पश्चात्ताप

©® सौ. हेमा पाटील.
वृंदाची आज सकाळपासूनच गडबड चालली होती हे सुमतीबाई खिडकीत बसून पहात होत्या.
गेले वीस दिवस तिच्याशी बोलण्याचा, तिचे लक्ष वेधून घेण्याचा त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरत होता. एक महिना उलटला परंतु मनाने वृंदा अजूनही सावरली नव्हती.
आज आईंची म्हणजे तिच्या सासुबाईंची पहिली महिना मासिक तिथी होती.
तेराव्याचे कार्य झाले की,आत्यांनी व इतर नातलग महिलांनी आईंच्या मृत्यू तिथीला दर महिन्याला एका स्त्रीला वर्षभर जेवायला घालायचे असे सांगितले होते. त्यामुळे तिने जवळच रहात असलेल्या आईंच्या मैत्रिणीला म्हणजेच मनिषा काकूंना जेवायला सांगितले होते.

मनिषाकाकू आल्या तेव्हा ती नुकतीच किचनमधून सगळे आवरुन बाहेर आली होती.
काकूंना पाणी देऊन त्यांची विचारपूस करुन ती पुढील तयारीसाठी परत आत गेली. तिच्या पाठोपाठच सुमतीबाईही बाहेर आल्या होत्या.
आपल्या मैत्रिणीला पाहून त्यांना आनंद झाला. तिच्याशी आपण कायम गुजगोष्टी करायचो. आताही तिला आपल्या मनातील शल्य सांगूयात. ती तरी ऐकेल आपले असे सुमतीबाईंना वाटले.
म्हणून त्या मनिषाकाकूंच्या जवळ जाऊन बसल्या व त्यांना हाक मारु लागल्या.

पण आपण कितीही हाका मारल्या तरी आपला आवाज मनिषापर्यंत पोहोचत नाहीय, त्यामुळे ती आपल्याकडे न पहाता टिव्ही बघत बसलेय, आपल्याकडे ढुंकूनही पहात नाही हे पाहून सुमतीबाईंना वाईट वाटले.
आज पहिलेच महिना मासिक असल्याने महेशने ही सुट्टी घेतली होती. त्याच्या भरपूर सुट्ट्या शिल्लक होत्या. पण आईचे तेराव्याचे कार्य झाले की , दुसऱ्या दिवशीच त्याने आॅफीस जाॅईन केले होते.
आईविना रिकामे घर त्याला खायला उठत होते. जन्मापासूनच्या आईसोबतच्या स्मृती त्याच्या मनात वारंवार घोळत होत्या.

घरातील प्रत्येक वस्तूला असलेला तिचा स्पर्श त्याला व्याकुळ करत होता. त्या आठवणींपासून काहीवेळ दूर झालो तर मनाची अस्वस्थता व मनाला भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा मागोवा घेण्याचा शोध तेवढ्या वेळापुरता तरी थांबेल यासाठी त्याने घेतलेला निर्णय होता तो !
कामात गुंतून राहिलो तर आठवांचा ससेमिरा पाठ सोडेल हा व्यवहारी दृष्टिकोन ठेवून महेश आॅफीसला जाऊ लागला होता. आॅफीसमधील सहकाऱ्यांच्या नजरेतील प्रश्न त्याला बोचत होते, पण आता हे प्रश्न कायमच आपल्याला सोबत करणार आहेत अशी त्याने मनाची तयारी केली होती.

वृंदाची अवस्थाही यापेक्षा वेगळी नव्हती. गेली पंधरा वर्षे या घरात सासुसासऱ्यांसोबत एकत्र सुखेनैव संसार करणारी वृंदा आपल्या या मायेच्या माणसांना खूप जीव लावायची.
गेल्यावर्षी जेव्हा सासरे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू पावले तेव्हा महेशइतकेच तिलाही पोरके वाटले. कारण आप्पा तिच्यावर स्वतः च्या मुलीसारखीच माया करत. पण मृत्यूने त्यांच्यावर झडप घातली अन् चौकोनी घराचा एक कोपरा निखळला.
जन्ममृत्यू या गोष्टी आपल्या हातात नसतात असे मनाला समजावत वृंदाने स्वतः ला सावरले कारण महेश व आईंकडे आपणच लक्ष दिले पाहिजे व त्यांना सावरण्यासाठी मदत केली पाहिजे हे तिने ध्यानात घेतले.

स्वतः ला झालेले दुःख दूर सारुन ती घराला सावरण्यासाठी पुढे झाली. तिच्या प्रयत्नांमुळे अल्पावधीतच महेश दुःखातून बाहेर पडला. आता आईकडे अधिक लक्ष दिले पाहिजे याची जाणीव त्यालाही झाली. 
आप्पांचे तेराव्याचे कार्य झाले की , प्रियाही तिच्या सासरी परतली.
मुलगी एकदा लग्न होऊन सासरी गेली की , इच्छा असूनही माहेरी जास्त दिवस राहू शकत नाही. तिच्या मुलांची शाळा,यजमानांचे आॅफीस,तिची नोकरी हे तिच्या आयुष्यातील रोजचे प्रश्न तिच्याशिवाय कोण सोडवणार होते?

मुलगा व सून आपली अधिक काळजी घेतात ,आपल्याकडे अगदी बारकाईने लक्ष पुरवतात हे पाहून सुमतीबाईंनीही घरासाठी, आपल्या नातवंडांसाठी आपले दुःख चेहऱ्यावर दिसणार नाही याची काळजी घ्यायला सुरुवात केली.
पण आयुष्याचा जोडीदार असा अचानक तडकाफडकी सोडून जाण्यामुळे त्या सैरभैर झाल्या होत्या. मुलगा सून कामावर गेले, नातवंडे शाळेत गेली की, सुमतीबाई दिवसभर घरात एकट्याच असत.
यावेळी पतीराजांसोबतच्या आयुष्यभराच्या आठवणी त्यांच्या मनात दाटून येत.

निशिकांतरावांचा स्वभाव एकदम शांत होता.मनातील गोष्टी बोलून दाखवणे त्यांच्या स्वभावात नव्हते. त्यांची अबोल प्रीती समजून येण्यासाठी सुमतीबाईंना एक वर्ष जावे लागले होते.
नवी नवरी असताना एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये सर्वांसोबत रहात असताना दिवसा सर्वांसमोर एकांत मिळत नसे.
घरातील बाळबोध संस्कार असल्याने सर्वांसमोर पत्नीशी गप्पा मारणे ही त्याज्य गोष्ट होती. एखादे दिवशी डबा बनवायला उशीर झाला तरी पत्नीचे नाव न घेता “माझा डबा झालाय की नाही”?असा मोघम प्रश्न निशिकांत राव विचारत.
मग ती गडबडीने डबा भरुन आणून त्यांच्या बॅगेत भरत असे. त्यावेळी दोघांची नजरानजर होत असे तोच पतीराजांना दिवसभरासाठी दिलेला निरोप असे.

संध्याकाळी पतीदेव आॅफीसमधून आल्यावर बॅग टेबलवर ठेवायचे.
त्यांच्यासाठी चहा घेऊन आल्यावर दररोज तिने बॅगेतून डबा काढायला जावे तर बॅग उघडल्याबरोबर मोगऱ्याचा सुगंध दरवळायचा. मग ती हळूच पतीराजांकडे एक कटाक्ष टाकत असे. त्यावेळी चहा पित असतानाच तेही तिच्याकडेच तिरक्या नजरेने पहात असत. त्या नजरेत फुललेला मोगरा सुमतीबाईंच्या अंगावर रोमांच उभे करत असे‌. दररोज रात्री त्यांच्या शयनगृहात मोगऱ्याचा सुगंध हळुवारपणे रात्रभर दरवळत असे.
पतीराजांच्या कुशीत शिरल्यावर दिवसभराचा दुरावा क्षणात दोघांनाही जवळ आणत असे.

त्यावेळी सुमतीबाईंच्या डोक्यात माळलेल्या मोगऱ्याच्या फुलांनाही बहर येत असे. संवादाविना एकमेकांच्या भावना समजून घेत दोघेही आता आयुष्याच्या सांजवेळी एकमेकांमध्ये इतके एकरुप होऊन गेले होते जसे मोगऱ्याचा सुगंध फुलात नेमका कुठे असतो हे आपण शोधू शकत नाही, तसेच या जोडीला पाहून सर्वांनाच हे दोघे फक्त एकमेकांसाठीच बनलेले आहेत अशी प्रचिती येत असे.
असे असताना अचानक निशिकांतरावांचा मृत्यू झाला हे सत्य पचवणे सुमतीबाईंना अवघड गेले. गेले वर्षभर त्यांनी स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न केला,पण निशिकांतरावांशिवाय आयुष्य कंठणे त्यांना खूप अवघड जात होते.

अन अशातच त्यांनी निर्णय घेतला… आयुष्य संपवण्याचा !
तुमच्या आमच्यासाठी सोपा वाटणार नाही हा निर्णय! पण पतीशी एकरुप झालेल्या सुमतीबाईंना यात काहीच अवघड वाटत नव्हते. दोन्ही मुलांची आयुष्ये मार्गी लागली होती. आपल्या नसण्याने फारसा फरक पडणार नाही असे त्यांना वाटले.
दृढनिश्चय झाल्यावर त्यांनी दुपारी शांतपणे एक चिठ्ठी लिहिली की ,माझे आयुष्य मी स्वतःच्या मर्जीने संपवत आहे. यासाठी इतर कुणाला जबाबदार धरु नये आणि डाॅक्टरांनी झोप येत नाही म्हणून दिलेल्या गोळ्यांची अख्खी बाटली त्यांनी तोंडात उपडी केली व पाणी पिऊन त्या बेडवर पडल्या.

घरात एकट्याच असल्याने यांची झालेली घालमेल कुणालाच कळली नाही. संध्याकाळी बेल वाजवून ही आज्जी दार का उघडत नाही म्हणून शेजारच्या घरी जाऊन चावी आणली तर…मग शेजाऱ्यांनीच महेश आणि वृंदाला फोन केला.
ते दोघे आल्यावर त्यांनी पोलिसांना कळवले..अन् सुरु झाली पुढची सगळी प्रक्रिया!
मुले तर पार भेदरुन गेली होती. वृंदा अन् महेशची अवस्था ही वेगळी नव्हती.
पोस्टमार्टेम झाल्यावर बाॅडी ताब्यात मिळाली.चिठ्ठी लिहून ठेवली असल्याने पोलिसांनी जास्त प्रश्न विचारले नाहीत. पण जमा झालेले नातलग अन् शेजारी यांच्या नजरेतील प्रश्नचिन्हे महेश अन् वृंदाला त्यांची काहीही चुकी नसताना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत होती.

स्मशानभूमीत अग्नीदहन करुन सगळे घरी आले तेव्हा अश्म दाराबाहेर कापडात बांधून वर टांगून ठेवतात तसा ठेवला, त्यावर सुमतीबाईंचा सूक्ष्मदेह येऊन बसला.
घरात महेश व वृंदाला भेटून त्यांचे सांत्वन करुन बाहेर पडले की आपलेच नातेवाईक त्या दोघांचीच काहीतरी चूक असली पाहिजे त्याशिवाय माणूस एवढा टोकाचा विचार करेल का अशीच चर्चा करत होते ‌हे ऐकून सुमतीबाईंना लाखो इंगळ्या एकावेळी डसाव्यात तसे दुःख होत होते.
आपल्या विरहाच्या वेदनेपुढे आपण आपल्या मुलांना आयुष्यभरासाठी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे याची खंत त्यांना वाटू लागली. पण आता तीर सुटला होता..

दहाव्यानंतर पुढच्या प्रवासाला आत्मा निघतो, पण सुमतीबाईंच्या आत्म्याला पुढच्या प्रवासाला निघणे शक्य झाले नाही,त्या आपल्या घराभोवतीच घोटाळत होत्या.
आजही त्या महेशच्या अवतीभवतीच घोटाळत होत्या. सत्य त्याला सांगण्याचा प्रयत्न करत होत्या, पण त्यातील एक अक्षरही महेशपर्यंत पोहोचत नव्हते.
महेशने कपाट उघडून आपली एक साडी काढलीय अन् तो त्यावरुन हात फिरवत आई ,माझे काय चुकले गं म्हणून तू अशी मला न सांगता निघून गेलीस असे म्हणत त्या साडीत तोंड लपवून रडत होता ते पाहून त्यांना अधिकच भरुन आले..

महेशजवळ जाऊन त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत त्याच्या डोळ्यांतील पाणी पुसावे व त्याचे सांत्वन करावे यासाठी त्या पुढेही झाल्या. पण आपण हे करु शकत नाही हे उमजून त्या तिथेच उभ्या राहिल्या. आपण आता फक्त आत्मा आहोत.
देह कधीच पंचमहाभूतात विलीन झाला आहे, त्यामुळे आपण इतरांशी संवाद साधू शकत नाही हे सत्य पुन्हा एकदा त्यांच्या समोर उभे राहिले.
आपण आई असूनही फक्त स्वतःचाच विचार केला,या मुलांनी आपल्याला दुःखातून बाहेर काढण्यासाठी किती प्रयत्न केले होते ते आपण विसरलो…अन् आपण का आयुष्य संपवत आहोत याचे खरे कारण आपण चिठ्ठीत का लिहिले नाही याचा त्यांना या घडीला खूप पश्चात्ताप झाला.

किमान ते कारण लिहिले असते तर या मुलांना बाकीच्यांच्या नजरेतील प्रश्नचिन्हांची उत्तरे शोधण्यासाठी इतके कासावीस व्हावे लागले नसते.
आपला एक अविचार या घरातील सर्वांच्या आयुष्यावर उमटलेला ओरखडा आहे जो कधीच अन् कशानेही पुसला जाणार नाही अन् त्यामुळेच आता आपल्याला मुक्ती ही नाही अन् आपल्या आत्म्याचा पुढचा प्रवास ही इथेच या घराभोवतीच फक्त घोटाळण्यापुरता आहे, हे सुमतीबाईंच्या आत्म्याने जाणले आणि शांतपणे हाॅलमधील पंख्याच्या एका पात्यावर बसून वृंदा मनिषाच्या पानात काय वाढतेय हे पाहण्यात तो आत्मा गढून गेला.

आपल्या चुकीमुळे घरातील सर्वांना आयुष्यभर ज्या क्लेशांना पदोपदी सामोरे जावे लागणार आहे ते पाहून जिवंत नसतानाही आपल्या आत्म्याला जे भोगावे लागणार आहे त्यापेक्षा विरहाचे आयुष्य जगलो असतो तर बरे झाले असते असे वाटून त्यांचा आत्मा चालणाऱ्या पंख्यासोबत भिरभिरु लागला.
इति हेमा उवाच.
©® सौ. हेमा पाटील.
सदर कथा लेखिका सौ. हेमा पाटील यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
ही कथाही अवश्य वाचा
लक्ष्य
तू सुखकर्ता
योगा





Leave a Comment

error: Content is protected !!