ना उम्र की सीमा हो

©® सौ. दिपमाला अहिरे
“काकु तुम्हांला किती वेळा सांगु मी? रोज सकाळी मोकळ्या हवेत फिरायला जात जा.. हे गुडघ्यांचे दुखणे थोडे तरी कमी होईल.. जितकं चालणार तितकं तुमच्या तब्बेतीसाठी चांगले आहे..”
गोळ्या लिहून देता देता डॉक्टर सुधाताईंना वेगवेगळ्या सुचना ही देत होते..
तेव्हा शाम सुधाताईंचा मुलगा म्हणाला, “सुमीत आईला मी रोज सांगतो. सकाळी नाही तर कमीतकमी सायंकाळी तरी थोडासा फेरफटका मारुन येते जा.. पण आई ऐकेल तेव्हा खरं! बरं तु आहेस म्हणून कधीही गरज पडली तर लगेच येतोस.. माझ्या मुळे तुला देखील त्रास”

“अरे त्रास कसला शाम ?? तुझी आई ती माझीच आई नाही का? आणि लहानपणापासून काकु़च्या हातचे लाडु आणि लोणचं तुझ्या सोबत मीही तितकेच फस्त केले आहे..म लाही जरा त्यांची सेवा करण्याची संधी मिळते त्या निमित्ताने करु दे की. पण हो काकू मी तुमचा मुलगा असलो तरी डॉक्टर सुद्धा आहे बर का? आणि या डॉक्टरांचा सल्ला तुम्हांला ऐकावाच लागेल. रोज सकाळी दोन ते तीन किलो मीटर पायी फीरायला जावेच लागेल..”
“अरे पण सुमीत एवढी थंडी पडुन राहिली बाहेर.. हिवाळा संपला की, जाते ना मग मी.”

“नाही हा काकु.. थंडीच्या दिवसात सकाळी, सकाळी बाहेर फिरणं हे तर माणसाच्या प्रकृती साठी जास्तच चांगले असते अजुन.. ते काही नाही शाम ही तुझी जबाबदारी आहे काकुंनी रोज थोडेफार तरी फिरले पाहिजे. नाही तर त्यांचा गुडघ्यांचा त्रास जास्त होईल..”
दुसऱ्या दिवशी शामने चांगला पाच वाजेचा अलार्म लावुन आईला उठवले. खुप कंटाळा करून करून कशाबशा सुधाताई उठल्या.

अंगात स्वेटर, शाल,टोपी, हातमोजे, पायमोजे सर्व तयारीनिशी बाहेर निघाल्या.. हळुहळु सोसायटीच्या गेटपर्यंत पोहचल्या.
तिथेच बाकावर बसल्या. थोड्या वेळातच त्यांच्याच वयाच्या बऱ्याच बायका त्यांना बाहेर रोडावर फिरायला जातांना दिसल्या.
सुधाताई देखील हळुहळु रस्त्याच्या कडेला चालू लागल्या. मध्येच थांबत,थांबत हळुहळु का असेना बऱ्याच अंतरावर त्या चालत आल्या होत्या.

थोड्या पुढे जॉगिंग ट्रॅक वर बरीच लोकं बसलेली त्यांना दिसली. त्याही जरावेळ तिथे बसल्या.
समोरच एका क़ोपऱ्याच्या झाडाखाली एक आजोबा प्राणायाम करत बसला होते. सुधाताई त्यांच्याकडे पहात होत्या. तर अचानक ते त्यांना बघुन हसले.. सुधाताईंना वाटले लांबुन मलाच तसा भास झाला असेल. पण पुढच्याच क्षणी ते आजोबा ऊठुन सरळ सुधताईंकडे चालत येत होते आणि हसतही होते.
ते सुधाताईंच्या बाजुच्या बाकड्यावर येवून बसले.अजुनही ते त्यांच्या कडे बघून हसत होते.
न राहवून सुधाताई त्याला जोरात ओरडल्या.

“काय हो मगाच पासुन बघतेय! तुम्ही मला बघुन हसातय ते, मी काही तुम्हांला ओळखत नाही किंवा तुम्ही मला ओळखत नाही. हे असं वेड्यासारखं हसायला काय झालं?”
“अहो तुम्हाला बघुन मला हसु आलं, ते थांबवु शकत नाही मी, काय करू सांगा बरं?”
“का मला काय शिंग फुटली आहेत का, हसु येतेय तर तुम्हांला?”
“नाही..माफ करा पण तुम्हांला पाहुन मला जोकरची आठवण येते आहे.” एवढे बोलून ते गृहस्थ पुन्हा जोरजोरात हसु लागले.

“आज पहिल्यांदाच आलात वाटतं तुम्ही सकाळी फिरायला?” ते सुधाताईंना विचारत होते.
“तुम्हांला काय करायचं?”. सुधाताई रागात बोलल्या
ते गृहस्थ आता उठून सुधाताईंच्या बाकावर त्यांच्याजवळ येऊन बसले.
” नाही एवढे सगळे थंडीचे कपडे घालून आलात, असं वाटतंय दहा माणसांची कापडं एकट्या तुम्ही परीधान करुन आल्या आहात.
थंडीत फिरण्याची मजाच काय मग? असं अवघडल्यासारखं येण्यापेक्षा न आलेलचं बरं.”

“थंडीपासून संरक्षण करण्यासाठी हे कपडे असतात ना, मग का नाही घालायचे?” सुधाताई ही आता थोड्या नरम आवाजाने बोलु लागल्या..
“असो मी श्रीधर पाटिल. रोजच येतो सकाळी इथे फिरायला, व्यायाम करायला इथे पुढेच थोड्या अंतरावर माझं घर आहे..माफ करा मगाशी मी तुम्हाला जरा जास्तच बोललो. पण माझा स्वभाव जरा बोलका आणि मिश्कील आहे..अशी थोडीफार मजाक मस्ती करत असतो मी.मनाला लावु नका तुम्ही”
“हो ते कळलंच मला.पण फक्त बोलका नाही तर जरा आगाऊ देखील आहे तुमचा स्वभाव.” सुधाताई बोलल्या.

” तुम्ही रोज येता का इकडे.म्हणजे कधी दिसल्या नाहीत ते?”
“आज पहिल्यांदाच आली मुलगा आणि सुनेच्या हटृटा खातर.. नाही तर मला मुळीच आवडत नाही. सकाळी सकाळी छान झोप घ्यायचं सोडून असं थंडीत फिरायला बाहेर पडायचं.”
“तुम्हांला सुद्धा तुमच्या मुलानेच पाठवलं का असं थंडीत कुडकुडत बाहेर फिरायला.” सुधाताई विचारत होत्या..
“नाही एवढा नशीबवान नाही मी, माझा एकुलता एक मुलगा आणि सून गेली पाच वर्षे झाली अमेरीकेत असतात. दोन वर्षांपूर्वी आमच्या सौभाग्यवती आंम्हाला सोडुन देवाघरी गेल्या. आंम्ही आता एकटा जीव.” एवढं बोलून श्रीधर पाटील ऊठुन उभे राहिले.

सुधाताई ही बाकावरुन उठल्या.
“माफ करा हा मी सहजच बोलले.”. 
दोघेही आपापल्या घराकडे निघाले.
सुधाताई घरी गेल्या. मुलाला त्यांना पाहून आनंद वाटला. चला आईने कमीतकमी सुरुवात तरी केली फिरायची…सुनेने त्यांच्या हातात गरमागरम चहाचा कप ठेवला.
चहा पितांना एकदमच त्यांना त्या श्रीधर ची आठवण झाली.. एकटाच म्हातारा घरी जाऊन स्वतः च चहा बनवुन पीत असेल का? की नौकर माणूस असेल त्याच्या कडे? त्याच्या विषयी अजुन काही जाणुन घेण्याची इच्छा होत होती त्यांची..”

दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीधर पुन्हा त्याच बाकावर सुधाताईंच्या आधीच हजर होते.
सुधाताई – “अरे वा आज लवकर संपले का तुमचे प्राणायाम?”
श्रीधर – “नाही.. अजुन बाकी आहे..चला तुम्ही सुद्धा. थोडेफार मेडीटेशन करा…काय नाव म्हणाला होता तुम्ही?”
सुधाताई – “नाव तर सा़गितलेच नव्हते मी.. मी सुधा देशमुख. साईकुंज अपार्टमेंट आहे ना पुढे तिथे रहाते मी.. माझा मुलगा,सुन,नातु आणि मी…माझे यजमान चार वर्षांपूर्वीच गेले..”
श्रीधर- “बरंय तसं तुमचं मुलगा,नातु,सुन संपूर्ण कुटुंब आहे सोबत.सुधाजी …”

सुधाताई – “सुधा म्हटलं तरी चालेल हो…सुधाजी वैगरे नको..”
अशाप्रकारे श्रीधर आणि सुधाताईंची रोज मॉर्निंग वॉक च्या निमित्ताने भेट व्हायची, बोलणं, गप्पा, हसणं.
हळुहळु त्यांची चांगलीच मैत्री झाली असे म्हणायला हरकत नाही.
दोघेही जवळपास सारख्याच वयाचे साठ – पासष्ट च्या दरम्यान श्रीधर फौज मधुन रिटायर्ड झालेला म्हणुन व्यायाम, आणि स्वतः ची प्रकृती या विषयी एकदम चोखंदळ माणुस.‍ मात्र सोबत कुणीही नसल्याने एकटा पडलेला..आपले एकटेपणाचे दुःख आपल्या चेहऱ्यावर दिसु नये म्हणून नेहमीच हसत खेळत राहणार, दिलखुलासपणे गप्पा गोष्टी करणारा एकुणच मनमिळाऊ स्वभावाचा व्यक्ती. आपल्या बोलण्याने कुणालाही लगेच आपलसं करणारा.

सुधाताईंशी ओळख झाल्यापासून त्याचे एकटेपण थोडे कमी झाले होते.
सुधा ताई- ” हे घ्या श्रीधर राव तुमच्या साठी डिंकाचे लाडू आणलेत. कालच केलेत सुनबाई आणि मी दोघांनी मिळून. थंडी खूप वाढली आहे ना आता.. खाऊन बघा जरा कसे झाले ते?”
अशाच प्रकारे कधी लाडु , कधी कोथिंबीर वडी असे वेगवेगळे पदार्थ सुधाताई त्यांच्यासाठी आणत असत.
मुलगा आणि सुन देखील सांगत आईला श्री़धर रावांसाठी घेऊन जा म्हणून..
आता सुधाताई न चुकता रोजच न सांगता फिरायला जाऊ लागल्या

तिथे श्रीधर आणि सुधाताई दोघे ही योगा, मेडिटेशन करायचे. नंतर फिरता फिरता दोघांच्या बऱ्याच गप्पा व्हायच्या.
श्रीधर त्यांना आपल्या फौजेतील लढाईचे किस्से सांगत, आपल्या पत्नीच्या काही आठवणी सांगत.
सुधाताईही आपल्या यजमानांच्या आठवणी, नातु सोबतची मस्ती, अभ्यास, खेळणं सर्व काही दोघेही एकमेकांशी शेअर करायचे. 
एके दिवशी अचानक श्रीधर राव तोल जाऊन खाली पडले. सुधाताई खुप घाबरल्या.
त्यांच्या तोंडून अचानक “श्री” असा शब्द निघाला.. स्वतः ला सावरत त्यांनी श्रीधरला हाताचा आधार देत उठवले, बाकावर बसवले. आपल्या जवळ असलेली पाण्याची बाटली दिली. श्रीधर रावांना त्यांच्या वागण्या बोलण्यातून आपली काळजी दिसत होती.

डोळ्यात चिंता दिसत होती आणि त्यांच्या “श्री” या एकेरी उल्लेखातुन आपलेपणाही दिसत होता.
दुसऱ्या दिवशी सुधाताई जेव्हा फिरायला आल्या तेव्हा श्रीधर रावांनी सरळ सरळ बोलायला सुरुवात केली.
सुधाताई – “गुड मॉर्निंग श्रीधर राव कशी आहे आज तब्बेत? काल खुप जोरात पाय घसरला तुमचा, लागले बिगले नाही ना जास्त?”
श्रीधर – “नाही तेवढे काही लागले नाही..मला काय होणार? तुम्ही होतात ना मला सावरायला.. सुधा मला तुमच्या शी थोडे बोलायचे होते..तुमची परवानगी असेल तर?
सुधाताई- “बोला की…”

श्रीधर – “काल तुमच्या तोंडून श्री ऐकून मला खूप बरं वाटलं..आमच्या सौ. नंतर तुम्हीच मला या नावाने बोललात… बरेच दिवस झाले मला तुम्हांला हे विचारायचे होते. पण मी जरा थांबलो होतो. पण कालच्या प्रसंगानंतर मला वाटतं की, माझ्या मनात जे आहे ते मी तुमच्याशी बोलावे.
मला तुमच्या साथीची खरंच खूप गरज आहे.. मला वाटतं की, आपण दोघांनी लग्न करावे.. श्रीधर राव बोलत होते आणि सुधाताई फक्त ऐकत होत्या.
हळुच त्या बाकावरून उठल्या. हातात आणलेला चिवड्याचा छोटासा डबा श्रीधर रावांच्या हातात ठेवला आणि बोलल्या “या वयात लग्न करु तर लोकं हसतील, नावं ठेवतील ते वेगळंच. पण माझा मुलगा आणि सुन काय म्हणतील याचा तर विचारही करवत नाही, आज बोललात..पण यापुढे हा विषय नको. ज्या समाजात राहतो त्याचे काही नियम आहेत…ते प्रत्येक माणसाला पाळावे लागतात..” 

एवढं बोलून सुधाताई तिथुन निघुन गेल्या.
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे फिरायला गेल्या पण श्रीधर राव आले नाहीत..असेच चार पाच दिवस झाले.
सुधाताई रोज सकाळी फिरायला यायच्या पण श्रीधर राव नाही यायचे.
आता सुधाताईला त्यांची काळजी वाटु लागली. तब्येत ठीक असेल का, कुठे बाहेर गावी गेले तर नसतील या विचारात त्या असायच्या.. आईच्या चेहऱ्यावर असलेली चिंता पाहुन शामने आईला विचारले, “सर्व ठीक आहे ना, तुझी तब्बेत बरी आहे ना?”
मग सुधाताई ने घडलेला सर्व प्रकार मुलगा सुनेला सांगीतला.

“आई काय हरकत आहे तुम्हां दोघांना लग्न करायला? चांगलाच प्रस्ताव आहे श्रीधर रावांचा आणि समाजाचं काय घेऊन बसली… हा समाज, या समाजातील रुढी, परंपरा या माणसाने बनवलेल्या आहेत..त्या मानायच्या की, नाही हे सुद्धा आपणच ठरवणार आणि कुठल्या समाजात हा नियम आहे ? की, वयोवृद्ध व्यक्तींनी लग्न करु नये. वयाच्या या टप्प्यावर जर कुणाला एकमेकांची साथ हवी असेल, लागत असेल, आणि ती मिळत असेल तर ती घ्यायला आणि द्यायला काय हरकत आहे सांग??”
शाम ने लवकरच श्रीधर रावांच्या घराचा पत्ता शोधून काढला. त्यांच्याशी बोलून लवकरच आईलाही लग्नाला तयार केले.. श्रीधर रावांच्या आणि सुधाताईंच्या मुला सुनांना या लग्नाविषयी काहीही आपत्ती किंवा हरकत नव्हती.

म्हणून श्रीधर आणि सुधा दोघेही पुन्हा नव्याने एका वेगळ्या लग्न बंधनात बांधले गेले… समाजासाठी एक वेगळा आदर्श घालून दिला.. सकाळच्या मॉर्निंग वॉक ने श्रीधर आणि सुधाताईंच्या आयुष्यात एक नवे वेगळे वळण आणले होते.
©® सौ. दिपमाला अहिरे
सदर कथा लेखिका सौ.दिपमाला अहिरे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
कुवत
ओढ
हनीट्रॅप
नवं माहेर

Leave a Comment

error: Content is protected !!