लक्ष्य

© धनश्री दाबके
” ये, आलास? लवकर आलास.. आज तुझ्या रिकामटेकड्या मित्रांना चक्क कामं होती वाटतं. नाहीतर तू कुठला एवढ्या लवकर यायला?” आजोबांनी नेहमीप्रमाणे खोचक बोलतच अजितचं स्वागत केलं.
त्यांच्या अशा तिरकस बोलण्याची सवय असलेला अजित काहीही न बोलता दारातून आत आला.
गायत्री तेव्हा स्वैपाकघरातली मागची आवरा आवर, उद्या सकाळच्या डब्याच्या भाजीची तयारी वगैरे आवरून पोथी वाचायला बसली होती.

“आई मी झोपतो ग. सकाळी जाग नाही आली तर मला हाक मार” असं गायत्रीला सांगून अजित शांतपणे झोपायला निघून गेला.
“पाहिलंस? कसा निघून गेला? माझ्याकडे साधं लक्षही दिलं नाही त्याने.. हा असा तुझा लेक.. अगदी बापावर गेलाय” गायत्रीच्या वडलांची नेहमीचीच बडबड सुरू झाली.
‘अहो बाबा, दिवसभर कॉलेज आणि अभ्यासच करतो तो.. विरंगुळा म्हणून रात्री थोडावेळ मित्रांसोबत कट्ट्यावर गप्पा मारतो फक्त तर तुम्ही लगेच त्याचा बाप काढताय.’ असं वडलांना सांगावसं गायत्रीला वाटलं पण त्याचा काय उपयोग होणार या विचाराने ती गप्प बसली.

शेवटी ते आपले वडील आहेत.. आणि कितीही टाकून बोलत असले तरी आपल्याला आधारही फक्त त्यांचाच आहे.
मी प्रमोद बरोबर पळून जाऊन लग्न केलं तेव्हा आमच्याकरता तुझं अस्तित्व संपलं असं सुनावणारे हे आईबाबाच तर प्रमोद मला अर्ध्यावर सोडून गेल्यावर माझ्या पाठीशी उभे राहिले. नाहीतर मी काय केलं असतं कोण जाणे?
कॉलेजमधलं अर्धवट वयातलं प्रेम आमचं.. खरंतर दोघही संस्कारी आणि सुखवस्तू घरातले. आईवडलांचा विचार करणारे.. पण एकमेकांना भेटलो आणि आमचं जगच बदललं. 

जाणिवा, संस्कार सगळं आमच्या प्रेमाच्या वादळात जणू वाहून गेलं. 
दोघांच्याही घरून जात एकसारखी नाही म्हणून विरोध झाला. मग काय? तेव्हा प्रमोदशिवाय दुसरं काही सुचतच नव्हतं. त्याच्याशिवायच्या आयुष्याची कल्पनाही करवत नव्हती. घरी कोणी काही ऐकून घ्यायला तयार नव्हतं..मग केला मनाशी निश्चय आणि गेलो दोघं पळून. जन्मोजन्मीच्या सोबतीच्या आणाभाका घेतल्या आणि मंदिरात लग्न करायचं ठरवलं.आमच्या कॉलेजच्या गृपने खूप मदत केली आणि लग्न पार पडलं.
एका सुरक्षित जगातून घराबाहेरच्या कठोर जगात प्रवेश केला आणि मग जगण्यासाठीचा संघर्ष म्हणजे काय ते कळायला लागलं. खूप टक्केटोणपे खाल्ले.. धडपडलो.. पण एकमेकांची साथ मात्र सोडली नाही.

लग्न झालं तेव्हा दोघांकडेही फक्त डीग्री होती.. मित्र मंडळींनी मदत केली म्हणून राहाण्याची कशीबशी सोय झाली.. पण खरा कस तेव्हा लागला जेव्हा आपल्या डीग्रीच्या कागदाची बाहेरच्या जगातली खरी किमंत उमजायला लागली.
खूप ठिकाणी प्रयत्न केल्यानंतर मला नोकरी लागली आणि थोडं तरी स्थैर्य आलं.
पण प्रमोदला मात्र प्रयत्न करूनही नोकरी मिळेना. काही दिवस असेच काढले. 

मग प्रमोदने एका मित्राला हाताशी धरून भागीदारीत स्वतःचा बिझनेस सुरू केला. त्यासाठी लागणाऱ्या भांडवलासाठी मी लोन घेतलं. पण दुर्दैवाने व्यवसायातही प्रमोदला यश आलं नाही. लोनचे हफ्ते फेडण्यासाठी प्रमोदने जे मिळेल ते काम करायची तयारी दाखवली आणि दोन चार हंगामी कामं केलीही.. पण कायमस्वरूपी पैसा मिळवण्यात तो अयशस्वीच ठरला. 
एका मागोमाग एक करत गेलेले त्याचे सगळे प्रयत्न फसले आणि तो खचला.
मी तुझ्या योग्यतेचाच नाही हा विचार त्याच्या मनात बळावला. त्याला नैराश्याने ग्रासले. 

आधीच आईबाबांनी पाठ फिरवलेली त्यात नवऱ्याची जगण्याची उमेद हरवली.
कधी कधी मलाही त्याच्या नैराश्याची बाधा होते की काय असं वाटायचं. पण तसं होऊ देऊन चालणार नाही, तुला हारून चालणार नाही असं स्वतःला बजावत बजावतच मी ते दिवस काढले.
प्रमोदला खूप सांभाळलं.
त्याला निराशेतून बाहेर काढत असतांनाच अजितच्या येण्याची चाहूल लागली. अजून एक जबाबदारी घ्यावी की नाही अशी मनाची द्विधा अवस्था झाली. 

पण ही बातमी प्रमोदला दिल्यावर त्याच्या डोळ्यात एक आशेची चमक दिसली. भरून आलेल्या आभाळालाही एखादी सोनेरी कडा असते असं म्हणतात त्याचा प्रत्यय आला आणि मी आनंदाने आई होण्यास सज्ज झाले. 
बाकी काही करत नसलो तरी आपल्या बायकोची काळजी घ्यायला, तिला मदत करायला आपण तयार असायला हवे या विचाराने प्रमोदला निराशा झटकायला मदत केली.
आधी माझं बाळांतपण आणि मग लहानग्या अजितचं संगोपन यासाठी प्रमोदने कंबर कसली. 

त्याने अजितची सगळी जबाबदारी घेतली आणि माझी नोकरी सुरू राहिली. मी कमवून आणायचं आणि प्रमोदने घर सांभाळायचं असं जगावेगळं जगणं सुरू झालं. 
लोकांच्या विचित्र नजरांचा त्रास खूप झाला पण दोघांचे आयुष्य प्रेमाच्या नाजूक पण खऱ्या धाग्याने जोडलं असल्याने आम्ही एकमेकांना सावरत पुढे जात राहिलो.
मला प्रमोशन्स मिळत गेली आणि आमची आर्थिक गाडीही रूळावर आली.

अजित भराभर मोठा झाला पण आपल्या घरात आईबाबांचे रोल्स इतर मुलांच्या आईबाबांपेक्षा वेगळे आहेत हे त्याला लहानपानापासूनच कळायला लागले.
आपले बाबा घरीच असतात आणि त्यावरून त्यांना नातेवाईक, शेजारीपाजारी कमी लेखतात.
आपल्याला तू आईसारखा कर्तुत्ववान हो असं खोचकपणाने म्हणतात हेही त्याला जाणवायला लागले. 
कधी कधी तर मित्र चिडवायचे तेव्हा त्याला बाबांचा रागही यायला लागला.

पण घरात मी कधीच प्रमोदला कमी न लेखल्यामुळे त्याचा तो राग एका चांगल्या महत्वाकांक्षेत बदलला.
आपण बाबांसारखे न होता, खूप अभ्यास करायचा, मेहनत घ्यायची आणि छान नोकरी करून आईबाबा दोघांना सुखात ठेवायचे हे स्वप्न तो पाहू लागला.
चांगल्या भरपूर पगाराची नोकरी हेच त्याचं लक्ष्य बनले.
तो खूप अभ्यास करून चांगले मार्क मिळवायला लागला. प्रमोदच्या मनाला मुलाच्या यशामुळे उभारी मिळत गेली आणि तो आनंदी राहू लागला.

मनातला न्यूनगंड झटकून परत काहीतरी करण्यासाठी धडपडू लागला. पण नियतीला त्याचे कुठलेच यश मान्य नसावे कारण त्याने स्वतःच्या हिमतीवर काही सुरु करायच्या आधीच त्याचा जगण्याचा प्रवासच एका ॲक्सिडेंटमधे संपला.
अचानक झालेल्या ह्या आघाताने मी कोसळले.. पण आईवडलांना हे कळल्यावर मात्र पूर्वीचा राग सोडून ते माझ्याकडे परत आले. शेवटी आईवडीलच ते! मुलीच्या दु:खाने त्यांच्या वर्षानुवर्षांच्या रागाला हरवलं.
मागचं सगळं विसरून त्यांनी मला जवळ केले. प्रेमाने सावरले व अजितकडे पाहात मी परत जगायला शिकले.

शक्य होईल तितका पैसा अजितच्या शिक्षणासाठी कमवायचा आणि काहीही झालं तरी फक्त डीग्रीवर न थांबता त्याला मास्टर्स करायला लावायचे हेच माझ्या आयुष्याचे लक्ष्य बनले.
प्रमोद गेल्यावर आईबाबा इथे राहायला आले खरे पण त्यांच्या मनातून विशेषतः बाबांच्या मनातून प्रमोदच्या नाकर्तेपणा बद्दलचा राग मात्र कधीच गेला नाही आणि त्यांनी तो कधी लपवलाही नाही. 
मी ऑफिसला गेल्यावर ते प्रेमाने अजितचा सांभाळ, रूटीन सगळं करत राहिले पण बोलण्यातून त्यांनी त्यांच्या मनातला राग सतत जीवंत ठेवला.

वडलांच्या प्रेमाला मुकलेला बिचारा अजित.. लवकर समंजस झाला आणि आजोबांचा राग, प्रमोदवरून मारलेले टोमणे सगळं काही पचवायला शिकला..
आजही पहाटेपासून उठून MBA च्या फायनल परिक्षेचा अभ्यास करत होता.. त्यात एका बॅंकेत फायनल इंटरव्ह्यूही देऊन आला दुपारी.. उद्या उठव जरी म्हणाला असला तरी मी उठवायच्या आधीच त्याला नक्की जाग आलेली असेल. 
खूप मेहनती आहे आणि खूप समंजसही.. प्रमोदही होता एकेकाळी पण..
गायत्रीचे डोळे नुसतेच पोथीतल्या शब्दांवरून फिरत होते पण मन मात्र प्रमोदच्या आठवणीत गुंतले होते. शेवटी एकदाचा शेवटचा अध्याय संपला आणि अजितच्या यशासाठी देवाकडे प्रार्थना करून गायत्री झोपायला गेली..

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गायत्री ऑफिसमधून आली तर आल्याआल्या अजितने तिला नमस्कार करून तिच्या हातावर पेढ्यांचा बॉक्स ठेवला. कालच्या इंटरव्ह्यू मधे त्याचे सिलेक्शन झाले होते आणि त्या नामांकित बॅंकेने त्याला भरभक्कम पगाराची ऑफर दिली होती. 
आजोबांचा उरही नातवाच्या अभिमानाने भरून आला होता. घर यशाच्या आनंदाने भरून गेले होते.
बऱ्याच वर्षांनंतर घरात काहीतरी सेलिब्रेट करण्यासारखे घडले होते. 

अजितच्या पाठीवर शाबासकीची थाप देतांना गायत्रीला प्रमोद आपल्या आजूबाजूलाच आहे असं वाटत होते आणि तिचे डोळे अश्रूंनी भरून आले होते.
आज एका मुलाचे वडलांच्या नाकर्तेपणाच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःला सिद्ध करण्याचे तर एका आईच्या आयुष्यभराच्या कर्तृत्वाचे लक्ष्य पूर्ण झाले होते.
समाप्त
© धनश्री दाबके
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

2 thoughts on “लक्ष्य”

Leave a Comment

error: Content is protected !!