आम्ही दोघी जावा नाही तर बहिणी- बहिणी

©®सौ.दिपमाला अहिरे
निशा आणि रुपाली दोघी जिवाभावाच्या जावा.
रुपाली मोठी जेठाणी तर निशा लहानी म्हणजे दिरानी. दोघींना एकत्र बघितल्यावर कुणीही त्यांना जावा जावा नाही तर बहिणी बहिणी समजत असत.
दोघींमध्ये खूप प्रेम,आदर होते. निशा आपल्या जेठाणीला तोंड भरून रुपा ताई, रुपा ताई करत असे, तर जेठाणीही निशाला प्रत्येक गोष्टीत अगदी विश्वासाने सांगत असे.
मी आहे ना तु काळजी करू नकोस अगदी दोन बहिणींप्रमाणेच.

कधी कधी तर काही वेळा दोन बहिणींचे ही काही कारणाने थोड्याफार प्रमाणात लुटपुटीचे का होईना पण भांडण होतांना दिसते. पण रुपाली आणि निशा मध्ये तर त्या छोट्याश्या वादालाही जागा नव्हती.
बरं काहिंना प्रश्न पडतो की, अशा दिरान्या जेठाण्या तर पहायला मिळतच नाही मग या दोघींमध्ये एवढी समजदारी कशी ? तर यांच्या या समजुतदारणाने वागण्याचे पूर्ण श्रेय त्यांच्या आदरणीय सासुबाईंनाच द्यावे लागेल.
कमलताई रुपा आणि निशाच्या सासुबाई. 

मोठ्या मुलाचे लग्न करून रुपा जेव्हा सून म्हणुन घरात आली तेव्हा कमलताई तेवढ्या खुश नव्हत्या. कारण त्यांना आपल्या मुलासाठी आपली भाची सून करून घ्यायची होती. पण रुपा ही त्यांच्या मुलाची अवीची पसंत होती.
अवी आणि त्याचे वडील दोघांनीही रुपाला पसंत केल्यामुळे कमलताईंना जास्त काही बोलता आले नव्हते.
अवी बॅंकेत चांगल्या पदावर कार्यरत होता. म्हनून‌ त्याच्यासाठी आपली मोठ्या भावाची शिक्षीका असलेली मुलगी करावी अशी कमलताईंची इच्छा होती.
पण अवीला जेमतेम बारावी शिकलेली रुपाली आवडली होती. त्यामुळे कमलताईंकडे लग्नाला होकार देण्याशिवाय पर्याय नव्हता.

रुपा कमी शिकलेली असली तरी दिसायला खुप सुंदर होती. सुशील आणि संस्कारी ही होती.
घरातील प्रत्येक कामात हुशार होती. त्याशिवाय तिचा स्वभावही गोड होता. मोठ्या परीवारातील असल्याने कुटुंबाला जोडुन ठेवणे, सर्वांची मनं जपणे या गोष्टींची तिला लहान पणापासूनच सवय होती.
आपल्या स्वभावाने लवकरच तीने सासरे, दिर, नणंद सर्वांची मने जिंकली होती. नाव ठेवण्यासारखे किंवा कमी काढण्यासारखे रुपा मध्ये काहीच नव्हते. पण तरीही कमलताई तिला मनापासून स्वीकारायला तयार नव्हत्या.

रुपा आपल्या परीने सर्व प्रयत्न करत होती. सासूच्या मनात जागा मिळविण्यासाठी. पण कमलताई रुपाचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नसत. पदोपदी तिच्या कमी शिक्षणाची गोष्ट पुढे करुन तिचा पाण उतारा करत असत.
एका वर्षानंतर अवी आणि रुपाला एक गोंडस मुलगी झाली.
घरातले सर्वच खुश होते. पण कमलताई “पहिली मुलगीच झाली तुला.” म्हणून सारख्या रुपाला टोचुन टोचुन बोलु लागल्या.
अवी नंतर दोन वर्षांतच कमलताईंचा लहान मुलगा शाम चे लग्न जमले.

यावेळी मात्र कमलताईंने कुणाचेही न ऐकता शामसाठी आपली भाची निशाच सुन म्हणुन केली होती.
रुपा आपल्या घरात लहानी जाऊ येणार या विचारानेच खूप आनंदात होती.
निशाचा गृहप्रवेश तीने अगदी धुमधडाक्यात केला होता आणि तेव्हाच तीने नीशाला सांगितले होते,” निशा तुझा गृहप्रवेश झाला की,तुला घरातले सर्व जण काही ना काही भेट देतील, पण मी नाही देणार. कारण मी तुला फक्त शब्द देईल. या घरात तुला कधीही कुठल्या ही गोष्टींचा त्रास होणार नाही आणि काहीही अडचण असली तर तू मला सांगु शकतेस, मला तुझी जाऊ नाही तर बहीण समज एवढंच सांगेल मी तुला.”

कमलताई मध्येच बोलल्या ” नीशाला या घरात त्रास होईल हे सांगणारी तु कोण? अजुन मी जिवंत आहे तिची आत्या, आणि हे निशाचं सासर नाही माहेर आहे, तीला पटेल तशी ती राहील.
तू तिला काहीही सांगण्याची गरज नाही. तेवढी ती हुशार आहे, शिक्षीका आहे, तुझ्या सारखी बारावी शिकलेली नाही.”
नेहमी प्रमाणे रुपाने यावेळी ही सासुच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. निशाला मात्र कमलताईंचे बोलणे पटले नाही.
रुपा जेवढी आपलेपणाने वागत होती, तेवढयाच कमलताई तिरसटासारख्या वागत होत्या हे तिच्या लक्षात येत होते.

कमलताईंनी आता घरात नवीन राजकारण खेळायला सुरुवात केली. निशा समोर रुपाला कमी लेखायचे आणि या गोष्टी चे वाईट वाटुन रुपा त्यांना काहीतरी बोलेल. शिवाय या तुलनेमुळे निशा आणि रुपात वाद होतील आणि घरातील वातावरण खराब करण्यात रुपाचा कसा हात आहे हे दाखवण्यात कमलताई यशस्वी होतील, असे त्यांना वाटत होते.
निशाचे कान रुपा विरुद्ध सतत भरायचे काम कमलताईंने सुरू केले.
” निशा तु शाळेत निघुन गेल्यावर रुपा सारखी बडबड करत असते, लहान असुन पण कामात काही मदत करत नाही. नौकरी करते म्हणून काय झालं? सकाळी तयार होऊन मस्त चालली जाते ,मी एकटीनेच मर मर करायची का? निशा पण या घरची सुन आहे, आणि ती पण लहान,जरा आपली जबाबदारी पार पाडायला नको का तिला?”

या वरुन निशाच्या मनात रुपा विषयी अढी निर्माण झाली. तिला वाटलेही की, जाऊन या विषयी रुपाशी बोलावे. पण तिने रुपाशी बोलणेच बंद करून टाकले होते.
हे रुपाच्या ही लक्षात आले होते, या सगळ्याच्या मागे सासुबाईंचाच हात असेल.
पण निशाला तसे सांगणे योग्य नाही हे तिला माहित होते. निशाला समजावणे ही गरजेचे होते.
रवीवारी सुट्टीचे औचित्य साधून रुपाने आज निशाच्या आवडीचा मुग दाळीचा हलवा बनवला व गरमागरम हलवा घेऊन ती नीशाच्या खोलीत गेली.

नीशा पेपर वाचत होती.
रुपाला प्लेट आणतांना पाहुन लगेच ती ऊठुन म्हणाली, ” ताई मी येतच होती. आत्ताच आवरलं माझं, चहा नाश्ता बनवायला तुम्हांला मदत करण्यासाठी कीचन मध्येच येत होती, पण तुम्ही तर नाश्ताच घेऊन आलात?”
रुपा तीच्या हातात प्लेट देत म्हणते ” अगं असु दे आठवडाभर धावपळ असते तुझी, रविवारच तर जरा निवांत मिळतो ना आराम करायला? हलवा गरम आहे तेवढ्यात खावुन घे. गार झाला की तुला आवडत नाही ना मग?”

“ताई तुम्ही मला किती चांगल्या ओळखतात.पण मी मात्र तुमच्या विषयी गैरसमज करून बसले होते, आणि तुमच्याशी बोलणेही सोडले होते. कीती चुकीची होती मी आत्ता समजलं मला, माफ करा ताई मला.”
रूपा निशाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाली, ” तुला मी आधीही सांगितले होते आणि आजही सांगते तुला काहीही अडचण असेल, माझ्या विषयी राग असेल तु माझ्याशी सर्व काही बोलु शकतेस, आपल्या मोठ्या बहिणीप्रमाणे.मला बहीण नाही तु या घरात आली तेव्हा माझी लहान बहीण आली असंच मला वाटलं.

मी तुला कधीही दीरानी मानलं नाही तर बहिणचं मानलं आहे. पण तरीही माझ्या वागण्या, बोलण्यातून तू दुखावली गेली असशील तर मी तुझी माफी मागते. पण तू माझ्याशी सर्व गोष्टी बोलत जा, बोलण्याने प्रश्न लवकर सुटतात.अबोला धरल्याने नाती तुटतात आणि आपल्याला ते होऊ द्यायचे नाही.”
रुपाचा कमालीचा समजदार पणा पाहुन निशाला आश्चर्य वाटले. ती आपल्या पतीशी शाम शी जेव्हा या सगळ्या विषयी बोलली तेव्हा तीला समजले की सासूबाईंना आधीपासूनच रुपा आवडत नाही, म्हणून त्या तिच्या विषयी असे बोलतात आणि वागतात.

आता मात्र निशाला समजुन चुकले होते. सासूबाई फक्त रुपाला कमी लेखण्यासाठी तिचे कान भरत होत्या.
निशा त्यांच्या वागण्या बोलण्या कडे दुर्लक्ष करून आता रुपाशी चांगले वागत होती.
दोघींच्या समजूतदारपणामुळे घरातील वातावरण खेळीमेळीचे असायचे.
रुपा आपली घरातील जबाबदारी पहिल्या सारखीच पार पाडत असे. निशाही आपले काम सांभाळून जेवढं होईल तेवढी मदत रुपाला करत असे, कुठलेही हेवेदावे नव्हते,की,रुसवे फुगवे नव्हते.

कमलताई रुपाला विनाकारण काही बोलल्या तर निशा रुपाच्या बाजुने बोलत असे. अशाप्रकारे जसजशी वर्ष सरत होती तसतसे दोघींचे नाते अधिक समृद्ध होत होते.
मानाने मोठी आहे म्हणून अडून न बसता रुपाच्या समजुतदारपणे घेतलेल्या एका माघारीमुळे दोन्ही जावा जावा बहिणी बनल्या होत्या.
©®सौ.दिपमाला अहिरे
सदर कथा लेखिका सौ.दिपमाला अहिरे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
ही कथाही अवश्य वाचा
पश्चाताप
तू सुखकर्ता
योगा

Leave a Comment

error: Content is protected !!