कुवत

©सौ. प्रतिभा परांजपे
सुनंदा ताई फुलांचा हार करत बसल्या होत्या. केशव राव पेपर वाचत होते. ते सकाळी फिरायला जात तेव्हांच फुल घेवून येत ! 
सुनंदा बाईंनाही ते म्हणायचे बरोबर चल म्हणून पण सकाळी कामाची घाई असल्याने त्या संध्याकाळी फिरायला जात.
मुलगा सून दोघ कामावर जाणारे, त्यामुळे सकाळची कामं पटापट उरकावी लागत! सुनबाई टिफीन घेऊन जात. .
सुनबाईचं किचन मध्ये  कामं सुरू होतंं. तिला दहा वाजता आपल्या बुटीकला जायचे होते.
मुलगा राजीव, त्याचे आरामात आटपत होता. त्याला ही आफिस होते.. तो मेनेजर.. पण तो जरा उशिराच निघत.

नात ऋचा सोळा वर्षांची, नुकतिच काॅलेजला जाऊ लागलेली, दुसरी ‌नात  हृदा दहावीत.
ऋचा उठून आली व आजीजवळ येऊन बसली.
तिच्या कॉलेजला आज सुट्टी होती. थोड्या वेळाने मुलगा व सून कामावर गेले.
सुनंदा बाईंनी अंघोळ व पूजा केली व बाहेर येऊन जप करायला बसणार तेवढ्यात नात ऋचा म्हणाली, “आजी, आई-बाबा मुलांवर  सारखच प्रेम करतात ना?”
“हो- कारण ते त्यांचेच असतात! आता कोणी आईचा जास्त तर कोणी बाबांचा जास्त  लाडका.”

“पण मग ते दोघांशी सारखे का वागत नाही?” 
“कोणाबद्दल विचारतेस ग?”
“असंच.” 
“प्रेम सारखच असतं. पण वागणूक ,परिस्थिती, मुलांचा स्वभाव यावर बरचस अवलंबून असतं. म्हणजे प्रेम नसतं असं नाही.”
“पण मग ते दोन्ही मुलांमध्ये भेदभाव का करतात ?”

“कसा भेदभाव ? कपडे जेवण सर्व सारखेच देतात.”
“तसं नाही ही ग– 
“तू तर आई बाबा दोघांची लाडकी–“
“माझं नाही म्हणत–”
“तुला नेमकं काय जाणून घ्यायचंय ते स्पष्ट विचार” सुनंदाबाई शांतपणे म्हणाल्या.

“आजी मी काल आई बाबांचं बोलणं ऐकत होते.
बाबांना  खूप पूर्वी बिझीनेस करायचा होता. त्या करता त्यांना आर्थिक मदत हवी होती पण्–“
“आम्ही नाही दिले हेच ना ?”
“हो-पण असं कां बरं ? काकांचा पण व्यवसाय आहे. त्याला तुम्ही—–“
“तुला वेळ आहे का? तर मी सांगते  सविस्तर.”

“हो”
“मग ऐक—राजू हा मोठा मुलगा पहिला वहिला म्हणून माझा लाडका, संजू  धाकटा ह्यांच्या सारखा. दोन्ही आमचीच, पण दोन्ही स्वभावाने अगदी विरोधी. राजीव शांत, हुशार पण त्याच्या स्वभावात एक भीडस्तपणा आहे. तो एकदम खुलून न बोलणारा, मनात ठेवणारा.”
“हो, बाबा जरा  मितभाषी आहे. आमच्याशी ही जेवढ्यास तेवढं बोलतात.”
“ते वाईट नाही ग. पण प्रत्येकाच्या स्वभावाचे चांगले वाईट दोन्ही पक्ष असतात.

त्या उलट संजू अभ्यासात खूप हुशार नव्हता पण त्याच्या स्वभावात एक धडाडी होती! बोलका, कुठलेही काम करायला घाबरत नसे!”
“हो काका  नेहमी आमच्याशी चेलेंजिग गेम खेळायचा. लहानपणी.”
“हे बघ ऋचा,  नेहमी यश मिळतच असे नाही, पण त्याने तो कोलमडून न जाता नवीन विचार करायला तयार असे.
कुठल्याही उद्योगासाठी माणसाच्या स्वभावात जे गुण हवे ते त्याच्यात उपजत होते, आपले म्हणणे दुसऱ्याला पटवून देणे त्याला छान जमायचे.”
“होs काकूला ही त्याने आपल्या बोलण्यातून पटवली.” ऋचा हसुन म्हणाली,

“ते वेगळं ग,” आजी हसुन म्हणाल्या.
“तुला पूर्वी ची एक घटना सांगते. त्यावेळेस यांची नोकरी फार खास नव्हती म्हणून  हातभार म्हणून मी घरी चकल्या भाजणी, चिवडा असे करायचे.
सर्वांना ते आवडायचे म्हणून मग दिवाळीच्या सुमारास विकायला ठेवायचं असा विचार केला. पण हे घरोघरी विकायला कोण जाणार? राजू ने स्पष्ट सांगितले ‘आई मला हे असं काही जमणार नाही दारोदारी विकणे, ज्यांना घ्यायचे असतील ते घरी येतिल’!

त्या उलट संजूने मला पाकीट बनवून दिले, पाच पाकिटावर एक पावभाराचे पाकीट अशी योजनाही लागू केली. त्यामुळे आमचे सामान सहजपणे विकले गेले. तर ही अशी व्यावसायिक बुद्धी त्याला लहानपणापासूनच उपजत होती.
राजीव खूप सेन्सिबल, हुशार पण नाकासमोरच्या वाटेने चालण्याचा स्वभाव. आपण बरे नी आपला अभ्यास बरा. त्यामुळे आम्हा दोघांना वाटायचे की त्याने नोकरी करावी आणि बघ त्याने तिथे आपली हुशारी दाखवली आणि ऑफिसर ग्रेडला पोचला.”
“पण बाबांना एक चांन्स द्यायला हवा होता.”

“दिला होता ग, यांच्या ओळखीमध्ये एक होते त्यांचा ऑइलचा बिजनेस होता तिथे हा जात असे. ऑर्डर घ्यायच्या आणि सामान पोचवायचे, कधी कधी दुकानात ऑइल घ्यायला ट्रक ड्रायव्हर यायचे. त्या तेलांचा वास, ते घाण माणसे हे सगळं ह्याला काही आवडत नसे. थोड्याच दिवसांत त्याने ते काम सोडून दिले!
खरंतर यांचा मित्र पूर्ण बिजनेस याला देऊन बाहेर देशात जाणार होता पण यांनी काही इंटरेस्ट दाखवला नाही.”
“मग बाबांना स्वतःचा काही बिझनेस का नाही करू दिला?”

“त्याचे नेमके असे काहीच ठरत नव्हते कधी म्हणायचा कपड्यांचा बिझनेस तर कधी अजून काही !
कुठलाही बिझनेस करायचा तर त्याबद्दलची काही माहिती, त्याचा अभ्यास करावा लागतो. मार्केटमध्ये कुठल्या गोष्टीची मागणी आहे हे जाणून घ्यावे लागते. तशी याची काहीच तयारी नव्हती.
तेव्हा मग तू शिक्षण पूर्ण कर आणि योग्य नोकरी शोध असा सल्ला आम्ही त्याला दिला.
आपल्या मागच्या सोलंकीचा बंगला पाहते ना त्या जागी आधी पाटील यांचे घर होते. चांगली फॅमिली होते नवरा बायको एक मुलगा व दोन मुली.

मुलींचे लग्न झाले. मुलगा धाकटा. त्याला बिझनेस करायचा होता म्हणून पाटील यांनी कर्ज काढून त्याला दिले. सुरुवातीला सगळं ठीक ठाक होतं. वरून वरून छान दिसत होतं. पण नंतर एक दिवस मुलगा घर सोडून निघून गेला.
त्याचा फोन बंद. सगळे घाबरले, शोध सुरू झाला तेव्हा कळले धंद्यात खूप तोटा आला होता. घरात आई बायको बाबा कोणालाच काही कल्पना नव्हती.
दोन दिवसांनी परत आला  कर्ज फेडण्यासाठी अगदी होत नव्हत सगळं, घरदार विकलं गेलं तेव्हा कर्ज फेडलं गेलं.

ते घर पाहिलं ना की पाटील परिवार आठवतो. किती छान राहत असत कल्पनाही नव्हती असं काही होईल. खूप वाईट परिस्थिती आहे सध्या त्यांची.
हे सगळं पाहून वाटलं, व्यवसाय करणं म्हणजे सोपं नाही. आपण स्ट्रॉंग हवं. काळाची पावलं ओळखता यायला हवी. वेळीच निर्णय घेण्याची क्षमता हवी म्हणून मग आम्ही राजीवला नोकरीचा पर्याय सांगितला. आता सांग काय चुकलं आमचं? 
आज राजू ने किती प्रगती केली, किती मान आहे त्याला ऑफिसमध्ये.

मुलांच्या गुणांना वाव देणारा व्यवसाय निवडण्यात मदत केली म्हणून आज दोघेही आपापल्या संसारात सुखी आहे .
आता तू पाहतेस, तुझी आई पार्लर चालवते. तिच्यात आहे धडाडी. शिवणाचे स्किल आहे, मेहनत करायला शरीराने पण धडधाकट हवं.
आता तुला पुढे काय करायचंय याचा विचार कर, शिक्षण पूर्ण करून नौकरी कि  एखादा व्यवसाय?
नौकरी चे काही फायदे आहेत. जसा नियमित पगार मिळतो, पण साहेबांची मर्जी सांभाळावी लागते आणि कामात हुशारी. पण काही व्यवसाय करण्यासाठी अंगात कला, निटनेटकेपण आणि प्रचंड मेहनतिची तयारी. 

संजू ला पहातेस न तू? कामात झोकून दिले त्याने स्वतःला. तेव्हा इतक्या वर्षांनी तो सफल झाला.
तू हीआपले गुण स्वभाव याचा विचार करून व्यवसाय निवड. आजकाल खूप ऑप्शन आहेत, एकच विचारही नको करू. दोन पर्याय डोक्यात ठेव. हे नाही जमलं तर निराश न होता दुसरं.”
“आजी  किती छान समजावून सांगतेस ग !
मी खूप चूक विचार करत होते, मी काय करु शकते ह्याचा मी नक्की विचार करेन. तू माझे गैरसमज दूर केलेस.”

“बरं झालंं. आज तू मोकळेपणाने विचारले. मनातली शंका दूर झाली.
खूप डोक खाल्लं आजीचंं. आता फक्कडसा चहा कर.” 
” पाहू तुला चहाची टपरी तरी चालवता येईल कां”? आजोबांनी असे म्हणताच तिघंही हसायला लागले.
समाप्त
©सौ. प्रतिभा परांजपे
सदर कथा लेखिका सौ. प्रतिभा परांजपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
ओढ
हनीट्रॅप
नवं माहेर

Leave a Comment

error: Content is protected !!