सुख

©️®️सायली जोशी
घरात एखादे छानसे कुत्र्याचे पिल्लू आणायचे म्हणून कपिल चार दिवस झाले आई-बाबांची मन धरणी करत होता. जितका नकार, तितकी त्याची कुत्र्याचे पिल्लू आणायची इच्छा तीव्र होत होती. “आई आणूया ना..” कपिल कधी नव्हे तर सकाळी लवकर उठून स्वयंपाक घरात येत म्हणाला.
“नको म्हंटल ना. त्याचं खाणं -पिणं कोण बघणार? तू कॉलेजला निघून गेलास की दिवसभर येत नाहीस आणि मला त्याचं करायला काही जमायचं नाही.” आई रागाने म्हणाली.
“बाबा, तुम्ही तरी हो म्हणा.” कपिल बाबांकडे वळून म्हणाला.

“आता आणखी हट्ट केलास, तर खेटरं खावी लागतील.” बाबा वर्तमानपत्राची घडी करत नेहमीच्या सवयीप्रमाणे म्हणाले.
“म्हणजे खेटरं खाल्ल्यावर आणलं तर चालेल ना?” कपिल हसत म्हणाला आणि हातात असलेल्या वर्तमानपत्राची गुंडाळी बाबांनी त्याच्या पाठीत मारली.
“असं काय करता? आजवर तुम्ही म्हणाल ते सगळं केलं. अगदी इंजीनियरिंगला सुद्धा गेलो.”
“इंजिनियर होणं ही आपल्या घरची परंपरा आहे आणि असले हट्ट करण्यापेक्षा दरवर्षी केवळ सत्तावंन टक्क्यांनी पास होण्याऐवजी अजून तीन- चार टक्के वाढवता आले तर बघा.” बाबा.

आता बोलण्यात काहीच अर्थ नाही असे समजून कपिल आजोबांच्या खोलीत आला.
“काय काम आहे रे?” त्याला आलेलं पाहून आजोबा थरथरत्या आवाजात म्हणाले. आधी माझा चष्मा शोधून दे आणि मग बोल.”
तसा कपिलने त्यांच्या डोक्यावर असलेल्या चष्मा डोळ्यावर ठेवला. त्यांची गादी नीटनेटकी करून दिली. औषधांच्या गोळ्याही व्यवस्थित ठेवून दिल्या.
“आबा, एक कुत्र्याचे पिल्लू आणूया ना. तुमचा मुलगा माझं काहीच ऐकत नाही.” कपिल वैतागून म्हणाला.
“तो नको म्हणतोय ना? मग नकोच.”आबा किंचित हसून म्हणाले.

“बाळा, त्याला आवरण्यासाठी कोणीतरी हवं घरात. आम्ही दोघं म्हातारे! तू कॉलेजला जाणार आणि तुझा बाबा ऑफिसला. आई एकटी कुठे कुठे बघणार? आणि माझा चष्मा कुठे असतो हे मला माहिती आहे. हे माझी गादी नेहमी नीटनेटकीच असते. पण आज अगदीच कंटाळा आला म्हणून आवरायची राहून गेली ती. तूच आमच्या खोलीत आठ दिवसांनी आला आहेस. मग तुझं लक्ष आहे का, ते बघण्यासाठी तुला काम सांगितलं मी.”
“आबा, धीस इज नॉट फेअर.” कपिल तणतण करत खोलीतून बाहेर पडला.
“ते प्राणी आणण्याऐवजी आम्हा म्हाताऱ्यांकडे  थोडंसं लक्ष दिलं तर बरं होईल.” जाता जाता आबांचे शब्द त्याच्या कानावर पडले.

“आता निदान आजी तरी हो म्हणेल, या आशेने कपिल परसदारी आला. आजी कधी नव्हे ते बांबावर पाणी तापवत होती.
“आजी, कुत्र्याचे पिल्लू आणूया?”
“अजून आहेच का? काय ठेवलं आहे त्या पिल्लांत! सगळे नाही म्हणाले ना?”
“हो.” कपिल चेहरा पाडून म्हणाला.
“मग नाहीच आणायचं.” आजी नाही या शब्दावर जोर देत म्हणाली.
“अगं तू तरी हो म्हण.” कपिलने गरम पाण्याने भरलेली बादली उचलली आणि ती आत घेऊन जाऊ लागला.

“अरे, थांब. ती बादली कुठे घेऊन जातोस?” आजी मागे मागे येत म्हणाली.
पण काही न ऐकता कपिलने ती बादली आजी – आजोबांच्या खोलीत आणून न्हाणीघरात नेऊन ठेवली.
“तरी मी सांगते, ही बादली तुझ्या बाबाला हवी आहे. पण हा मुलगा ऐकलं तर शप्पथ! आता बाबाला म्हणाव, इथेच आंघोळ करून घे.” बोलता बोलता आजी पुन्हा परसदारी आली.
“कपिल, आता आजीच्या मागे काय आहे? आजी हो म्हणाली तरी आम्ही होकार देणार नाही.” आई आपल्या हातात तिचं स्वयंपाक घरातलं आवडतं आयुध, म्हणजेच लाटणं घेऊन बाहेर आली होती.

“जाऊ दे मला कोणाशीच बोलायचं नाही. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे केली तरी, तुम्हाला माझ्या मनात काय आहे हे कधीच कळत नाही.” कपिल रागारागाने आवरायला गेला.
“त्याऐवजी घरात चार माणसं आहेत, त्यांच्याशी मिळून -मिसळून वाग. संध्याकाळी आल्यानंतर आजोबांना फिरायला नेत जा. तसंही त्यांना दिवसभर नुसतं बसून कंटाळा येतो. बाबांची, आजीची छोटी -मोठी काम कर आणि कधीतरी आईचीही विचारपूस करत जा आणि तेवढंच आम्हाला बरं वाटेल.” आई कपिलच्या मागोमाग येत म्हणाली.

“बाहेर असल्यावर मित्रांची संगत आणि घरात आपली खोली, कधी सोडायची नाही. असं कोणत्या शास्त्रात लिहिलंय?” बोलता बोलता आई पुन्हा स्वयंपाक घरात आली.
आपल्या डोळ्यातलं पाणी लपवत ती पुन्हा कामाला लागली.
“आता तू कशाला रडतेस? त्याच्या बापाने त्याला इतकी वर्ष नुसता धाक दाखवला आणि शिस्त लावली. मी जे म्हणेन ते माझ्या लेकाने करायलाच हवं. आपल्या इच्छा -आकांक्षा सगळ्या त्याच्यावर लादल्या. आता त्याला जे हवे ते आणू दे.” आजी समजुतीने घेत म्हणाली. यावर काही न बोलता आई फक्त पोळ्या लाटत राहिली.

“मला डबा नको आहे. तसंही कॉलेजला कोणी डबा घेऊन जात नाही. मी मात्र आज्ञाधारक मुलगा! रोज आईच्या हातचा गरम गरम डबा नेतो. पण आजपासून मला डबा नको आहे. घरात परवानगी विचारली तरी कायम तुमचा नकार असतो. तुम्हा सर्वांना हे तरी कळायला हवं, हा मुलगा घरात परवानगी विचारल्याशिवाय काही करत नाही. पण कोणाला समजून घ्यायचं नाहीये. असो, मी निघतोय.” कपिल बाहेर पळाला.
“अरे, अन्नावर राग काढू नको. डबा घेऊन जा.” आजीने बाहेर येऊन त्याच्या सॅकमध्ये डबा जवळ जवळ कोंबलाच.
“पुरुषांनी हट्टी असावं, या घराण्याची रीतच आहे जणू.” आजी आपल्या जाणाऱ्या नातवाकडे नुसतीच पाहत राहिली.
————————–

“कपिल, घेतो आहेस ना पिल्लू?” मित्र त्याच्या खांद्यावर हात टाकत म्हणाला.
“नको. घरी कोणी तयार नाही. आई म्हणाली, मी दिवसभर इथे असतो. बाबाही घरी नसतात. त्याला सांभाळणार, खायला घालणार कोणीतरी हवं. तू सध्या त्याला तुझ्याकडेच ठेव. आई -बाबा माझ्याकडून कसलीही अपेक्षा करतात आणि मी मात्र नुसता हट्ट करत राहतो. आधी बाईकसाठी हट्ट केला आणि आता त्या पिल्लासाठी.” कपिल विचार करत म्हणाला.
संध्याकाळी कपिल नेहमीपेक्षा जरा लवकर घरी आला.
“आई, मी चहा घेऊन आलोय.” आत येताच त्याने जाहीर केले.

“आबा, चला फिरायला जाऊ.” कपिलने आबांचा चष्मा शोधून दिला. काठी त्यांच्या हातात आणून दिली आणि ही जोडीगोळी बऱ्याच दिवसानंतर फिरायला म्हणून बाहेर पडली.
तशा आई आणि आजी कौतुकाने या दोघांकडे पाहत राहिल्या.
घरी आल्यावर कपिलने आजीला मंदिरात नेऊन आणले. आईला थोडीफार मदत केली.
अचानक त्याच्यात झालेला हा बदल पाहून रात्री जेवणाच्या संगतीला सारेजण त्याचे कौतुक करू लागले.

“मी हे सगळं त्या कुत्र्याच्या पिल्लासाठी करत नाहीय. त्या विषयाला सध्या तरी मी होल्डवर ठेवलं आहे. सकाळी आई बोलली, ते मनाला लागलं. जाणवलं, आपल्या माणसांना आपला आधार तितकाच महत्त्वाचा असतो आणि बाबा, मी ते दोन-चार टक्के जास्त पाडायचा नक्की प्रयत्न करेन.” कपिल मान खाली घालून म्हणाला.
“चल.. इतका शहाणा होऊ नको. ते पिल्लू घरी घेऊन ये. आपण काहीतरी व्यवस्था करू.” बाबा जेवता जेवता म्हणाले.
“नको. नंतर केव्हातरी बघू.”

“अरे, मुलांनी हट्ट करायचा नाही तर कोणी करायचा? आजोबा आपली काठी आपटत म्हणाले. ” त्या पिल्लाला शहाण्यासारखं कसं वागायचं, याचा ट्रेनिंग देऊ आपण. मग झालं तर आणि तशी मलाही त्याचीसोबत होईल.”
“तुझ्या बाबाच्या धाकाने ते गप्प बसेल. हे मात्र खरं.” आजी हसत म्हणाली.
आईने आपल्या लेकाच्या डोक्यावरून हात फिरवला. “किती समजूतदार आहे माझं लेकरू!” आणि तिने बाबांकडे पाहून होकारार्थी मान हलवली.
“नको आई. मला नकोय ते पिल्लू वगैरे. ती माझी हौस होती. जेव्हा मी त्याची जबाबदारी स्वतः घेईन तेव्हाच त्याला घरी आणेन आणि हा माझा फायनल डिसिजन आहे.” कपिल शांतपणे म्हणाला. त्याच्या डोळ्यांत पाणी तरळत होतं.

बाबा समाधानाने हसले.
“माझा मुलगा इतका समजूतदार असेल असं वाटलं नव्हतं. मात्र हे बघून छान वाटलं. एका बापाला आणखी काय हवं असतं?” कधी नव्हे ते बाबांच्या डोळ्यात पाणी आलं.
“काय म्हणतात ते.. धीस इज नॉट फेअर. आधी लेकाला रडवायचं नंतर आपण डोळ्यातून पाणी काढायचं.” आजोबा हसत म्हणाले.
“काय रे, जमलं का तुझ्यासारखा बोलायला? चल ये.”आजोबांनी आपल्या नातवाला जवळ घेतलं आणि आपल्या लेकाकडे पाहून ते म्हणाले, “तुझा लेक मोठा होतो आहे. त्याच्याशी मित्रासारखा वाग. आता धाक दाखवायचं वय संपलं त्याचं.”

आज घरात सर्वांचे चेहरे आनंदी दिसत होते.
“पोटचा मुलगा समजूतदार असेल, तर घरच्या माणसांना फारशी काळजी करायचं कारण नसतं आणि यापेक्षा सुख ते कोणतं?” असे म्हणत बाबाही आपल्या वडिलांच्या जवळ आले अन् आई आणि आजी आपल्या कुटुंबाकडे कौतुकाने, समाधानाने पाहत राहिल्या.
समाप्त.
©️®️सायली जोशी.
सदर कथा लेखिका सायली जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
ह्या कथाही अवश्य वाचा
पश्चाताप
तू सुखकर्ता
योगा

Leave a Comment

error: Content is protected !!