हनीट्रॅप ( भाग 1)

©® सौ. हेमा पाटील
लैला मैं लैला…या गाण्यावर उत्तानपणे नृत्य करणारी बारबाला बारमध्ये टेबलांच्या अधून मधून नृत्य करत करत मधूनच उगाचच एखाद्याच्या अंगचटीला जात होती.
एखाद्याच्या गालावरुन बोट फिरवत दुसर्‍याच्या डोक्यावर टपली मारत होती. मद्यासह तिच्या नृत्याचा आस्वाद घेत बेधुंद होऊन काहीजण तिच्या अवतीभवती नाचत होते.    
मनोज मात्र आज एकटाच हातात व्हिस्की चा ग्लास घेऊन नेहमीच्या कोपर्‍यातील टेबलवर उदासपणे बसला होता.
त्याला रोज कंपनी देणारा त्याचा जोडीदार पप्पू आज कामानिमित्त शहराबाहेर गेला होता.

समोर डिशमध्ये आवडीचे खारवलेले काजू होते..एक एक सिप घेत तो समोर चाललेल्या डान्सकडे पहात एखादा काजू मधूनच तोंडात टाकत होता. चाललेले उत्तान नृत्य पहाणारांच्या वासना चाळवत होते.
त्याचे चार बाॅडीगार्ड त्याच्या अवतीभवती कुणाला समजू नये अशा पद्धतीने वावरत होते.
अलिकडे रोज संध्याकाळी मनोज पप्पूसोबत इथे येऊन बसायचा. हातातील ग्लास मधील मदिरा जसजशी पोटात जायची, तसतसे अलिकडे त्याला घरची आठवण त्रास द्यायची.
मनिषा व मुलांचे चेहरे डोळ्यासमोर यायचे अन् तो अधिकच अस्वस्थ व्हायचा.

मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या मनोजने स्मगलिंगच्या धंद्यात उतरल्यानंतर सुरवातीला ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली होती.
रोज सकाळी कामावर जाऊन संध्याकाळी घरी परतणारा मनोज जेव्हा आठवडाभर घरीच राहिला तेव्हा घरच्यांनी व शेजार्‍यांनी रोज रोज एकच प्रश्न विचारुन त्याला भंडावून सोडले की,कामावर का जात नाही?
पण आपल्याला कामावरुन काढून टाकले आहे ही गोष्ट त्याने कुणालाच अगदी मनिषाला ही सांगितली नाही.
आठ दिवसांनंतर त्याने विचार केला व आधीसारखा सकाळी डबा घेऊन तो कामावर जातो म्हणून घराबाहेर पडला व दिवसभर इथे तिथे बसून वेळ घालवून संध्याकाळी घरी परतला.

यानंतर हा त्याचा रोजचाच दिनक्रम झाला. याच दरम्यान एकदा तो जुहू बीचवर एकटाच बसलेला असताना रवी त्याच्याकडे आला.
रवी त्याच्या शेजारी येऊन बसला व त्याला म्हणाला, “नोकरी गेली आहे ना ?”
या परक्या माणसाला हे कसे कळले असावे या विचाराने तो फक्त त्याच्या तोंडाकडे पहात राहिला.
यावर त्याने सांगितले, “मी रवी..मी पण चार वर्षांपूर्वी याच अवस्थेतून गेलो आहे. मी पण असाच तासनतास समुद्रावर येऊन बसायचो” बोलता बोलता त्याने खिशातून सिगारेटचे पाकीट काढले व मनोजसमोर धरले.
मनोजने त्यातील एक सिगारेट घेतली. रवीने दुसरी काढली व खिशातून लायटर काढून दोघांच्याही सिगारेटस् शिलगावल्या.

बोलता बोलता तो मनोजला म्हणाला, “एक काम आहे तुझ्यासाठी. सध्या नवीन नोकरी लागेपर्यंत करणार का ?”
मनोज म्हणाला, “काय काम करायचे आहे ?”
“पार्सल एका ठिकाणाहून दुसरीकडे पोचवायचे आहे. रोजचे एका पार्सलचे १०० रुपये मिळतील. चार पोचवली तर चारशे मिळतील.” मनोजचे डोळे चमकले..नाहीतरी आता महिना भरल्यानंतर घरी कुठले पैसे द्यायचे हा प्रश्न त्याला सतावत होताच.
नवीन नोकरी लागेपर्यंत करायला काय हरकत आहे असे त्याला वाटले.
तो म्हणाला, “ठीक आहे, करेन मी हे काम..”

मग रवीने पार्सल काढले , “हे घे. आजपासूनच सुरवात कर. हे पार्सल या पत्त्यावर पोचवायचे. हे घे रिक्षाला पैसे..अन् हे शंभर रुपये.” लगेचच हातात काम व कामाचे पैसे आल्याने मनोज खुश झाला.
त्याने ती पार्सलची पिशवी, पैसे व पत्ता घेतला व तो उठला. रवीने त्याला कागदावर लिहून एक फोन नंबर दिला अन् सांगितले की, पार्सल पोच केले की या नंबरवर फोन करुन ‘गाडी गॅरेजला पोचवली’ असे सांगायचे.
मनोज शंभरची नोट बघून भुलला होता, त्याची सारासार विवेकबुद्धी काम करत नव्हती.
तो यंत्रवत उठला व रस्त्याच्या दिशेने चालू लागला.

पहिले पार्सल जेव्हा त्याने पोहोचविले व फोन केला की , ‘गाडी गॅरेजला पोचवली’.
हे ऐकून पलिकडून फक्त ओके एवढेच ऐकू आले व फोन बंद झाला.
त्यानंतर मनोजला रोजचीच सवय झाली. कधी दोन ,कधी चार तर कधी सहा पार्सल पण तो पोहोचवत असे.
असेच सहा महिने निघून गेले.
घरी वेळेवर पैसे मिळत असल्याने कुणालाच कसला संशय आला नाही. तो आधीसारखाच रोज डबा घेऊन घराबाहेर पडायचा.

असेच त्यादिवशी रवीने त्याला समुद्रकिनारी गाठले व त्याला म्हणाला, “तू गेले सहा महिने अगदी व्यवस्थितपणे काम केले आहेस, त्यामुळे साहेबांनी तुला भेटायला बोलावले आहे.”
मनोज रवी सोबत गेला..अन् त्याचक्षणी तो या स्मगलिंगच्या जाळ्यात पूर्णपणे अडकला.
साहेबाने त्याला गोड बोलून असे भुलवले की तो एका अड्ड्याची जबाबदारी स्वतःवर घ्यायला तयार झाला.
आज दोन वर्षांनंतर या शहरातील स्मगलिंगच्या धंद्यातील सर्वात महत्वाचा दुवा तो होता.

मनोज शेठ या नावाने तो ओळखला जाऊ लागला होता. पण जेव्हा घरी तो कामावर जात नाही हे कंपनीतील एका सहकार्‍याकडून मनिषाला समजले तेव्हा तिने त्याला याबाबत विचारले. ‌
सुरवातीला तर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
नंतर मी नोकरी बदलली असे सांगितले. पण सत्य थोडेच लपून रहाते ! 
मनोजचे बदललेले वागणे बोलणे, राहणीमानातील बदल ,ओठांत कायम पेटलेली सिगारेट, मोबाईलवर सांकेतिक भाषेत बोलणे.. मनिषाच्या लक्षात आले.

अन् याविषयी विचारले तर तुला काय करायचंय..तुला काही कमी पडत नाही ना..मग यात लक्ष घालू नकोस . हे माझ्या कामाचे स्वरूप आहे असे तो मनिषाला सुनवायचा.
घरात येणाऱ्या महागड्या वस्तू पाहून काहीतरी मोठा लोच्या आहे हे मनिषाला समजले होते. पण नेमके काय ते तिला समजत नव्हते. पण याचा उलगडा तिला लौकरच होणार होता.
साहेबांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त पार्टी होती अन् या पार्टीला कुटु़ंबियांना घेऊन ये असे साहेबांनी सांगितल्यामुळे मनोजपुढे पर्यायच नव्हता. मनिषा व मुलांना घेऊन तो हाॅलवर पोहोचला.

हाॅलची सजावट व एकूणच सगळा श्रीमंतीचा थाट पाहून मनिषा बुजली.
मुले व ती एका बाजूला कोपऱ्यातील टेबलवर बसली. पण साहेबांनी केक कापायच्या वेळी मनोजला मुलांना व मनिषाला बोलवायला सांगितले. तो त्यांना घेऊन गेला तेव्हा साहेबांना तिने हात जोडून नमस्कार केला.
तेव्हा त्याने , “वहिनी हा माझा उजवा हात आहे बरं का !” असे सांगितले.
त्यावेळी याचा संदर्भ न कळून तिने नवर्‍याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले.
मनोजने नजर चुकवली हे तिच्या लक्षात आले.

‘Happy Birthday to you, Happy Birthday dear Soham !’ च्या गजरात केक कापला, पण केक कापण्यासाठी तलवार वापरली गेली. हे पाहून मनिषाचे डोळे विस्फारले. मुलेही कावरीबावरी झाली होती.
जेवणाचा एकंदरीत थाट व जमलेली पाहुणेमंडळी,त्यांची वागण्याबोलण्याची पद्धत हे सगळे पाहून मनिषा चक्रावली.
मनोज आपल्यापासून नक्कीच काहीतरी लपवतोय..काहीतरी चुकतंय याची तिला स्पष्टपणे जाणीव झाली होती.
घरी परतनाना ती गप्प गप्प आहे हे मनोजच्या लक्षात आले.
पण तोही काही न बोलता मुकाटपणे बसून राहिला.

सकाळी नेहमीप्रमाणे मनोजने डबा मागितला तेव्हा मनिषा म्हणाली, “आज सुट्टी काढा,माझे जरा काम आहे.”
हे ऐकून मनोजच्या लक्षात आले की,आजवर टाळत असलेल्या गोष्टीला आपल्याला आता सामोरे जावे लागणार आहे…
मुले शाळेसाठी बाहेर पडली अन् किचनमधील आपली कामे पाच मिनिटांत आवरुन मनिषा बाहेरच्या खोलीत आली तर मनोज कुणाशीतरी फोनवर बोलत होता.
ती समोरच बसून राहिली.
मनोजचा फोन झाला की तिने मनोजला विचारले, “हे सगळे नेमके काय चालले आहे? हे तुमचे साहेब नेमके काय करतात ? अन् नवीन लागलेल्या नोकरीत तुम्ही लगेच त्यांचे उजवा हात कसे झालात ?

घरात पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात पैसा येऊ लागला आहे. नोकरी बदलली तरी पूर्वीच्या चौपट पगार नक्कीच वाढणार नाही हे मला नक्कीच कळते. तेव्हा सत्य काय आहे ते मला हवे आहे.” 
यावर मनोज म्हणाला, “अगं ,माझ्यावर विश्वास ठेव. माझे साहेब खूप चांगले आहेत.”
“हे बघा , साहेब कितीही चांगला असला तरी नोकराचा पगार चौपट करत नाही. तुम्ही काही नको ते धंदे करताय का ? ज्याचा मोबदला म्हणून तुम्हाला इतके पैसे मिळतात..!”
“अगं ,असं काही नसतं. मी फक्त देखरेख व हिशोब ठेवण्याचे काम करतो. अन मी केले नाही तरी माझ्याजागी दुसरे कुणीतरी करणारच आहे. मग मी केले अन् चार पैसे मिळवले तर बिघडले कुठे?”

“घरात येणारा पैसा कष्टाचा व योग्य मार्गाने येणारा असावा , नाही तर त्या पैशाच्या मागून दुःख,दैन्य येतच असते. मला कमी पैसा असला तरी चालेल पण कष्टाचा पैसा हवा. अन आत्ता तुम्ही जे माझ्या नजरेला नजर न देता उत्तरे देताय ना, यावरुनच मला समजतेय….”
“हो ,मिळवतोय मी पैसा, हे कष्टाचा पैसा वैगरे खूळ असते. पैसा पैसा असतो. त्यात भला बुरा काही नसते. पण तोच नसला तर जगणे मुश्किल होते. मला माझ्या मुलांचे, तुझे आयुष्य सुखात जावे असे वाटते.”
“पण पूर्वी आम्ही सुखात नव्हतो असे का वाटले तुम्हाला? पैसा हेच सर्वस्व नसते.”

“तुझे हे मत काही दिवसांनी नक्की बदलेल. जेव्हा तुला या सुखासीन आयुष्याची सवय होईल याची मला खात्री आहे.” असे मनोज म्हणाला.
यावर मनिषाने सांगितले, “पण हा पैसा माझ्या मुलांसाठी व माझ्यासाठी वापरायचा नाही मला. अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही मागे फिरा.. पूर्वीसारखी एखादी नोकरी शोधा अन् मिळेल त्या पैशांत आपण सुखाने चटणी भाकरी खाऊ.”
“वेड लागले आहे का मला मागे फिरायला ?”
हे ऐकल्यावर मनिषा म्हणाली, “मग आज मला स्पष्ट बोलावे लागेल, आमच्यासोबत एकत्र रहायचे असेल तर तुम्हाला हे धंदे सोडावे लागतील. आणि हे सोडायचे नसेल तर आम्हाला सोडावे लागेल.”

हे ऐकून मनोज सटपटलाच..मनिषा असे काही बोलेल असे त्याच्या मनीध्यानी ही नव्ह्ते. उलट आपण गोड बोलून, उज्ज्वल भविष्याचे आमिष दाखवून मनिषाचे मन वळवू असा विश्वास त्याला होता.
पण हे ऐकल्यावर त्याला राग अनावर झाला.
रागाच्या तिरीमिरीतच त्याने बॅगेत आपले कपडे, सामान भरले अन् तो मनिषाच्या नजरेसमोर घर सोडून चालता झाला.
मुले घरी आल्यावर विचारतील, बाबा कुठे आहेत? मनिषा अन् ती आपल्याशिवाय कशी राहतील याचाही विचार त्याच्या मनाला शिवला नाही.
उलट चार दिवस पैशांवाचून रहावे लागले की सदाचार,नीती,कष्टाचा पैसा हे सगळे जे डोक्यात खूळ आहे ते सोडून मनिषा आपोआप आपले पाय धरायला येईल असाच विचार त्याच्या डोक्यात घराबाहेर पडताना होता.
क्रमशः
काय होईल पुढे मनोज आणि मनिषाच्या संसाराचे? मनोज त्याचा मार्ग बदलून परत येईल की मनिषा त्याची साथ देईल?
वाचा उद्याच्या अंतिम भागात
©® सौ. हेमा पाटील.

सदर कथा लेखिका सौ. हेमा पाटील यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
ही कथाही अवश्य वाचा
दीप उजळले आनंदाचे
स्वभाव
देणे सौजन्याचे

Leave a Comment

error: Content is protected !!