आली माझ्या घरी ही दिवाळी

©® वैशाली प्रदीप जोशी
अर्चनाच्या मुलाचं फेब्रुवारीमध्ये लग्न झालं. हा येणारा पहिलाच दिवाळसण! प्रथेप्रमाणे अजिंक्य-अनुयाने दिवाळीसाठी गावच्या घरी यावं अशी अर्चनाताईच्या सासूबाईंची इच्छा नव्हे अट्टाहास आहे म्हणा ना!
अजिंक्य सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि अनुयाचं स्वतःचं बुटीक आहे. तिनं डिझाईन केलेल्या कपड्यांना म्हणजे आजच्या भाषेत आऊटफिट्सना भरपूर मागणी असते. त्यात दिवाळी म्हणजे फुल्ल धंद्याचा टाईम!
म्हणून अनुयाचा आग्रह होता की अर्चनाताई-विनयराव ह्यांनीच आजींना घेऊन नागपूरला यावं.

नागपूरला अजिंक्यचा थ्री बीएचके चा प्रशस्त फ्लॅट आहे. आणि अनुयाला संसाराची खूप हौस! आपल्या नवीन घरात लक्ष्मीपूजन व्हावं, सगळ्या पाहुण्यांनी घर गजबजावं, हसण्या-खिदळण्याच्या आवाज घरादाराला व्यापून उरावा अशी कितीतरी स्वप्नं ती उराशी कवटाळून आहे.
अर्चनाताईंची मात्र इकडे आड तिकडे विहीर झालीये. तसं म्हटलं तर सासूबाईंचं म्हणणं पण योग्यच आहे. मुलगा-सुनेचा पहिला दिवाळसण घरीच साजरा व्हायला हवा ना!

पण अनुयाचं म्हणणं पण बरोबर आहे. तिचं काम महत्वाचं आहे. तिनं इतक्या मेहनतीने डिझाईन्स बनवल्यात. ऑर्डरचे कपडे डिलीव्हर होईपर्यंत धनतेरस उजाडणार. शिवाय ती नागपुरात असेल तर केव्हाही कामाकडे लक्ष देऊ शकते. शिवाय त्या फ्लॅटमधली ही पहिलीच दिवाळी!
त्यांना आठवलं -त्यांना किती आवड होती आपल्या राहत्या घरीच लक्ष्मीपूजन करावं. पण भलेही ते घर लहान का असेना पण एखादे वर्षी घर-अंगण दिव्यांच्या रोषणाईने झगमगून जावं!
त्यांनी सासू-सासऱ्यांना किती विनंत्या केल्या की एखादे वर्षी तरी दिवाळी आमच्याकडे साजरी करूया. तुम्हीच चला तिकडे.विनयरावांकडे हट्ट केला. प्रसंगी रुसल्या-रागावल्या.

पण सासऱ्यांचा आदेश असे की लक्ष्मीपूजन गावच्या घरीच व्हायला हवं. “ते मोठं घर आहे” त्यांचं हुकमी वाक्य! “मी जिवंत असेपर्यंत दिवाळी वेगवेगळी होणार नाही” सासऱ्यांनी निर्वाणीचं सांगून टाकलं.
मग सासूसासरे दिवाळीला कधीही इकडे आले नाहीत आणि आणि विनयराव कधी वडिलांच्या शब्दाबाहेर जाऊ शकले नाहीत. त्यांची दिवाळी दरवर्षी गावी होत राहिली.
सासरे वारल्यानंतर सासूबाई अर्चनाताईंकडेच राहायला आल्या. त्यामुळे आता दिवाळी अर्चनाताईच्या घरीच होत असे.

“मी काय म्हणते! अनुयाची इच्छा आहे तर आपण जाऊया ना अजिंक्यकडे दिवाळीला! मुलींना सुरुवातीला सगळी हौस असते हो… एव्हढया आग्रहाने बोलावतेय… नका मन मोडू तिचं ” अर्चनाताईंनी विनयरावांना तिसऱ्यांदा गळ घातली. आणि आश्चर्य म्हणजे ह्या खेपेस त्यांनी चक्क होकार तर दिलाच पण आईला समजावून सांगण्याची जबाबदारी पण घेतली.
“तिच्याच्याने होणारे का फराळाचं करणं? तिथे सगळं विकत आणणार ते.. तेच खा मग कडकमडक… ह्यांना घरची दिवाळी नकोय ना करा म्हणावं विकतची दिवाळी साजरी ह्यां …” आजीबाईंनी शक्य तितकं नाक मुरडलं.

“पण फराळाचे पदार्थ घरी करण्यात जी मज्जा आहे ना ती कशातच नाही. आम्ही एकादशी आणि वसुबारस दोन्ही दिवस पूर्ण फराळात गुंतलेल्या असू. त्याआधी चकलीची भाजणी दळणे, अनारश्यांची उंडी, करंज्यांचे सारण सगळी तयारी करावी लागे. किराणा आणणे, निवडणे, त्याची ठेवरेव! जीव फराळमय होत असे. एकदा फराळ डब्यात पडला की आमचा जीव भांड्यात! हो किनई गं अर्चना?” आता त्यांनी अर्चनाताईंना पटवण्याचा प्रयत्न केला.
“हो आई. आपण ह्यावर्षी पण घरी फराळ बनवणार आहोतच पण ज्या सुगरणी फराळ बनवण्याचा व्यवसाय करतात त्या पारंगत असतात ह्यात आणि एकेकीची स्पेशालिटी असते.त्यांच्याकडूनही मागवावा ना काही फराळ!

नाहीतरी फराळाचं बनवण्यामध्ये किती दगदग होते! वेळ जातो, ऊर्जा खर्च होते. शिवाय काही चुकलं -बिघडलं तर विरस होतो.
ह्या मुलींना त्यांची नोकरी सांभाळून नाही सगळं शक्य!आमच्या वेळची गोष्ट वेगळी होती. आमची नोकरी सुटसुटीत होती 10 ते 5. आता तर नोकरीत किती आव्हाने आहेत ह्या मुलींना.. आपल्या ईशाचंच बघा ना… लहानपणापासून अभ्यासात हुशार म्हटल्यावर स्वैपाकघरात आलीच नाही कधी. त्यामुळे साधा स्वैपाक येतो तिला पण हे निगुतीचे पदार्थ नाही जमत. आणि ज्यांना आवड आहे, सवड आहे आणि पॅशन आहे त्यांच्याकडून घ्यावेत काही पदार्थ!” अनुया फराळ विकत आणणार ह्याची कल्पना असल्याने लाडक्या सासूबाईंनी तिची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला.

“पण आशुतोष आणि अदिती येतात ना दरवर्षी दिवाळीला इथे! त्यांना सांगणार आहात का आम्हीच चाललोय गावाला तर तुम्ही येऊ नका म्हणून! आणि ईशाचा पाडवा???” आजीबाई मोडता घालण्याची एकही संधी सोडेनात.
अरे हो! सांगायचं राहिलंच. आशुतोष हा अजिंक्यचा थोरला भाऊ आणि ईशा ही धाकटी बहीण. विनयराव-अर्चनाताईंची ही तीन अपत्य! ईशाचं लग्न तीन वर्षांपूर्वी झालंय आणि ती नवऱ्यासह मुंबईत राहतेय.
आशुतोष नोकरीनिमित्त पुण्यात राहतोय. सगळ्यांनी दिवाळी सोबत साजरी करायची हा घरचा नियम असल्याने आशुतोष-अदिती त्यांच्या चिमणीसह दिवाळीसाठी गावीच येत.

“बाबा, माझं बोलणं झालंय अजिंक्यशी! आम्ही लक्ष्मीपूजन पुण्यातच करणार आणि पाडव्याच्या रात्री दुरोंतोने निघतोय तिकडे यायला.” आशुतोषने त्याचा कार्यक्रम कळवला.
शेवटी नाईलाजाने का होईना आजीबाई नातवाच्या घरी दिवाळी साजरी करायला राजी झाल्या. अर्चनाताईंनी तिथे नेण्यासाठी बराचसा फराळ घरी बनवला आणि आणि ते तिघेही दिवाळीच्या दोन दिवस आधी नागपूरला येऊन पोहचले.
“दिवाळी म्हटलं की घराची साफसफाई किती पुरते… तुझी सून दुकानात बसेल की घर आवरेल कुणास ठाऊक! लक्ष्मी घरी येते त्यावेळी घर कसं लख्ख असावं! आम्ही आठ दिवस आधी अगदी भिंती पुसणे,फरश्या घासणे,छत झाडणे, जाळे-जळमटे काढणे, डब्बे घासणे, पंखे पुसणे… रोज एकेक खोली स्वच्छ करायची… “आजीबाई भूतकाळात रमल्या होत्या.

“विनय, तू म्हटलं म्हणून मी आले दिवाळीला पण मला घर अस्तव्यस्त असलेलं मुळीच खपायचं नाही हं… सांगून ठेवते.” आजीबाईंच्या तोंडाचा तोंडाचा पट्टा सुरु आणि विनयरावांच्या तोंडाला कुलूप. अर्चनाताई पुढे काय होणार ह्या विचारात गढून गेल्या. कारण सासूबाईंची दिवाळी लगबग त्यांना चांगलीच ठाऊक होती. आता वय 80 च्या घरात असलं तरी तुडतुडीत होत्या आणि मुख्य म्हणजे दिवाळीसाठी पूर्वीचा उत्साह टिकून होता. दिवाळीचे सगळे दिवस पारंपरिकरित्या साजरे झालेच पाहिजे ह्यासाठी त्या आग्रही असत.
असो, तर हे त्रिकूट घरी पोहचलं तसं अजिंक्यने त्यांचं स्वागत केलं. अनुया बुटीकमध्येच होती.
चहापाणी झाल्यावर आजीबाईंची नजर घरातल्या पाचही खोल्या आणि बाल्कनीमध्ये नजर फिरवली. घरात कुठे जाळेजळमटे दिसतात का ह्याचा वेध घेऊ लागली. ते बघून अजिंक्य गालातल्या गालात हसू लागला.

“अनू, संपूर्ण घराची साफसफाई तुम्ही दोघांनीच केली की काय गं! सुमनबाई आलेल्या का मदतीला… तरी कठीणच आहे एव्हढं सगळं आवरणं!” सूनबाईने आणलेली भाजी निवडताना अर्चनाताईंनी विचारलंच.
“नाही हो आई, अजिंक्यचं ऑफिस आणि माझं काम… मी सरळ हाऊसकीपिंगला कॉन्ट्रॅक्ट दिला डीप क्लीनिंगचा.” अनुयाने गुपित उघड केलं.
“अगंबाई! हे काय असतं?” आजीबाईंची उत्सुकता चाळवली.
“आजी, त्यांची टीम असते पाच-सहा जणांची. सगळं सामान घेऊन येतात आणि दिवसभरात सगळं चकाचक करून देतात.” अनुया खूश होती.

“अग्गोबाई, आम्ही सगळं घरीच करत असू. आठआठ दिवस कामं पुरत. असो, पण हे छान आहे” आजीबाईंनी मान डोलावली आणि विनयरावांनी सुटकेचा श्वास टाकला.
दुसरे दिवशी धनत्रयोदशीला संध्याकाळी सगळे बुटीकमध्ये गेले. तिथे विनयरावांच्या हस्ते यथासांग लक्ष्मीपूजन केलं आणि आजींच्या हस्ते कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिला. आता बुटीकला आठवडाभर सुट्टी असणार होती.
घरी आल्यावर आजींनी सुचवल्याप्रमाणे धन्वंतरीपूजन आणि यमदीपदान सुद्धा केलं. मुलं आपलं ऐकताहेत म्हणून आजी सुखावल्या, आणि आजींची नाराजी निवळतेय हे बघून अजिंक्यला समाधान वाटलं.

“उद्या नरकचतुर्दशी बरं का! सकाळी अभ्यंगस्नान करायचं. तीळाचे उटणे करावे, अंगाला तेल रगडावे, ऊन ऊन पाण्याने आंघोळ.. ते ही सूर्योदयापूर्वी.निदान पुरुषांच्या आंघोळी तरी लवकर करा म्हणावं आणि मग औक्षण! लक्षात आहे ना गं अर्चना! आजींनी झोपताना आठवण करून दिली तसं अनुयाने ‘सगळं होऊन जाईल’ असा दिलासा अर्चनाताईना दिला.
दुसरे दिवशी आजींना अंमळ उशिरा जाग आली तर अर्चनाताई आणि अनुया अभ्यंगस्नानाची तयारी करत होत्या. बसायला पाट, पाटाभोंवती रांगोळी, एका गुलाबपाकळ्यांनी सजवलेल्या तबकात वाट्या -एका वाटीत मालिशसाठी तेल आणि दुसरीत उटणं!अनुयाने तेलाच्या वाटीत थोडं ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई ऑईल मिसळलं आणि सुगंधी उटण्यात दूध आणि आपलं पारंपरिक तीळाचं उटणं!
दोघींनी आपापल्या नवऱ्याला तेल-उटणं लावून दिलं आणि आंघोळीला पाठवलं.

एव्हाना डोअरबेल वाजली आणि दोन मुली हातात छोटी बॅग घेऊन हजर झाल्या.
“आजी, ह्या मुली आपल्याला जरा अंग चोळून देणार बरं! पहिला नंबर तुमचा!” अनुयाने आजींना हळूच उठवलं.
“हे काय? मला कशाला?” आजींना एकामागून एक धक्के बसत होते.
“अहो, आपण इतकी कामं करतो. वयोमानाप्रमाणे हाडं थकतात. जरा रिलॅक्स वाटेल.” एक मुलगी दोन टबमध्ये कोमट पाणी घेऊन आली आणि त्यात काही जिन्नस घालून एकात आजींचे आणि दुसऱ्यात अर्चनाताईचे पाय बुडवले. तसं कोमट पाण्याच्या स्पर्शाने आजींना खूप बरं वाटलं. त्या मुलींनी हळुवारपणे पाय स्वच्छ केले. क्रीम चोळलं. टाचेच्या भेगांमध्ये क्रीम भरलं. डोक्याला मसाज करून दिला, केस धुवून दिले.पाठ घासून दिली. नंतर चेहऱ्याला सिरम लावलं. आजींना खूप शांत आणि प्रसन्न वाटलं… अर्चनाताईंची थकलेली गात्रं सुद्धा सुखावली.

अर्चनाताईंनी शेवटी अनुयासहित सगळ्यांचं औक्षण केलं आणि अनुयाने आईचं. सगळे सोबतच फराळ करायला बसले. आजींनी आग्रहाने पार्लरच्या मुलींनासुद्धा फराळ करायला लावला.
अनुयाने त्या मुलींना एका पाकिटात पैसे, ड्रेस, मिठाई,पणत्या, फटाके असं बरंच काही देऊन त्यांची बोळवण केली.
“ही पॅडिक्युअर आणि हेडमसाजची आयडिया छान आहे गं ” अर्चनाताईंना सुनेच्या कल्पकतेचं मनापासून कौतुक वाटलं.
“ह्या मुली माझ्या बुटीकमध्ये काम करतात. शिवाय पार्लरचा कोर्स केलाय. परिस्थितीने गरीब आहेत पण होतकरू आहेत.उद्या रांगोळी काढायलासुद्धा ह्या दुपारी येणार बरं का एक वाजता!” अनुयाने माहिती दिली तसं आजींनी त्या दोघी जेवायलादेखील आपल्याकडेच असतील हे जाहीर करून टाकलं!

लक्ष्मीपूजनाचा दिवस उजाडला. आज स्वैपाकघराचा ताबा अर्चनाताईंकडे होता. नव्हे, तसा विनयरावांचा आणि अजिंक्यचा आग्रहच होता. अनुयाला देखील सासूबाईंच्या हातची पुरणपोळी खायची होतीच.
दुपारी मस्त तट्टावून जेवल्यावर सगळ्यांनी थोडा वेळ ताणून दिली. संध्याकाळी यथासांग लक्ष्मीपूजन झालं. आजींनी अनुया आणि अर्चनाला साड्या घेतल्याच होत्या.
“माझ्या लग्नापासून प्रत्येक वर्षी आईंनी दिलेली साडी नेसूनच माझं लक्ष्मीपूजन झालंय बरं का!” अर्चनाताईंनी असं म्हणताच आजींचा चेहरा आनंदाने उजळला. “अदिती आणि ईशासाठी पण घेतल्यात बरं का! एरव्ही ड्रेस घाला तुम्ही मुली पण दिवाळीला साडीच नेसावी गं “

अनुयाने देखील आजींचा मान राखत दिवाळीसाठी स्वतः डिझाईन केलेला लेहंगा बाजूला ठेवून सासूचं अनुकरण करत आजींनी दिलेली साडी पूजेला नेसली. मग आजी अजूनच खूश झाल्या!
“उद्या आराम करूया. आपापल्या बॅगा भरायला घ्या आपण बाहेर जातोय फिरायला ” अजिंक्यने जाहीर केलं तसं आजींच्या भुवया उंचावल्या.
“अरे, ईशा यायला हवी भाऊबीजेला… पाडव्याची आणि भाऊबीजेची अक्षत आहे ना तिची! माहेरवाशिणीचा हक्क असतो… शिवाय आशुतोषचं काय? बडनेराला का उतरणार तो? आणि अजिंक्यचा दिवाळसण… त्यांनी कधी बोलावलंय?” मला मेलीला काही सांगत नाही कुणी.

आपल्याकडे पाडवा-भाऊबीज म्हणजे नुसती धम्माल असायची. आम्ही सगळ्या जावा-सुना आधी सासऱ्यांना ओवाळायचो आणि मग नवऱ्याला. मुली-पुतण्या-भाच्या वडलांना-काका-मामाला औक्षण करायच्या. एखादीचा भाऊ आला असेल तरी तो फक्त बहिणीकडूनच नव्हे तर तिच्या जावांकडूनसुद्धा अक्षत लावून घ्यायचा. मीनावहिनींचा भाऊ दरवर्षी माझ्याकडून ओवाळून घेत असे म्हणून मला भाऊ नसल्याची उणीव कधीच भासली नाही.” आजी गावातली दिवाळी मनात रंगवू लागल्या.
“तर काय! आम्ही सगळे सख्खे-चुलतभाऊ एका रांगेत बसत असू आणि सगळ्या बहिणी एकेकाला ओवाळणी करत. किती छान दिवस!” विनयरावसुद्धा आठवणीत रमले होते. ” त्यात दोन दिवस हिच्या माहेरी! तिथे जावई म्हणून कित्ती कौतुक आणि सासूबाईंच्या हातची गरमागरम शेव आणि गुळाचे अनारसे! पण आता इतकं फिरायला वेळ कुठाय सगळ्यांना! मी नोकरीत असताना दिवाळीची तीन दिवस सुट्टी आणि आणखी एक दोन दिवस रजा घेऊन मस्त फिरणं होई. आता तुम्हा मुलांना जेमतेम दोन दिवस सुट्टी असते त्यात इतक्या नातेवाईकांच्या भेटी… शक्यच नाही ” विनायरावांनी उसासा टाकला तसं अजिंक्य-अनुयाने एकमेकांकडे बघून स्मित केले.

” ढाण ट्या ण्याण… आपण सगळे उद्या शेगावला जातोय. हे आपल्या सगळ्यांसाठी मोठ्ठ सरप्राईज आहे. ईशा आणि आशूदादा तिथेच येणार आहेत आणि अनूचे आईबाबा सुद्धा!” तिथेच आमचा दिवाळसण साजरा होणार आहे. पपा तुम्हाला निमंत्रणाचा फोन करतीलच आता!”
“हो, आजी… माझ्या बाबांनी शेगावजवळ एक तासाच्या अंतरावर तीन दिवसांसाठी एक रिसॉर्ट बुक केलंय आपण सगळे उद्या दुपारपर्यंत तिथे जाऊ. माझे आईबाबा आणि दादावहिनी तिथे असतीलच. आपण तिथेच पाडवा-भाऊबीज साजरी करू. गजानन महाराजांचं दर्शन, आनंदसागर अशी भटकंती करू. मस्त एन्जॉय करु!” अनुया उत्साहात होती.
रीतीप्रमाणे आजींना आणि विनय-अर्चनाला अनुयाच्या पपांनी फोनवर दिवाळसणाचं आमंत्रण दिलं आणि हे सगळे फुल्ल एन्जॉय करत रिसॉर्ट ला पोहचले.

ईशा आणि आशुतोष कुटुंबासोबत अगोदरच पोहचले होते. अनुयाच्या वहिनीशी अदिती आणि ईशाची छान गट्टी जमली आणि चिल्लीपिल्ली धम्माल मस्ती करण्यात रंगली.
“अदिती, तुम्हीसुद्धा नागपूरला यायचं ना गं लक्ष्मीपूजनासाठी. अनुयानं काय वेगवेगळं केलं बॉ ” अदिती नमस्कारासाठी वाकली तसं आजींनी मनातलं बोलून दाखवलं.
“आई, आम्ही आपल्या घरचा नियम म्हणून दिवाळीला गावी येतो पण पुणे-चंद्रपूर जाण्यायेण्यात तीन दिवस निघून जातात. तीन दिवस गावी.आमची सुट्टी संपते मग अदितीचं माहेरी जाणं राहूनच जातं गं.” एखाद्या रविवारी हिचे बाबा किंवा दादा येऊन जातो पुण्याला किंवा मग आम्ही जातो. पण तोपर्यंत दिवाळीची मजा संपून जाते. आमच्या दिवाळसणानंतर सात वर्षांनी पहिल्यांदाच आम्ही काल पाडव्याला हिच्या माहेरी गेलो.”आशुतोषने उलगडा केला.

“तरीच थोरली सुनबाई इतकी खूश दिसतेय” विनयरावांना वाटलं खरं, पण घरच्या नियमाच्या नादात आपण सुनबाईच्या आनंदाचा विचारच नाही केला म्हणून खजिल झाले.
‘एका वर्षी अदितीच्या आजी खूप आजारी होती तर तिच्या भेटीसाठी म्हणून तरी भाऊबीजेला जाऊ का तिकडे म्हणून विचारलेलं तिनं पण ईशाच्या दिवाळसणाला तिच्या सासरची मंडळी येणार म्हणून आजींनी जाऊ नाही दिलं आणि तिच्या आजीची शेवटची भेट नाहीच झाली.’ नुसत्या आठवणीनी अर्चनाताईंना गलबललं.
“पण ही आऊटींगची कल्पना भारी आहे बरं का!” विनयराव अनुयाच्या पपांशी बोलत होते.

“आजकाल ह्या मुलांना वेळ नसतो. कॉर्पोरेट जगतात कामाच्या प्रेशरखाली मुलं इतकी पिचून जातात.. की मुलांना रिलॅक्स होण्यासाठी बाहेर जावंसं वाटतं. अनुया बोलली की आम्हालाही बाहेर फिरायला जावंसं वाटतंय बाहेरगावी दोन दिवसांसाठी तरी.. तर हे दिवाळसण वगैरे राहू देत का? तेव्हा मला लक्षात आलं की जसं डेस्टिनेशन वेडींग करतात तसा डेस्टिनेशन दिवाळसण करूया. ही कल्पना आशुतोष आणि अजिंक्यने उचलून धरली. आपल्या आजींना पण शेगावचं दर्शन करायचं आहेच म्हणे… म्हटलं चला.. गजानन महाराजांच्या छत्रछायेत जावयाचा दिवाळसण साजरा करूया.
“खरंय ना! हा असा मध्यममार्ग काढायला हवाच. एक पंथ दो काज! सगळं कुटुंब एकत्र, आऊटींग पण झालं आणि पाडवा-भाऊबीज पण”
संध्याकाळी रिसॉर्टच्या गच्चीमधून चंद्राला ओवाळून अर्थातच पाडवा-भाऊबीजचा कार्यक्रम धडाक्यात पार पडला.

“ही दिवाळी अगदी अविस्मरणीय ठरली बरं का” रात्री जेवणानंतर सगळी एकत्र असताना आजींनी चर्चेची सूत्र आपल्या हातात घेतली.
“आमची धाकटी नातसून फार कल्पक आहे, शंकाच नाही. पण सगळं आयतं करून घेणं म्हणजे पैश्याचा अपव्यय नाही का?” म्हणजे घराच्या साफसफाईपासून ते रांगोळी-फराळ सगळं मोलानं विकत घ्यायचं म्हणजे पारंपरिकता मोडीत काढल्यासारखंच झालं हे. आम्ही सगळं घरी करायचो त्यात किती आनंद मिळायचा, समाधान असायचं.”
“आई, पण आपण सगळं एन्जॉय केलंच ना! आपण बायका दिवाळीची कामं करून इतकं दमून जातो की दिवाळी झाल्यावर अक्षरशः आजारपण येतं. त्यापेक्षा काही कामं बाहेरून करून घेतली तर काय हरकत आहे!” अर्चनाताईंनी सुनेची बाजू घेतली.

“पूर्वी घरात एक पुरुष कमवायचा आणि स्त्री घरातली कामं सांभाळायची. गाठीला फारसा पैसा नसायचा शिवाय इतक्या सुखसोयी उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे सगळी कामं घरीच असायची. इलाज नव्हता.
आता परिस्थिती बदलली आहे. आपण सगळे बऱ्यापैकी कमावतोय. त्या कमाईचा एक हिस्सा ही कामं करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना-कामगारवर्गाला दिला तर! त्यांचं पोट ह्या कामावर अवलंबून आहे. ह्यामुळे आपण किती लोकांना दिवाळीचा आनंद दिलाय सांगा बरं!” अनुयाने मुद्दा पुढे रेटला.
“हो तर! अर्थशास्त्राचा नियम आहेच ना की पैसा मार्केटमध्ये खेळता राहायला हवा. तरच अर्थव्यवस्था बळकट होईल” अदिती बोलली तसं आशुतोषने तिच्याकडे कौतुकाने बघितलं. ती एम कॉम झालीये हे अगदी विसरायला झालेलं सगळ्यांनाच.

“आणि दिवाळी म्हणजे आनंद, दिवाळी म्हणजे समाधान, दिवाळी म्हणजे एकत्र कुटुंब… हे सगळं मिळालं म्हणजेच दिवाळी जोरदार साजरी झाली. हो किनई आजी! अजिंक्य बोलला तसं आजी एकदम म्हणालीच “हो रे बाबा! पटलं मला दिवाळी म्हणजे आनंद मग ती पारंपरिक असो की आधुनिक… घरची असो की विकतची!”
“पणजीआजी, विकतची दिवाळी म्हणजे काय गं!” अदितीच्या चिमणीनं मध्येच विचारलं तसं सगळं कुटुंब हास्यात रंगलं!
…. आणि आता “मोठं घर” ही संकल्पना मोडीत काढल्याचं जाहीर करत विनयरावांनी अर्चनाताईंना पाडव्याचं सगळ्यात मोठ्ठ गिफ्ट दिलं.
अर्चनाताई आनंदल्या कारण आता दिवाळी कशी साजरी करायची ह्याचे सर्वाधिकार घरातल्या महिला टीमकडे होते.
“आशुतोष, पुढच्या वर्षी दिवाळीला तुझ्याकडे येणार बरं का! अदिती आत्तापासूनच तयारीला लाग” आजींनी आदेश दिला तसं अदिती आनंदून गेली आणि अर्चनाताईच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं.
समाप्त
©® वैशाली प्रदीप जोशी
सदर कथा लेखिका वैशाली प्रदीप जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
ही कथाही अवश्य वाचा
दीप उजळले आनंदाचे
साकव
सामाजिक मानसिकतेला उत्तर

Leave a Comment

error: Content is protected !!