प्राक्तन भाग 3

भाग 2 इथे वाचा
©® वर्षा लोखंडे थोरात
यात्रा झाली आणि दोन दिवसांनी मंजू ताईचा साखरपुडा. दोन्ही घरात उत्साहाचे वातावरण. खूप मोठा मंडप उभारला होता ताईच्या घरासमोर. सगळे अगदी उत्साहात होते. आदल्या दिवशी आम्ही सगळे ताईच्या घरी मेंदी काढायला गेलो.
माझी ताई खूप सुंदर मेंदी काढते. तीच काढत होती मंजू ताईच्या हातावर. मी आणि गोलू तिथेच खेळत होतो.
मंजू ताई म्हणत होती, “मला नाही जायचं एवढ्या लांब. मला नको आहे हे लग्न. माझं केशव वर खूप प्रेम आहे आणि त्याचं माझ्यावर. आम्हाला लग्न करायचं आहे. परवा त्याने मंदिरात मला पत्र दिलं आहे. मी जर दुसरीकडे कुठे लग्न केलं तर जिवाचं बरं वाईट करून घेणार असं लिहिलं आहे. मला त्याची खूप काळजी वाटतेय.” आणि मंजू ताई रडायला लागली.

ताई तिला समजावत होती की “तुला वाटतं तेवढा चांगला नाहीये केशव. तू त्याचा नाद सोड. आयुष्य तुला एक चांगली संधी देत आहे त्याचं सोनं कर. अतातायी पणा करू नको. केशव चा विचार मनातून काढून टाक. तो रस्ता तुला कधीच मुकामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचवणार नाही.धावत राहशील आयुष्यभर सैरावैरा.कोणी सावरायला नसेल मंजू. ऐक माझं तू.”
माझी ताई मला खूपच भारी वाटली आज.आहेच गुणाची ती.
मंजू ताईचा साखरपुडा अगदी थाटामाटात पार पडला. इंदोर वरून आणलेल्या चंदेरी साडीत ताईचे रूप खुलून दिसत होते.
शेरवानी घातलेला नवरदेव तर खूपच भारी वाटत होता. घरचीच पेढी त्यामुळे मंजू ताई तर दागिन्यांनी मढली होती . जोडा अगदी लक्ष्मी नारायणासारखा दिसत आहे सगळेच म्हणत होते.

पण का कुणास ठाऊक मंजू ताई अजूनही खुश वाटत नव्हती. पण आता साखरपुडा झाला म्हणजे पुढे काही अनर्थ होणार नाही असं बाबा आईला म्हणत होते. बरं झालं या सगळ्यातून बाहेर पडली. कल्याण झालं मुलीचं. लग्न  दिवाळीनंतर करायचं ठरलं. सगळया आज्या सारख्या दृष्ट काढत होत्या ताईची.
साखरपुडा झाला पाहुणे आपापल्या घरी गेले.
अंजू ताई आणि गोलू पण गेले. पंधरा दिवसांनी निवडणूक आहे. मला तर उन्हाळ्याची सुट्टी आहे.
आता मंजू ताईला जास्तं बंधनं नाहीत. तिची खिडकी पण उघडी असते. आमच्या घरी पण येते.मला तिच्या घरी बोलावते.

विनायक काकांना निवडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला जातोय. धमक्या पण दिल्या जातायत. परवा तर त्यांच्या घरावर दगड पण टाकले होते. सुदैवाने कोणाला काही लागले नाही.
आज तर मंजू ताईचा दादा शहरातून येताना त्याच्यावर कोणीतरी हमला केला.. खूप जखमी झाला आहे.
यात केशव चा हात आहे हे सगळयांना माहीत आहे. एवढं सगळं होवूनही विनायक काकांनी अर्ज मागे घेतला नाही.
निवडणूक आठ दिवसांवर आली आहे. त्यामुळे गावात नुसती धामधूम. घोषणा,मिरवणुका ,सभा..पण यात केशव दादा जास्तं काही दिसत नव्हता.
मला तर कित्येक दिवस तो दिसलाच नाही.

आज झोपच येत नाहीये. बाहेर कुत्री एवढी का भुंकत आहेत कळत नाही.
पहाटे कसल्याशा आवाजाने मला जाग आली. बाबा ,दादा,काका घरात कोणीच नाही. उठून बाहेरच्या खोलीत गेले तर तिथे आजी काकी आणि ताई डोक्याला हात लावून बसलेले.
आजीच्या डोळ्यातून घळघळा पाणी येत होते.पण आई कुठाय? मला आई दिसत नव्हती. काय पाप केलं विनायकने म्हणून असा दिवस दाखवला रे परमेश्वरा. गेली कार्टी बापाच्या तोंडाला काळे फासून त्या केशव बरोबर.
अशी कशी दुर्बुद्धी झाली मंजू तुला? नाक कापून पळाली सगळया कुटुंबाचं.ते पण त्या दृष्ट मुलाबरोबर?

नाक कापणे म्हणजे काय मला तर समजत नव्हतं. नाक तर लक्ष्मणाने कापले होते शूर्पनखेचे .मंजू ताई  ने का?
मला झोपेत मंजू ताई घरातील सगळ्यांची नाकं तलवारीने कापून केशव दादा बरोबर पळत आहे असं दिसत होतं.
खूप काहीतरी भयंकर झालं आहे हे जाणवत होतं. मला मंजू ताई पण आता दृष्ट वाटायला लागली. तिच्याशी आता कधीच न बोलण्याचा मी निश्चय केला.
आईच्या कुशीत झोपावं वाटत होतं.मंजू ताईच्या घरी गेलेल्या आईची वाट बघत मी झोपी गेले.
उद्यापासून शाळेत लवकर जायचे आहे. आठवीला गेल्यामुळे स्काऊट गाईड आणि एनसीसी पण आहे.मला पोलीस अधिकारी व्हायचं आहे त्यामुळे मी NCC घेतलं आहे.

पुढच्या महिन्यात स्वातंत्र्य दिन आहे त्या दिवशी शाळेत खूप कार्यक्रम असतात. स्काऊट गाईड आणि NCC ची परेड तर विशेष आकर्षण. माझ्याकडे मुलींच्या परेड चे नेतृत्व आहे ते पण आपला झेंडा पकडून. त्यामुळे सराव तर हवाच. त्यासाठी आम्हाला दोन तास लवकर शाळेत बोलावतात.
ताई शहराच्या बाहेर असलेल्या मेडिकल कॉलेज मधे आहे. घरून तिला लांब पडतं म्हणून मग ती आता हॉस्टेल वर राहते मागच्या महिन्यापासून. नील दादा बारावीला.
शाळेत आता मी एकटीच जाते. तशा आजूबाजूच्या मैत्रिणी आहेत. जातो आम्ही एकत्र पण गावसारखी मज्जा नाही येत.आणि परेड मधे आमच्या घराच्या आजूबाजूचे कोणीच नाही.

आमची कॉलनी सोडल्यावर शाळेत जायला एक शॉर्ट कट आहे. म्हणजे अगदी जुन्या जीर्ण अशा चाळी आहेत. तिथे तसा खूप गोंगाट असतो.
आमच्याकडे घरकाम करायला येणाऱ्या सुमन मावशी तिकडेच कुठे तरी राहतात. त्या चाळी ओलांडल्या की लगेच शाळेची भिंत. सुमन मावशींची कामं संपायची आणि माझी शाळेत जायची वेळ एकच.
आई म्हणाली त्यांच्याबरोबर जात जा म्हणजे तुला सोबत होईल आणि जवळ पण पडेल. त्या चाळीच्या तोंडाशी सुमन मावशींची खोली त्या तिथून मला  निरोप द्यायच्या आणि मी पुढे जायची.
आठ दहा दिवसांनी सुमन मावशींनी अजून एक काम पकडलं त्यामुळे मी एकटीच जावू लागले.

तसाही तो रस्ता आता मला आवडू लागला होता. त्या रस्त्याने खूप गडबड असायची. कोणी बाहेर नळावर पाणी भरत असे , कोणी बाहेर कामे. मुलांचा गोंधळ,गप्पाटप्पा करत दारात बसलेल्या बायका. चाळींच्या पार टोकाला कोपऱ्यात एक छोटीशी खोली होती. तिथे मात्र कायम सामसूम असायची. जरा जास्तच जीर्ण वाटत होती ती खोली.खिडकी उघडी असायची आणि दार थोडे किलकीले उघडे. कधी कधी बाळाचा रडण्याचा आवाज यायचा तो पण खूप जोरात.अगदी बेसूर.
बाळाला खूप भूक लागल्यावर बाळ रडते हे ठीक आहे ..पण हे बाळ खूपच भयंकर आवाजात रडते.का बरं? खूप दिवसाचं भुकेले आहे का बाळ? मी एकदा खिडकीतून डोकावून बघायचा प्रयत्न केला पण आत अक्षरशः अंधार होता.बकाल भकास.भितीदायक.

आज नेहमीप्रमाणे त्या खोलीच्या बाहेरून जाताना आतून काहीतरी आवाज येत होता. बाळाची आई असावी.बोलत होती बाळाशी. ‘नको रडू बाळा.काय झालं तुला?
बाळा कसं सांभाळू रे तुला
पोटी माझ्या जन्म घेतला तू फुला
बाप तुझा फसवून गेला
कसं वाढवू सांग बाळा तुला?

माय बाप माझे थोर
त्यांची मी अभागी पोर
खुपसला त्यांच्या पाठीत खंजीर
तुझ्या पोटाला काय देवू माझ्या जीवाला घोर
रडू नको बाळा  थांब जरासा
तू हसला की दिसतो तुझ्यात मामा थोडासा
मावशीला तुझ्या किती किती हौस
बघ धाडलीत तुझ्यासाठी बाळ लेणी खास

तालेवार घरच्या लेकीचा तू बाळ
तुला वाढवण्यासाठी कुठून आणू बळ
पोटात तुझ्या आणि माझ्या पण पडली आहे घळ
पोट भरणार असेल तर अश्रू तू डोळ्यातून ओघळ
सोन्याच्या ताटात आजी वाढत असे जेवण
आता भुकेने दिसते समोर मरण
डोळ्यासमोर येते आता माझेच सरण
तेच आता माझ्या चुकीचे प्राक्तन
तेच आता माझ्या चुकीचे प्राक्तन

हा आवाज… हा आवाज कोणाचा? हे स्वर माझ्या ओळखीचे. त्यातील आर्तता का माझ्या काळजाला चिरून जाते आहे ?
मी क्षणभर स्तब्ध झाले.अडखळले..आणि अचानक शाळेकडे पळत सुटले. माझ्या ह्रदयाचे ठोके वाढले होते ..अंग घामाने चिंब झाले होते. मन सारखं म्हणत होते तू आत जावून बघायला हवं होतं .
मी आता मनात पक्कं ठरवलं होतं की घरी जाताना  पण त्याच रस्त्याने जायचं आणि त्या खोलीत जावून बघायचं .आणि ते पण एकटीने.
त्यामुळे शाळा सुटल्यावर पटकन मी त्या रस्त्याने बाहेर पडले. नेहमी प्रमाणे दरवाजा लोटलेला आणि खिडकी पूर्ण उघडी. खिडकीतून न बघता मी दरवाजा लोटून बघितला.

समोर पाठमोरी एक कृश स्त्री बाळाला मांडीवर घेवून बसलेली.घरात चार पाच भांडी. फाटकी चादर आणि इकडे तिकडे पसरलेले कपडे. माझी चाहूल त्या स्त्रीला लागली जणू आणि तिने मागे वळून बघितलं.
तिला बघताच माझ्या पायाखालची जमीन सरकली.
ती पण आश्चर्याने माझ्याकडे बघत होती ती उठून माझ्याकडे येणार त्या क्षणी मी तिथून धूम ठोकली आणि घरी निघून आले.
‘काय झालं रेवा इतकी का पळत आलीस? कधी वेंधळेपणा जाणार आहे तुझा देव जाणे?’ आई बडबड करत होती पण माझ्यापर्यंत काहीच पोहोचत नव्हतं.

त्या रात्री मंजू ताई केशव दादा बरोबर निघून गेली. पुर्ण गावात जणू सुतक पडले होते. विनायक काकांनी त्या धक्याने अंथरूण धरले. मंजू ताईचा दादा जो जखमी झाला होता तो ठीक झाला पण त्याचा एक पाय कायमस्वरूपी अधू झाला. मंजू ताईच्या आईचे मानसिक संतुलन बिघडले. अंजू ताई तर धाय मोकलून रडत होती. कुठलं तोंड घेवून सासरी परत जावू असं म्हणत होती.
एव्हाना ही बातमी तिच्या सासरी पोहोचली होती. मोठ्या मनाची माणसं ती. त्यांनी माझ्या बाबांना फोन केला की जे झालं त्यात अंजू आणि तिच्या घरच्यांनी काहीही चूक नाही. आम्हाला त्यांच्यावर काही आक्षेप नाही .
मंजू ताईचे कुटुंबीय अपराधीपणाची भावना दाटून आल्यामुळे इंदोर वरून आलेल्या फोन वर बोलू शकत नव्हते.

केशव दादा ज्या पक्षासाठी काम करत होता त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सगळं झालं. विनायक काकांनी अर्ज मागे घेतला.त्यामुळे त्यांची बिनविरोध सत्ता आली.
मंजू ताईला घर सोडून जावून आता एक महिना झाला होता. आज अंजू ताई आणि गोलू परत इंदोर ला निघाले आहेत. माझे बाबा आणि अंजू ताईचे काका सोडवायला जाणार आहेत. या महिनाभरात आमची दोन कुटुंबं सतत बरोबर होती. जेवणही आमच्या घरून जात होतं.आई तर दिवसातील बराच वेळ तिकडेच असायची.
विशेष म्हणजे गावातही कोणी जास्तं चर्चा न करता विनायक काकांना मानसिक दिलासा दिला. कुटुंबाची पुण्याई तेवढी होती.

अंजू ताई निघताना विनायक काकांनी तिच्या पुढे हात जोडले. ‘बाळा मी तुझा अपराधी आहे.मला माफ कर. पण एक वचन देतो तुला मी मंजुचा आणि या घराचा आता संबंध संपला.ती मुलगी आमच्यासाठी आता मेली.’ हे ऐकून सगळ्यांच्या गळ्यातून हुंदका बाहेर पडला.
मंजू ताईचे नाव कधीच घ्यायचे नाही असं आम्हाला पण मोठ्यांनी सांगितले होते. त्यानंतर आम्ही मुलं शहरात शिकायला आलो. मंजू ताई हे नाव कधीच उच्चारले गेले नाही. सुट्टीत गावी गेल्यावर तिची आठवण व्हायची. पण नाव कोणी घेत नव्हतं.
दरम्यान मंजू ताईच्या दादाचे लग्न झाले. विनायक काका काकू थोड्या सावरले. अंजू ताईला गोड अशी मुलगी झाली. तिच्या दिराचे पण लग्न झाले. सगळे बऱ्यापैकी सावरले होते. पण मंजू ताईला कदापि क्षमा करायची नाही हे पण पक्कं होतं.

आज मला हे सगळं का आठवतं आहे. मला जे दिसलं ते खरं होतं का? की माझी काही नजर चूक झाली? आईला सांगू का? नको. ती मलाच रागे भरेल. तुला कशाला उठाठेव म्हणेल.काय करू? ताई असती तर बरं झालं असतं. तिला सांगितलं असतं. विचार करता करता मी झोपेच्या स्वाधीन झाले आणि स्वप्नात परत मला ती कृश स्त्री दिसली माझ्याकडे बघताना. मी घाबरून आईच्या कुशीत शिरले.
“रेवा अगं उठ.आज शाळा नाही का? लवकर जायचे असेल ना तुला?” आई हाका मारत होती.
अरे आईला काल सांगायची विसरले. आज १४ ऑगस्ट त्यामुळे शाळा अर्धा दिवस आहे .आणि शाळा सुटल्यानंतर एक तास सराव . काल काय झालं होतं मला कोण जाणे?

आईला सांगितल्यावर ती जरा वेळ माझ्याकडे बघत होती. मग म्हणाली “अगं लक्ष कुठे आहे तुझं सध्या? आणि काल शाळेतून येताना मैत्रिणींबरोबर का नाही आलीस? संध्याची आई सांगत होती मघाशी. काय चालू असतं तुझ्या डोक्यात काय माहिती? आता तयार हो बघू लवकर. जाताना एकत्र जा तुम्ही मुली आणि येताना आपल्या नेहमीच्या रस्त्याने ये. उगीच घोर नको लावू जीवाला.”
मी हो म्हणून पटकन आवरायला गेले.
आज खूप दिवसांनी आम्ही मैत्रिणी एकत्र शाळेत जात होतो त्यामुळे मजा येत होती. स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम खूप छान झाला.नंतर दोन दिवस जोडून सुट्टी होती त्यामुळे मी त्या घटनेबद्दल जवळ जवळ विसरलेच होते.
राखी पौर्णिमेचा दिवस होता. सुमन मावशी नेहमीप्रमाणे काम करत होत्या आणि आई बरोबर गप्पा पण मारत होत्या.

“उमा ताई त्या पोरी कडे बघवत नाही हो. खानदानी दिसतेय पण मग अशी कशी या दलदलीत येवून पडली काय माहिती? खानदानी तेज लपून राहत नाही बरं. लेकरू तर भुकेने तळमळत असतं. आम्ही तरी काय आणि किती मदत करणार? आमचंच हातावर पोट. कधी भाकर तुकडा देतो पण त्या लेकराला दूध कुठून देणार? जीव तुटतो आमचा. उमा ताई काही जुने पुराणे कपडे असतील तर दया . तेवढाच हातभार.”
आईने मग काही जुन्या साड्या, चादर वगेरे दिलं काढून. आज गोडधोड बनवलाय होतं ते पण दिलं डब्यात. सुमन मावशी नक्कीच त्या स्त्री बद्दल बोलत असणार. मी तर विसरूनच गेले. आईला सांगू का की मी बघितलं आहे तिला. नको नाहीतर ती रागवेल. दुसऱ्यांच्या घरात डोकावून बघायचं नसतं असं सूनावेल.

आज सकाळपासून पाऊस पडत आहे.  शाळा सुटताना पाऊस आला म्हणून मी पळत झाडाखाली जावून उभी राहिले. बाकीच्या मैत्रिणी शाळेच्या फाटका जवळच होत्या.
इतक्यात आवाज आला “रेवा… रेवाच ना तू? रजनी ची बहिण .मी आश्चर्याने वर बघितलं तर समोर तीच स्त्री.अंगात अगदी ढगळ पोलके… अशक्त अशा अंगावर कशीबशी गुंडाळलेली साडी..ती पण जुनी.. जीर्ण. कडेवर बाळ ..हातापायाच्या काठी असलेले… निस्तेज…
हो..ही मंजू ताईच…मी डोळे विस्फारून तिच्याकडे बघत होते.

तिच्या साखरपुड्याचे काही फोटो आहेत ताई कडे..गुपचूप बघत असते ताई आणि रडत असते.त्या वेळेचे तिचे ते रूप..ती साडी ..दागिने…आणि आत्ता समोर असलेली मंजू ताई…अंजू ताईची गोल गुटगुटीत मुलगी आणि हे बाळ..
सगळं बघून मी चक्रावून गेले.
तोंडातून शब्द फुटत नव्हता. का कोणास ठावूक काही न बोलता मी तिथून धूम ठोकली ..
“अगं रेवा…” हाक ऐकू येत होती ..
पण मागे वळूनही न बघता एवढया पावसात मी पळत सुटले.
रात्री डोळे मिटल्यावर परत परत तेच दृश्य दिसायला लागले.

काय करू?आईला सांगू का? पण ती रागे भरेल. मंजू ताईचे नाव कोणीच घ्यायचे नाही असं सांगितलं आहे. ताई इथे असती तर बरं झालं असतं. तिला सांगितलं असतं.
मंजू ताईची अशी अवस्था कशी काय झाली? ती इथे कशी? त्या केशव बरोबर पळून गेली होती मग तो कुठे आहे? ही दुनिया दाखवणार होता का तो? या साठी मंजू ताईने एवढ्या रुबाबदार अशा अंजू ताईच्या दीराला सोडून दिलं?
मला कळत नाहीये मी काय करू? मला खूप गुंगी येते आहे.
जाग आली तर  चांगलेच उजाडले होते.
क्रमश:
©® वर्षा लोखंडे थोरात

सदर कथा लेखिका वर्षा लोखंडे थोरात यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
कुवत
ओढ
हनीट्रॅप
नवं माहेर

4 thoughts on “प्राक्तन भाग 3”

 1. अजुन भाग आहेत का. कथा अपुर्ण नका ठेऊ. पुढे काहीतरी लिहा. तिचे प्रायश्चित्त.

  Reply
  • हो मॅम…अजून दोन भाग आहेत…लवकरच प्रकाशित होतील.
   कथा वाचण्याकरता मनापासून धन्यवाद.

   Reply
 2. खूप सुंदर कथा …. अगदी डोळ्यासमोर उभा राहतो प्रसंग… इतकी साधी पण प्रभावी लेखणी आहे

  Reply

Leave a Comment

error: Content is protected !!