प्राक्तन भाग 1

©® वर्षा लोखंडे थोरात
पलीकडच्या गल्लीत राहणारी मंजू ताई आताशी जरा गप्प गप्पच असते. पहिल्यासारखी गच्चीत पण दिसत नाही. क्वचित कधी तरी खिडकीत येवून डोकावून जाते.पण तिचा चेहरा आता असा का दिसतो? डोळे पण सुजलेले असतात.
आधी तर अशी नव्हती ताई. किती छान दिसायची ,हसायची.तिचे डोळे किती सुंदर. मला तर गोष्टीतील परीच वाटायची. मी रस्त्यावर खेळत असले की मला गच्चीत बोलवायची. श्रीखंड गोळी द्यायची. काही बाही बोलायची. खुदकन गालात हसायची. मध्येच  गाणं गुणगुणत गिरकी घ्यायची. वहीत घडी करून ठेवलेला कागद काढून वाचायची.
अचानक कधी सायकल ची घंटी वाजायची आणि मग ताई कावरीबावरी व्हायची.

पटकन खाली रस्त्यावर बघायची आणि तिच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक यायची. पटकन माझ्या हातात अजून गोळ्या देवून मला पिटाळून लावायची. खाली रस्त्यावर चार गल्ल्या सोडून राहणारा केशव असायचा. मला बघून म्हणायचा काय मग पोरे? मला तो अजिबातच आवडायचा नाही. मी त्याला वाकोल्या दाखवून तिथून धूम ठोकायची.
तो केशव मात्र हल्ली सारखाच चकरा मारत असतो. त्याला बघून आजूबाजूच्या बायका हळूच काहीबाही कुजबुजत बोलायच्या. मंजू ताई चे नाव पण अस्पष्ट कानावर पडायचे. आपण तिथे घुटमळत राहिलो तर आई काकी नाहीतर ताई पाठीत जोरात धपाटा घालून तिथून हाकलून लावायचे.
ही ताई पण ना.. आता फारच चोंबडी झाली आहे. थांब आता उन्हाळ्यात कैऱ्या आणून देणारच नाही आणि गारेगार वाला आल्यावर तर आणायला मुळीच जाणार नाही. जा तुम्हीच सगळे मोठे.

आज महाशिवरात्री . सकाळपासून घरात लगबग चालू. महत्वाचं म्हणजे आज मंदिरात जाता येणार. नदी बघता येणार आई , काकू, गल्लीतल्या सगळ्या काक्या.आणि माझ्या मैत्रिणी  सुध्दा.नुसती धम्माल.पूजा करून,शंकराला अभिषेक करून आम्ही तिथेच खेळत होतो. बायका एकमेकांना हळदी कुंकू लावत होत्या.गावातील या टोकापासून तर त्या टोकापर्यंत राहणारे सगळेच जमले होते. सुखदुःखाच्या गोष्टी केल्या जात होत्या.अरे मंजू ताई पण आलीय.आज ताईने छानशी साडी नेसली आहे.किती सुंदर दिसत आहे ताई.पण आज ताईच्या तिच्या मैत्रिणी बरोबर का नाहीत ? बायकांमध्ये काय करतेय?
अरेच्चा मंजू ताई पण मॅट्रिक ला आहे की नलीच्या ताई बरोबर.

नलीची ताई तर परीक्षा द्यायला शहरात गेली आणि तिची आजी पण गेली आहे बरोबर. त्या मुळे नली आताशा जास्तच उनाडक्या करत आहे. मॅट्रिक ला असं लांब जावून परीक्षा द्यावी लागते म्हणतात . मंजू ताईला का नाही परीक्षा?
सगळ्या बायका पण ताईच्या आईला ,काकूला हेच विचारात होत्या. परीक्षेला का नाही गेली मंजू ताई. ती आईला सोडून जायला घाबरत असेल असं मला उगीचच वाटून गेलं.
“आमचं बाहेर पडणं बंद केलं आहे.” मंजू ताई कडे एक तीक्ष्ण कटाक्ष टाकत ताईची आई म्हणाली.
ताईचा चेहरा खूपच केविलवाणा झाला आणि तिची नजर खाली गेली.

पण मंजू ताईचे घराबाहेर पडणं का बंद केलं आहे?
आता वार्षिक परीक्षा जवळ आली आहे. त्यामुळे  आई बाहेर खेळायला  जाऊन देतच नाही. तसाही माझा अभ्यास कधीच पूर्ण नसतो. मग काय आई स्वयंपाकघरात बसवूनच अभ्यास घेते. मला तर अजिबातच आवडत नाही संध्याकाळी घरात बसायला.बाहेर खेळावं वाटतं.
बाबा मात्र रात्री जेवण झाल्यावर चल रेवा बेटा म्हणून शतपावली करायला  घेवून जातात. नंतर थोडा वेळ आम्ही अंगणात बसतो. तिथे बसलो की मला मंजू ताईचे घर दिसते.महाशिवरात्री नंतर मंजू ताई दिसलीच नाही. ज्या खिडकीत ती कधीतरी दिसायची ती तर आता कायम बंद असते. ताईच्या घरातील सगळे  जरा  वेगळेच वाटतात हल्ली. सहसा बाहेर कोणी फारसं दिसतही नाही. उदास उदास वाटतं त्यांचं घर.

ताईच्या बाबांची बाजारपेठेत सोन्याच्या दागिन्यांची पेढी आहे. खूप मोठी. मागच्या आठवड्यात मामीला बाळ झालं.बाळ लेणी आणायला दुकानात गेलो. हसत स्वागत केलं काकांनी पण नेहमी प्रमाणे नाही वाटलं.
आधी गेलो की काका मला त्यांच्या जवळ बसवायचे.खूप गप्पा मारायचे. दुकानातल्या श्याम काकाला सांगून माझ्यासाठी  खाऊ  मागवायचे. पण आज काका कुठेतरी हरवल्यासारखे वाटत होते. आईने पण जास्त काही विचारलं नाही.
येताना आजी आणि आई बोलत होत्या पोरीने बापाची रयाच घालवली. अशा गुंड मुलाच्या कशी काय नादी लागली? एवढं देखणं रुप घेवून आली.. नशीब म्हणून अशा घरात जन्माला आली. पण हे भिकेचे डोहाळे कुठून लागले काय माहिती? पोर यातून जर बाहेर पडली नाही तर याचा शेवट विनाश असणार यात शंका नाही.

का माहीत नाही मला छातीत धस्स झालं आणि मंजू ताईची आठवण येवून खूप रडू आलं.
आता सध्या गावात खूप उत्साहाचे वातावरण आहे. तशी यात्रा तर लांब आहे. पण तरीही हल्लीं बाबा,बाबांचे मित्र, वेगवेगळ्या गल्यांमधले दादा सगळे मिळून सारखी चर्चा करत असतात. भिंतींवर वेगवेगळी पत्रकं दिसतात. प्रत्येक गल्लीच्या कोपऱ्यावर पाण्यासाठी हापसा पण बसवला आहे म्हणे सरकारने . आता हे सरकार काय आहे मला तर काहीच कळत नाही.आणि आता ते बदलणार आहे म्हणजे नेमकी काय होणार आहे ते पण कळेना.

हा केशव दादा त्याच्या गल्लीतल्या मुलांना घेवून दिवसातून दोन तीन वेळा या गल्लीतून त्या गल्लीत फिरत असतो. मोठ्याने आरडाओरडा करत असतो. त्यांच्या हातात काठ्या पण असतात.मला तो ना बाबांच्या आवडीच्या  त्या जय विरूच्या सिनेमा मधला वाईट गब्बरसिंग सारखाच वाटतो. तशीच दाढी आहे त्याची.आमच्या गल्लीतल्या रस्त्यावरून मंजू ताईच्या खिडकीकडे हसत बघत असतो. मंजू ताई किती किती गोड आहे . भंवरेने खिलाया फूल मधल्या त्या नायिकेसारखी.
मला असं वाटतं की केशव दादाला जाउन एक बुक्की मारावी. ढकलून द्यावं .तुझ्यामुळेच मंजू ताईचा विनाश होणार आहे हे मला कळलं आहे सांगावं.

शेतावर राहणारे दिगु काका गावात आले की त्यांच्या बरोबर शेतीची औजारं आणायला आजोबा जातात केशव दादाच्या घरी.
मी पण जाते मागे लागून. तिथली प्रेमळ आजी माझ्या डोक्यावरून हात फिरवते मला पितळीत चहा देते. म्हातारे आजोबा विटी दांडू बनवून देतात. कधी छान छान खेळणं देतात.
केशव दादाला आई बाबा नाहीत का? त्याची आजी म्हणत असते आई बापाविना वाढलेलं लेकरू .. वांड आहे समजून घ्या त्यासानी. काय चुकलं तर पोटात घ्या. आणि डोळ्याला पदर लावते. असा राग येतो ना त्या केशव दादाचा.

गावची निवडणूक आहे असं सगळे म्हणत होते. मतदान की काय आहे. दादा पण येणार आहे मतदान करायला. दादा शहरात एकटाच राहतो. ताई पुढच्या वर्षी मॅट्रिक ला जाणार आहे. काकुचा नील दादा आठवीत आणि मी पाचवीत.
आम्हाला शहरातल्या शाळेत प्रवेश घेणार आहेत. मुलींवर गावातील वातावरणाचा काही वाईट परिणाम होईल याची भीती वाटत आहे असं मोठे बोलत होते. निवडणुकी नंतर जायचं ठरलं आहे.
हल्ली वेगवेगळ्या गटाचे लोक घरी येतात.प्रचार करायला. गावाचा विकास ,कारभार अशा अनेक गोष्टींवर बोलत असतात.केशव दादा पण आला होता.
त्याच्या गटातील कोणी तरी उमेदवार आहेत .खूपच तावातावाने बोलत होता. आधीच्या सरकारने हे केलं ते केलं.आता या वेळेस विनायक शेठ ला आम्ही पडणारच. बघाच.

अरेच्चा विनायक शेठ म्हणजे मंजू ताईचे बाबा. केशव दादा यांना पाडणार म्हणजे नेमकी काय करणार? आमच्या शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात तेच प्रमुख पाहुणे असतात. किती छान भाषण करतात आणि खाऊ पण  वाटतात. केशव दादा आता माझ्या आणखीनच नावडीचा झाला आहे.
केशव दादा विनायक काकांच्या विरोधी गटासाठी काम करतो असं बाबा दादाला सांगत होते. ते सगळेच गुंड विचारांचे आहेत असंही म्हणत होते. त्यांना गावात फक्त दहशत निर्माण करून सत्ता काबीज करायची आहे.
मंजू ताईला नादी लावून केशव दादा चाल खेळत आहे अशी चर्चा पण गावात आहे.

मंजू ताई त्यांचं प्यादं आहे .प्यादं आणि चाल तर बुद्धिबळात असते. त्या सोंगट्या तर निर्जीव असतात.मंजू ताई तर खरीखुरी मुलगी आहे.मग तिचा वापर करून कुठली चाल  खेळत आहे हा दृष्ट केशव दादा?
पुढच्या आठवड्यात वार्षिक परीक्षा आहे. ताईचे यंदाचे महत्वाचे वर्ष त्यामुळे ती फारच मन लावून अभ्यास करत आहे. तिला मोठं होवून डॉक्टर व्हायचं आहे. ताई,मंजू ताई, सुधा ताई,जयू ताई या सगळया मैत्रिणी. एकत्रच शालेय जायच्या.
गावात एसटी स्टँड वर उतरलं की डाव्या बाजूला हायस्कूल आणि उजव्या बाजूला आमची शाळा. सरळ पुढे आलं की मारुती मंदिर आणि गाव देवीचे मंदीर. बसायला पार आणि तिथेच ग्रामपंचायतीचे कार्यालय. पुढे बाजारपेठ आणि मग वेगवेगळ्या गल्ल्या.
एकेका गल्लीतून मुलं एकत्र येत येत रमतगमत शाळेत जात.

सुधा ताई ची आजी खूप आजारी आहे त्यामुळे तिचे आई बाबा तिला भेटायला गेले आहेत. त्यांचं मूळ गाव खूप लांब आहे . शाळेतील नोकरीमुळे ते आमच्या गावात रहात आहेत. परीक्षा असल्यामुळे सुधा ताई आमच्या घरीच थांबणार आहे चार दिवस.
आधी कधी सुधा ताई राहायला आली तर मंजू ताई पण येत असे. मग खूप मज्जा यायची.मला मंजू ताई बरोबरच जेवायचं असायचं. झोपताना पण ताईच हवी असायची. ती पण माझा खूप लाड करायची.
ताई तिला म्हणायची मंजू जास्त लाडावून ठेवू नको हिला. नाहीतर डोक्यावर बसेल.
मंजू ताई गोड हसून म्हणायची बसू दे…नाहीतर असं करते मी तिला माझ्या घरीच घेवून जाते.
ताई म्हणायची लगेच घेवून जा. बॅग भरून देवू का? सगळे खूप हसायचे.

आज सगळ्यांनाच मंजू ताईची आठवण येत होती.
आई सांगत होती त्यांच्या घरी कधी जाणं झालं तरी मंजू ताई माडीवरून कधीच खाली येत नाही.किती महिने झाले नीट दिसलीच नाही. ताई आणि तिच्या मैत्रिणी जरी गेल्या कधी भेटायला तर काहीतरी कारण सांगून भेटू देत नाहीत. तिला नजर कैदेत ठेवले आहे म्हणे . तो मुलगा राजरोसपणे सांगतोय सगळ्यांना की बघा कसं उध्वस्त करतो विनायक शेठ ला.
नजरकैदेत तर शिवाजी महाराजांना ठेवलं होतं औरंगजेबाने. ताई ला का? हे ऐकून माझ्या घशाला कोरड पडली. तो मुलगा म्हणजे नक्कीच तो दृष्ट केशव दादा. आता त्याला मी कधीच दादा म्हणणार नाही असं मी मनोमन ठरवलं आहे.
जेवण झाल्यानंतर ताई आणि सुधा ताई अभ्यास करत बसल्या.
मी तिथेच झोपून गेले.अचानक रात्री मला जाग आली.

ताई आणि सुधा ताई हळू हळू गप्पा मारत होत्या मंजू ताई बद्दल.
एवढं काही होईल असं आपल्याला वाटलं पण नव्हतं ना? वरचा वर्ग म्हणून आपल्याला तासभर लवकर शाळेत जावं लागायचं.नववी आणि मॅट्रिक मिळून फक्त आठ दहा मुली. त्यातल्या सहा गावात राहणाऱ्या आणि चार वस्ती वरून येणाऱ्या.केशव दोन तीन वर्ष शहरात गेलेला.अचानक सात आठ महिन्यांपूर्वी गावात आला.
शाळेच्या सुटायच्या आणि भरायच्या वेळी रस्त्यावर थांबायचा. एकटक बघत असायचा, हसायचा. भीती पण वाटायची. नेमका कोणाकडे बघतोय कळायचं नाही पण का कोणास ठावूक त्याला बघून मंजुचा चेहरा खूप खुलायचा. आणि एक दिवस अचानक त्याने समोर येवून एक कागद मंजुला देण्याचा प्रयत्न केला. आमची तर भीतीने गाळण उडाली. पण अनपेक्षितपणे मंजू ने तो कागद पटकन घेतला.

साहजिकच आपण तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिच्यावर काय जादू झाली होती काय माहित? हळू हळू मंजू आपल्यापासून दूर होत चालली. कारण आपण तिला सतत सांगत होतो की हे योग्य नाही मंजू. नको या सगळ्यात पडू. खूप त्रास होईल तुला.
पण तिच्यावर केशव ची नशा चढली होती जणू. त्याची ती प्रेमाची पत्र, बिनधास्त आयुष्य याची तिला भुरळ पडायला लागली. आपल्याला म्हणायची आयुष्य कसं ठसकेबाज असावं. बेभान. या मिळमिळीत आयुष्याचा मला उबग आला आहे. सगळं कसं आखीव रेखीव. नाविन्य काही नाहीच.
केशव म्हणतो या गावापेक्षा पण भारी वेगळी दुनिया आहे.जिथे कुठलीच बंधनं नाहीत. कुठल्या नियमांचे ओझं नाही. सगळं कसं मुक्त.

तुला मी त्या दुनियेत नेणार आहे. तुला पण ती दुनिया खूप आवडेल. आपल्याला काही ते सगळं पटत नव्हतं. आणि मंजू काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. नंतर नंतर तर ती आपल्याबरोबर शाळेत यायला पण टाळायची.
बरोबर निघत असू पण ती काहीतरी कारण सांगून मागे रेंगाळत असे.
पुढे रस्त्याच्या कोपऱ्यावर केशव उभा असायचा. खूप राग यायचा त्याचा आणि मंजू चा पण. उद्या मोठ्यांना कळलं तर आपली शाळा पण बंद होते की काय याची धास्ती.
दोन तीन महिने झाले होते आता या सगळ्या प्रकरणाला.शेवटी कितीही लपून छपून आणि सावधगिरीने केल्या तरी अशा गोष्टी लपून थोड्या राहतात? टीव्ही मुळे एक दिवस मंजू  च्या घरी सगळा प्रकार कळला.
क्रमश:
©® वर्षा लोखंडे थोरात

सदर कथा लेखिका वर्षा लोखंडे थोरात यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
कुवत
ओढ
हनीट्रॅप
नवं माहेर

Leave a Comment

error: Content is protected !!