©️®️ वर्षा लोखंडे थोरात
“मनुचा बारावा वाढदिवस आपण या वेळी चांगला थाटामाटात करू. छानसा हॉल वगैरे बुक करून एखाद्या थ्री स्टार हॉटेल मध्ये.”
नवऱ्याचा नेहमीप्रमाणे उत्साह.
अरेच्चा आली पण एक जानेवारी. लाडक्या लेकीचा वाढदिवस आणि नवीन वर्ष.
पण एक जानेवारी ही तारीख मनात आली की तिच्या काळजात हलकीशी कळ यायची. उदास वाटायचं आतून.
लेक संसार यात ती मनापासून अगदी रमून गेली होती. लाडक्या लेकीचा धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करायला तिला खूप आवडायचे.
“अगं कुठल्या विचारात हरवलीस? आधी आपण यादी करू पाहुण्याची आणि त्या नुसार पुढचं ठरवू. आणि तुझा शाळा कॉलेज चा ग्रुप आलाय ना परत संपर्कात त्यांनाही बोलाव.”
‘ हो हो.. बोलावते नक्की.’ ती कसंनुसं हसून म्हणाली.
पाहुण्यांच्या यादी प्रमाणे ती प्रत्येकाला आमंत्रण देत होती.
निशा तिची अगदी जीवाभावाची मैत्रीण. लग्नानंतर बरीच वर्ष काही संपर्क नव्हता. आता सोशल मीडिया मुळे परत मैत्री बहरली.
“अगं निशा मनुचा वाढदिवस आहे तुला नक्की यायचं आहे.’
‘ हो बाई नक्की येते.तारीख तर सांगशील.
‘ तारीख अगं एक जानेवारी ..
‘…….
“अगं निशा ऐकतेस ना? तारीख ऐकून तू…
“नाही तसं काही.. अगं मला अजून एका ठिकाणी जायचं आहे कार्यक्रमाला म्हणून थोडी गडबडले. बाकी सगळ्यांना पण दिलं का आमंत्रण?
“हो..एक सोडून..
“ओक्के ओक्के.. मला पत्ता पाठव मी नक्की येते.”
असं म्हणून निशाने फोन ठेवला.
ही थोडी विचारात पडली. निशा काहीतरी लपवत होती. ती थोडी दचकली म्हणजे तिला अजूनही वीस वर्षापूर्वी जे झालं होतं ते तारखे सकट लक्षात आहे की काय?
त्या विचाराने नाही म्हणायला तिला थोडं ओशाळल्यागत झालंच. मोठया प्रयासाने सगळे विचार झटकून ती कामाला लागली.
बघता बघता वाढदिवसाचा दिवस आला. थ्री स्टार हॉटेल मधला एक हॉल ..सुंदर सजावट..फुगे..केक आणि मनूला हवी तशी थीम.. वर्षांचा पहिला दिवस त्यामुळे हॉटेल मधे गर्दीही होती.
बाजूच्या हॉल मधेही वाढदिवस वाढदिवसाची धमाल दिसत होती.
बाहेर बोर्ड वर उत्सव मूर्तीचं नाव होतं ‘ अर्णव ” . नाव वाचून ती थोडी दचकली. आज सकाळपासून मनात दाबून ठेवलेली कळ परत उफाळून आली.
अरे आजच हे नाव का समोर यायचं होतं? आणि आजच्या दिवशीच वाढदिवस ? मनात असंख्य विचार जरी आले तरी तसं काही न दाखवता ती पाहुण्यांच्या सरबराईत लागली.
आमंत्रण दिलेले सगळे पाहुणे आणि जवळजवळ वीस एक वर्षानी भेट झालेले मित्र मैत्रिणी. अगदी हरखून गेली ती.
निशाला तर घट्ट बिलगली. निशा आजच वीस वर्ष झाली ना आपल्या शेवटच्या भेटीला. ती हळूच कानात कुजबुजत बोलली.
“अच्छा अच्छा हो का? माझ्या नाही बुवा तारीख लक्षात” असं बोलून तिने तो विषय बदलला.
ये आम्हाला अजून एका वाढदिवसाला जायचं आहे बरं. त्यामुळे इथून जरा लवकर निघू. तू नंतर कार्यक्रमात गुंतून जाशील म्हणून आताच सांगितलं.”
“अय्या कोणाचा वाढदिवस आहे अजून ?” तिने विचारलं.
निशा काही उत्तर देणार तितक्यात तिला नवऱ्याने हाक मारली.
पण जाताना निशाने सोडलेला सुस्कारा तिच्या नजरेतून सुटला नाही.
कार्यक्रम अगदी छान झाला. सगळे पाहुणे जाता करता बारा वाजले.
गाडीकडे निघताना बाजूच्या हॉल मधली लोकांची गर्दी पण कमी झाल्यासारखी तिला वाटली.
अगदी हसतखेळत सगळे जात होते तेवढ्यात अर्णव थांब पळू नको म्हणत कोणीतरी छोटया पाच एक वर्षाच्या मुलाच्या मागे पळत होतं. म्हणजे हाच तो बॉय हा विचार मनाला शिवता शिवता तिने तो आवाज ऐकला आणि तो ओळखायला तिला क्षणभरही वेळ लागला नाही.
ती डोळे विस्फारून त्याच्याकडे बघत होती..आणि तो ही..आज त्याच्या पण मुलाचा वाढदिवस? नेमकी याच दिवशी? एकमेकांना साधी ओळखही न दाखवता दोघे आपापल्या रस्त्याने निघून गेले.
वरुन कितीही शांत दिसत असले तरी आतून जणू कोणी आगीच्या डागण्या देत असावं इतका त्रास होत होता. रात्रीच्या निरव शांततेत तिचं मन आक्रोश करत होतं.
या दिवसाच्या दाबून ठेवलेल्या आठवणी आता मात्र ढूसण्या देवून बाहेर येऊ पहात होत्या.
गाडीच्या सीट वर डोकं ठेऊन डोळे बंद करून ती विचार करत होती. हा इतका योगायोग की दुसरं काही? दोघांसाठी पण.. याला नशीब म्हणावं,योगायोग की काही ऋणानुबंध?
जो दिवस, जी तारीख ती घटना दोघंही अगदी कसोशीने विसरण्याचा प्रयत्न करत होतो तो असा वाट्याला यावा?
बघता बघता तिचं मन भूतकाळात गेलं.
कॉलेजच्या पहिल्या वर्षातच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. कोणापासून न लपवता न घाबरता .
अगदी दोघे लग्न करणारच याची खात्री त्यांच्या माहितीतल्या सगळ्यांना होती. निशा तर अगदी दोघांमधला दुवाच. जिजाजीच म्हणायची हक्काने.
अखंड प्रेमात बुडालेले दोघे. तो तर जास्तंच स्वप्नाळू.
सुट्टी असली तर तिला एकदा बघण्यासाठी तासनतास तिच्या घरापुढे रेंगाळणारा . अगदी पुढच्या पन्नास वर्षांचा प्लॅन तयार होता त्याच्याकडे. होणाऱ्या मुलांच्या नावापासून घराच्या इंटेरियर पर्यंत.
मुलाचे नाव .. तेच..अर्णव.. हे आठवून तिचे डोळे आपसूकच वाहू लागले.
पण नेहमीप्रमाणे इथेही आर्थिक सामाजिक दरी होतीच.
त्यामुळे तिच्या घरी कळल्यावर पुढचं शिक्षण बाहेरून करण्याची तंबी देऊन तिला घरी बसवण्यात आलं.
नुकतीच पदवी झालेली. तो नोकरीला लागला होता. निशा जमेल तसं त्यांना मदत करत होतीच.
पण अचानक तिच्या घरून तिचे लग्न जमवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. आणि नाईलाजाने एके पहाटे तिने हातात येईल ते सामान घेऊन गुपचूप घर सोडले.
निशाला कल्पना होतीच. पहाट होती एक जानेवारीची. त्याच्या विश्वासावर.. निस्सीम प्रेमासाठी तिने ते पाऊल उचललं. त्यानेही तिला साथ दिली.
तो एक दिवस त्यांच्या आयुष्यात किती मोठी उलथापालथ आणणार होता हे दैवालाच माहीत होतं. दोघांनी घराबाहेर पाऊल टाकलं खरं..लग्नासाठी नाव नोंदणी आधीच केली होती.
पण ती तारीख आठ दिवसानंतर होती. त्याआधी पाच सहा तासांवर असलेल्या मंदिरात लग्नाची व्यवस्था केली होती. सगळं कसं ठरल्याप्रमाणे थोडं होतं? त्याआधीच तिचे घरचे तिच्यापर्यंत पोहोचले आणि तिला परत माघारी जाणं भाग पडलं.
त्यानंतर मात्र तिला परत त्याच्यापर्यंत घेऊन जाणारं अंतर पार करता आलं नाही.
तिच्या लग्नाच्या आधी त्याने एक पत्र तिला लिहिलं होतं. त्यात लिहिलं होतं आपला प्रेमाचा प्रवास जरी थांबला असेल तरी प्रेम संपणार नाही. तुझ्या माझ्या सहवासाचे प्रत्येक क्षण जरी तुला मला बेचैन करणार नाही पण तो एक दिवस ज्या दिवशी आपण एक होणार होतो ती तारीख तो दिवस आपल्या आठवणीतून कधीच जाणार नाही. कितीही पुसायचा प्रयत्न कर अजून जास्तं ठळक होत जाणार. एवढा हट्ट तर करू शकते ना आपलं प्रेम?
अंथरुणावर पडल्या पडल्या तिला सगळं आठवत होतं.
लग्नानंतर तिने अगदी सगळं दडपून टाकलं होतं मनात. ती तारीख.. तो दिवस…आणि थोडया उशिराच मनुचा जन्म झाला आणि तो ही एक जानेवारीला. त्याने तर आता सहा सात वर्षापूर्वी लग्न केलं आणि त्याच्याही मुलाचा जन्म त्याच दिवशी?
नंतरचे कित्येक दिवस रात्र तिने तळमळत काढली.
मनात साठलेले कोणाशी बोलताही येत नव्हतं. असंख्य विचार.. का? कसं काय? सगळं जीवघेणं. मनाची द्विधा मनस्थिती .
एकीकडे १९ वर्षांचा सुखी संसार दुसरीकडे उचंबळून आलेल्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी.
निशा बरोबर बोलावं की गप्प राहावं… काही कळत नव्हतं.
शेवटी अगदी थरथरत्या हाताने ग्रुप मधून नंबर शोधून तिने त्याला फोन लावला.
तो ही जणू तिच्या फोन ची वाटच बघत होता. कसं आणि कुठून सुरुवात करावी तिला काही सुचत नव्हतं.
“मला वाटलं होतंच तू फोन करशील. मला निशाकडून कळालं होतं की तुझ्या मुलीचा पण त्याच दिवशी वाढदिवस होता.
मी पण नियतीच्या या योगायोगाने भांबावून गेलो होतो.
तो एक आयुष्यातून निसटून गेलेला दिवस आणि त्याच दिवसाचे नाव पांघरून आलेला नंतरचा हा दिवस.
बरं एकाच्या नाही तर दोघांच्या आयुष्यात. का?
कसोशीने विसरायचा प्रयत्न केला. अगदी एका तपाहूनी जास्तं वर्षानी नवा डाव मांडला बघ… कारण तुला विसरुच शकत नव्हतो. नव्या डावात रमण्याचा प्रयत्न करत होतो आणि अर्णव चा जन्म त्याच तारखेला झाला.
आनंद आणि तूझी आठवण.. एका डोळयात आसू आणी एका डोळयात हासू… कळतच नव्हतं हा निव्वळ योगायोग की नियती? आणि परवा परत एक अनपेक्षित धक्का..
तुझ्या लेकीचा पण त्याच दिवशी? मी पण पुरता हादरून गेलो. का तोच दिवस पुन्हा पुन्हा आपल्या समोर येतोय? दोघेही इतके पुढे निघून आल्यावर?”
“याच प्रश्नाच्या उत्तरासाठी मी आज तुला फोन केला आहे.” ती कसं तरी बोलली.
“मला माहीत होतंच तू मला फोन करशील. अगं आपलं प्रेम इतकं नितळ आणि पवित्र होतं.आणि खूप गहिरं. उथळ नव्हतंच. पण आपण एकत्र यावं हे नशिबात नव्हतं आणि नियतीच्या मनातही नसावं. म्हणूनच तर अगदी इतक्या टोकाला जाऊन सुध्दा आपल्याला एक होता आलं नाही.
तो दिवस आठवला तरी किती त्रागा व्हायचा मानाचा. भयंकर राग यायचा. तुला तर तेवढा वेळ मिळाला नाही पण मी १४ वर्ष त्या दिवसाला दोष देत होतो. पण नियतीने त्याच तारखेला आपल्या दोघांच्या ओंजळीत मातृत्व आणि पितृत्व या अमूल्य सुखाचे दान टाकले. कदाचीत तिलाही आपल्या सुंदर आणि पवित्र प्रेमाची आतून खात्री असेल. तिलाही वाटत असेल आपण पूर्ण जीवनभर तो दिवस लक्षात ठेवावा पण एक चूक किंवा काहीतरी अपराध केला होता म्हणून नाही तर आपण आपलं प्रेम पूर्णत्वाला नेण्याचा कसोशीने प्रयत्न केला होता म्हणून.
हा विचार कर आणि मनातून सगळं किल्मिष काढून टाक. ऋणानुबंध म्हणू शकते तू… बंध अनुबंध असतात…दर वर्षी त्या दिवसभरात एखादा क्षण एकमेकांना आठवू.. थोडंसं स्मित हास्य करू आणि परत आपल्या आपल्या आयुष्यात रमू. हो किनाई.. सोपं आहे गं सगळं…
आणि हो मागील वीस वर्षात आपण कधीच संपर्क ठेवला नाही तसंच आता पुढील आयुष्यभर पण ठेवायचा नाही.. कारण शेवटी काहीही झालं तरी आता जगतोय ते आयुष्य तुझ्या माझ्यासाठी तडजोड आहे. आणि तडजोडीत बऱ्याचदा मनाची अवस्था द्विधा होऊ शकते. ठेवतो मी आता फोन.”
त्याला फोन लावताना जड झालेले तिचं मन आता पिसाहून हलकं झालं होतं.
©️®️ वर्षा लोखंडे थोरात
सदर कथा लेखिका वर्षा लोखंडे थोरात यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी.
कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
कथा आवडली. लिहीत रहा हीच सदिच्छा!
धन्यवाद