ऋण 

©️®️सौ. सायली जोशी.
वसुधा आणि शिरीषला एका पाठोपाठ एक अशा तीन मुलीच झाल्या. घरची शेती, दोन घरं, दूध – दुभती जनावरं, अशी बरीच मालमत्ता असल्या कारणाने घराण्याला ‘वारस’ हवा अशी जानकी बाईंची इच्छा होती. खरंतर आणखी एक ‘चान्स ‘ घ्यायचा वसुधाच्या मनात नव्हतंच मुळी. ‘मुली मोठ्या झाल्या की थोडी, थोडी इस्टेट प्रत्येकीच्या नावावर करू. त्यात काय एवढं?’ असं शिरीषचं म्हणणं होतं. ते रास्तच होतं.
पण जानकी बाई स्वतः वसुधाला डॉक्टर बाईंकडे घेऊन गेल्या.

“आमच्या इस्टेटीसाठी वारस नाही, पण राखणदार तरी हवा की नको? आजकालच्या मुली काय राखणार ही इस्टेट? सरळ विकून मोकळ्या होतील, त्यापेक्षा माझ्या सुनेला तपासून काय ते सांगा.”
डॉक्टर बाईंनी वसुधाला तपासलं. 
“चौथा चान्स घेतला, तर हिच्या जीवाला धोका आहे.” बाईंनी स्पष्टच सांगितलं. 
तसा जानकी बाईंचा चेहरा पडला.

“असं म्हणता? हिच्या जीवावर बेतणार असेल तर आम्ही दुसरी सोय बघू.” सासुबाईंच्या तोंडून हे ऐकून वसुधाचं धाबं दणाणलं. 
जानकी बाई आता काय निर्णय घेतील? याची तिला भीती वाटू लागली. ‘शिरीषरावांचं दुसरं लग्न लावून देणार की काय ह्या? आणि तसं झालं तर मी आणि मुली कुठे जाणार? माझं माहेर म्हणावं तसं श्रीमंत नाही, की भाऊ आणि वहिनी आम्हाला प्रेमाने पोसणारही नाहीत.’ विचार करून वसुधाचे डोळे भरून आले.
“वसुधे, नसता विचार का करतेस?’ जानकी बाई आपल्या सुनेच्या मनातलं ओळखून म्हणाल्या. 
“मी काय म्हणते, अनाथ आश्रमातून एखादा मुलगा दत्तक घ्या.” 

जानकी बाईंचं बोलणं ऐकून वसुधाच्या जीवात जीव आला. 
“या मुलींसोबत तो वाढेल, खेळेल, मोठा होईल. मुलींना भाऊ मिळेल. पुढे जाऊन आपली सारी इस्टेट सांभाळेल तो.”
वसुधाला आपल्या सासुबाईंचा विचार खूपच धाडसी वाटला. 
“पण सासुबाई, लोक काय म्हणतील?” वसुधाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते.

“लोकं काय आपल्याला पोसायला येतात का? बोलतील नि उद्या विसरून जातील. त्या अनाथ लेकराला घर मिळेल. आई -बाप मिळतील, असाही विचार करून बघा. लक्षात ठेवा, काळानुसार आपल्याला बदलावं लागतं. मन घट्ट करून काही निर्णय घ्यावे लागतात.” जानकी बाई म्हणाल्या.
“पण मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया म्हणावी तितकी सोपी नसते. त्यासाठी खूप खटपट करावी लागते आणि उद्या तो मुलगा चांगला निघाला नाही म्हणजे?” शिरीष मधेच म्हणाला.

“आपण एखाद्याला आपलं मानलं की सगळं काही नीट होतं. योग्य ते संस्कार केले म्हणजे मुलं वाया जात नाहीत. माझ्या सुनेच्या जीवावर बेतण्यापेक्षा की कल्पना बरी नव्हे? मी आपलं मत मांडलं. निर्णय तुमचा आहे.” इतकं बोलून जानकी बाई बाजूला झाल्या.
या विषयावर खूप विचार – विनिमय झाला आणि अखेर खटपट करून दोन वर्षानंतर शिरीष आणि वसुधाने एक मुलगा दत्तक घेतला. 
तीनही मुली खुश होत्या. कारण त्यांच्याशी खेळायला, सोबतीने शाळेत जायला, अभ्यास करायला पाठीशी असणारा एक भाऊ मिळाला होता. 

मुलाचं नाव शेखर असं ठेवलं गेलं. जानकी बाई त्याला खूप जपत होत्या. त्याची काळजी घेत होत्या.
वसुधा आणि शिरीषचं कुटुंब आता खऱ्या अर्थाने पूर्ण झालं होतं.
दिवस पळत होते.
एक दिवस अचानक वसुधाची तब्येत बिघडली. डॉक्टर बाईं तिला पाहायला घरी आल्या.
“अहो, तुम्हाला सांगितलं होतं ना? चौथा चान्स अजिबात घ्यायचा नाही म्हणून. तुम्ही पुन्हा गरोदर आहात. दोन महिने होऊन गेलेत. 
पण बाकी सगळं ठीक वाटतंय. योग्य ती काळजी मात्र घ्यायला हवी.”

डॉक्टर बाईंनी पुढची तपासणी करायला सांगितली.
अनवधानाने ही ‘गोड बातमी’ मिळाल्याने आनंद मानावा की दुःख, हेच कोणाला कळेना. 
जानकी बाईंना आपल्या सुनेची काळजी वाटू लागली. पण देव दयेने सारं काही व्यवस्थित पार पडलं.
मुलाचा जन्म झाला आणि अख्ख्या कुटुंबात आनंदी -आनंद साजरा झाला.
या गोबऱ्या मुलाचं नाव ‘विकास ‘असं ठेवलं गेलं. 
मुलं हळूहळू मोठी होत होती.

पहिल्यापासून स्वभावाने शांत असणारा शेखर सर्वांचा लाडका होता. विकास मस्तीखोर असला तरी आपला खरा वारस म्हणून शिरीष त्याला कायम पाठीशी घालत होता.
दिवस असेच सरत होते.
शेखर आपला सख्खा भाऊ नाही, हे जेव्हा विकासला कळलं, त्या दिवसापासून त्याच्या मनात शेखर विषयी अढी निर्माण झाली. तो या घरचा सख्खा मुलगा नाही म्हणून त्याला या घरातून काहीही मिळता कामा नये, असा त्याने पवित्रा घेतला. 
जानकी बाईंनी विकासला समजावण्याचा खूप प्रयत्न केला.

मात्र तो काही समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.
वसुधाचं शेखर इतकंच विकासवर प्रेम होतं. दोघांनी एकमेकांना समजून घेऊन रहावं, अशीच तिची अपेक्षा होती. 
यथावकाश मुलांची शिक्षणं पूर्ण झाली. शिरीषने योग्य स्थळी तिन्ही मुलींची लग्न करून दिली.
शेखर आपलं शिक्षण पूर्ण करण्याच्या नादात होता तर विकास मात्र गावभर भटकून, हिंडून आपला दरारा, वचक सर्वांवर कसा बसेल याचा विचार करत होता. घरात उलट उत्तर देत होता. कोणाशी नीट जमवून घेत नव्हता. त्याला ना शिक्षणात रस होता, ना अभ्यासात गोडी होती. केवळ परीक्षे पुरतं कॉलेजला जाऊन नापास होऊन, पुन्हा त्याच वर्गात बसण्याचा विक्रम त्याच्या नावे होता.

थोडक्या आजाराचे निमित्त होऊन जानकीबाई देवाघरी गेल्या. कालांतराने वसुधा – शिरीष थकले.
शेखरने गावातल्याच एका मुलीबरोबर लग्न केले आणि तो नोकरी निमित्त शहरात स्थायिक झाला. गरज असेल तेव्हा शिरीषच्या मदतीला तो धावून येई. काय अडलं -नडलं जातीने पाही.
विकास मात्र आपल्या गडगंज श्रीमंतीवर अवलंबून राहत गावभर उनाडक्या करत फिरत होता. 
शिरीषला आपल्या लेकाची काळजी असणं साहजिकच होतं.

शिक्षण राहिलं तर राहू दे. पण निदान संसार तरी मार्गी लागावा म्हणून त्याने विकासासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली. 
पण विकासकडे बघून त्याला मुली देण्यास कोणी तयार होईना. 
वर्षे उलटत होती. 
विकासला ना आपल्या आई -वडिलांची काळजी होती, ना राखून ठेवलेल्या इस्टेटीची! या काळजीने वसुधाने अंथरुण धरले. आईसाठी तिन्ही मुली माहेरी आल्या.
आपल्या सख्ख्या भावाचे प्रताप पाहून सारी इस्टेट शेखरच्या नावावर करा, असे म्हणू लागल्या.

वसुधानेही याला दुजोरा दिला. जेणेकरून आपल्या माघारी मुलींचे माहेरपण व्यवस्थित होईल.
यामुळे विकास आणखीनच बिथरला. आता मनाला येईल तसे वागू लागला, बोलू लागला. 
शेखरला बोलावणं धाडलं गेलं.
आपल्या बायकोसह तो गावी आला. पण इतकी मोठी इस्टेट केवळ आपल्या नावावर असावी, हा विचार त्याला पटेना. 
“मी एक अनाथ आश्रमातला मुलगा. मला राहायला घर मिळाले. या तीन बहिणी मिळाल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई-बाबांचं, आजीचं प्रेम मिळालं. चांगलं शिक्षण मिळालं. तुम्ही सर्वांनी कधी अनाथ असल्याची जाणीवही करून दिली नाहीत.

याहून मी अधिक काय मागू? ही सगळी मालमत्ता विकास आणि या माझ्या तीन बहिणींची आहे. यावर माझा काहीही अधिकार नाही.” शेखरच्या बोलण्याने सगळेच भारावून गेले.
शिरीषने त्याची पाठ थोपटली. 
“पोटचा मुलगा असूनही विकासला ना कशाची काळजी, ना चिंता. आम्ही तुम्हा मुलांवर एकसारखे संस्कार केले. पण त्यातून खऱ्या अर्थाने ‘घडला ‘ तो शेखरच.
घराण्याला वारस हवा ही सामान्य कुटुंबाची भावनिक अपेक्षा असते. मात्र या मागणीचा कधीही अट्टाहास होता कामा नये.

कधी कधी आपण योजना ठरवतो एक आणि घडतं निराळं! यात आपली काहीच चूक नसते तर आपल्यासाठी कोरून ठेवलेलं नशीब सारं काही ठरवत असतं.
शेखरचे न ऐकता शिरीषने आपली सगळी इस्टेट तीनही मुली आणि शेखरच्या नावे केली.
विकास सुधारला तर त्याला इस्टेटीमधील वाटा देण्याचा हक्क मात्र शेखरला दिला. 
विकास पोटचा मुलगा असूनही त्याकडून शिरीषचा अपेक्षा भंग झाला होता. पण दत्तक घेतलेल्या मुलाचे मन आभाळा इतके मोठे आहे, हे शेखरने दाखवून दिले होते. 

‘मन घट्ट करून काही निर्णय घ्यावे लागतात.’ जानकी बाईंचे हे वाक्य राहून राहून वसुधा आणि शिरीषला आठवत होते. शेखरला मात्र आपल्या आई -बापाचे ऋण कसे फेडावे हेच उमगत नव्हतं.
समाप्त.
©️®️सौ. सायली जोशी.
सदर कथा लेखिका सौ. सायली जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी.
कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!