हनीट्रॅप ( भाग 2)

©® सौ. हेमा पाटील
भाग 1 इथे वाचा
गेल्या भागात अपण पाहिलं की मनोज रागाच्या तिरीमिरीत घरातून बाहेर पडला. त्याला वाटलं की चार दिवस पैशांवाचून रहावे लागले की सदाचार,नीती,कष्टाचा पैसा हे सगळे जे डोक्यात खूळ आहे ते सोडून मनिषा आपोआप आपले पाय धरायला येईल…
आता इथून पुढे….
पण हा त्याचा विचार चुकीचा होता हे मनिषा व मुले आजवर त्याच्याकडे परत तर सोडाच, पण भेटायला ही आली नाहीत यावरुन स्पष्ट झाले .
तो ही परत त्या मार्गाकडे माघारी फिरला नाही. कारण एव्हाना या सुखासीन आयुष्याने त्याच्यावर आपली मोहिनी पसरली होती.
त्याच्या दृष्टीने तो वरवरच्या पायर्‍या चढत राहिला. त्या यशात आपले सुख शोधत राहीला.
आज चार वर्षांनी एकटेच बारमध्ये पेग घेता घेता त्याच्या नजरेसमोरून आपले गतायुष्य सरकून गेले.

त्याच्या हृदयात क्षणभरच मनिषा व मुलांच्या आठवणीने कालवाकालव झाली. पण दुसऱ्याच क्षणी त्याने आपले लक्ष नाचणार्‍या मुलीकडे वळवले.
त्याचवेळी एक लो-कट शर्ट व स्कर्ट घातलेली सुंदर तरुणी त्याच्या टेबलजवळ आली.
“Excuse me sir..आपणच मनोज सर ना ?”
तो सावरुन बसला व हो म्हणाला.
“मी इथे बसून बोलू का सर?”
यावर त्याने मान हलवली .ती खुर्चीवर बसली.

“मला साहेबांनी तुमची भेट घ्यायला सांगितले आहे. हे ऐकून तो रिलॅक्स झाला. कारण आजवर कधीच त्याने कुठल्याही परस्त्री शी कसलाच संबंध येऊ दिला नव्हता. तो ज्या फिल्डमध्ये वावरत होता तिथे या गोष्टींना तोटा नव्हता.
पण आता तो बायकोपोरा़ंपासून ,घरापासून चार वर्षे दूर होता तरीही त्याच्या मनात कधीच असा विचार आला नव्हता.
“मी दिल्ली येथे आपले काम पहाते. सध्या कामानिमित्त मुंबईला आले आहे तेव्हा तुमच्या साहेबांनी सांगितले की, मनोजशी चर्चा करा. तो तुम्हाला यातील बारकावे छान समजून सांगेल.”
एव्हाना मनोजवर मदिरेने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली होती.

ती जवळ आल्यावर त्याचे बाॅडीगार्ड जवळ आले पण त्यानेच हाताने त्यांना थांबवले.
मनोजने जेवणासाठी वेटरला आवाज दिला ,वेटरने जेवण आणून ठेवले व प्लेटस मांडल्या. तिने खुणेनेच वेटरला जायला सांगितले व स्वतः जेवण सर्व्ह करायला सुरुवात केली.
त्याची डिश त्याच्याकडे अदबीने सरकवत तिने स्वतःच्या डिश मध्ये वाढून घेतले अन् जेवत जेवत मधूनच त्याला व्यवसायासंबंधी काहीतरी विचारत ती जेवू लागली.
मनोजची नजर त्याच्याही नकळत अधूनमधून तिच्याकडे जात होती.

तो तिच्याकडे पहाणे टाळण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याची नजर त्यांच्याशीच बेईमान झाल्यासारखी पुन्हा पुन्हा तिकडेच वळत होती.
ती खूपच सुंदर होती. तिने घातलेल्या लो-कट शर्ट व शाॅर्ट स्कर्ट मधून तिचे शरीरसौष्ठव ठळकपणे जाणवत होते.
नाही म्हंटले तरी मनोज पुरुष होता अन् इतके दिवस स्त्री सहवासावाचून असल्याने त्याची नजर तिचे लक्ष नाही असे पाहून तिच्या शरीरावरुन फिरत होती.
तिला हेच तर साध्य करायचे होते. हेच काम तिच्यावर सोपवले गेले होते.

वास्तविक मनोज जे काम करत होता ते या आधी छगनशेठ करायचा. त्याचा साहेबांच्या नजरेतील भाव मनोजच्या येण्याने अगदी कमी झाला होता. मनोजचा फंडा होता, जे पण काम करायचे ते तळमळीने व प्रामाणिकपणे करायचे.
त्यामुळे अल्पावधीतच त्याने धंद्यातील बारकावे समजून घेत आपली छाप पाडली व साहेबाने या शहरातील सर्व सूत्रे त्याच्या हातात दिली. गेली पंधरा वर्षे साहेबांच्या हाताखाली काम करणाऱ्या छगनशेठला हे रुचले नाही.
कालचा आलेला पोरगा, आपल्याला डावलून पुढे जातो हे त्याला सहन झाले नाही. त्याचा अहंकार दुखावला गेला.

त्याने मनोजला साहेबांपासून दूर करण्याचा हरप्रकारे प्रयत्न केला पण त्याला त्यात यश आले नाही.
तेव्हा त्याने विचारपूर्वक पावले टाकत हा हनीट्रॅप योजला होता. गेली चार वर्षे मुलाबाळांपासून दूर रहाणारा मनोज या ट्रॅप मध्ये अडकेल असा त्याचा कयास होता.
मनोजची शरीरावरुन अधीरपणे फिरणारी नजर पाहून आपण पहिली लढाई तर जिंकली आहे हे ज्युलीच्या लक्षात आले.
मग तिने जेवण सर्व्ह करण्याच्या बहाण्याने त्याच्या हाताला स्पर्श केला.
त्यावेळी त्याचा शहारलेला स्पर्श तिला बरेच काही सांगून गेला.

जेवण झाल्यावर तिने आईस्क्रीम मागवले. हात धुण्यासाठी व फ्रेश होण्यासाठी बेसीनजवळ गेल्यावर तिने मोबाईल वरुन फोन केला व या हाॅटेलमध्ये बुक केलेल्या रुमबाबत विचारणा केली.
फोनवरून रुम नंबर सांगण्यात आला.
टेबलजवळ परत येत तिने खुर्चीवर बसताना खुर्ची मुद्दाम मनोजच्या खुर्चीजवळ सरकवली. बसताना तिच्या पायाचा स्पर्श मनोजच्या पायाला झाला. तीने मनोजकडे आपल्या मदभर्या नजरेने पहात आपण माझ्या रुममध्ये बसून बोलूया का असे विचारले.
यावर मनोजने होकार दिला. एव्हाना तिच्या सौंदर्याचा अ़ंमल त्याच्या पुरुषत्वावर चढू लागला होता.
मदिरेने आपले काम करत नीतीअनीतीचा विचार करण्याची शक्ती लुळी पाडली होती. आता त्याच्यातील पुरुष जागा झाला होता….

तीने वेटरला बोलावून आपला रुम नंबर सांगितला व काॅल केल्यावर आईस्क्रीम रुमवरच पाठवून द्यायला सांगितले.
मनोजने आपल्या बाॅडीगार्डना जवळ बोलावून सांगितले की,तो आज इथेच रहाणार आहे तुम्ही गेलात तरी चालेल.
ज्युलीकडे एक कटाक्ष टाकत ते चौघेही हाॅटेलबाहेर पडले.
ते चौघेही बाहेर पडल्यावर ज्युली उठून उभी राहिली व अचानक तोल गेल्यासारखे करत मनोजच्या अ़ंगावर कल़ंडली.
बेसावध मनोज सावरला,पण तिच्या स्पर्शाने तो अधिकच अस्वस्थ झाला. ती स्वतः ला सावरत उठली, मनोजही उठून उभा राहिला. तिच्यामागोमाग मनोज निमूटपणे रुमच्या दिशेने चालू लागला.

रुममध्ये गेल्यावर फ्रेश होऊन कपडे बदलण्यासाठी ती बाथरुममध्ये गेली. मनोज बेडवर उशीला टेकून बसला होता. तीने बाथ घेतला व झिरझिरीत गाऊन घालून ती बाहेर आली. तिच्याकडे पहाताच मनोज अधिकच अस्वस्थ झाला.
एवढ्यात दरवाजावर टकटक झाली. तीने येस म्हणताच वेटर आईस्क्रीम चे बाऊल घेऊन आत आला व ठेवून माघारी फिरला.
तीने मनोजजवळ बसत एक बाऊल त्याच्या हातात देऊन दुसरा आपल्या हातात घेऊन खायला सुरुवात केली.
मनोजला यावेळी आईस्क्रीम खायची अजिबात इच्छा नव्हती. त्याने बाऊल साईड टेबलवर ठेवला, आणि तो अनिमिष नेत्रांनी तिच्या झिरझिरीत गाऊन मधून स्पष्टपणे दिसणारे तिचे सौंदर्य न्याहाळत तसेच बसला होता.

आईस्क्रीम वितळत चालले होते. तिरक्या नजरेने मनोजकडे सगळे लक्ष असणार्‍या ज्युलीने त्याला एकेक प्रश्न विचारायला सुरुवात केली. मग हळूच आपल्या बाऊलमधील एक चमचा आईस्क्रीम त्याच्या समोर धरले.
त्याने तोंड उघडले पण त्याचक्षणी तिचा हात धरुन तिला आपल्याकडे ओढले.
दोघांचेही आईस्क्रीम चे बाऊल शेजारच्या साईड टेबलवर ठेवले गेले, अन् त्यातील आईस्क्रीम वितळत असतानाच मनोजच्या देहात इतके दिवस साचून राहिलेली स्त्रीसंगाची ओढ ज्युलीच्या मादक सहवासात हळूहळू फुलत जेव्हा पूर्णत्वास गेली तेव्हा तो ज्युलीच्या मिठीत शांतपणे विसावला होता.

यापुढे रोजचीच रात्र ज्युलीच्या सहवासात जाऊ लागली. ज्युलीच्या आक्रमक प्रणयात तो इतका वाहवत गेला की तो रोज रात्र कधी होते याची वाट पाहू लागला.
ज्युलीने आपला कार्यभाग साधण्यासाठी त्याला आपल्या देहाच्या सहाय्याने जणू आपले गुलाम बनवले होते. या कालावधीत त्याच्या नजरेसमोर कायम ज्युलीचा अनावृत्त देह तरळत असे.
त्याचे आपल्या कामाकडेही दुर्लक्ष होऊ लागले. पप्पूने त्याला सावरण्याचा व यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला,पण तो अयशस्वी ठरला.

पुढे पुढे तो दिवसभर ज्युलीच्या सोबतच राहू लागला. जाईल तिकडे ज्युली त्याच्या सोबत असे.
छगनने आपला एक्का बरोबर टाकला होता. ‌तीर अगदी निशाण्यावर बसला होता.
हा सगळा गेम छगनचा आहे याची सुतराम ही कल्पना मनोजला आली नव्हती. आता छगनने परत साहेबांच्या नजरेत आपले काम कसे उठावदार आहे हे दाखवून द्यायला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सुरवात केली.
साहेबांच्या कानावर ही मनोजबाबत आले पण सुरवातीला त्यांनी दुर्लक्ष केले. पण कामाच्या बाबतीत जेव्हा मनोजची चाललेली चालढकल त्यांच्या लक्षात आली. त्याचक्षणी त्यांनी मनोजला पत्रातील पानासारखे दूर भिरकावून दिले.

सुरवातीला तर मनोजला काय झाले ते समजलेच नाही.पण जेव्हा समजले तेव्हा तो अक्षरशः रस्त्यावर आला होता.
ना घर का ना घाट का अशी त्याची अवस्था झाली होती.
या क्षेत्रात जेवढे वर चढणे सोपे असते तेवढेच भिरकावून देणेही… हे आज मनोजला समजले होते. पण खूप उशीर झाला होता. त्याची एक चूक त्याला इतकी महागात पडली होती.
इतकी वर्षे आपल्या मेहनतीने उमटवलेला ठसा क्षणात पुसला जाऊन त्याचे अस्तित्व पुसले गेले होते. ती जागा छगनशेठने बळकावली होती.

अन् ज्या ज्युलीच्या सहवासात तो इतका वाहवत गेला होता ती ज्युली आता स्वतःच्या अंधेरीतील पाॅश एरीयातील नव्याकोऱ्या फ्लॅट मध्ये रहात होती. अन् फ्लॅट सोबतच दिलेल्या फोरव्हिलर मधून फिरताना छगनशेठचे मनोमन आभार मानत होती.
कारण या पाॅश एरियात रेंटवर रहाण्याची ही तिची ऐपत नव्हती. तो तिला तिच्या कामगिरीसाठी मिळाला होता.
अर्थात यासाठी आपल्या स्त्रीत्वाचा बळी तिला द्यावा लागला होता पण तिच्यासारख्या मुलीला त्याचे दुःख नव्हते.
आता दुसरा कुठला हनीट्रॅप मिळतोय का या शोधात ती होती.
समाप्त
©® सौ. हेमा पाटील
सदर कथा लेखिका सौ. हेमा पाटील यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
ही कथाही अवश्य वाचा
दीप उजळले आनंदाचे
स्वभाव
देणे सौजन्याचे

Leave a Comment

error: Content is protected !!