©® सौ. हेमा पाटील.
दारावरच्या बेलवर बोट ठेवतानाच सुमीतला माहीत होते की, बेल वाजताक्षणीच दार उघडले जाणार आहे आणि झाले ही तसेच! मानसीने सस्मित चेहर्याने दार उघडले.
सुमीत सोबत आलेल्या आईला पाहून तिचा चेहरा आनंदाने फुलला होता.
सुमीतने आईंची बॅग आत ठेवली व तो फ्रेश व्हायला गेला. बाहेर आल्यावर मानसीने चहाचा कप हातात आणून दिला. चहाचे घोट घेत घेत तो मानसीचा चिवचिवाट ऐकत होता.
आईच्या आगमनाने आनंदी झालेल्या मानसीला आईला काय सांगू आणि काय नको असे झाले होते. हे घर घेतले तेव्हा करोनाचा सर्वत्र हाहा:कार माजला होता. त्यामुळे अगदी घरच्या घरीच गृहप्रवेश केला होता.
त्यामुळे नवीन घर पहाण्यासाठी मानसीच्या आईला आणण्यासाठी तो सकाळी लवकरच मुंबईहून पुण्याला स्वतःच्या कारने गेला होता.
आईंना आणून सोडणे मानसला म्हणजे मानसीच्या भावाला जमणार नव्हते आणि या वयात त्यांना एकटीने प्रवास करायला लावणे सुमीतलाच मान्य नव्हते. त्यामुळे सकाळी लवकर जाऊन दुपारी आईंना घेऊन परत निघायचे असे ठरले होते.
त्याप्रमाणे आत्ता त्यांचे आगमन झाले होते. कोरोना काळात वयस्कर व्यक्तींनी बाहेर फिरणे धोकादायकच होते. त्यामुळे लेकीचे नवीन घर पहाण्याची उत्कंठा असूनही आईंनी संयम बाळगला होता.
नाही म्हणायला मानसीने घराचे विविध अॅंगलमधून काढलेले फोटो पाठवले होते. पण प्रत्यक्षात पहाणे व फोटो पहाणे यात खूप फरक आहे. तर आज तो दिवस उगवला होता.
सुमीतचे आईवडील त्याच्या बालपणीच देवाघरी गेले असल्याने आणि तो एकटाच असल्याने त्यांच्या कुटुंबात मानसीची आई ही एकमेव ज्येष्ठ व्यक्ती होती.
त्याने जेव्हा आईंची बॅग गाडीत टाकली, तेव्हा त्याला गाडीत अजून कुणीतरी आहे असा भास झाला. नकळतपणे त्याला आपण गेल्या वर्षी ब्रिटनला गेलो होतो तेव्हाची आठवण झाली. पण मनाशीच हसत तो ड्रायव्हिंग व्हीलवर बसला.
आईंना आरामात बसता यावे यासाठी त्याने त्यांना मागच्या सीटवर बसवले होते. पुढची सीट रिकामीच होती, पण आज का कुणास ठाऊक तिथे कुणाचे तरी अस्तित्व सुमीतला जाणवत होते.
आपण आज पहाटे लवकर उठून गेलो अन् झोप पूर्ण झाली नाही, त्यामुळे असे भास आपल्याला होत असावेत असा विचार करून त्याने ड्रायव्हिंग वर आपले पूर्ण लक्ष केंद्रित केले.
रात्री गोडाधोडाचे जेवण झाल्यावर सुमीतने हाॅलमध्ये सोफ्यावर आपली पथारी पसरली, कारण मायलेकींना गप्पा मारायला रात्रही पुरणार नाही हे नेहमीच्या अनुभवाने त्याला माहित होते.
मानसीने जवळच पाण्याची बाटली आणून ठेवली त्यावेळी त्याने तिचा हात धरला, पण ती लगेच आपला हात सोडवून घेत म्हणाली, “हे काय वेड्यासारखे! आई बघेल ना!”
त्यावर त्याने तिला आपल्याकडे ओढले व तो म्हणाला, “बघू देत ना मग! त्यात काय झाले? माझ्या प्रिय बायकोचाच तर हात धरलाय ना मी!”
हे ऐकून मानसी म्हणाली, “तुम्ही तर कधीच सुधारणार नाही” अन आपला हात सोडवून घेत ती हलकेच गालातल्या गालात हसत आत निघून गेली.
स्वतःशी हसतच त्याने टिव्ही सुरु केला व क्रिकेटची मॅच लावली. ती पहाण्यात तो इतका गुंगून गेला की, बेडरुममधील त्या दोघींची चाललेली बडबड त्याला ऐकू येईनाशी झाली.
तासाभराने डोळे मिटायला लागले, उठवेना…म्हणून त्याने रिमोटवरुनच टिव्ही बंद केला आणि तो झोपेच्या स्वाधीन झाला. गाढ झोपेत असताना अचानक त्याला जाग आली. कशाने जाग आली हे समजेना पण समोर पाहिले तर टिव्ही सुरु होता. त्याच्या मनात पहिला प्रश्न हा आला की, आपण टिव्ही बंद केला नव्हता की काय!
म्हणून त्याने रिमोट कुठे आहे ते पाहिले व हातात रिमोट घेतला. टिव्ही बंद करणार इतक्यात टिव्ही वर दिसणारे दृश्य पाहून तो अचंबित झाला. आपण तर क्रिकेटची मॅच पहात होतो, मग हे काय लागलेय?
टिव्हीवर ब्लॅक अँड व्हाईट सीन दिसत होता. एका जुनाट घरात एक स्त्री जिन्यावरुन पायऱ्या उतरत खाली येत होती. ते घर आपण कुठेतरी पाहिले आहे असे त्याला क्षणभर वाटून गेले.
पण नंतर आपण पाहिलेल्या एखाद्या इंग्रजी सिनेमातील ते दृश्य असावे असे त्याला वाटले. कारण एखाद्या राजवाड्यासारखेच ते घर दिसत होते. तो आपल्या स्मरणशक्तीला ताण देत आठवू लागला, पण त्याला आठवेना.
दरम्यान ती सुंदर स्त्री निम्म्या पायर्या उतरुन आली होती. सुमीतने तिच्याकडे पाहिले अन ती रोखून आपल्याकडेच पहात आहे हे त्याला जाणवले. तिच्या त्या थंडगार नजरेने सुमीत एकदम थरारला.
पण रात्रीच्या अंधारात आपल्याला हे भास होत आहेत बाकी काही नाही असे मनाशीच म्हणून त्याने परत रिमोट वरुन टिव्ही बंद केला व उठून बटनही बंद केले. टाॅयलेटला जाऊन आला.
बेडरुमच्या बंद दाराचा कानोसा घेतला तर बेडरुम गपगार पडले होते. मनाशीच हसत तो सोफ्यावर बसला आणि त्याने पाणी पिण्यासाठी बाटली उघडली व वर तोंड करून तो पाणी पिऊ लागला.
तेवढ्यात परत आवाज ऐकू आला…. चकीत होतच त्याने टिव्ही कडे पाहिले तर टिव्ही सुरु झालेला होता अन मगाचाच जुनाट घराचा सीन दिसत होता, फक्त आता ती स्त्री जिन्याच्या शेवटच्या पायरीवर उभी होती व एकटक सुमीतकडे पहात होती.
टिव्ही मधून ही बाई आपल्याकडे कसे पाहू शकते तेच त्याला समजेना आणि बोर्डवरुन बटन बंद करुनही टीव्ही आपोआप कसा लागला हेही त्याला समजेना.
ती स्त्री आता सगळ्या पायर्या उतरुन पुढे पुढे चालत येत होती, अन हतबुद्ध होऊन सुमीत तिच्याकडे पहात बसला होता. हातातील पाण्याची बाटली खाली ठेवावी याचेही भान त्याला राहिले नाही.
आता ती टिव्ही च्या काचेला अगदी चिकटलीय हे सुमीत पहात होता.अन पुढच्या एका क्षणात ती टिव्ही बाहेर आलीय अन आपल्या हाॅलमध्ये समोर ऊभी आहे हे सुमीतला जाणवले व तो प्रचंड घाबरला.
मोठ्याने ओरडावे म्हणून त्याने प्रयत्न केला, पण त्याच्या तोंडातून आवाज फुटू शकला नाही, कारण भीतीने त्याची गाळण उडाली होती व त्याची जीभ लटकी पडली होती.
ती सुंदर युवती आता हळूहळू सुमीतच्या दिशेने येऊ लागली. हतबल झालेला सुमीत जागेलाच खिळला होता. पुढच्या दोनेक मिनिटांत ती सुमीतच्या अगदी समोर ऊभी होती. ती मिनिटे सुमीतला युगासारखी वाटली.
ती समोर येऊन ऊभी राहिली व सुमीतला म्हणाली, “ओळखले का मला?”
सुमीतच्या मेंदूपर्यंत तो प्रश्न पोहोचून त्याला त्या प्रश्नाचे आकलन व्हावे या मन:स्थितीमध्ये सुमीत नव्हताच.. तो फक्त विस्फारलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पहात होता. हे कसे शक्य आहे??? हाच प्रश्न त्याला पडला होता.
त्याच्या नजरेसमोर चित्रपट पहावा तसे सगळे एका क्षणात तरळून गेले.
गेल्या वर्षी तो कंपनीच्या कामानिमित्त ब्रिटन येथे तीन महिन्यांसाठी गेला होता. एका रविवारी जवळच असलेल्या जुन्या राजवाड्यातील म्युझियम मधील शस्त्रे व दागिन्यांचे प्रदर्शन पाहण्यासाठी तो गेला होता.
बरोबर.. तोच तो जिना मगाशी टिव्ही मध्ये दिसला.. ज्यावर ही ऊभी होती.
शस्त्रे पाहून झाल्यावर तो स्त्रियांचे दागिने व कपडे, आरसे इत्यादी ठेवलेल्या दालनात आला. ते जुने दागिने व कलाकुसर केलेले आरसे त्याला खूप आवडले. तो त्यातील एका आरशात पहात असताना एकदम त्याला आरशात कुणाचा तरी चेहरा दिसला, म्हणून त्याने आपल्यामागे वळून पाहिले, तर कुणीच नव्हते.
परत आरशात पाहिले तर आरशातून एक अतिशय सुंदर युवती आपल्याकडेच पहात आहे हे त्याच्या लक्षात आले. परत मागे वळून पाहिले तर कुणीच नाही. त्याला वाटले, हे काहीतरी वेगळेच प्रकरण आहे, म्हणून तो तिथून लगेच रुमवर परतला.
पण त्यानंतर एक महिन्याच्या वास्तव्यात सतत आपल्या मागेपुढे कुणीतरी आहे असा त्याला भास व्हायचा. रुमवर एकटे तो अजिबात थांबत नसे. तीन महिने पूर्ण झाले अन तो भारतात परतला.
इकडे परत आल्यावर एकदाही तो अनुभव आला नाही त्याला…कालांतराने तो ही गोष्ट विसरुनही गेला.
कधीकाळी आठवले तर तो आपल्याला झालेला भासच असावा असे तो मनाशी म्हणायचा.
पण ….आज तोच आरशात दिसलेला चेहरा अन तेच ठिकाण टिव्हीत दिसले अन अनाकलनीय गोष्टी समोर घडत होत्या.
आरशात चेहरा दिसलेली युवती प्रत्यक्ष समोर ऊभी होती व विचारत होती, ओळखले का मला ?
त्याची अवस्था पाहून तो खूप घाबरलाय हे त्या युवतीला समजले. पाणी पी अशी तिने खूण केली तेव्हा बाटली आपल्या हातात आहे हे सुमीतच्या लक्षात आले.
त्याने बाटली तोंडाला लावली व घटाघटा पिऊन सगळे पाणी संपवले.
मग त्या युवतीने बोलायला सुरुवात केली.
“घाबरु नकोस.फक्त मी काय सांगतेय ते ऐक.ते सांगण्यासाठी मी इतकी प्रयत्नांची पराकाष्ठा करत इथवर पोहोचलेय. मागच्या जन्मात आपले दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. एक दिवसही असा जात नसे की, आपण भेटलो नाही. तुझ्या आईलाही मी सून म्हणून पसंत होते.माझ्या बाबांचा मात्र विरोध होता, कारण त्यांना आपल्या मुलीसाठी गर्भश्रीमंत जावई हवा होता.
पण मला मात्र तुझा साधाभोळा स्वभाव आवडत होता.
तुझ्यासोबत झोपडीत रहाण्याची ही माझी तयारी होती.
बाबांच्या इच्छेविरुद्ध आपण पळून जाऊन लग्न करणारच होतो, पण तेवढ्यात राजपुत्राची विखारी नजर माझ्यावर पडली व तो माझ्या रुपावर मोहित झाला.
राजपुत्रच तो! त्याने सरळ माझी उचलबांगडी केली व मला राजमहालात आणून कोंडून ठेवले. माझे बाबा खुश झाले, कारण त्यांना हवा होता तसाच गर्भश्रीमंत होता तो! राजपुत्र होता ना तो…
मी खूप विरोध केला, माझे तुझ्यावर प्रेम नाही असे राजपुत्राला वारंवार सांगितले, पण त्याने माझे काहीही ऐकले नाही.
लग्नासाठी तयार होण्यासाठी तो दररोज माझी आर्जवे करत होता. पण मी बधत नव्हते.
तुझी भेट होत नव्हती म्हणून मी कासावीस होत होते. तुझ्याबद्दल काहीच समजत नव्हते.
तुझ्याबद्दल मी कुणापाशीच काही बोलत नव्हते कारण राजपुत्र तुझे काही बरेवाईट करेल अशी मला भीती वाटायची. पण अखेर त्याने डाव साधला.
त्याला कुठूनतरी आपल्या प्रेमाबद्दल समजले आणि त्याने तुझी हत्या केली. त्यानंतर राजपुत्र माझ्या दालनात आला आणि त्याने हिऱ्याची अंगठी माझ्या बोटात जबरदस्तीने घातली.
आता तरी तू माझी होशीलच असे तो का म्हणाला हे मला तेव्हा समजले नाही. अजूनही मी त्याला प्रतिसाद देत नाही हे पाहून काही दिवसांनी दासीकरवी तुझ्या मृत्यूची बातमी त्याने माझ्यापर्यंत पोहोचवली.
पण दासीकडून ही बातमी जेव्हा मला समजली तेव्हा मी स्वतःला सावरु शकले नाही.
तोपर्यंत मी आपण कधीतरी भेटू या आशेवर जगत होते .पण तूच नाहीस तर जगून काय करायचे म्हणून मी बोटातील अंगठीतला हिरा प्राशन केला व स्वतःचे आयुष्य संपवले. पण मला मुक्ती मिळाली नाही. मी तिथेच त्या दालनात तुझी वाट पहात राहिले वर्षानुवर्षे…..कारण माझा जीव तुझ्यात गुंतला होता.
गेल्यावर्षी तुला पाहिले अन मला खूप आनंद झाला. पण तू मला भेटलाच नाहीस! मला आरशात पाहिलेस तू , पण ओळखले नाहीस. बरोबर आहे,तुझा हा दुसरा जन्म आहे. गतजन्मीची ओळख या जन्मी आठवत नाही.
मी खूप प्रयत्न केला पण तुझ्याशी तेव्हा संपर्क साधणे नाहीच जमले.
तुझ्या अवतीभवती फिरत होते,पण माझे अस्तित्व तुला जाणवून देण्याची योग्य वेळ तेव्हा आली नव्हती.
तुझ्यासोबत श्रीदत्तात्रेय व नवनाथांची उदी होती. त्यामुळे मी तुझ्या अवतीभवती फिरकू शकत नव्हते.
पण गेल्या महिन्यात तुझ्यासारखाच एक तरुण ब्रिटनला आला होता. नेमका तो संग्रहालय पहायला आला होता, तेव्हाच तुझा विडिओ काॅल त्याला आला होता. एका कोपऱ्यात उभे राहून तो तुझ्याशी बोलत होता. ते ऐकून तू भारतात आहेस हे समजले. तेव्हा मात्र मी तुझ्या मित्राच्या अवतीभवती वावरत राहिले, अन त्याच्यासोबत पुण्यात पोहोचले.
आज तू नेमका पेट्रोल भरायला ज्या पेट्रोल पंपावर गेलास तिथे मी होते. तुला पाहून खूप आनंद झाला. मी तुझ्या गाडीत शिरले.अशा पद्धतीने तुझा तेव्हापासून शोध काढत काढत मी आज इथे पोहोचलेय.
गेल्या जन्मापासून हा अतृप्त जीव असाच तुझ्या शोधात भटकतोय. तुझ्या आराध्यांची म्हणजे दत्तप्रभूंची मी याचना केली होती की, तुमच्या भक्ताच्या केसालाही मी धक्का लावणार नाही. पण मला एकदा त्याला भेटायचे आहे.
तेव्हा त्यांच्याच कृपेने आपली भेट होऊ शकली आहे. जात, धर्म, देश, भाषा कुठलीही असो, दत्तगुरु हेच या योनीतून सुटका घडवतात हे मला समजून चुकले आहे. पण ही सुटका घडवण्यापूर्वी मला तुला भेटायचेय ही माझी इच्छा ही त्यांच्याच कृपेने पूर्ण झाली आहे.
तेव्हा सुमीतला आठवले की, त्याचा तो कलीग एवढा जवळचा मित्र नसताना ही आपण त्याला विडिओ काॅल करावा,अन् आत्ता लगेच करावा अशी अनावर ऊर्मी का मनात दाटून आली होती, याचे कारण त्याला आत्ता समजले. ही सर्व त्यांचीच कृपा ! त्याने मनोमन दत्तप्रभूंना वंदन केले.
तेव्हाही म्हणजे गेल्या जन्मी मी फक्त तुझीच होते हे मला तुला सांगायचे होते. अन ते सांगितल्याशिवाय मला या योनीतून मुक्ती मिळणार नाही.
घाबरु नकोस, मी तुला काहीही करणार नाही. फक्त एवढेच तुला सांगायचे होते की, राजपुत्राने जबरदस्तीने माझ्या रुपावर मोहित होऊन मला उचलून नेले होते. मी त्याच्या ऐश्वर्याला भुलून त्याच्यासोबत गेले नव्हते. मी तेव्हा ही फक्त तुझीच होते व आजही तुझीच आहे..
पुढच्या जन्मी तरी आपले प्रेम सफल होवो ही माझ्या मनात असलेली कामना पूर्ण होवो.. असे म्हणून त्या युवतीने सुमीतचा हात हातात घेतला अन काय आश्चर्य.. त्याक्षणी सुमीतला मागच्या जन्मातील सगळे क्षणार्धात आठवले.
तिच्यासोबतचे सहवासाचे ते सुंदर क्षण त्याला आठवले. राजपुत्राने त्याचा वध करताना त्याच्या डोळ्यांसमोर तिचाच चेहरा होता हे आठवले. तो हृदय पिळवटून टाकणारा तिचा विरह आठवला.
आत्ता याक्षणी त्याने आपल्या हातात असलेल्या तिच्या हाताचे चुंबन घेतले व त्याचे डोळे भरुन आले.
ती म्हणाली, बस.. एवढेच…. आता मी जाते.
तिचा चेहरा ओंजळीत घेऊन आवेगाने तिचे चुंबन घ्यायला तो पुढे सरसावला होता तोच ती एका क्षणात उभ्या जागी धुराच्या वलयासारखी विरुन गेली.
त्याक्षणी मागच्या आयुष्यातील दोघांच्या सहवासातील उत्कट क्षणांनी सुमीतला घेरले होते पण तिला आपल्या डोळ्यांसमोर हवेत विरून गेलेले पाहून सुमीत धाय मोकलून रडू लागला. त्याला कशाचेही भान उरले नाही,कारण त्याक्षणी तो गतजन्मात पोहोचला होता. तो सुमित नव्हताच!
सुमीतच्या मोठ्याने रडण्याच्या आवाजाने बेडरूममध्ये झोपलेल्या मायलेकी जाग्या झाल्या व उठून बाहेर आल्या.
सुमीतला रडताना पाहून मानसीला काहीच समजेना. घाबरुन तीने प्रश्नांची सरबत्ती सुरु केली, पण तो काहीच बोलत नव्हता.
कारण आत्ता याक्षणी तो मानसीचा सुमीत नव्हताच…! तो तर एका अपूर्ण अपयशी प्रेमकहाणीतील प्रियकर होता , आणि आत्ता याक्षणी त्याच्या प्रेयसीच्या स्पर्शाची त्याला अनिवार ओढ लागलीय हे तो मानसीला कसे सांगणार होता.!
इति हेमा उवाच…
©® सौ. हेमा पाटील.
सदर कथा लेखिका सौ. हेमा पाटील यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
ही कथाही अवश्य वाचा
दीप उजळले आनंदाचे
साकव
सामाजिक मानसिकतेला उत्तर