©️®️ सौ.दीपिका सामंत
अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या घरात विठाईचा जन्म झालेला. मुलगी असली तरी तिच्या आईवडीलाना काहीच हरकत नव्हती. पण अशी काळीसावळी थोडी कुरूप मुलगी झालेली पाहून त्यांची निराशा झालेली .
तिच्या आधी त्यांना एक मुलगा होता. तो मात्र दिसायला बरा होता त्यामुळे यापुढे त्याचेच लाड व्हायला लागले.
विठाईच्या वाट्याला उपेक्षा आली.
जेव्हा तिला शाळेत घालायची वेळ आली तेव्हा आईने साध्याच जिल्हापरिषदेच्या शाळेत घालायचे ठरवले.
विठाई शाळेत जायला लागली तशी तिच्या बुद्धीची चमक दिसू लागली. परंतु आईवडीलाना त्याची फारशी किंमत नव्हती. मुलगी देखणी असती तर वयात आल्यावर पटकन खपली असती असा साधासरळ विचार तिची आई करत असे.
मुलाचे मात्र खूप लाड चालू असत. लहान वयातही विठाईच्या हा फरक लक्षात येऊ लागला.
विठाई जेव्हा चौथीत गेली तेव्हा तिच्या शिक्षकांनी तिला स्कॉलरशिपच्या परीक्षेस बसवले व तिच्याकडून तिच्या बाई शाळेव्यतिरिक्त ज्यादा तास घेऊ लागल्या.
तिला रोज शाळेतून येताना उशीर होतो हे पाहून आईचे पित्त खवळले.
काही विचारपूस न करता तिने विठाई ला मारायला सुरवात केली. तिच्या वडीलांना मात्र तिची दया आली.
आईच्या हातून तिची सुटका करून घेत त्यांनी विठाई ला विचारले “ बाळ,तुला शाळेतून यायला उशीर का होतो?”
तेव्हा विठाई ने तिला स्कॉलरशिप परीक्षेला बसविल्याचे सांगितले. आईला काही ही गोष्ट पटेना तेव्हा तिने शाळेत जाऊन खात्री केली. मग मात्र तिला उशीरा बद्दल चा ओरडा कमी झाला.
विठाई स्कॉलरशिप परीक्षा चांगले गुण मिळवून पास झाली. त्यामुळे तिच्या शिक्षणाला थोडी पैशांची मदत मिळाली.
असेच करत विठाई सातवीची स्कॉलरशिप परीक्षाही पास झाली.
दहावीनंतर मात्र विठाईंचे शिक्षण तिच्या आईने बंद केले व स्वत:बरोबर ती तिला कामाला घेऊन जाऊ लागली. विठाई ची आई एकदोन घरी स्वयंपाकाची कामे करीत असे.
एकदा विठाई एका घरात भाजी चिरत असताना त्या घरातील एक तिसरी चौथीतला मुलगा त्याची एक अभ्यासातील शंका त्याच्या आजीला विचारायला गेला.
आजी म्हणाली “हे बघ सोन्या, मला तुमच्या हल्लीच्या अभ्यासातील काही समजत नाही”
“मग,आजी आता मी काय करू?माझे हे होमवर्क आजच सबमिट करायचे आहे. आई तर ऑफिसला गेली ” सोनू
आजी “ हे बघ ती ताई आहे ना तिला विचारून बघ”
सोनू विठाई कडे आला. “ताई,मला मदत करशील का ?”
“हो करते ना , दाखव बर मला” विठाईने त्याच्या सर्व शंकांचे चुटकीसरशी निरसन केले. सोनू खूष होऊन निघून गेला.
आता रोजच तो विठाई आली की तिच्याकडून आपला अभ्यास करून घेई. विठाई त्याला अगदी सोप्या शब्दात समजावून सांगे. विठाई च्या आईला ही गोष्ट आवडत नसे.
”तुला थोडेच त्याचे पैसे मिळतात,उगीच कशाला वेळ फुकट घालवतेस” आई म्हणाली.
“अग,विद्यादानासारखे पुण्य नाही” विठाई ने आईची समजूत घातली.
विठाई आणि सोनूचा हा क्रम सोनूच्या आईच्या कानावर गेला. या परीक्षेत त्याला गुण ही बर्यापैकी मिळाले.
त्याच्या आई विद्याताईनी मग विठाईची चौकशी केली. त्यांनी विठाईला रोज सोनूचा अभ्यास घ्यायला लावला व त्याचे वेगळे पैसे तिला देऊ लागल्या.
आता विठाईची आई ही पैसे मिळतात बघून खूष झाली.
एक दिवस विद्याताई घरी असताना विठाई व तिच्या आईला म्हणाल्या “विठाई पुढे कॉलेजात का नाही जात?”
“अहो, पुढचे शिक्षण द्यायला पैसे नकोत?,आणि एवढे शिकवून उपयोग काय शेवटी तिचे लग्नच करून द्यायचे ना ?” विठाई ची आई उत्तरली.
“पण जर विठाई ने पुढील शिक्षण पूर्ण केले ना तर तिला चांगली नोकरी मिळेल आणि आपल्या लग्नाचे पैसे ती स्वत:चं जमा करेल ना, तुम्ही घाला तिला कॉलेजला आणि मी तिला अजून दोन तीन शिकवण्या मिळवून देते. ती कॉलेज मधून आल्यावर त्यांना शिकवेल म्हणजे तुम्हाला पण पैशाची थोडी मदत होईल”.
विठाई च्या आईला ही गोष्ट पसंत पडली. ती खूष झाली आणि विठाई कॉलेजला जाऊ लागली.
ती विद्याताईना म्हणाली ”तुमचे आभार कसे मानु मला कळत नाही” असे म्हणून ती विद्या ताईच्या पाया पडली.
“खूप मोठी हो “ विद्याताईनी तिला आशिर्वाद दिला.
विठाई आता कॉलेज मध्ये जाऊ लागली. या नविन वातावरणात तिला खूप छान वाटत होते, अगदी फुलपाखरासारखे. आजपर्यंत ती जे जिवन जगली त्यापेक्षा हे आयुष्य खूप वेगळे,छान होते. तिला अनेक मैत्रिणी मिळाल्या.
त्यातच एक जिवलग मैत्रीण मिता भेटली. मीताची आणि तिची खास मैत्री होती.
खरतर दोघींचे स्वभाव खूप वेगळे होते. विठाई प्रेमळ होती, तिला कधी राग येत नसे तर मिता रागीट होती. जशास तसे ठोसे देणारी.
सेकंड इयरला विठाईला एक मित्र मिळाला सुजय. विठाई त्याच्यात गुंतत गेली.
त्यांच्यात नाजूक रेशमी बंध निर्माण झाले. परंतु जशी सेकंड इयरची परीक्षा संपली. सुजय ने विठाई ला डिच केले. विठाई चे भावविश्व कोलमडून पडले. सुजय ने फक्त विठाईचा तिच्या नोट्स, तिचे मार्गदर्शन पेपर सोडवायला तिची मदत घेण्यासाठी नाते जोडले होते.
मिताच्या मदतीने विठाई लवकरच यातून सावरली. मीताने तिला समजावून सांगितले की प्रेमाव्यतिरिक्त आयुष्यात खूप काही करण्यासारखे आहे. विठाईने प्रेम हा विषय आपल्यासाठी बंद केला व ती पुढील शिक्षण घेण्यास तयार झाली.
पण मिता गप्प बसणारी नव्ह्ती तिने प्रयत्नपूर्वक सुजयला आपल्या जाळ्यात ओढले व काही दिवसांनी तिच्या प्रेमात गुंतून पडलेल्या सुजयला प्रेमभंगाच्या दुःखाची चव चाखायला दिली.
विठाईने मिताला तेव्हा खूप समजावयाचा प्रयत्न केला पण शेवटी तिला कळले की मिता ने हे मुद्दाम केले होते.
आपल्या प्रिय मैत्रिणी वरच्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी!शेवटी सुजयला तिने विठाईची माफी मागायला लावली. विठाईने मीताला कडकडून मिठी मारली.
विठाई आणि मिता दोघीही पदवी परीक्षा चांगल्या मार्क्स मिळवून पास झाल्या. इथून दोघींच्या आयुष्याचे मार्ग बदलले.
विठाईने एका शाळेत पार्ट टाइम नोकरी करून बी एड केले व एका शाळेत ती नोकरी करू लागली.
नियमित पगार सुरु झाला आणि तिच्या घरची परस्थिती सुधारली. तिचे आईबाबा आता तिच्या लग्नासाठी पाठी लागले.
पण विठाईने तो मार्ग स्वत:साठी बंद करून घेतला होता. एकदा ठेच लागल्यानंतर पुन्हा त्या मार्गावरून तिला जायचे नव्हते.
विठाईने लवकरच आपले पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केले आणि ती एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाली.
आपल्या या शिक्षकी पेशात तिने अनेक विद्यार्थ्यांना मदत केली. ज्यांची शिकण्याची आर्थिक परिस्थिती नाही त्यांना ती स्वत:च्या पैशाने मदत करू लागली.
पण आपण जे मुलांसाठी करतो तेव्हढे पुरेसे नाही. अजून अशी बरीचशी मुले शिक्षणापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी काहीतरी व्यापक स्वरुपात काम करणे आवश्यक आहे असे तिला वाटे.
अशात तिला एक आश्रमशाळेची नोकरी चालून आली. इथे आपल्या समाजसेवेला वाव मिळेल असे तिला वाटले. तिने ती नोकरी स्विकारली. शाळेत बरेचसे चांगले बदल केले.
मुलीना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी सरकारकडून अनुदानासाठी प्रयत्न करून संगणक कोर्सेस चालू केले.
शाळेसाठी संगणक खरेदी केले, काही कंपन्यांच्या पदाधिकार्यांना भेटून आश्रमातील मुलीना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
परंतु सगळीकडेच जसे चांगले लोक असतात तसेच वाईटही असतात.
आश्रमशाळेतील मुलींचे लैगिक शोषण चालू असल्याची बातमी पसरली. सगळ्या मिडीयाने यावर टीकेची झोड उठवली. विठाईची नोकरी तर गेलीच पण तिची स्वच्छ प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला गेला.
विठाई पुरती खचून गेली. निराश झाली.
तिला मीताची, तिच्या जिवलग मैत्रिणीची खूप आठवण आली. आज ती असती तर तिने नक्कीच काहीतरी केले असते.
पण मिता लग्न करून अमेरिकेत स्थायिक झाली होती.
एक दिवस तिची बाजू मांडणारा एक लेख वर्तमान पत्रात छापून आला.
कोणी श्रीनिवास या व्यक्तीने हा लेख लिहिला होता. त्याने सरकारला या घटनांची चौकशीची मागणी केली. पुन्हा एकदा सरकारने आश्रम शाळेत घडलेल्या घटनांची चौकशी सुरु केली आणि मग चौकशीत राजकारणी लोक गुंतले असल्याचे बाहेर आले.
तसेच विठाई च्या हाताखाली शिक्षण घेतलेल्या मुलांनी एक संघटना बनवून मंत्रालयात मोर्चा नेला व सरकारला पुनर्विचार करायला भाग पडले.
विठाई निर्दोष असल्याचे सिद्ध झाले.
हा श्रीनिवास कोण? विठाईला प्रश्न पडला. तिने त्याची भेट घ्यायचे ठरवले.
त्याची आधी इतरत्र चौकशी केली. तो एका निराधार मुलांच्या वसतिगृहाचा संस्थापक होता.
तिने त्याला विचारले “आपली आधी ओळख नसताना तुम्ही मला कशी काय मदत केली?”
“तुमची मैत्रीण मिता ही माझीही मैत्रीण आहे. आम्ही अमेरिकेत एकाच कॉलेजात होतो. त्यानंतर ती तिथेच राहिली मी भारतात परत आलो. तिने मला तुमच्या विषयी सांगितले,तुमच्या स्वभावाची, निर्दोष पणाची खात्री दिली.
मी ही तुमच्या प्रकरणाचा सखोल अभ्यास केला. तुमची काहीच चूक नसल्याचे माझ्या लक्षात आले म्हणून मग मी प्रयत्न केले.” श्रीनिवास ने सांगितले.
श्रीनिवास हा एका मोठ्या शेती,बागायतीदाराचा एकुलता एक मुलगा. घरात पैशाची काही कमी नाही.
त्याने वकिलीची पदवी घेतली व त्यातील उच्च शिक्षण अमेरिकेला जाऊन घेतले होते. त्याला समाजातील छोट्या निराधार मुलांसाठी काही करायचे होते म्हणून त्याने कोकणातील आपल्या गावात एक वसतिगृह स्थापन केले.
आज त्याचा मोठा व्याप होता, जवळ जवळ हजार मुले त्याच्या या शिक्षण संस्थेत राहून शिक्षण घेत होती.
विठाई म्हणाली “तुम्हाला भेटून खूप आनंद झाला,तुमचे कार्य खूप मोठे आहे,तुमचे आभार कसे मानु मला कळत नाही, तुमच्या
कार्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा.”
विठाई श्रीनिवास चा निरोप घेऊन घरी आली. पण मनातून मात्र त्याचा विचार जईना ,कोण कुठला हा आणि आपल्यासाठी किती केलं त्याने. मग ती अधूनमधून त्याच्या शाळेला भेट देऊ लागली तिथल्या मुलांचा अभ्यास घेऊ लागली.
श्रीनिवासला पण तिचं हे असं येण व शाळेतल्या मुलांसाठी काही करणे आवडू लागलं. बऱ्याच विषयावर त्यांच्या गप्पा व्हायच्या त्यावरून तिच्या बुद्धीची, हुशारीची चुणूक त्याला दिसून येई.
नकळत दोघांना एकमेकांबद्दल काही वाटू लागलं. पण याबाबत विचारायचं कुणी कुणाला हा प्रश्न होता.
परंतु ही कोंडी मिता ने फोडली. काही दिवसांसाठी ती भारतात आली होती त्या वेळी तिने दोघांची भेट घेतली पण ज्यावेळी तिच्या लक्षात आले की हे दोघे एकमेकात गुंतले आहेत त्यावेळी दोघांची एकत्रित भेट घेऊन तिने विषय काढला.
आणि त्या दोघांचे लग्न ठरवूनचं ती परत गेली.
काही दिवसातच श्रीनिवास व विठाई यांचे लग्न झाले.
लग्नाआधीच हजारो मुलांचे आईबाप झालेले असे ते दोघे !
त्या मुलांच्या उपस्थितीतच लग्नसोहळा पार पडला.
©️®️ सौ.दीपिका सामंत
सदर कथा लेखिका सौ.दीपिका सामंत यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी.
कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.