साकव

©® मृणाल शामराज
“वसुधाई.. वसुधाई..” हाकांचा भडीमार चालला होता. वसुधा लगबगीने हॉल मधे गेली.
सोहा नी सगळं पसरून ठेवलं होतं. सगळीकडे कागद, रंग, ब्रश.. त्याच्या मधे रमलेली सोहा.
“काय ग, किती हाका मारतेस !”
“वसुधाई, अगं हा रंग इथे कसा दिसेल..सांग ना मला..”
वसुधा कौतुकानं तिच्याकडे बघत हॊती.
दहा वर्षाची ही आपली नात.. किती मोठी दिसतेय, पण अजून बालिशपणा काही जातं नाही.
“वसुधाई.. बघ आता.”
“खूपच छान बाळा.”

तिला कौतुक वाटलं. किती सुंदर रंगासंगती साधलीय हिने, अगदी आपल्यावर गेली आहे. ती तिच्या जवळ बसली. तिच्या चेहऱ्यावर आलेल्या बटा सावरत ती म्हणाली..
“बाळा, मोठी झालीस आता. नीट बसावं.”
“हॆ ग काय, अजून तर एवढीशीचं आहे मी, आई नाही का मला बच्चा म्हणत.”
“कसं सांगू तुला? जा, तोंड धु. रंग लागलाय चेहऱ्याला. आई बाबा येतीलच आता ऑफिस मधुन.”
तिला आवरायला पाठवून वसुधा स्वयंपाकघरात गेली.

सगळं टेबलवर मांडेपर्यंत आशु आणि मेधा आले.
“चला रे, दमला असाल. चहा करू का?”
“मला वाटतं आपण आता जेवणचं करू या.” मेधानी आशुकडे सहेतुक पाहिलं. काही न बोलता ती आत निघून गेली.
आशु पण न बोलताच तिच्या मागे गेला.
नेहमी खेळीमेळीत होणारी जेवण आज चुपचाप झाली. काहीतरी बिनसलंय, ह्याची जाणीव वसुधाला झाली.
मागचं आवरून सगळे हॉल मधे आले.
T. V. चालू होता पण कुणाचंच लक्ष तिकडे नव्हतं.

शेवटी वसुधाच म्हणाली..”अगं, पडदे इस्त्रीला दिलेत.किराण्याची ऑर्डर दिलीय. फ़राळ काय करायचा, काय ऑर्डर करायचा लिहून ठेवलंय. मला वाटतं या वर्षी नवीन आकाशकंदील आणावा.”
“आई..” आशु म्हणाला. त्यांना त्याचा आवाज काहीसा खरखरीत वाटला.
“आई.. अगं सगळं तु केलंस तर मेधा काय करणार? झाली आमच्या लग्नाला बारा वर्ष. आता तरी तिचा संसार तिला करू दे.”
मेधाकडे बघत तो म्हणाला.
एक क्षण वसुधा स्तब्ध झाली. तिनं मेधा कडे बघितलं. मेधानी तिची नजर चुकवली.

दोन मिनटं विचार करून वसुधा म्हणाली, “चुकलंच माझं..”
“आई, असं नाही हो..” मेधा म्हणाली.
वसुधा काही न बोलता तिच्या खोलीत गेली.
“आजी.. गाणं म्हण ना.”
सोहाला कुशीत घेतं वसुधा म्हणाली, “बाळा, माझं डोकं दुखतय ग. झोपशील का तु?”
“काय झालं ग तुला.. तुझे डोळे ओले का आहेत?”

“कचरा गेला बाळा डोळ्यात.. झोप तु.” तिला थोपटत असताना सोहा झोपून गेली.
वसुधा जुन्या आठवणीत रमली.
लग्न होऊन मोहनच्या घरी आली. काही तरी करायचा ध्यास काही तिला स्वस्त बसू देईना. सासूबाई जुन्या वळणाच्या. तिनं नोकरी करणं काही त्यांना मान्य नव्हतं. पण तिची तळमळ मोहनच्या लक्षात आली.
त्याच्या परवानगीने तिनं शाळेत नोकरीं धरली.
सासूबाईंनी जणू काही मदत न करायची शपथच घेतली हॊती.

घरचं सगळं करायचं, छोटया आशुचं आटपायचं. त्याला आपल्याबरोबर शाळेत सोडायचं . घरी येऊन परत सगळी काम.
काही राहिलं, चुकलं तर सासूबाईच तोंड सुरु.
त्यात आशु किरकिरा. सतत छोटं, मोठं दुखणं सुरु. घरात येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता.
वसुधा कधीकधी खूप वैतागून जायची. तिनं ठरवलं आपल्याला झाला तो झाला आपल्या सुनेला आपण त्रास होऊ द्यायचा नाही.
दिवस भरभर पुढे सरकले. सासूबाई तर केव्हाच गेल्या.
शुल्लक आजाराचं निमित्त होऊन मोहनही साथ सोडून गेला.

आशुच लग्न झालं. मेधा सुन म्हणून घरी आली. एवढी शिकलेली, उच्चपदस्थ असलेली आपली सुन बघून वसुधा धन्य झाली. आपल्याला झाला तसा त्रास तिला होऊ नये म्हणून वसुधा जास्तीत जास्त काम करत हॊती. तिला जाणवत होतं. आपलंही वय वाढतंय. पाठ दुखतेय. होतं नाही आता पूर्वीसारखं. पण ती ओढून, ओढून सर्व करत हॊती.
आणि आज..
तिच्या डोळ्यातून अश्रू झरझर वाहू लागले.
रडून झाल्यावर तिला खूप मोकळं वाटलं. आता ती शांतपणे विचार करू लागली.

काय चुकलं तीच? स्वाभा्विक आहे. तिचा संसार आहे, तिला ही हौसमौज आहे. आपल्या नकळत आपण खूप जास्त त्यांच्या संसारात रमत होतो. तिनं मनाशी काहीतरी ठरवलं. आता तिला शांत झोप आली.
दुसऱ्या दिवशी रविवार होता.
मेधा बाहेर आली तर तिला काही चाहूल लागली नाही. म्हणून ती वसुधाच्या खोलीत डोकावली. तर ती तिथं नव्हती.
मेधानी चहा ठेवला तर latch उघडून वसुधा आत आली.

“आई, चहा देऊ ना?”
“हो, ग. घेईन मी. छान walk घेवून आले बघ.”
मेधानी हुश्श केलं. म्हणजे या रागावल्या नाही आहे तर.
तिघांनी गप्पा मारत चहा घेतला.
मेधा कप आत ठेवायला निघाली तर वसुधा म्हणाली.
“मेधा, थांब.थोडं बोलायचं होतं.”
मेधानी प्रश्नार्थक आशुकडे पाहिलं.

“आई.. “आशु म्हणाला.
“थांब जरा तु. मला मेधाशी बोलायचंय.”
“आई.. मी..”
“मेधा, घाबरू नकोस. अगं, मी तुला मुलीप्रमाणे समजते. मला कळलं नाही तर तु सांगायचंस. तुझी खूप ओढाताण होते, म्हणून तुला मदत करायचा माझा प्रांजळ हेतू होता. असू दे, मी रागवले नाही आहे. तु कर तुला हवं तसं. माझी काही मदत लागली तर अवश्य सांग.”
“म्हणजे आई, तुम्ही रागावला नाहीत?”

“नाही ग, आपल्या माणसांवर कुणी रागवतं का?”
‘हो आई, अजून एक सांगायचंय. सोहाला, आता शाळा सुटल्यावर ऍक्टिव्हिटी कलासला घालणार आहे. तीच drawing चांगलं आहे. ते तिकडे करून घेतील. मग music शिकेल. मग प्लेग्राऊंड. तिला घरी यायला संध्यकाळ होईल.”
“बरं. मी आणायला, सोडायला जायचंय का?”
“नाही, रिक्षा लावलीय.”
“बरं.”

दुसऱ्या दिवसापासून त्यांच शेड्युल सुरु झालं. वसुधा चालून येईपर्यंत मेधाची बरीच काम आटोपलेली असायची. वसुधाला वाटलं खरंच उगाचच आपण काळजी करत होतो. या आजच्या मुली सक्षम आहेत.
“आई, चहा..”
हो, चालेल असं म्हणत असतांना मेधाला वसुधाच्या डोळ्यात तिच्या बद्दल असणार कौतुक जाणवलं.
उगाचच आपण गैरसमज करून घेतला ह्यांच्याबद्दल. मेधाला क्षणभर वाटून गेलं.

“वसुधाई जावून येतें ग.. आल्यावर तुला काल काढलेल चित्र दाखवते.”
गडबडीने तिघेही निघून गेले.
वसुधानी फॅन लावला आणि ती सोफयावर रेलून बसली. आता ते रिकामं घरं तिला बेचैन करू लागलं.
तिनं नजर फिरवली. सगळं कसं नीट, नेटकं. आपण ठेवत होतो तसं. आता आपली गरज संपली. काय करायचं आता. दिवस कसा जायचा.
तिचा जीव कासावीस झाला. ती खोलीत गेली. टेबलवरच पुस्तकं घ्यावं म्हणून तिकडे गेली तर सोहाच रंगवलेलं चित्र तिथेच होतं. ते आकर्षक रंग तिला खुणावू लागले.

एकदम तिला काहीतरी आठवलं, म्हणून तिनं कपाट उघडलं. कोपऱ्यात ठेवलेलं एक गाठोडं बाहेर काढलं. ते उघडताच रंगीबेरंगी कापडाचे तुकडे बाहेर आले. तिला तिची आजी आठवली. दुपारी एकाला एक तुकडे जोडत गोधडी शिवणारी..
तिला खूप आनंद झाला. वेळ कसा घालवायचा याच उत्तर तिला सापडलं.
आता रोजची तिची दुपार रंगीत व्हायला लागली. दुपारी हॆ काम, संध्याकाळी सोहा बरोबर.. वेळ मजेत चालला.
मेधा, आणि आशु पण खूष.

एकदिवस फिरायला बाहेर पडली आणि मागून हाक आली.. “वसू..”
मला वसू म्हणणार कोण म्हणून मागे पाहिलं तर आशा.. तिची लाडकी बालमैत्रीण..
“आशा.. तु..”
“अगं, तु इथे राहतेस?”
“हो, ग. पण तु इथे कशी?”
“आठ दिवस झाले, आम्ही इथे राहायला आलो. चल, आता घरी.”
दोघी दिवसभर गप्पा मारत होत्या.

आता वसुधा अजूनच खूष झाली.
दोघी वारंवार भेटू लागल्या.
आशा मुळातच बडबडी, त्यामुळे तिचा जनसंपर्क भारी.
“अगं, किती सुंदर गोधडया करतेस तु !”
“हो, ग. पण करून, करून काय करणार? घरात सगळ्यांना करून झाल्या.”
“आज, दुपारी तयार रहा. वसू. आपल्याला बाहेर जायचंय.”

दुपारी त्या कॉटन विलेज मधे गेल्या.
“अगं, आशा, मला काही घायचं नाही ग. मेधा आणणार आहे.”
“चल ग आत तु.”
“या, आशाताई. आज कसं येणं केलेत?”
मग आशानी बरोबर आणलेली वसूची गोधडी दाखवली.
“खूप सुबक काम, आणि उत्तम रंगसंगती आहे. आम्हाला करून द्याल का?”
वसुधा आवाक होऊन आशाकडे बघत हॊती.

“सध्या डझन द्या. मग पुढची ऑर्डर देतो.”
“हो, देऊ ना. हो, ना वसू ? “
“आशा..”
आशानी तिला खुणेनी चुप बसवलं.
“हॆ हाताचं काम आहे, थोडा वेळ लागेल.”
“चालेल, आम्हाला घाई नाही. पण अवश्य दया.”
“नक्की. धन्यवाद.”

दोघी दुकानाच्या बाहेर आल्या.
“आशा.. मला जमेल का हॆ?”
“हो, तुझी जिद्द माहिती आहे मला वसू.”
आता वसुधा कामात रमली. सोहा पण मधुन मधुन आजी बरोबर काहीतरी करत बसे.
मेधाला ही बरं वाटलं आईंचा वेळ चांगला चाललाय.
सगळं सुरळीत चाललं होतं. अचानक मेधाचं प्रमोशन झालं.

कामाचा ताण वाढला. आता तिला सगळं घरंच करून जाणं जड जावू लागलं. वसुधा सगळं पाहात हॊती. तिचा जीव तिची घालमेल पाहून व्याकुळ होतं होता. पण ती शांत हॊती.
एक दिवस मेधा न राहून म्हणाली.. “आई, मला खूप होतंय. मला मदत कराल का?”
“हो ग, करीन ना.”
“आई..तुमचं काम.”
“असू दे, माझ्या परिवारापेक्षा ते महत्वाचे नाही. जमेल तसं करीन.”

“आई.. माझं.. “मेधाच्या डोळ्यात पाणी आलं.
“अगं, वेडी का तु..” तिला जवळ घेतं वसुधा म्हणाली.
आता उसवत चाललेले मायेच्या गोधडीचे तुकडे परत सांधले जातं होते, समजुतीच्या घट्ट धाग्याने…
समाप्त
©® मृणाल शामराज
सदर कथा लेखिका मृणाल शामराज यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
सामाजिक मानसिकतेला उत्तर
पश्चाताप
सुख
सातच्या आत

Leave a Comment

error: Content is protected !!