सामाजिक मानसिकतेला उत्तर

©®सौ. दिपमाला अहिरे.
‘माझ्या मुलीच माझे हात बनल्या, खरोखर माझ्या मुलींनी मला कधीही मुलाची उणीव भासू दिली नाही. मला माझ्या मुलींचा सार्थ अभिमान आहे.’ आपल्या मुलींचे किती कौतुक करावे असे गजाननरावांना झाले होते.
त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू येत होते.
आणि आपसूकच त्यांच्या डोळ्यासमोर दोन वर्षांपूर्वीचा प्रसंग उभा राहिला.
जेव्हा कंपनीत मशीनवर काम करतांना अचानक मशीनमध्ये काहीतरी बिघाड झाला आणि काही कळायच्या आतच गजानन रावांचे दोन्ही हात त्याच्यात अडकले.

दवाखान्यात जो खर्च लागला त्या साठी राहते घर गहाण ठेवावे लागले.
गजाननरावांनी आपले दोन्ही हात गमावले होते. ‘आता आयुष्य जगायचे कसे?’ हा यक्षप्रश्न त्यांच्या समोर उभा होता.
कारण ते घरातला कर्ता पुरुष आणि एकटेच कमावणारे होते.
गजाननरावांना तीन मुली. तिघीही मुली लग्नाला आलेल्या.
त्यातल्या मोठ्या नंदाचे एक महिन्यापूर्वीच लग्न ठरले होते आणि येत्या दोन महिन्यांत लग्नाचा मुहूर्त होता. दोन नंबरची मुलगी सीमा घरीच शिलाई काम करायची तर लहानी अंजु आता बी.ए. च्या शेवटच्या वर्षाला होती.

दोन्ही मोठ्या बहिणींपेक्षा अंजुला जरा जास्तच शिकायला मिळाले. हे तिचे नशीबच म्हणावे लागेल.
कारण गजाननरावांची परिस्थिती बेताची म्हणून मोठ्या मुलींना जेमतेम बारावीच्या वर्गापर्यंतच शिक्षण मिळाले.
लहानी अभ्यासात थोडी हुशार निघाली म्हणून तिला पुढे शिकायला मिळाले.
त्यात मुलींची आई, शोभाताई, जरा जुन्या विचारांची.
तिघीही मुली झाल्या म्हणून नातेवाईकांकडून नेहमीच तिला काही बाहि ऐकावे लागायचे.

कदाचित त्यामुळेच त्या सतत चिडचिड करत असायच्या. “मुलींना शिकवून काय मिळणार? सासरीच जाणार आहेत. भाकरी तर थापायच्या आहेत शेवटी ! त्यांच्या शिक्षणाला पैसा लावण्यापेक्षा दोन पैसे जमवून ठेवावेत. ते त्यांच्या लग्नात कामी येतील.
वाचण्या लिहण्या पुरत्या दोन इयत्ता शिकल्या तरी पुरे आहेत आपल्या साठी” अशी सारखी त्यांची आपले पती गजाननरावांच्या मागे भुणभुण चालत असे!!

पण ते मात्र नेहमीच सांगत “असे नाही शोभा, मुलींना आपण चांगले शिक्षण दिले तर त्याही नोकरी करुन आपले दिवस बदलू शकतात, मुलगा मुलगी असा भेद करण्यापेक्षा आपल्या मुलींनाच आपण मुलं समजू या” पण शोभा ताई ने कधीही त्यांच्या बोलणे ऐकले नाही. त्या दोन्ही मोठ्या मुलींचे बारावी नंतर लगेच लग्नाचे पाहू लागल्या. 

नंदासाठी चांगले स्थळ सांगून आले आणि लगेचच शोभाताई ने लग्न उरकून घ्यायचे ठरवले. पण पुढे काय मांडून ठेवले आहे याची कल्पनाच नव्हती त्यांना.
गजानन रावांचे दोन्ही हात गेले. आता पुढे काय?? घरातील सर्वांपुढेच सर्वत्र अंधार दिसत होता.
आता शोभाताई जास्तच चिडचिड करु लागल्या. काम नाही, खाणार काय? तिन तिन मुली उजवायच्या कशा? नंदाच्या लग्नाचे आता काय होणार. तिघी पैकी एखादा तरी मुलगा देवाने दिला असता तर आज त्याने घराला हातभार तरी लावला असता.

गजानन रावही मुलींचे लग्न कसे होणार? अजुन बऱ्याच पैशांची सोय करायची राहिली आहे! नंदा चे लग्न मोडणार तर नाही ना ! या चिंतेने रात्र रात्र जागून काढायचे आणि ज्या गोष्टीची भिती होती तेच झाले.
दुसऱ्या दिवशी नंदाचे सासर कडची मंडळी आली. घरात सर्वांना बरे वाटले. आपल्या दुःखात जणू आपली माणसं आपल्या सोबत आहेत असे वाटले.
पण निघाले काही वेगळेच. नंदाच्या होणाऱ्या नवऱ्याने सरळ सरळ गजानन रावांना प्रश्न विचारला तुम्ही तर “आता तर तुम्ही काम करु शकत नाही, मग लग्न कसे पार पाडणार,लग्नात लागणारा खर्च,मानपानाचा खर्च सर्व कसं करणार तुम्ही?? दुसरे कुणी कमावते माणुसही नाही तुमच्या घरात. म्हणून आम्ही विचार केला आहे की, हे लग्न इथेच मोडलेले बरे.”

हे ऐकुन शोभाताई मुलाच्या आई समोर हातपाय जोडु लागल्या . “असे नका करू, माझ्या अजुन दोन पोरी आहेत. त्यांची लग्न कशी होतील??”
हे सर्व पाहुन नंदाला खुप वाईट वाटत होते.
गजानन राव मुलाला समजावू लागले, “आम्ही आमच्या परीने लग्न व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करु,”
त्यावर मुलाने उत्तर दिले, “दोन्ही हात गेले तुमचे , काय करणार तुम्ही??”
हे ऐकून इतक्या वेळ सर्व शांतपणे ऐकणारी नंदा आता मधे पडली.

ती म्हणाली, “माझ्या वडिलांना काही ही बोलू शकत नाही तुम्ही. आणि तुम्ही काय हे लग्न मोडणार मीच मोडते हे लग्न आता. कारण वाईट परिस्थितीत आपल्या सोयऱ्यांच्या मदतीला उभे न राहता त्यांना नावं ठेवणाऱ्या लोकांशी आम्हांलाच सोयरीक करायची नाही.”
आईने नंदाला खुप सुनावलं, “समाजात तोंड दाखवायला जागा उरली नाही ठरलेले लग्न मोडले म्हणून आता काय होणार?”
तेव्हा नंदाने आईला विश्वास देऊन सांगितले, “आई तू चिंता नको करू. आपण सर्व मिळून सर्व काही ठीक करु, घाबरु नकोस तू.”
तिघीही बहिणींनी मिळून आता वडिलांना आधार देण्याचा निश्चय केला.

दोन नंबरची सीमा आधीच घरा पुरते शिलाई काम करत होती. आता तिने पुढे तिचे काम वाढवले.
बाहेरचे ब्लाऊज, ड्रेसेस शिवून द्यायचची कामं ती घेऊ लागली.
नंदा विचारात होती कि, आपण काय काम करु शकतो?
तेव्हा लहान्या अनु ने तिला सांगितले, “माझ्या काही मैत्रिणी आहेत त्या शिक्षणासाठी ईथे रुम करून राहतात. त्यांना जेवणाचे डबे लागणार आहेत, ताई तू छान स्वयंपाक करतेस. त्यांची डब्यांची ऑर्डर आपण घेऊयात.”
तिघीही बहिणी आपल्या घराला कशा पद्धतीने मदत करता येईल फक्त याचाच विचार करत होत्या.

अंजु आपले कॉलेज आणि अभ्यास सांभाळून घरी काही मुलांची शिकवणी घेत असे.
हळूहळू डब्याच्या ऑर्डस वाढू लागल्या होत्या. नंदा आणि आई दोघी मिळून वेळेत डबे बनवून देत असत.
नंदाला रोज बाजारात जाऊन भाजी आणून, डबे बनवून वेळेत सर्वांना पोहचते करावे लागत असत.
तिच्या हाताला चव होती म्हणून इतरही लोकांनी तिच्या कडे डबे लावले होते.
सीमा आणि अंजु आपापल्या कामात व्यस्त, आईला बाबांकडे लक्ष द्यावे लागत असल्याने नंदाला डब्यांचे काम एकटीनेच सर्व करावे लागत.

गजानन रावांना आपल्या मुलींचे कौतुक वाटत होते पण स्वतःला ते हतबल ही समजत होते.
अशातच गावा कडून काही लोकं गजानन रावांना बघायला म्हणून आले.
तर ते गजाननरावांना सांगू लागले की, “गजा, तुझ्या नंदा ने स्वतः लग्न मोडले ही बातमी आपल्या गावी ही समजली आहे. आणि आता काय तर स्वतः डबे घेऊन सायकल वर ही सर्व गावभर फिरत असते लोकांच्या घरी, आफिसात डबे वाटत फिरते अशाने गावात, समाजात तिला लोकं नावं ठेऊन राहिलेत.
लग्नाचं वय गेलं तर कोण करणार हिच्याशी लग्न आणि पोरींच्या जातीला शोभतं का असं घरोघरी भटकणं??”

यावर लहान्या अंजुने आपल्या काकाला चांगले च उत्तर दिले.
“ताईच्या लग्नाला खर्च लागणार होता तो तुम्ही करणार होतात का काका?? आमचे घर गहाण आहे, सोडवायला लाखो रुपये लागणार आहेत. द्याल का ते तुम्ही? बरं हे सर्व सोडा, पण तुमच्या मोठ्या भावाला एवढा मोठा अपघात झाला तर तुम्ही हजार पाचशे रुपयांची तरी मदत केली का? आणि आंम्हाला नावं ठेवायला इतक्या लांबून गावाहून पैसे खर्च करून आलात. हे किती योग्य वाटते तुम्हाला?” हे ऐकून मात्र काका आल्या पावली परत गेले.
पोरींनी हिंमत करून, मेहनत करून दोन वर्षांतच आपले गहाण घर ही सोडवून घेतले आणि काही पैसे शोभाताई ने पोरींसाठी जमा ही ठेवले.

आज दोन वर्षांनी आपले घर मुलींने सोडवले म्हणून गजानन राव शोभाताईला मोठ्या अभिमानाने सांगत होते, “बघ मी म्हटले होते ना ! आपल्या मुली मुलांपेक्षा कमी नाहीत, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले.”
नंदाला आईची चिंता समजत होती म्हणून ती आईला म्हणाली, “आई तू ज्या नातलगांचा, समाजाचा विचार करते ना ते आपल्या मदतीला कधीही येत नाहीत. ते फक्त नावं ठेवायला, उणीवा काढायला बसलेले असतात. शेवटी आपल्या अडचणी आपल्यालाच निस्तराव्या लागतात. आपलं ओझं दुसरं कुणीही वाहत नाही. मग का त्यांना घाबरायचे आपण ?

आत्ता पर्यंत सर्व ठिक झाले. यापुढेही सर्व व्यवस्थित होईल बघ , तुला आमच्या लग्नाची चिंता आहे ना? ती ही होतीलच की, पण लोकं बोलायला लागले की, घाबरून न जाता त्यांना खंबीर पणे सांगायचे, तुम्ही जर काही मदत नाही करु शकत ना?? तर मग नावही ठेवायचा तुम्हाला अधिकार नाही.”
अशा पद्धतीने गजानन रावांच्या तिन्ही मुलींने लोकांना त्यांची जागाही दाखवली आणि मुली या मुलांपेक्षा जास्त हुशार आणि लायक असतात हे सिद्ध करुन समाजाच्या बुरसटलेल्या विचारांच्या मानसिकतेलाही चोख उत्तर दिले.
©®सौ. दिपमाला अहिरे.
सदर कथा लेखिका सौ.दिपमाला अहिरे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
पश्चाताप
सुख

Leave a Comment

error: Content is protected !!