नवं माहेर

©️®️सायली जोशी.
निशाला माहेरी जायला खूप आवडायचं. तसं सगळ्यांचं स्त्रियांना ते आवडतं म्हणा.
‘माहेर’ म्हंटल की समस्त स्त्रियांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो तो!
असो, तर निशाला सासरच्या गोतावळ्यातून वर्षातून एकदा माहेरी जायला मिळायचं. तेही कसेबसे चार दिवसच.
तसं तिच्या माहेरी कोणी नव्हतं, फक्त ती आणि आई दोघीच असायच्या.
एरवी या मोठ्या घरात आई एकटी राहायची. पण निशा आली की काय करू अन् काय नको? असं व्हायचं आईला.

तिच्या येण्यानं घर अगदी भरून जायचं. आईला समाधान वाटायचं.
इथे आल्यावर निशा मनसोक्त आराम करायची आणि आई सारखी तिच्या मागे -पुढे करत राहायची.
चहाच्या वेळी दोघी मस्त गप्पा मारायच्या. त्यात अगदी राजकारणापासून ते गल्लीच्या तोंडाशी नेहमी होणाऱ्या भांडणांच्या गप्पा मस्त रंगायच्या. या गप्पांच्या नादात चहा गार व्हायचा आणि आई भर घालून पुन्हा चहा गरम करून आणायची. हा अलिखित नियमच होता जणू.
मग रोज संध्याकाळी जेवायला काय करायचं? यावरून दोघींचा वाद ठरलेला असायचा.

पण आई तिच्या मनाचं करायची ही गोष्ट वेगळी. शेवटी आईच्या हातचं जेवण ते! निशाला काहीही केलं तरी आवडायचं.
इकडे निशाच्या सासरी कोणाला गप्पा मारायला वेळच नसायचा.
मोठा दीर ऑफिसला निघून जायचा. पाठोपाठ तिचा नवरा सुद्धा गडबड करायचा. वेळ झाली की जाऊबाई शाळेत जायच्या आणि सासुबाई देवळात. लहान दिर कॉलेजला पळायचा अन् सासरे आपल्या ज्येष्ठ मित्रांच्या कट्ट्यावर रमायचे!
मध्येच आजे सासुबाई तिला हाका मारून सारख्या सूचना द्यायच्या. त्यांना वाटायचं जणू ही आपलं सगळं ऐकते.

पण निशाला मात्र आपल्या सासुबाईंच्या म्हणण्याप्रमाणे वागायची आज्ञा दिली गेली होती.
ही आज्ञा शिरसावंद्य मानून निशा घरची सगळी कामं नीटनेटकी करायची.
नाही म्हंटल तरी, जाऊबाई तिला जमेल तशी मदत करून जायच्या. पण सासुबाई मात्र मोकळ्या हाताने तिची गडबड नुसत्याच पाहत राहायच्या. याचा कधी कधी निशाला राग यायचा.
पण तसं त्याचं वागणं – बोलणं प्रेमळ असल्याने तिचा राग फार काळ टिकायचा नाही.

माहेरी आल्यावर मात्र निशा सासर विसरून जायची.
तिथे खूप काम पडतं म्हणून आई तिला काही करू द्यायची नाही. पण जाताना मात्र ‘सासरच्या लोकांची मनं सांभाळ, कोणाला काही कमी पडू देऊ नको’ म्हणून दम वजा समजावून सांगायची.
आणखी दोन दिवस माहेरी राहायची हुक्की आली की निशा सासुबाईंना फोन करून सांगायची, ‘माझी तब्येत बरी नाही.’ मग नाईलाजाने त्या रहा म्हणायच्या.
माहेरी गेल्यानंतर आपली सून  आजारी कशी काय पडते? हे एक कोडंच होतं त्यांच्यासाठी.

जाऊबाई नोकरीच्या असूनही माहेरी आठ -आठ दिवस राहून यायच्या.
‘ती नोकरीला जाते’ असं म्हणत निशाच्या सासुबाई तितकी सूट द्यायच्या. तसं पाहायला गेलं तर जाऊबाईचं माहेर गडगंज होतं. त्याचा त्यांना अभिमान असला तरी गर्व नक्कीच नव्हता.
निशाची आई इतक्या मोठ्या घरात एकटी कशी काय राहते! याचं त्यांना खूप आश्चर्य वाटायचं.
“तुझ्या आईला भीती नाही का वाटत?” असं त्या नेहमी निशाला म्हणायच्या.
त्यांनाही उत्सुकता होती, निशाचं माहेर पाहण्याची!

कधी कधी निशाला वाटायचं, जाऊबाईंना सुट्टीत आपल्या माहेरी घेऊन यावं. पण पुन्हा तिचा विचार बदलायचा. रोज तर एकत्र असतो आपण! निदान माहेरी तरी निवांत राहायचं सुख मिळू दे की. आई सुद्धा तिला दरवेळी आठवण करून द्यायची, “पुढच्या वेळी येताना तुझ्या जाऊबाईंना घेऊन ये.” पण निशा ते टाळायची.
लवकरच सुट्ट्या पडल्या आणि सासुबाईंनी फर्मान काढलं. “या सुट्टीत दोन्हीं सुना आपापल्या माहेरी जाणार नाहीत.”
असं का? तर सासुबाई स्वतः आपल्या माहेरी जाणार होत्या.

निशाचं लग्न झाल्यापासून म्हणजेच गेल्या चार वर्षांत सासुबाईंनी त्यांच्या माहेरचं नाव सुद्धा काढलं नव्हतं आणि आता अचानक जायची तयारी! दोन्ही सुनांना एकदम आश्चर्य वाटलं.
“असं काय बघताय दोघी? मला सुद्धा माहेर आहे, हे विसरलात की काय? नेहमी सुनांनीच आपापल्या माहेरी जावं असं कुठे असतं?”
सासुबाईंनी हा..लाडवाचा घाट घातला. चांगले शंभरभर लाडू वळायला घातले.
खमंग चिवडा करायची ऑर्डर सुनांना दिली गेली.

त्यांनी आपली बॅग भरून तयार ठेवली आणि तिन्ही मुलांना त्यांच्या खोलीत जाऊन बऱ्याच सुचना दिल्या. आपल्या सासुबाईंची सोय लहान दिराकडे लावून त्या निवांत बसल्या.
“वहिनी, वर्षातून फक्त एकदा माहेरी जायला मिळतं. यावेळी तेही मिळणार नाही. एरवी सासुबाई स्वयंपाक घरात पाऊल सुद्धा टाकत नाहीत. माहेरी जायचं म्हणून किती उत्साहाने लाडू, चिवडा केला. केला कुठला? तसं आपल्यालाच करावं लागलं सगळं.” निशा चेहरा पाडून म्हणाली.

“मग काय तर? मी नोकरी करते म्हणून निदान आठ दिवस तरी माहेरी जाऊ शकते. पण तुला कसेबसे चारच दिवस मिळतात.” जाऊबाई मनापासून म्हणाल्या.
“हो..माझी आई तुम्हाला कधीची राहायला बोलवते आहे. पण मीच तुमच्या वतीने नकार द्यायचे. वाटायचं, माहेरी हक्काने एकटीने राहावं.” निशा खरं खरं म्हणाली. तसे जाऊबाईंनी डोळे मोठे केले.
पण दोघींची मनं साफ झाली होती. एकमेकींकडे बघून दोघी छान हसल्या.

“ते चुकलंच माझं. यावेळी जाऊ आपण.” निशा उत्साहाने म्हणाली.
“आता कुठे जायला मिळतंय? सासुबाई एकदा गेल्या की महिनाभर काही यायच्या नाहीत. या चार वर्षांत त्या कशा काय गेल्या नाहीत? देवालाच ठाऊक.” जाऊबाईंनी माहिती पुरवली.
समोरून सासुबाई येताना दिसल्या. तशा दोघी गप्प बसल्या.
“चला, दोघींनी आपापल्या बॅगा भरायला घ्या.” त्यांनी हुकूम सोडला.

आता आपल्याला सुद्धा माहेरी जायला मिळणार म्हणून दोन्ही सुनांना खूप आनंद झाला.
“चला, आटपा लवकर.  तुम्ही दोघी माझ्यासोबत, माझ्या माहेरी येताय. तिथे चांगल्या आठ दिवस राहा. मग वाटलं तर इकडे निघून या.” सासुबाईंचा आदेश मोडणं दोघींनाही जमणार नव्हतं.
दोघी निमूटपणे बॅगा भरून सासुबाईंच्या माहेरी पोचल्या देखील.
तिथे इतका सारा गोतावळा होता. हे पाहून त्यांना दडपण आलं. पण मंडळी मनानं अतिशय चांगली होती.

सासुबाई तर आपल्या सुनांचं कौतुक सांगून थकत नव्हत्या. हे पाहून दोघींची मनं सुखावली.
लवकरच दोन्ही सुना तिथे रमल्या. आठाचे दहा दिवस झाले, तरी या दोघी तिथून निघायचं नाव घेईनात.
शेवटी सासुबाईचं म्हणाल्या, “माहेर हे माहेर असतं. ते सुनेचं असो वा सासूचं. माहेरची ओढ निराळीच असते. आता गेलात तरी चालेल बरं. तुम्हा दोघींचे नवरे वाट बघत असतील तिकडे. त्यांची आठवण आहे की नाही?”
हे ऐकून आपापल्या नवऱ्याच्या आठवणीने दोघींचाही जीव भरून आला.

“आता निघायला हवं” असं म्हणत सर्वांचा निरोप घेऊन दुसऱ्या दिवशी त्या बाहेर पडल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक निराळंच समाधान दिसत होतं. एक वेगळीच ऊर्जा त्यांना मिळाली होती.
‘माहेर’ म्हणजे आपल्याला समजून घेणारी आई आणि तिचं घर, आपलं हक्काचं घर. इतकीच मर्यादित संकल्पना रुजलेल्या मनाच्या घरट्यात या दोन्ही सुनांना एक नवं माहेर मिळालं होतं, हे मात्र खरं.
सासरी आल्यावर दोघी जावा मनापासून, नव्या उत्साहाने कामाला लागल्या.
नवं माहेर गवसल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून अगदी ओसंडून वाहत होता.
©️®️सायली जोशी.
सदर कथा लेखिका सायली जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
ओढ
दीप उजळले आनंदाचे
स्वभाव

Leave a Comment

error: Content is protected !!