प्राक्तन भाग 4

भाग 3 इथे वाचा
©® वर्षा लोखंडे थोरात.
आईने उठवले नाही आज.
“रेवा उठली का? चूळ भरून घे आणि खा काहीतरी. रात्रभर तापाने फणफणली होतीस. काल एवढ्या पावसात भिजत यायची गरज होती  का?” आई म्हणत होती.
पुढचे दोन तीन दिवस शाळेत गेलेच नाही. मंजू ताई आली असेल का परत मला भेटायला? तिला काय वाटलं असेल मी तिच्याशी न बोलता निघून आले. ती खरंच खूप अडचणीत दिसत आहे.आणि कोणी अडचणीत असेल तर त्याला आपल्यापरीने जेवढी मदत करता येयील तेवढी नक्कीच करावी अशीच शिकवण आपल्याला घरातून मिळाली आहे.
आज आईला सांगू मंजू ताई आणि  तिच्या बाळा बद्दल असं मी ठरवलं.

आज पाऊस बऱ्यापैकी उघडला आहे. दुपारी अचानक फाटकाचा  आवाज आला. कोणीतरी जोरजोरात फाटक वाजवत होते.मी खिडकीतून बघितलं तर मंजू ताई…
आईने काही ओळखलं नाही.
ती आतूनच म्हणत होती आम्हाला कामासाठी कोणी नको आहे जा तुम्ही.
तरीही ती फाटक वाजवत होती म्हणून आई बाहेर गेली, फाटक उघडलं आणि मंजू ताई धाडकन खाली जमिनीवर पडली.
तिचे बाळ जोरजोरात रडायला लागले. मी धावत बाहेर आले.
एव्हाना आईने पण तिला ओळखले होते. मी बाळाला घेतले आणि आईने कसं तरी ताईला घरात आणले. बसवलं.पाणी दिलं…
“मला खूप भूक लागली आहे ..माझ्या बाळाला दूध हवं आहे” असं म्हणून ताई परत बेशुद्ध पडली.

“शरीर पुर्ण कुपोषित झाले आहे. कमी वयातील बाळंतपण आणि त्यात झालेली खाण्यापिण्याची आबाळ त्यामुळे अशी अवस्था झाली आहे. अंगावर मारहाणीच्या आणि काही चटक्याच्या खुणा पण आहेत. डोळ्यात तेल घालून काळजी घ्यावी लागेल मगच ती यातून बाहेर येवू शकेल. शक्य असेल तर दवाखान्यात भरती करा आणि जवळची मायेची माणसं बोलावून घ्या म्हणजे रुग्ण लवकर बरा होईल” डॉक्टर आईला सांगत होते.
“मी औषधोपचार चालू केले आहे.पडेल आराम.मग काहीतरी खायला द्या.” असं सांगून डॉक्टर निघून गेले.
हे सगळं इतकं पटकन घडलं की आईला विचार करायला वेळच मिळाला नाही.

अशा परिस्थितीत पण तिने बाळाचा ताबा स्वतः कडे घेतला. त्याला स्वच्छ केलं दूध पाजलं. पोट भरल्यावर तो मस्त खेळायला लागला. तेवढ्या वेळात शेजारच्या दादाला बाबांना आणि ताईला फोन करून बोलवायला सांगितलं.
बाळासाठी कपडे मागवले. काय झालं आणि कोण मुलगी दारात बेशुद्ध पडली हे बघायला आजूबाजूचे लोकं येत होते ..त्यांच्या प्रश्नांना जेमतेम उत्तर देवून आई वेळ निभावत होती.
इतक्यात तिला काय वाटले तिने मला हाक मारली… “रेवा तू तापात नेमकी मंजू ताईचे नाव घेत होतीस आणि आज ही अशा अवस्थेत दारात कशी काय? तुला काही माहीत आहे का? घाबरु नको बाळा. सांग मला.”
मी आईला महिना दीड महिन्यातला सगळा वृत्तांत सांगितला.

आई रागावली नाही पण तिने उसासा सोडला. हे असं होणार ही खात्री होतीच पण असं काही होवू नये ही पण इच्छा होती.
शेवटी प्राक्तन.अजून किती भोग राहिलेत पोरीच्या नशिबात ईश्वर जाणे. गजानना तूच आम्हाला मार्ग दाखव. कुठल्या तोंडाने विनायक दादांना हे सगळं सांगू? काय भूमिका घेतील ते? रेवा तू लगेच सांगितले असते तर थोडी लवकर मदत करता आली असती. तुझं पण वागणं योग्यच होतं म्हणा. बाबा आल्यावर ठरवू काय ते.
उमा काकी क्षीण आवाजात मंजू ताईने हाक दिली. ताई शुध्दीवर आली…आईने आधी तिला खायला दिले. किती दिवस उपाशी होती काय माहिती? अगदी पोटभरून जेवली . स्वच्छ कपडे घातले. आता तिला थोडी हुशारी आली.
शरीर आणि मन पुर्ण पोखरल्यामुळे तिच्यात ताकद राहिलीच नव्हती.अंथरुणात पडून तिचे डोळे सतत वहात होते आणि आईकडे बघून फक्त हात जोडत होती.

बाळ माझ्याकडे चांगलाच रमला होता. माझी ताई तासाभरात पोहोचणार होती आणि बाबा रात्री पर्यंत. झालं काय होतं तिच्या आयुष्यात आणि होणार काय आहे पुढे हे काहीच कळत नव्हते.
आता फक्त बाबा येण्याची वाट बघत होतो तिच्या भवितव्यासाठी..मंजू ताई बरी होण्याची वाट बघत होतो नेमकी  काय झालं तिच्या आयुष्यात जाणून घेण्यासाठी आई आणि मी तिच्या आणि तिच्या बाळा सोबत आहोत वर्तमानात.
सगळंच अतर्क्य…
मंजू ताईला नुकतीच झोप लागली होती. तिचे बाळही पोट भरल्यामुळे छान झोपले होते.
तासाभरात ताई पण आली .योगायोगाने तिला पुढच्या आठवड्यात गणपतीची सुट्टी आहे त्यामुळे निवांत राहील म्हणाली. मंजू ताईच्या खोलीत तिने डोकावून बघितले आपल्या बालमैत्रिनीला अशा निस्तेज रुपात बघून ताईचे डोळे ओघळू लागले.

“रजनी, मंजू थोडी सावरली की तूच विचार तिला नेमकी काय झालं तिच्या आयुष्यात? अशी अवस्था कशी झाली तिची? आणि डॉक्टर म्हणत होते की दवाखान्यात भरती करावं लागेल. तुझा काय विचार आहे याबद्दल?” आई रजनी ताईला सांगत होती.
“हो आई तू नको चिंता करू.मी बोलेन तिच्याबरोबर.आणि दवाखान्यात भरती करायचं तर तिचं बाळ अवघं वर्षाचं वाटतंय.ते राहणार नाही. त्यापेक्षा आता मी आलेच आहे तर मीच सुश्रुषा करते तिची. डॉक्टरांच्या संपर्कात राहू आपण.” आईला पण रजनी ताईचे म्हणणे पटले.
त्या रात्री बाबा आले. नंतरचे आठ दिवस मंजू ताईची तब्येत चांगली कशी होईल याच विचारात गेले.
केशव दादा आणि तिच्या घरातून निघून जाण्याबद्दल कोणी काहीही विचारलं नाही.

बाळाने पण छान बाळसे धरले होते आता. पण लोकाची मुलगी अशी किती दिवस घरात ठेवणार? तसं बाबांनी गावातल्या काही जाणत्या आणि विचारी लोकांच्या कानावर सगळा वृत्तांत घातला होता.
ते शहरात येवून गेले. पण परस्पर..मंजू ताईच्या समोर आले नाही. तिच्या घरी काय आणि कसं सांगायचं हा मोठा प्रश्न होता.
केशव चा काही तपास नव्हता. त्याच्या घरी मंजू ताईला पाठवावे तर त्याचे आजी आजोबा दोघेही या जगात नाहीत आता.
संयम ठेवून परिस्थिती हाताळणे खूप गरजेचे होते.
मंजू ताई आता पूर्णपणे बरी झाली होती.घरातल्या घरात फिरू लागली होती. पण शांत बसून असायची. आतल्या आत मिटून गेल्यासारखी. आई आणि ताई खूप प्रयत्न करत होत्या तिला बोलत करायचा पण अजूनही यश येत नव्हतं.

बाबा,दादा,नील दादा सगळेच तिची आणि बाळाची काळजी घेत होते.ए के रात्री झोपेत अचानक मंजू ताई घाबरून किंचाळली. थरथर कापत होती. तिचा आवाज ऐकून सगळे उठून तिच्याजवळ आले. मंजू ताईने आईला आणि रजनी ताईला बिलगून हंबरडा फोडला.
आई मायेने तिच्या डोक्यावर हात फिरवत रडून घे बाये  म्हणत होती. सगळ्यांचेच डोळे भरून आले.
आता मंजू ताई थोडी शांत झाली. बोल बाळा..काय झालं सांग आम्हाला. मनाला काय टोचत आहे तुझ्या? आपण मार्ग काढू नक्की. बाबा म्हणाले.
यात्रेच्या दिवशी मंदिरात केशव ने मला पत्र दिले. त्यात लिहिले होते तू जर दुसऱ्या कोणाशी लग्न केलं तर मी जिवंत राहणार नाही. आधीच त्याने माझ्या मनावर काय गारूड केले होते मला माहित नाही. त्याचे ते पत्र वाचून मला असं वाटलं की जगात फक्त केशव माझ्यावर खूप प्रेम करू शकतो. बाकी कोणी नाही. सारासार विवेकबुद्धी जणू गहाण ठेवली होती मी.त्याच्या भूलथापांना मी बळी पडले.

मला माझ्या वडिलांची पत, प्रतिष्ठा,बहिणीच सन्मान,तुम्हा सगळ्यांचे प्रेम या सगळया गोष्टींचा विसर पडला. त्या पत्रात त्याने घरातून बाहेर पडायची योजना आखली होती.आणि मी सुध्दा सहज त्याच्या धूर्त चालीची भागीदार झाले. त्या रात्री काही कपडे आणि साखरपुड्याचे दागिने घेवून मी घरातून पळ काढला.
मुंबई आणि तिथून रेल्वे ने वाराणसी. कुठल्याशा मंदिरात गळ्यात हार घालून एका खोलीत संसार थाटला. संसार होता का तो? माझ्यासाठी होता. पण केशव साठी तर मी फक्त एक कळसूत्री बाहुली होते. पाहिले दोन तीन महिने प्रेमाच्या धुंदीत गेले. गावाकडील वातावरण शांत झाल्यावर आपण तिकडे जावू आणि तिकडेच काही कामधंदा करून सुखाने राहू असं केशव मला रेल्वेत म्हणाला होता. मलाही ते पटले होते पण सहा महिने होत आले तरी केशव गावी जाण्याचे नाव घेत नव्हता. कुठलं कामही करत नव्हता.त्याने बरोबर आणलेले पैसे महिन्याभरात संपले.

मग गोड गोड बोलून माझ्याकडून एकेक दागिना मागून घेतले. त्याची संगतही मला जरा संशयास्पद वाटत होती. हळूहळू आठ आठ दिवस तो घराबाहेर राहू लागला. दारूचे पण व्यसन होते त्याला.अजून वर्ष तसेच गेले. ज्या प्रेमासाठी मी इतकं वाकडं पावूल उचललं ते तर मला कुठेच दिसत नव्हते. ते भन्नाट आयुष्य,स्वातंत्र्य याची स्वप्नं त्याने मला दाखवली होती ते कुठे होतं?
एक दिवस अचानक पोलिस घरी आले आणि केशव बद्दल विचारू लागले. गेले आठ दिवस तो घरीच नव्हता. त्याच्यावर बरेच गुन्हे होते. जुगार, सट्टा, चोऱ्या माऱ्या सुध्दा. मुंबईतून काही वर्ष तो तडीपार पण होता. हे ऐकून मला भोवळ आली. जरा सावराल्यावर पोलिस म्हणाले तो घरी आल्यावर पोलीस स्टेशन ला खबर द्या.
मी किती वेळ तशीच सुन्न बसून होते . काहीच सुचत नव्हते.
पुढचे चार पाच दिवस होवून गेले तरी पण केशव आला नाही.अशा परमुलखात एकटी असहाय मी. मीच विणलेल्या जाळ्यात अडकलेले.कोणाकडे मदत मागणार?  असा कसा वागू शकतो हा केशव?

त्याला काहीच वाटत नसेल? घरात मला काही हवं नको? मला माझं घर आठवतं. घरभर बागडणारी मी आठवते. दुधा तुपाने भरलेली फडताळं आठवतात. मायेनी न्हावू माखु घालणारी आजी कडाकडा बोटं मोडून दृष्ट काढणारी…आई, बाबा,काका ,काकू..मैत्रिणी.. कधी कोणी एकटं वाटू दिलं नाही.आणि आज? घरी पत्र लिहावं का?
हो… बाबांना पत्रच पाठवते. ते नक्की मला सोडवतील यातून. अचानक मला मळमळ व्हायला लागली…कोरड्या उलट्या..परवा भोवळ पण आलेली.
आवाज ऐकून शेजारची भाभी आली आणि हसू लागली. तनिक निंबू का आचार चख लो.आराम पडेगा. तुम्हारा आदमी किधर हैं? पेहली बार पेट से हो तो उसे साथ में होना चाहिए.

माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. पुर्ण जग भवती भिरभिरत आहे की काय असे वाटू लागले. माझ्या पोटात बाळ आहे? अशा वस्तीत मी माझ्या बाळाला जन्म देणार? ज्याचं बाळ आहे तो आणि मी आम्ही आहोत का सक्षम हे सगळं निभावून न्यायला? अनेक विचार मनात आले.
एक मन म्हणत होते कदाचित बाळ जन्माला येणार म्हणजे केशव पण आनंदी होइल. सुधारण्याचा प्रयत्न करीन. आपल्या प्रेमाचा अंश बघून सुखावेल. जबाबदारीने वागेल. त्यामुळे मी आई बाबांना पत्रच नाही पाठवले. ही माझी दुसरी घोडचूक झाली. पण मनच ते. कधी केशव कडे कधी आई बाबांकडे अविरत धावत होते. पोटातल्या अंशा मुळे केशव चे माझ्या मनातील पारडे अजून जड झाले.
एके रात्री धाड धाड दरवाजा वाजवत केशव घरी आला आणि सामानाची बांधाबांध करू लागला.बरोबर अजून एक माणूस होता. केशव त्याला म्हणत होता, इसको इधर ही मरने छोड़ देता लेकिन पुलिस को पता चला हैं ये मेरे साथ थी। इसलिए ये बोझ लेके जाना पड़ेगा। नहीं तो मैं इसको छोड़ के गया था।

हे सांगताना मंजू ला परत रडू आलं. तिला पाणी देवून शांत केलं. ताई सगळ्यांसाठी कॉफी घेवून आली.
केशव जे काही बोलला ते ऐकून मला खूप धक्का बसला. सामान आवरून त्याच रात्री आम्ही वाराणसी सोडलं आणि रेल्वेत बसलो. मागच्या रेल्वेच्या प्रवासात माझ्या डोळ्यात नवीन आयुष्याची स्वप्नं होती… मला हवं तसं मुक्त आयुष्य होतं… बंधमुक्त….आणि आज या प्रवासात माझे डोळे भकास होते….आयुष्यात अंधार दिसत होता… या सगळ्यातून बाहेर पडण्याचा तू आता प्रयत्न करूच नको हे सांगणारा माझ्या ओटीपोटात वाढणारा मायेचा पाश होता. माहीत नव्हतं आता हा प्रवास मला कुठे नेणार होता?
रात्र तशी खूप झाली होती. सगळ्यांची झोप मात्र उडाली होती. आणि नेमकी काय आणि कसं झालं तिच्या आयुष्यात हे जाणून घेणं आवश्यक होतं. त्याशिवाय पुढे काय करायचे हे ठरवता आले नसते.

मंजू ताई  बोलता बोलता क्षणभर थांबली . बाबांनी पुढे होवून तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले बेटा आज सगळं बोलून मोकळी हो. तुझी चूक झाली आहे याचा अर्थ असा नाही की तू कोणी गुन्हेगार आहेस . बाबांच्या आश्वासक अशा बोलण्याने तिच्या डोळ्यात वेगळीच चकाकी आली आणि तिने बाबांचा हात हातात घेऊन परत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. पण हे अश्रू कृतज्ञतेचे होते. इतक्या वर्षांनी आज तिला परत वडिलांचा दिलासादायक स्पर्श जाणवला असेल आणि म्हणूनच ती बऱ्यापैकी आश्वस्त झाली असावी.
वाराणसी वरून आम्ही मुंबईला आलो. परत तशाच कुठल्यातरी गलिच्छ वस्तीत. माझ्या पोटात बाळ वाढत होते. त्या जाणिवेने मी हरकून जायची. आता तरी केशव माझी काळजी घेईल … जबाबदारीने वागेल अशी मला आशा वाटत होती. पण केशव? तो तर कोणी वेगळाच होता.

मीच मग शेजारच्या एका वहिनींबरोबर सरकारी दवाखान्यात नाव नोंदवून आले. माझं वय आणि तब्येत बघून डॉक्टर बऱ्यापैकी चिंतेत पडले होते. कित्येकदा नवऱ्याला घेवून ये सांगायचे पण केशव कधीच माझ्याबरोबर आला नाही. उलट घरात अजून चार त्याच्यासारखे मित्र जमा करून पत्ते,जुगार खेळत दारू सिगारेट ओढत बसायचा. त्या एका खोलीत माझा जीव गुदमरत असे. त्या वासाने मळमळ व्हायची आणि त्याच्या मित्रांच्या वखवखलेलया नजरा.
दागिने तर सगळेच लंपास केले होते. घरात कधी खायला असायचे कधी नसायचे. क्वचित बाहेर जावून काही काम करून बऱ्यापैकी पैसे आणायचा. पण काय काम केले कळू देत नसायचा. तुला कशाला उठाठेव म्हणायचा.
पळून आलीस ना मग आता गप कोपऱ्यात बसून रहा.जे मिळेल ते गिळ नाहीतर ते पण मिळणार नाही. हळूहळू माझा पण संयम सुटायला लागला होता. शब्दाने शब्द वाढत जायला लागले..आणि मग ढकलून देणे..मारहाण करणे हे नित्याचे झाले. अशा परिस्थितीत माझ्या पोटात बाळ वाढत होते.

नववा महिना लागला होता. कधीही दवाखान्यात दाखल व्हावं लागणार होतं. एके दुपारी मी तपासणी साठी दवाखान्यात गेले होते. नेहमीप्रमाणे एकटीच.घरी आले तर बाहेर बऱ्याच चपला आणि आतून बोलण्याचे आवाज येत होते. बोलण्याच्या पद्धतीमुळे ते लोक नक्कीच आपल्या गावाचे असणार हे मी लगेच ओळखले. पण नेमकी कोण असावं हा संदर्भ लागत नव्हता.मी बाहेरच खिडकीशी उभी राहून त्यांचं बोलणं ऐकत होते.
किती दिवस हे लोढणं गळ्यात घालून फिरू? तीन वर्ष होत आले की. तुम्ही तर फक्त निवडणुकीपूरते सांभाळून घे असं सांगितलं होतं. तूम्ही बोलावलं म्हणून मी गावाला आलो. त्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. बदनामी होइल विनायकशेठ ची असं वागलो. पण विनायक शेठ काही बधले नाही. मग त्याच्या पोरीला घेवून पळून गेलो. विनायक शेठ खचले आणि त्यांनी अर्ज मागे घेतला. तुमचा हेतू साध्य झाला. कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुम्हाला पद हवं होतं. मला मोबदला दिला त्याचा.

पण आता या पोरीचं आणि तिला होणाऱ्या पोराचं काय करू? सोडून दिलं असतं पण नेमकी पोलिस तिच्यापर्यंत पोहोचले होते. कुठूनही माझा सगळा इतिहास शोधून काढतील. आता तुम्हीच मोकळं करा मला यातून. केशव बोलत होता आणि त्याचा प्रत्येक शब्द माझ्या कानात गरम लोह रसासारखे पडत होते. अपमान आणि लाजेने माझ्या डोळ्यातून गरम अश्रू बाहेर पडत होते.
‘हे बघ केशव तुला फक्त मुलीला नादी लावून आणि नंतर पळवून ने एवढं सांगितलं होतं. तू कशाला एवढं झंझट वाढवलं? वर्ष सहा महिने मजा करून सोडून द्यायचं. आता आमचा काही संबंध नाही. निस्तर तुझं तू.” कोणीतरी बोललं.
‘विनायक शेठ कडे सोडून ये. तुला पण सांभाळतील. आता तर काय लेक, जावई आणि नातवंड पण. रग्गड पैसा आहे त्याच्याकडे कर ऐश.’

हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी पटकन शेजारच्या खोलीत घुसले. ते लोक निघून गेल्यावर मी घरी गेले. केशव बऱ्यापैकी शांत वाटत होता. मला बघून पुढे आला..पाणी दिलं.
त्या दिवसानंतर त्याच्यात चांगलाच बदल झाला. गोड गोड बोलू लागला,काळजी घेवू लागला.. आपलं बाळ असं म्हणू लागला.
मात्र आता मी सावध होते. मला त्याला कळू द्यायचं नव्हतं की मला त्याचं खरं रूप माहिती झालं आहे.
क्रमश:
©® वर्षा लोखंडे थोरात.
सदर कथा लेखिका वर्षा लोखंडे थोरात यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
कुवत
ओढ
हनीट्रॅप
नवं माहेर


2 thoughts on “प्राक्तन भाग 4”

Leave a Comment

error: Content is protected !!