देणे सौजन्याचे

©® मृणाल शामराज
गुरुकृपा.. बंगला दिव्यांच्या रोषणाईने नटला होता. पोर्चमधे मोठा आकाशकंदील वाऱ्याबरोबर डोलत होता.
एक दिमाखदार वळण घेतं पांढरी शुभ्र audi पोर्चमध्ये येऊन थांबली.
“आले वाटतं…” म्हणत मीनाताई दारात आल्या.
“काकू, सावकाश उतरा..” विशाल हात देतं म्हणाला.
मीनाताई संभ्रमात पडल्या.. या कोण काकू आल्या??

सौख्या आणि विशालनी हात देतं त्यांना उतरवलं.
‘कोण आहेत या? फार वय दिसतं नाही आहे. ह्यांच्याकडे आलायं वाटतं पेशंट.’ .मीनाताई पुटपुटल्या आणि आत आल्या.
“या ना आत.. बाबा.. बघा कोण आलंय.”
डॉक्टरसाहेब, विशालचे बाबा पण कुतूहलाने बघत होते. आज दिवाळीचे कोण पाहुणे आले.
“अरे नाना तू? तू तर सुट्टीवर होतास ना चार दिवस !”

“हं.. हो साहेब.. पण..”
नाना चाचरतच बोलत होते.
“बाबा, मीच सुट्टी दिली हॊती त्यांना.
आज काकूंनाही घेवून आलो. दोघही राहणार आहेत आपल्याकडे चार दिवस दिवाळीचे.”
डॉक्टरसाहेबांनी पाहिलं, नाना, आणि त्यांच्या मागे त्यांची पत्नी संकोचून उभे होते.

“अरे नाना.. बस ना. असा समोर ये. लाजू नकोस. आता काही तु ड्युटीवर नाहीस.”
त्यांनी हात धरून नानांना शेजारी बसवलं.
मीनाताई पुढे आल्या.. त्यांनी काकूंना आत नेलं.
काकू आज प्रथमच इथे येतं होत्या. सौख्या आत आली.
“आई, आता तुम्ही आणि काकू गप्पा मारा. मी चहा करून आणते.”

“आजोबा.. आजोबा.. कुठे आहात. आजची match जिंकली आम्ही.”
“ये, रे, इकडे..”
“आजोबा..ही बघा ट्रॉफी. अरे नाना तुम्ही..”
नाना बघत होते.. केवढा मोठा झाला हा..
त्यांच्या डोळ्यापुढून जुने दिवस झरझर सरकू लागले.
गावाकडून इथे आलो. कंपनीत ड्राईव्हर म्हणून लागलो. काही दिवस बरे गेले. पण नंतर कंपनी बंद पडली.

घरी बायको, एक मतीमंद मुलगा..कसं घर चालवायचं !
कुणीतरी डॉक्टरांना ड्रायव्हर हवा आहे म्हणून सांगितलं आणि इथे कामाला लागलो. किती वर्षं झाली त्याला..
“नाना, चहा घ्या.”
“वहिनीसाहेब.. कशाला त्रास..”
“आता मला सुनबाईच म्हणा नाना..”
इकडे मीनाताई, आणि काकूंची गट्टी जमली.

दोघींचं गाव एकच निघालं यवतमाळ..
मग काय.. गप्पा चांगल्याच रंगल्या.
विशाल बेडरूम मधे होता.
शौर्य तिथे आला.
“बाबा.. हॆ आपल्याकडे राहणार का?”
“हो, का रे?”
“असंच विचारलं.”

“बस इकडे.. तुला काहीतरी सांगायचंय.”
“काय बाबा?”
“आता तुला कळेल इतका तु मोठा झाला आहेस.
नाना.. मी लहान होतो तेव्हा पासून आपल्याकडे आहेत ड्रायव्हर म्हणून.
आजोबा, इथले नामांकित डॉक्टर.
त्यांचा हातगुण चांगला म्हणून त्यांचा नावलौकिक.

आजूबाजूच्या गावातून खूप पेशेंट यायचे त्यांच्याकडे. कधी पैश्यासाठी त्यांनी कुणाची अडवणूक केली नाही. रात्री, अपरात्री परगावी जायला पण ते कंटाळा करायचे नाहीत. आयुष्यभर रुग्णात देवं पाहिला त्यांनी. नानांना ह्याची जाणीव हॊती. ते पण कधीही नाही म्हणाले नाहीत की कधीही त्यांनी पगार वाढवून मागितला नाही. बाबांबरोबर सावलीसारखे असायचे.
मला कॉलेजला सोडायला यायचे.
माझं तरुण वय.. कॉलेज बंक करून टिवल्याबावल्या करायचो मी कधीकधी.
एक दिवस नानांनी मला चांगलं झापलं.

‘दादा.. तुमचे बाबा बघा. दिवसरात्र काम करतात. किती लोकं मानतात त्यांना. वेळेचं सोनं करा. खूप शिका.
तुम्ही करता हॆ बरोबर नाही. साहेबानां कळलं तर खूप वाईट वाटेल त्यांना.’
त्यांची तळमळ मला उमगली. मी नेटानी अभ्यास केला आणि आज यशस्वी उद्योजक म्हणून लोकं ओळखतात मला.
नंतर माझं लग्न झालं. तुझ्यावेळेस, कधीही दवाखान्यात जावं लागेल म्हणून दिलेल्या तारखेच्या चार दिवस आधीपासून ते इथेच राहिले. तु आजारी असलास की इथेच जवळपास घोटाळायचे. त्यांनी खूप निरपेक्षपणे, आपलेपणानी आपली सेवा केली.

“मागच्या वर्षी आठवतंय का तुला?”
“काय बाबा?”
“आपण नवीन गाडी घेतली. नाना बाहेर होते. बोलता बोलता तू म्हणालास..
बाबा, गाडी नवीन तर ड्राईव्हरही नवा ठेवू यात..
नाना किल्ली दयायला आत येतं होते. त्यांनी ते ऐकलं बहुतेक. ते डोळे पुसत वळले.”
“हो, बाबा. तुम्ही मला रागावलात. त्यांची क्षमा मागायला लावलीत. मला खूप राग आला होता तुमचा.”

“बाळा, मागच्या वर्षी त्यांचा तो मतिमंद मुलगा वारला. ह्या दिवाळीत ते दोघं एकटेच. म्हणून त्यांना इथे आणलं.
ठीक केलं ना आम्ही.?”
“हो, बाबा. अगदी असंच करायला हवं होतं. बरं झालं तुम्ही नाना आजोबा आणि आजीला इथे आणलं.”
नाना आजोबा.. विशाल चकित झाला.
इतकं परिवर्तन झालं ह्याच्यात. त्याला मुलाच्या समजुदारपणाचं कौतुक वाटलं.

इकडे मीनाताई आणि काकू ह्यांच्या गप्पा रंगल्या होत्या.
थोड्यावेळानी काकू म्हणाल्या..”निघू का आम्ही?”
“कुठे.. कुठेही जायचं नाही आहे तुम्ही.” सौख्या म्हणाली.
“सुनबाई….”
“सुनबाई, म्हणता ना.. शौर्याच्या वेळेस मला जेवण जातं नाही कळलं तर किती पदार्थ नानांबरोबर पाठवायचात. आता मी आणि विशाल हीच तुमची मुलं. संकोच करू नका.
आणि, हो.
भाऊबीजेच्या दिवशी तुम्ही दोघं, आणि बाबा, आई गाणगापूरला जायचंय.”

“तुला कसं कळलं?”
“नाना मधे सांगत होते, तुमची खूप इच्छा आहे तिथे जाण्याची. पण इतके वर्षं तुम्हाला घरातून हलता आलं नाही.
पण आता नवीन गाडीतून तुम्ही चौघानी जायचं. ठरलंय.”
काकू ख़ुशीत हसल्या.
“तरीच.. “मीनाताई उद्गारल्या.
“काय, हो आई?”
“तरीच मी भाऊबीजेला मुंबईला ताई कडे जाऊन येतें म्हणलं, तर तू नाही म्हणालीस.
मला खूप राग आला होता तुझा..”

“गेला ना आता ?”
“हो, बरं, सुनबाई.. चल दारात पणत्या लावते.”
मीनाताई, पणतीने, पणती लावत होत्या.
“आजी, असं का ग?”
“अरे बाळा, ज्योतीनेच ज्योत उजळायची असते बरं का..” त्याला जवळ घेतं त्या म्हणाल्या.
आता त्या निशंक होत्या.
या घरातून जाणारा रस्ता कधीही वृद्धाश्रमाकडे जाणार नव्हता..
समाप्त
©® मृणाल शामराज
सदर कथा लेखिका मृणाल शामराज यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
स्वभाव
अनुभवी फुलपाखरं

Leave a Comment

error: Content is protected !!