ओढ

©® धनश्री दाबके
चार दिवस सारिकाला आणि नातवंडांना भेटायला म्हणून आलेल्या वसुधाचं घरात पाय घसरून पडण्याचं निमित्त झालं आणि तिचा हात फ्रॅक्चर झाला. पायालाही बऱ्यापैकी मार लागला.
सकाळच्या ऑफिसच्या, शाळेच्या वेळीच नेमका हा प्रकार झाला. मग सारिका आणि सुजयने घाईघाईने वसुधाला दवाखान्यात नेलं. मुलांना शाळेसाठी तयार करायची जबाबदारी सारिकाच्या सासूबाई, अंजलीताईंनी उचलली.
दोन तीन तासांनी दवाखान्यातले सगळे सोपस्कार पार पाडून पायाने लंगडत व हात गळ्यात बांधूनच वसुधा घरी आली.

मग काय हालचालींवर बंधनं आल्याने वसुधा आणि सुधीरचं परत निघायचं लांबलं.
चार दिवसांकरता आलेले दोघं महिना दीड महिना होत आला तरी सारिकाकडेच अडकले.
वसुधाला लागल्याचं कळल्यावर प्रकाश आणि आरती लगेचच भेटायला आले.
“आई तुझ्या पायाची सूज उतरली, तुला थोडं बरं वाटलं की लगेच न्यायला येतो” प्रकाश म्हणाला.
पण सारिकाने त्याला, आई पूर्ण बरी झाल्याशिवाय आम्ही तिला पाठवणारच नाही, असं सांगितलं.

आरतीनेही ‘आईंना घरीच येऊ दे, कितीही म्हंटलं तरी त्यांना तुझ्याकडे अवघडल्या सारखं होईल, तुझीही खूप ओढाताण होईल’ असं सारिकाला समजावून पाहिलं. पण सारिकाने आईचं प्लॅस्टर काढल्यावरच आई येईल हा तिचा हट्ट काही सोडला नाही.
सुजयने ‘आम्ही आईंची अगदी व्यवस्थित काळजी घेऊ, तू निर्धास्त राहा’ असं म्हंटल्यावर प्रकाशला जास्त काही बोलता आलं नाही.
आई बाबा घर सोडून चार दिवसांपेक्षा जास्त कुठे रमत नाहीत हे प्रकाश आणि आरती दोघांनाही माहीत होतं. पण सारिकाचं सासर असल्याने त्यांना आम्ही आईला घेऊनच जातो असं म्हणता येईना.
वसुधा आणि सुधीरचीही तीच पंचाईत झाली.

“लेक एवढी प्रेमाने म्हणतेय तर राहा की आमच्याकडे, मी ही आहे तुमच्या सोबतीला दिवसभर..” असं अंजलीताईंनी म्हंटलं आणि वसुधाने लगेच घरी परत जाण्याचा विचार मनातच दाबून टाकला.
सारिकाने पंधरा दिवसांकरता ऑफिसमधून सुट्टी घेतली.
सारिका, सुजय, त्यांची ८ व ६ वर्षांची दोन मुलं, अंजलीताई असा परिवार. आता त्यात वसुधा आणि सुधीर ॲड झाले.
सारिकाने पहाटेपासून तिचं व्यवस्थित रूटीन बसवून घेतलं. अंजलीताईंनीही तिला समजून घेऊन साथ दिली.. आणि वसुधाचं खाणं पिणं, औषध पाणी, आंघोळ, मसाज, डॉक्टरकडचा फॉलो अप सगळं व्यवस्थित मॅनेज होऊ लागलं.

आता हे आजी आजोबाही घरी असल्याने दोन्ही नातवंडं खूप खुश होती. सुजय आणि अंजलीताईंनीही वसुधा, सुधीरला खूप छान रितीने आपल्यात सामावून घेतलं होतं.
पण तरी दोघांना अवघडल्यासारखं वाटतच होतं. जावयाच्या घरी किती दिवस राहायचं आणि त्याच्याकडून किती करून घ्यायचं ! त्यात वसुधाला औषधांच्या डोसमुळे व्यवस्थित झोप लागत होती पण सुधीरला जागा बदलली की झोप लागायची नाही.
आधीच रोजचं रूटीन बदललं होतं त्यात झोपही पूर्ण होत नव्हती. त्यामुळे आपली तब्येत बिघडून सारिकावर अजून ताण पडू नये या विचाराने सुधीर तिकडे बॅंकेची महत्वाची कामं आहेत ती करून मी थोड्या दिवसांत परत येईन म्हणून घरी परत गेला.

वसुधा पडल्याचं कळल्यावर तिला तिच्या मैत्रीणींचे चौकशीसाठी फोन येत होते.
त्यांच्याशी बोलतांना वसुधाचं, सारखं सारखं मी पडल्यामुळे इथेच अडकली आहे…उगीच सारिका आणि तिच्या घरच्यांना माझं करावं लागतंय.. वगैरे वगैरे बोलणं सारिकाला अस्वस्थ करत होतं.
मी इतकं मनापासून आईचं करतेय, शिवाय कधीही तिला त्याची जाणीव करून देत नाही.. पण तरी आईला मात्र ती इथे अडकली आहे असं वाटतंय..
शेवटी आईला दादा आणि आरतीचंच कौतुक जास्त. काय कमी आहे आईला इथे? पण तरी तिचं लक्ष सारखं तिकडेच.. बाबा जेवले का? कामवाली आली का? नात शाळेतून आली का? आरतीने जेवायला काय केलंय? याच सगळ्या विचारांत असते ती..

आत्ताही सगळे जेवायला बसले होते. सारिकाने आईला आवडते तशी घट्ट आटवलेल्या दुधातली शेवयांची खीर आणि टम्म फुगलेली गरम पुरी आईच्या पानात वाढली.. पण आईचं सगळं लक्ष तिच्या फोनकडे होतं.
प्रकाश ऑफिसमधून आला का याच्याकडे.. आज म्हणे तिकडे अचानक जोरदार पाऊस झाला होता.. त्यामुळे दादा सुखरूप घरी आल्याचं कळल्याशिवाय आईला खीर गोड लागणार नव्हती..
इतरवेळी सारिकाला यात काहीच वावगं वाटलं नसतं.. पण आत्ता तिचं चित्त थाऱ्यावर नव्हतं..
आई शरीराने इथे असली तरी मनाने तिकडे तिच्याच घरी आहे.. हे सारिकाला आवडत नव्हतं..

“छान झालीये ग सारिका खीर पुरी..” अंजलीताई म्हणाल्या आणि वसुधा भानावर आली.
” हो ग सारिका.. मस्तच झालीये.. माझे अगदी लाड पुरवते आहेस तू ! पण कशाला ग उगाच इतकं करत बसलीस.. आधीच किती दमछाक होते तुझी.. माझ्यामुळे तुझं काम वाढलंय. त्यात हे सगळं…” आईची पुढची नेहमीची वाक्य सारिकाला पाठ होती.
ती काही न बोलताच पुऱ्या तळायला आत निघून गेली.
लाड पुरवते आहे म्हणते आहे तरी त्यापुढे हिचा पण आहेच..

खरंच प्रेमाने केलेलं करून घेताही आलं पाहिजे.. हिला कुठलं ते जमायला ! .. त्यासाठी मोकळा स्वभाव पाहिजे..
नाहीतर माझ्या सासूबाई बघ.. त्यांच्या लेकीकडे जातात तेव्हा तिथल्याच होऊन जातात.. उगीच सारख्या इथे काय चाललंय त्याच्या चौकशा करत बसत नाहीत.. सारिकाचं मन वाऱ्याच्या वेगाने धावत होतं..
पण हा विचार मनात आला आणि सारिका दचकली..
खरंतर आपलं लग्न नवीन नवीन असतांना आईही त्यांच्या लेकीकडे फार जायच्या नाहीत.. तिच्याकडे राहायला तर त्यांना नकोच असायचं..

पण आपणच घरात जरा म्हणून मोकळीक नाही.. सासूबाईंना एकटं ठेवून कुठे ट्रीपलाही जाता येत नाही.. आपल्याला आपला असा वेळच मिळत नाही.. अशी सतत सुजयकडे कटकट करायचो..
ती जाणवल्यामुळेच की काय आई अधून मधून ताईंकडे जायला लागल्या.. तरी तिथे गेल्यावर त्यांचंही लक्ष इथेच असायचं.. फोन करून सगळं विचारत राहायच्या.. जसं आत्ता आई करतेय…
पण त्यांची ती स्वतःच्या घराबद्दलची ओढ समजून न घेता आपण त्या तिथूनही आपल्याला कंट्रोल करायला बघतायत असा अर्थ काढला.. मग त्यांचा फोन आल्यावर नकळत का होईना पण आपली होणारी चिडचिडही त्यांना समजली.. त्यानंतर हळूहळू त्यांनी सारखे फोन करणंही बंद केलं..

त्या अजिबात फोन करत नाहीत म्हंटल्यावर आपण त्या तिकडेच रमल्या आणि नातवंडांनाही विसरल्या असा अर्थ काढू लागलो..खरंच किती वाईट्ट आहे माझं मन..
आईबद्दलची नाराजी बाजूला पडली आणि सारिकाला स्वतःच्याच विचारांची लाज वाटू लागली.. आज आपण या काठावर आहोत तेव्हा आपल्याला पलिकडच्या काठावरून दिसणारी हिरवळ टोचायला लागलीये..
नाहीतर इतके दिवस आपल्या वागण्यामुळे आईंची होणारी कुचंबणा, त्यांनी त्यांच्या स्वभावाला घातलेली मुरड हे सगळं कधी लक्षातही आलं नाही..

त्यांनी सगळं शांतपणे स्वीकारलं आणि स्वतःला बदललं.. कधी त्याबद्दल नाराजीचा सूरही काढला नाही..की त्यांनी तो काढूनही माझ्या स्वकेंद्रीत मनाला कधी ऐकूच आला नाही?? खरंच एक स्त्री असूनही मी दुसऱ्या स्त्रीची घराबद्दलची ओढ समजून घेऊ शकले नाही.. आधी आईंची आणि आता स्वतःच्याच आईची… तिचं मन तिकडे आहे म्हणजे आपण कुठेतरी कमी पडतोय असा त्याचा अर्थ नाही…. सारिकाचे डोळे वाहू लागले..
मनातलं मळभ बाहेर पडलं आणि सगळं चित्र स्वच्छ दिसू लागलं.. त्यातलं आईचं अवघडलेपण समजू लागलं..
उगीच आपण काहीतरीच विचार करत होतो.. इथे काहीतरी कमी आहे म्हणून आईला घरी जायची घाई नाहीये.. तर आपापल्या घरी परतण्याची ओढ वाटणे ही प्रत्येकाची मूलभूत प्रवृत्ती आहे.. ज्याला मीही अपवाद नाही..मी आईंशी खूप चुकीचं वागले या जाणीवेने तिचे डोळे परत भरून आले.

इतक्यात आईsss पुरी sss म्हणून धाकट्या लेकाने बोलावलं आणि भराभर डोळे पुसत सारिका पुऱ्या घेऊन बाहेर गेली. एक हात प्लॅस्टरमधे असलेली आई हळूहळू जेवत होती..
मग सारिकाने आधी आरतीला व्हिडीओ कॉल लावला. प्रकाश नुकताच घरी आला होता.
प्रकाशच्या मुलीने, ‘आज्जी आता ये ना ग लवकर घरी…i miss you so much. या वीकेंडला येशील?” असं विचारल.
त्यावर वसुधा काही बोलायच्या आधीच सारिका हसून म्हणाली, “yes बेटा, आजी तुम्हा सगळ्यांना, तिच्या घराला खूप मिस करतेय.. येईल ती आता लवकरच..” हे ऐकल्यावर आजी आणि नात दोघीही खुश झाल्या.

‘आई, बाबा यंदा दिवाळी इथेच करून जा’ असं म्हणणाऱ्या सारिकाने तिचा आता मात्र तो विचार बदलला आणि डॉक्टरांशी बोलून लगेचच्या वीकेंडला ती सुजय बरोबर जाऊन आईला घरी सोडून आली.
घरी पोचल्यावर आईच्या आणि घरातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सारिकाला खूप बरं वाटलं.
आईला सुखरूप घरी सोडून एका वेगळ्याच समाधानाने सारिका घरी परतली.
एक छोटीशी पडझड सारिकामधे मोठ्ठा बदल घडवून गेली.
समाप्त
©® धनश्री दाबके

सदर कथा लेखिका धनश्री दाबके यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
ही कथाही अवश्य वाचा
दीप उजळले आनंदाचे
स्वभाव
देणे सौजन्याचे

Leave a Comment

error: Content is protected !!