदना ईशाला बोलवायला खोलीपाशी गेली.
ईशा फोनवर रुपा, तिच्या मैत्रिणी शी बोलत होती,” तू नाही येत? मग मी पण नाही जाणार .”
“पण कां? तुला काय प्रॉब्लेम आहे?”

“मला भीती वाटते ग”
तेवढ्यात वहिनीला पाहून ईशाने ‘अच्छा बाय’ म्हणत घाई घाईने फोन बंद केला.
“ईशा चहा गार होतोय, चल –“
“आई मी आज क्लासला नाही जात”.
“अगं–पण तू तर काल–“
“हो  पण आता नाही जाते, घरीच अभ्यास करेन..”

 “बरं बरं अभ्यास झाला की जरा मला मदत कर, घर स्वच्छ करण्यात. उद्या नवरात्र सुरू होईल.”
“बरं …”
“ईशा संध्याकाळी गरब्याच्या प्रॅक्टिसला चलणार आहे कां?” वहिनीने आफिसला निघता निघता विचारले.
“हो चलेन.”
ईशा  ही, दहावीत शिकणारी मुलगी. तिला एक भाऊ विनीत, वहिनी वंदना व आई-बाबा असे कुटुंब.
ईशा अभ्यासात खूप हुशार, मेहनती. पुढे अजून छान मार्क्स हवे म्हणून कोचिंग क्लासला जायची. 

“ईशा आज क्लास आहे ना?” सकाळी आईने पूजेची तयारी करता करता विचारले.
“हो आई” म्हणत ईशा तयार होऊ लागली.
तेवढ्यात तिचा फोन वाजला. वहिनी तिथेच होती, ती फोन उचलणार तेवढ्यात धावत येऊन ईशाने फोन घेतला.
फोनवर बोलताना तिच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव वंदना दुरून पाहत होती.
“आई मी निघते ग” म्हणून ईशा घाईने गेली.
“अगं नाश्ता” असे आई म्हणेपर्यंत ईशा गेली पण.

संध्याकाळी वंदनाने ईशाला विचारले “काल तू प्रॅक्टिसला आली नव्हती, कां?” 
“आले होते, पण लवकर घरी आले.”
वंदनाला सारखे जाणवत होते की ईशाचे काहीतरी बिनसलं आहे .पूर्वीसारखी मोकळेपणाने बोलत वागत नाही ,कुठल्यातरी दडपणाखाली वावरते आहे .
ती मंगलाताई जवळ बोलली “आजकाल ईशाच वागणं बदलत चाललंय नाही? हरवल्यासारखी वाटते.”

“हो अगं –जेवणावरही फारसे लक्ष नसते, मध्ये मध्ये फोन पाहत असते.”
दुसऱ्या दिवशी सकाळी ईशा ची मैत्रीण रूपा आली.
दोघी ही खोलीत बोलत बसल्या होत्या .वंदना सहजच खोलीपाशी गेली.”
“ईशा तू इतकी  कशी ग घाबरट? झापले का नाही त्याला? मी असते ना तर काढली असती त्याची वरात. मी नाही आले क्लासला तर तु नाही जाणार कां? मला वाटले होते तू गेली असशील तर तुझ्या जवळून नोट्स घ्याव्या म्हणून मी आले.”

तेवढ्यात वंदनाला पाहून ईशाचा चेहरा बावरला, तिने इशाऱ्याने रूपाला चुप केले.
ते वंदनाच्या नजरेने हेरले पण तसे न दाखवता ती रूपाशी बोलू लागली, “काय रूपा नवरात्रात डांडियाची तयारी कशी चालली आहे? कोणत्या रौ मध्ये तुम्ही खेळणार ?”
“भाभी आम्ही सध्या पाचव्या रो मध्ये आहोत .”
“आणि ईशा तू ?”
“अरे ही तर सारखी गलत करते म्हणून हि सातव्या रोमध्ये “.

“ईशा तू तर छान स्टेप्स घ्यायची आता काय झालं तुला ?”
“पता नाही हिला काय झालं तिचं लक्षच नसतं.”
“वहिनी आप उपवास करते है ?” रूपाने विचारले.
“उपवास नाही ग, पण– पूजा व्रत करते. माझा देवीच्या शक्तीवर विश्वास आहे.”
“हां बोलते है  दुर्गा ,काली अशी सर्व रूप घेऊन येते देवी. अंबा भवानी चे ते सूंदर रुप मला फार आवडते. पण मला काली माता ची भारी भीती वाटते.

ते भयंकर डोळे ,लाल लाल जीभ,गले मे नरमुंड की माला, दुसरे हाथ में खड्ग, शेर पर सवार. वहिनी इतनी सुंदर देवी इतनी डरावनी कैसे हो जाती है?”
“देखो रूपा, काय आहे साधे सोज्वळ रूप  सामान्य माणसांकरता ,आपल्या भक्तांसाठी पण– दुष्ट राक्षसांना घाबरवायचे तर तसेच भयंकर रूप ही हवे ना. देवी खूप रागात येते म्हणून तिचे असे भीतीदायक रूप दिसते आणि तिच्या तल्या सर्व शक्तींना एकवटून ती  युद्ध करून महिषासुराला मारते.”
“बापरे इतकी शक्ती कुठून आणते?” ईशा ने विचारले.

“ती तपोबळाने येते. अश्याच शक्तीची गरज आपल्यालाही आहे. म्हणूनच शक्तीची उपासना म्हणजेच नवरात्र.
हे शक्तीचं जागर आहे आणि ही शक्ती आपल्या सर्वांमध्ये आहे. तिची जाणीव असावी लागते गरज पडल्यावर तिला जागृत करावे लागते.”
“भाभी तुम्ही किती छान समजावले ” रूपा  म्हणाली.
रात्री झोपताना ईशा विचार करत होती. गेला महिनाभर ती सोमेशचा त्रास सहन करते आहे. तिला आठवले एक दिवस क्लास मधील रोहनने तिला फिजिक्सचे नोट्स विचारले, त्याच्याशी बोलत असताना हा सोमेश तिथे आला.

तिने फारसे लक्ष दिले नाही, पण तो मात्र मधून मधून तिला हाय हॅलो करायचा.
तिने दुर्लक्ष करायला सुरुवात केली ,तेव्हा तो जास्तच मागे लागला.
आता तर त्याची मजल वाढत चालली.
त्याने तिचा मोबाईल नंबर ही मिळवला व फोन करून त्रास देऊ लागला.
आता स्टेडियम मध्येही सोमेश येऊ लागला. गरब्याच्या मध्ये मध्ये येऊन ईशा ला त्रास देऊ लागला.

इतक्या गर्दीमध्ये कोणी कोणाकडे लक्ष देत नाही पाहून जवळ जवळ येऊ लागला. त्यामुळे तिच्या स्टेप्स चुकायला लागल्या.
काल तर त्याने तिची ओढणी  खेचली. म्हणूनच ती डांडिया अर्धवट सोडून घरी निघून आली.
काय करावे घरी सांगावे कां? 
ईशा ला दोन वर्षांपूर्वी घडलेली घटना आठवली.
अकरावीत एक मुलगी होती. नंदा सुभेदार, तिने आत्महत्या केली असे शाळे मध्ये पसरले.

पोलिस पण शाळेत आले होते. चौकशी केली त्या नंतर समजले कि एक मुलगा बरेच दिवस तिला त्रास देत होता. तो तिला ब्लॅकमेल करत होता. तिची घरी सांगायची  हिम्मत नाही झाली.
त्यानी तिच्या या घाबरट स्वभावाचा फायदा घेऊन तिला कुठे तोंड दाखवायला जागा नाही ठेवली .
तेव्हा जर तिने थोडी हिंमत दाखवली असती आणि त्याला वेळीच हिसका दाखवला असता तर आज तिचा असाबळी गेला नसता. आपण ही जर असेच घाबरून राहिलो तर सोमेश ची मुजोरी वाढत जाईल

त्याला वेळीच विरोध करायला हवा.
वहिनी म्हणत होती त्या प्रमाणे  अंतर शक्ती जागृत करायला हवी.
विचार करता करता ईशा ला झोप लागली.
आज अष्टमीचा दिवस, संध्याकाळी पूर्ण स्टेडियम मध्ये गरबा खेळणाऱ्यांची धूम होती.
रंगबिरंगी परिधान नेसून सर्व आले होते.
देवी गीत लागले होते उपस्थित सर्व गोल घेर करून गरबा, डांडिया करत होते, स्टेप्स बदलत होत्या सर्व एका तालावर नृत्य करत होते.

ईशा आणि तिच्या सर्व मैत्रिणी चणिया-चोळी, घागरा ओढणी नेसून, हातभर बांगड्या, कडे, सुंदर मेकअप करून आल्या होत्या. युवक गुजराती वेशभूषा करून आले होते.
“ए नाम रे, सबसे बडा तेरा नाम, ओ शेरावाली” या गाण्यावर डांडिया रंगला होता.
ईशा ला पण आज खूप मजा येते होती. ती पूर्ण उत्साहाने नृत्य करत होती.
खेळता खेळता अचानक तिला समोर सोमेश दिसला तशी ती घाबरली तिने आपली रो बदलली.

थोड्यावेळाने सोमेश परत समोर आला. आता ईशाच्या स्टेप्स चुकायला लागल्या. तेवढ्यात रूपाने तिला आवाज दिला .
“ईशा, चल ना जरा ब्रेक घेऊ. कोल्ड्रिंक पीते है.”
ईशा  व रूपा  स्टॉलवर आल्या, तेवढ्यात रूपाचा फोन वाजला.
ती जरा बाजूला जाऊन बोलू लागली.
तेवढ्यात सोमेश ही तिथे आला व ईशाशी जवळीक करू लागला.
आता ईशाचा स्वतःवरचा ताबा सुटला. तिने मनात देवीचे स्मरण केले.

आणि “माते शक्ती दे, शक्ती दे ” म्हणत हातातल्या डांडीयाने जवळ आलेल्या सोमेश वर ताडताड प्रहार केले.
ती संतापून उठली आणि प्रहार करत सुटली.
अचानक झालेल्या प्रहाराने सोमेश गांगरला व खाली पडला, तिने त्याच्या डोक्यात अजून दोन-तीन तडाखे मारले .
हे सर्व पाहून आजूबाजूला असणारे लोकही  धावत आले व त्यांनी ही सोमेश ला फटके दिले.
तेवढ्यात एक लेडी कॉन्स्टेबल ही धावतआली व सोमेश ला फटके मारत धरून घेऊन गेली.

“वेलडन ईशा अखेर तुने अपने डर पर काबु  पा ही लिया , और अच्छा सबक सिखाया” रूपा कौतुकाने म्हणाली.
“सर्व आदिशक्तीची कृपा ” म्हणत ईशाने डोळे मिटून देवीला हात जोडले व रूपाचा हात धरून डांडिया खेळायला मैदानाकडे वळली.
समाप्त
©सौ. प्रतिभा परांजपे
सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
पाश
कामांचे वळण

Leave a Comment

error: Content is protected !!