प्राक्तन भाग 2

©® वर्षा लोखंडे थोरात
भाग 1 इथे वाचा
ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर मागच्या वर्षी एक चौकोनी आकाराचा डब्बा बसवला आहे. त्यात चित्र आणि आवाज पण येतो. त्याला टीव्ही की काय म्हणतात. टीव्ही मुळे काय झालं नेमकं?
सुधा आपले नवीन आलेले शिंदे सर .. त्यांनी आपल्याला टीव्ही वर येणारा किलबिल हा कार्यक्रम आणि बातम्या बघत जा असा सल्ला दिलेला. संध्याकाळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर बसून गावकरी टीव्ही बघत.
सर स्वतः येवून प्रत्येक मुलीच्या पालकाची परवानगी घेवून गेले. मग काय रोज संध्याकाळी आपण सगळ्या मुली बातम्या आणि किलबिल बघायला जात असू. आधी थोडे दिवस कोणीतरी सोडवायला आणायला येत असे पण नंतर आपण आपलं जात असू.आणि हीच वेळ साधली नियतीने.

इथेच आपल्या मैत्रिणीच्या आयुष्यातील  दुःखाचा अधोगतीचा फेरा चालू झाला. एक मोहाचा क्षण आयुष्यात ठिणगी होवून आला आणि त्याचं रूपांतर वणव्यात झालं. काय झालं होतं नेमकी ?
तुला लक्षात आहे का सुधा मंजू नंतर नंतर आपल्याला टाळत असे. संध्याकाळी बरोबर टीव्ही बघायला निघालो की काहीतरी  काम आठवलं असं सांगून परत माघारी जात असे. एक दोनदा मंजू रस्त्यातून घरी जाते म्हणाली पण कार्यक्रम सुटायच्या वेळेस परत आपल्याबरोबरच घरी आली. आपण तिला विचारलं पण की तू तर घरी गेली होतीस ना? मग इथे कशी? नेहमीप्रमाणे काही नाही म्हणत तिने विषय टाळला.
आता तर मंजू अजूनच वेगळी वागत होती.

शून्यात हरवलेली असायची.मध्येच खुदकन हसणं, आपल्याच हाताला कुरवाळत बसणं…शाळेत शिक्षकांच्या निदर्शनात पण या गोष्टी आलेल्या. एकदा शिंदे सरांनी आपल्या दोघींना बोलावून विचारलं पण होतं. लाज वाटून आपण काही बोललो नाही. आपलं चुकलंच. सांगायला हवं होतं त्यामुळे पुढील बऱ्याच गोष्टी टळल्या असत्या आणि आज मंजू कदाचित आपल्याबरोबरच असती.
त्या दिवशीची संध्याकाळ लख्ख आठवतेय.
थंडीचे दिवस होते त्यामुळे अंधार लवकर पडत होता. नेहमी प्रमाणे आपण तिघी टीव्ही बघायला निघालो.
कोपऱ्यावर गेल्यावर मंजू म्हणाली आज खूपच थंडी आहे मी नाही येत. घरी जाते परत.
आपणही ठीक आहे म्हणत तिला निरोप दिला.

किलबिल संपलं आणि बातम्या चालूच होत्या.आणि अचानक काहीतरी गडबड सुरू झाली. आपल्याला कळेचना काय झालं? पण सगळे लोक मारुती मंदिराच्या मागे जात होते.
काय झालं होतं तिथे?
सगळं मैदान जवळजवळ रिकामं झालं होतं.आपण काय झालं म्हणून बघायला थोडं पुढे गेलो तर मंजू.
विस्कटलेले केस, मान खाली आणि तिचा दादा आणि काका अक्षरशः तिला ओढत नेत होते.
आपल्याला तर धक्काच बसला. काय झालं काहीच कळेना. लोक कुजबूज करत होते. काही हसत होते. सगळंच विचित्र.

विनायक काकांच्या दुकानात काम करणारे शाम काका.
मंजू बऱ्याचदा आपल्या बरोबर बाहेर पडायची आणि अचानक घरी जाते म्हणायची. मारुती मंदिराच्या मागे पुर्ण मोकळं मैदान आणि मैदानाच्या पलीकडे केशव चे घर. जरा एकटं. ज्या वेळेस सगळे टीव्ही बघण्यात मग्न त्या वेळेस मंजू व केशव चोरुन मैदानात असलेल्या झाडाच्या आडोशाला थांबून बोलत असत.
कधी हातात हात घेवून तर कधी एकमेकाला बिलगून. शाम काकांनी एक दोनदा बघितलं.
दोघांना तिथल्या तिथे समज द्यावी असा विचार पण केला त्यांनी…पण उगीच तमाशा नको म्हणून ते शांत राहिले.

न राहवून ते केशव ला समजवायला गेले की मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. थोडा विचार कर. थांबव सगळं. एक प्रतिष्ठित कुटुंब उद्ध्वस्त होईल. जात पात गरीब श्रीमंत या भिंती तोडून वाट शोधणं अशक्य असते. त्या भिंती तोडताना त्यांच्या ढिगाऱ्याखाली आपणच गाडले जाणार हे सत्य आहे.
त्यावर तो विकृत केशव म्हणाला काय काका..कसली काळजी करता? मी काय तिला घरात घेणार आहे का? हे राजकारण आहे… यात सगळं चालतं.
विनायक शेठ चे खच्चीकरण करायला त्या मुलीचा मी वापर करत आहे. काका या वेळेस सरपंचपद राखीव आहे. आपल्या वस्तीला मिळू दे की कधीतरी संधी.

किती वर्ष आपण यांच्या अधीपत्याखाली जगायचं? मंजू ला जाळ्यात अडकवून विनायक शेठ ला खजील करायचं…बदनाम करायचं…आपसूकच शरमेने तो माघार घेणार बघ. त्याचे घाणेरडे विचार ऐकून शाम काकांच्या काळजाचे पाणी पाणी झाले.
दोन तीन दिवस हा प्रकार शेठ च्या कानावर घालायचा प्रयत्न केला पण नाही हिंमत झाली..आणि त्या संध्याकाळी तो प्रकार.
झालं काय केशव चे आजी आजोबा बाहेर गावी गेलेले. घरी कोणीच नाही. थंडी आहे म्हणून परत गेलेली मंजू लपत छपत नेहमीच्या जागी गेली.
बहुतेक त्या दिवशी केशव ने मनोमन काहीतरी ठरवलं होतं. तो तिला आडवाटेने आपल्या घरी घेवून गेला. शाम काका लक्ष ठेवून होतेच.

मंजुला घरी नेण्यात केशव चा काय इरादा आहे हे ध्यानात यायला त्यांना वेळ लागला नाही.आपण त्याला अडवायला जावं तर तो ऐकणार तर नाहीच शिवाय आपली ताकदही कमी आहे. पण आता स्वस्थ बसून चालणार नाही म्हणून ते तसेच मंजूच्या घरी गेले. तिच्या काकांना आणि दादाला घेवून केशव दादाच्या घरी गेले.
दार आतून बंद.. दोघे घरात. संताप आणि शरमेने मंजूचा दादा आणि काका अक्षरशः लालबुंद झाले होते.
दार ठोठावत होते. अगदी थंड नजरेने केशव ने दार उघडले. समोर अस्तव्यात कपड्यातील भेदरलेली मंजू आणि केशव च्या चेहऱ्यावर विजयी हसू.

त्याला ढकलून मंजू चे काका आत गेले आणि खाडकन मंजू च्या कानामागे दिली. या वेळेस वाचली मंजू तुम्ही लवकर आल्यामुळे पण मी काही तिला तसं सोडणार नाही केशव हळूच मंजुच्या दादाच्या कानात कुजबुजला.
दादाने मुठी आवळल्या पण संयम ठेवला. कारण त्याने जर केशव वर हात उगारला असता तर त्याचं नक्कीच खूप मोठं भांडवल केलं असतं. आणि केशव ला तेच हवं होतं.
त्यांना खिंडीत पकडून त्यांची गळचेपी करायची होती. हे कळण्याईतके मंजू चे कुटुंब हुशार नक्कीच होते.
रागारागाने काकाने आणि दादाने मंजुला घरी नेले.

ही बातमी गावात पसरायला वेळ लागला नाही. आपल्या घरातील मुलीला अशा अवस्थेत कोणा मुलाबरोबर बघण्याचा पुर्ण कुटुंबाला धक्का बसला. विशेषतः तिचे बाबा. पुर्ण कुटुंब स्तब्ध झाले.
का असं वागली मुलगी? इतकं वाकडं पावूल का पडलं? काय चुकलं आमचं? आणि त्या दिवसापासून मंजू ला घराबाहेर पडायला बंदी घातली गेली. शाळा बंद . नजरकैद जणू.
हे सगळं ऐकून मला तर खूप भीती वाटली.
मंजू ताई खोटं कसं काय बोलली? त्या दृष्ट केशव मुळे तिला मार बसला. ती का भेटायची त्याला ? आणि घरी का गेली त्याच्या? मला तर काहीच कळेना. का कोणास ठावूक पण मी झोपेत पटकन माझ्या ताईला बिलगले.

वार्षिक परीक्षा संपली .गावात यात्रेचे उत्साही वातावरण. मंजू ताई प्रकरण बऱ्यापैकी शांत झालेले.
एवढ्यात केशव पण जास्त फिरकत नव्हता. यात्रेनंतर निवडणुका आणि मग आम्ही मुलं शहरात शिकायला.
आजी,आई ,काकू येवून जावून आमच्या बरोबर. यात्रा म्हंटल्यावर गावात आठ दिवस आधी पाहुण्यांची वर्दळ. गावातील चाकरमनी, लेकी बाळी यांची पावलं हमखास गावाकडे वळणार.
नाळ सहजपणे तुटते थोडी असं काहीतरी आजी म्हणत होती.
अरे मंजू ताईचा दारात चार चाकी थांबली आहे. म्हणजे नक्कीच ताईची मोठी बहीण इंदोर वरून आली असणार.

तिचा मुलगा गोलू नावाप्रमाणे खुप गोड आहे. मागच्या वेळेस आलेला तर मला दिदू दिदु म्हणत मागे फिरायचा. ताईच्या मोठ्या बहिणीचे सासर फारच तालेवार आहे म्हणतात. पोरीने नशीब काढलं असं सगळेच म्हणतात गावात.
आम्ही काल मंजू ताईच्या घरी जावून पाहुण्यांना भेटून आलो.
सगळे खूप आनंदी होते. घरात उत्साहाचे वातावरण होते. मंजू ताई पण होती तिथे. ती पण खुश वाटत होती. हसत होती बोलत होती. तिला आनंदी बघून मला तर फुलपाखरू झाल्यासारखं वाटत होतं.
ताई अशीच आनंदी राहावी यासाठी काय करता येईल बरं असा विचार माझ्या मनात येवून गेला.

यात्रेच्या आदल्या दिवशी इंदोर वरून बाकीचे पाहुणे येतील. थोडी गडबड होईल पण जाईल निभावून असं सगळे म्हणत होते.
उमा ताई तुमचा हातभार लागणार बरं. अगदी प्रत्येक गोष्टीत.
काही काळजी करू नका .आमची पण लेकच की मंजू.अगदी निर्धास्त रहा. दहा बारा पाहुण्यांची सोय आमच्या घरी आरामात होईल.बाकी धावपळ करायला घरातील पुरुष मंडळी आहेतच. स्वयंपाक पाणी जेवण खावण याची अजिबात चिंता करू नका. आपण सगळे मिळून अगदी फक्कड बेत करू सगळे.आई म्हणत होती.
सगळ्यांनी एकत्र बघून मला तर फार भारी वाटत होतं. किती दिवस अशी भेट झाली नव्हती.

एवढं कार्य निर्विघ्न पार पडू दे गजानना आजी हात जोडून म्हणत होती. त्या क्षणी माझं लक्ष मंजू ताईकडे गेले. तिच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. त्या वेळी ती मला थोडी भयानक का वाटली? काय चालू असतं तिच्या मनात?
दोन दिवसांनी इंदोर चे पाहुणे आले.
काही आमच्या घरी मुक्कामाला होते. त्यात एक खूपच रुबाबदार मुलगा होता.
मंजू ताईची बहीण अंजू ताईचा तो दीर आहे असं सगळे म्हणत होते. सरकारी खात्यात खूप मोठा अधिकारी आहे.
मोठ्या बहिणी मागे बारक्या बहिणीचे पण नशीब फळफळले असं सगळे म्हणत होते.

अंजू ताईच्या सासरच्यांनी आधीच मंजू ताईला सून करून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण वयात जरा जास्तच अंतर असल्यामुळे विनायक काका द्विधा मनस्थितीत होते. पण अंजू ताईला जेंव्हा केशव बद्दल कळलं तेंव्हा तिने तातडीने पावले उचलली. वेळ वाया न घालवता दोन्ही घरांचा समन्वय साधत पुढची बोलणी केली. आणि तातडीने मंजू ताई आणि तिच्या दिराच्या साखरपुड्याची तारीख ठरली.
म्हणजे मंजू ताईचा होणारा नवरा हा आहे तर. मला तर खूपच आवडला हा नवरा मुलगा. गोलू सारखाच छान आहे. मला काय मग रेवा बाहुली म्हणतो. आमच्याबरोबर खेळतो पण.
त्याचे कपडे, रुमाल, घड्याळ सगळं कसं अगदी सिनेमातल्या मुलासारखे आहे. आम्हाला सगळ्यांना इंदोर ला येण्याचे आमंत्रण पण दिले आहे तिथली मिठाई खाण्यासाठी.

मला तर असं वाटतंय की मंजू ताईला नक्कीच राजा भेटला आहे आणि ती आता राणी होणार आहे. किती गोड ना? उद्या पासून यात्रा चालू होणार आणि दोन दिवसांनी साखरपुडा.
पहाटेच मंदिरात अभिषेक असतो. मोठी माणसं जातात सगळी पहाटे मंदिरात आणि आम्ही बच्चे मंडळी सकाळी. उदया पण जाणार आहोत. मंजू ताई पण येणार आहे … किती मज्जा….
पण तो केशव दादा???
आज सकाळी जाग आली तीच गजबजाट ऐकून. आज यात्रा आहे. घरातील सगळी मोठी मंडळी पहाटे अभिषेक वगेरे करून घरी आलीत.

आई,आजी ,काकू स्वयंपाकघरात वेगवेगळे पदार्थ बनवत आहेत. घरात खूप छान घमघमाट पसरला आहे. इंदोर चे पाहुणे सगळं आवरून नाश्ता करून गावात फेरफटका मारायला गेले आहेत.
ताई, मी, मंजू ताई आणि आजूबाजूच्या मुली आम्ही सगळया आता थोड्या वेळाने मंदिरात जाणार आहोत आणि संध्याकाळी जत्रेत. किती मज्जा.रंगीबिरंगी दुकानं,पाळणा,आणि खूप खूप धमाल.
जत्रेत फिरून आल्यावर दोन दिवस पाय खूपच दुखतात.पण तरी खूप आवडतं फिरायला.
ताई आणि तिच्या मैत्रिणी पाळण्यात बसल्या की नुसत्या किंचाळत असतात. भित्र्या कुठल्या.मंजू ताई तर डोळे घट्ट मिटून घेते आणि कोणाचा तरी हात  पकडून ठेवते.

मंजू ताईचा होणारा नवरा तिच्या बरोबर मंदिरात जायचं म्हणत होता. त्याने तिच्यासाठी गुलाबी रंगाचा चुडीदार ड्रेस आणला आहे. पण गावात अशा गोष्टी चालत नाहीत असं सांगून एकत्र मंदिरात जायला विनायक काकांनी नकार दिला. केशव काही गडबड करील अशी त्यांना भीती वाटत असावी अशी चर्चा आई आणि काकी करत होत्या.
निदान आज मंजूने आम्ही आणलेला ड्रेस तरी घालावा अशी इच्छा व्यक्त केली. त्याला मात्र सगळ्यांनी होकार दिला अगदी आनंदाने. मंजू ताई किती सुंदर दिसणार ड्रेस मधे .मला तर असं वाटत होतं की कधी एकदाचं ताई ला बघतेय.
मस्त रमतगमत आम्ही मंदिरात निघालो. मंजू ताई कित्येक महिन्यांनी आज अशी घराबाहेर पडली आहे. अगदी लहान मुलासारखी बागडत होती ती.

गुलाबी चुडीदार ड्रेस मधे तर मला खूपच आवडली. मी तिचा हात हातात घेऊन चालत होते.आज ताईचा हात सोडायचा नाही असं मी पक्कं ठरवलं होतं. रस्त्याने अधून मधून आम्हाला ताईचे काका,दादा,शाम काका दिसले.
का बरं? आधी तर असं कधी व्हायचं नाही. जाऊदे असेल काही.
मंदिराजवळ बऱ्यापैकी गर्दी होती. मंत्रोच्चार चालू होते. फुल , धूप दीप, नैवेद्य यांचा सुगंध आसमंतात व्यापून राहिला होता.
मंदिराचा गाभारा खूप प्रसन्न वाटत होता. अगदी शांत आणि खूप शीतळ. देवाच्या मूर्तीकडे बघून खूप प्रसन्न वाटत होते.
दर्शन घेवून आम्ही गाभार्याला प्रदिक्षणा घालत होतो. सगळे पुढे. मंजू ताई आणि मी सगळ्यात मागे अगदी सावकाश.

गर्दीत मला पुसटसा केशव दादा दिसल्यासारखा वाटला. पण आता मंजू ताई तर राजाची राणी होणार त्यामुळे काही चिंता नाही असं मला वाटलं. प्रदक्षिणा मारून आम्ही सगळे गाभाऱ्याच्या बाहेर पडलो .
अचानक मंजू ताई म्हणाली माझी अंगठी पडली वाटतं प्रदक्षिणा घालताना.
थांबा मी घेवून येते असं बोलून ती पटकन आत गेली आणि मी तिच्या मागे धावत. गाभाऱ्याच्या मागे अगदीच गुपचूप त्या केशव ने ताईच्या हातात पटकन काहीतरी दिले आणि ताईने ते पटकन ड्रेस मध्ये लपवले. बहुतेक कागद होता.
तितक्यात ताईने मला बघितले . कावरीबावरी झाली.

मला म्हणाली, “रेवा बाळा मी तुझी ताई आहे ना . कोणाला सांगू नको बरं.नाहीतर मग परत मला घरात बंद करतील आणि मारतील पण.”
पण मोठ्यांना न आवडणाऱ्या गोष्टी ताई का करते? मला बिलकुल आवडत नाही. कोणाला सांगू पण शकत नाही मी. ताईने वचन घेतलं आहे ना..
संध्याकाळी जत्रेत खूप धमाल केली. त्या गडबडीत मी सकाळचा प्रसंग विसरूनच गेले.
मंजू ताईच्या होणाऱ्या नवऱ्याने तर माझ्यासाठी खूप खूप खेळणी घेतली. घरातील सगळ्यांसाठी काही ना काही वस्तू घेतली. मंजू ताई साठी तर खूप काही. सगळे म्हणत होते किती माणुसकी आहे मुलाला.
मला लपून छपून मंजू ताईला काहीतरी देणारा केशव आणि बिनधास्त तिच्यासाठी भेटवस्तू देणारा हा … दोन्ही चित्र बेचैन करत होती.
क्रमश:
©® वर्षा लोखंडे थोरात

सदर कथा लेखिका वर्षा लोखंडे थोरात यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
कुवत
ओढ
हनीट्रॅप
नवं माहेर

Leave a Comment

error: Content is protected !!