रिकामी फ्रेम

©️®️ सचिन बेंडभर
आज कार्यालयातून सुटतानाच दामल्याने मला गाठले. त्याच्याबरोबर कार्यालयातले भिसे, जमदाडे, काळे हेही होते. फारच आग्रह केल्यामुळे त्यांच्याबरोबर जाण भाग होते म्हणून गेलो.
माझ्या टेबलावरून गेलेला कागद प्रत्येकाचा टेबल पास करीत अंतीम सहीला दामल्याकडे जायचा. कधी कधी दामल्याला लपका लागला की तो सर्वांना हॉटेल मध्ये जेवण द्यायचा. तसा तो खत्रूडच पण भिसे अन् जमदाडे त्याला जेवण द्यायला भाग पाडायचे.
तसे सगळेच गप्पाडदास होते.
गप्पा रंगात आल्या होत्या.

जेवणावर ताव मारून सगळे असे निवांत झाले तसा मी बाहेर डोकावलो.
अंधार जाणवताच मी उठणार तोच भिसे म्हणाला, “का रे,इतकी कसली घाई झालीय तुला?”
“अंधार पडण्यापूर्वी घरी गेलेलं बरं.”
“उशिरा गेलेलं वहिनीला आवडत नसावं वाटतं.?”
“तसं समज हवं तर..” मी घरी गेल्यावर कपडे बदलले. जेवून आल्यामुळे खानावळीत जाण्याचा प्रश्नच नव्हता. लाईट विझवली अन् क्षणभरातच माझ्याकडे पाहून ती खुदकन हसली.

तशा अंधारातही मी तिच्या गालावरची खळी पाहिली. मिस्किलपणे हसताना तिच्या गोऱ्या गालावर काळ्याभोर केसांची बट खूपच मोहक वाटायची. तिचे पाणीदार डोळे मी कितीतरी वेळ एकटक पहात होतो.
आम्ही दोघे चार पाच वर्षे एकाच कॉलेजात होतो. ती घरून निघाली की इराण्याच्या दोस्ती कॉफी हाऊस समोरच्या बसस्टॉपवर उभी रहायची. बस आली तरी बसमध्ये कधीच जात नव्हती.
अगदी मला उशीर झाला तरीदेखील. मी माझ्या बाईकवर आलो की त्या स्टॉपवर थांबायचो.

स्टॉपवर कितीही माणसं ओळखीची, अनोळखीची असली तरी ती मला सर्वांसमोर पालीसारखी चिटकून बसायची. तिचं तसं बसणं मलाही मनापासून आवडायचं, पण कोणी ओळखीचं दिसलं की संकोच वाटायचा.
पण हे दररोजचंच झाल्यावर मी ही निढविलो. कॉलेजात असताना अशा कितीतरीजणांच्या जोड्या मुलांच्या चर्चेत असायच्या पण आम्हाला मात्र त्या चर्चेची शिकार कोणीच केलं नाही.
तिने आम्हा दोघांचं कोणतं पवित्र नातं सांगितलं होतं देव जाणे पण त्या दृष्टीने माझ्याकडे कोणीच बघत नसायचं अन् त्यामुळे आम्ही अधिक मोकळेपणाने एकत्र रहायचो.

आणलेला डबाही एकत्र खायचो. तिची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी होती. बाहेरचा खर्च ती मला करू देत नसे. आम्ही देहाने अन् मनानेही एक झालो होतो. दिवस कापरा सारखे भुर्रकन उडून गेले.
परीक्षा संपली अन् एक दिवस तिने माझा निरोप घेतला.
जाताना मला म्हणाली, “शंतनू ,आता आपण काय परके राहिलोत? तू तुझी जीवनाची दिशा ठरव. तुला आवडेल तसा जॉब मिळव. एकदा तुला जॉब मिळाला की,त्या सोईने मी जॉबसाठी आयुष्यभरासाठी पुन्हा एकत्र येवू.”

“खरं आहे तुझं.पण मधला काळ..? तो तर रात्रन्दिवस खायला उठेन?”
ती हसली, गालगुच्चा घेता घेता अलगद किस घेतला अन् म्हणाली, “बुद्धू,विरहातच प्रेम वाढतं. खऱ्या प्रेमाची किंमत विरहातच कळते.अन् फार वेळ नाही वाट पहावी लागणार. विरहसमयी तुझा काळ छान आनंदात जावा म्हणून माझा बारावीत असताना मी काढलेला माझा फोटो तुला पाठवून देते.
त्या फोटोकडे बघ, आयुष्यासाठी स्वप्न रंगव,आलेच मी, पुढं आयुष्यभर एकत्रच तर रहायचंय ना?” ती निघून गेली.

अन् पुण्यातच मला बांधकाम खात्यात जॉब मिळाला, अगदी मनासारखा. शिवाय ती गेल्यावर तिसऱ्याच दिवशी मला माझी रूमही बदलावी लागली नाही, की नाही बदलावी लागली खानावळ. मागचंच रुटीन पुढे.
ती वास्तवात जरी गेली असली तरी तिचं असणं मला नेहमी जाणवायचं. ती गेली त्याच दिवशी मी घराबाहेर पडलो. खूप खूप फिरून मी मनपसंत फ्रेम आणली. माझ्या टेबलावर उभी राहीन अशी फोटो फ्रेम.
तिला मी टेबलावर ठेवली अन् तिचा फोटो येण्याची वाट पाहू लागलो. विद्यार्थी असतानाची ती माझी रूम. तिनंही अजागळपणा सोडून एखाद्या संसारी कुटुंबाला शोभेल असं रूप धारण केलं.

ती सुंदर नटवलीच होती मी तिला. कॉटवर पडल्या पडल्या मला टेबलावर सहज दिसेल अशा जागी टेबलावर ती फोटोफ्रेम मी उभी करून ठेवली. पोस्टमन दररोज दहा वाजता आमच्या गल्लीतून जायचा. तो लांब दिसला की मी खोलीचा दरवाजा उघडून दारात उभा रहायचो, पण तो नुसता माझ्याकडे बघून निघून जायचा.
माझं मन म्हणायचं, पाहून गोड हसूनच पुढे जाऊन तिलाही विरह जाळीत असणार ,गेल्याबरोबर फोटो पाठवते अशी म्हणाली होती, तिने पाठवलाच असेल. मग मीच पोस्टमनला माझी ओळख करून दिली. अन् पुन्हा तिच्या पत्राची म्हणजे फोटोची वाट पाहू लागलो.

असेच दिवस,महिने, वर्ष गेलं पण नाही मिळाला तिचा फोटो की नाही आलं तिचं टपाल. तरीही माझ्या मनातली तिची खात्री तसूभरही कमी झाली नव्हती. मला विश्वास होता की ती बोलते ते करणारच.
तिने दिलेला शब्द अजून कधीच खोटा ठरला नव्हता. तिने मनापासून प्रेम केलं होतं माझ्यावर.
एक दिवस कार्यालयातून मी थेट घरी आलो. नेहमीप्रमाणे हातपाय धुवून फ्रेश झालो.
कपडे बदलून कॉटवर आडवा झालो तोच दामल्याने मला आवाज दिला.

दरवाजा उघडताच दामले, भिसे, काळे अन् जमदाडे आत आले.
नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याने मलाही विचारले, “वहिनी दिसत नाही घरात?”
“नाही आली अजून.”
“कधी येणार आहेत त्या?”
“कधीही,कदाचित आज संध्याकाळीसुद्धा.” नेहमीच्या गप्पाटप्पा मारून चौघेही अर्ध्या तासानंतर निघून गेले. त्यांना माझ्या उत्तरात काहीच गैर वाटलं नाही.

तसं मी तरी त्यांना कुठं गैर सांगितलं होतं? थोडी थिडकी नाही तर पाच वर्षे तिने आपल्या प्रेमाची मुक्त उधळण केली होती माझ्यावर. लवकरच परत येण्याचं वचन देऊनच ती जड अंत:करणाने गेली होती. जाताना तिने फोटो पाठवते असंही सांगितलं होतं, म्हणून मी खास फोटो फ्रेम आणून टेबलावर उभी करून ठेवली होती.
पाहणाऱ्याला ती रिकामी फोटोफ्रेम दिसली की मलाच नवल वाटायचं. खरं सांगतो तुम्हाला, माझं दिवसभराचं रुटीन ठरलेलं. त्यात तसूभरही फरक पडत नव्हता.
संध्याकाळी कार्यालय सुटलं की इतरांना जशी घराची ओढ लागायची तशी मलाही लागायची. घरी आलो की फ्रेश व्हायचो. कपडे बदलून हवेशीर फिरायला जावं तसं जोशी काकूच्या खानावळीत जावून जेवायचो.

आठ साडेआठला पुन्हा घरात यायचो. तासभर कसा तरी रेंगाळलो की ती नियमानं यायचीच. वर वर पाहणाऱ्याला ती फोटोफ्रेम रिकामी वाटायची, पण मला ती कधीच रिकामी नाही वाटली.
रात्रीच्या नऊलाच मी खोलीतला दिवा बंद करायचो. गडद अंधारात ती फोटोफ्रेम चमकायची अन् निलू तिच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये माझ्याकडे बघत मिस्कीलपणे हसायची. गालावर आलेली तिच्या काळ्याभोर केसांची बट मागे सारायची.
तिची एक वेगळीच लकब असायची. बोलायला लागली की तिचे पाणीदार डोळे अधिक मोहक वाटायचे. अलिकडे तिची गौरकांती अधिकच खुलून दिसायची.
बऱ्याचवेळा मी तिच्या हसण्याची वाट पहायचो. ती हसली की गालावर मोहक खळी पडायची. पुन्हा पुन्हा ती हसावी असं मला वाटायचं.

मग आमची दिवसभराच्या घडलेल्या घटनावर चर्चा व्हायची. कधी कधी कॉलेज जीवनाचा विषय निघाला की धमाल मजा यायची. तिच्या आवडी निवडीतही फारसा फरक पडलेला नव्हता.
कधी पंजाबी ड्रेस तर कधी जीनवर टॉप चढवायची. मला आवडते म्हणून कधी केप्री घालून त्यावर टॉप तर कधी साडीही घालायची. तिच्या रंगाची आवडही मला माहीत झाली होती.
अशा कितीतरी विषयावर गप्पा सुरू झाल्या की वेळ कसा निघून जायचा तेच कळत नसायचं. बराच वेळ बोलत बसायची अन् मग हसत हसत पुढं येवून अलगद अंथुरणात घुसायची.

अंगावर हात टाकूनच तिला झोपायची सवय. सकाळ झाली की रुटीन सुरू व्हायचं. पुन्हा मी संध्याकाळी ओढीनेच घरी यायचो. रात्र झाली की अंधार पाहून ती हमखास यायचीच.अगदी हसत हसत.
मध्यंतरी एक वेगळीच समस्या उभी राहिली. मी लग्न करावे घरच्यांनी गळ घातली. कोणी न कोणी वरचेवर येवू लागले.
ते एकटेच येत असं नाही तर मुलीकडच्या चार चौघांना घेऊन येवू लागले. मला मुलगी पाहण्यासाठी आग्रह करू लागले.
एकदा तर गंमतच झालीएक वधूपिता चक्क मुलीलाच दाखवायला माझ्याकडे आला. शेवटी मी माझा ठाम नकार सांगितल्यावर ते सत्र थांबलं.अन् दुसरीच समस्या उभी राहिली.

माझ्या मामाचाच मुलगा रोहन माझ्याकडे फेऱ्या मारू लागला. कधी कधी लव्हमरेज केलंय, म्हणूनच तो आलेल्या स्थळांना नकार देतोय. अचानक गेल्यावर दिवा मुद्दामच उशिरा रूमवर यायचा.
त्याचा असा समज होता की शंतनूनं नक्कीच सत्य सापडेल म्हणून उशिरा अन् अचानक यायचा. तो आला तरी रात्री मालवल्यावर त्या गढद अंधारात मी फ्रेमकडे पाहिले की निलू हसताना हमखास दिसायची, पण दररोजच्यासारखी बोलायची मात्र नाही.
तिच्या पाणीदार डोळ्याकडे मी एकटक पहात शेवटी चोरपावलाने माझ्या शेजारी येवून नेहमी सारखी झोपी जायची.

सकाळ होताच त्या दिवशी रोहन मला म्हणाला … “तुझं कुणावर प्रेम आहे का?”
“हो.निलूवर.” मीही त्याला स्पष्टच सांगून टाकल्यावर तो केविलवाना चेहरा करून मला म्हणाला, “तिला एकदा घरच्यांना चालेल, सगळ्यांची संमती आहे असं समजून तरी घरी घेऊन ये.”
मी हो म्हटल्यावर त्यांनी मला पुन्हा विचारले … “मग एकटाच का राहतो? तिला का रूमवर आणीत नाहीस?” मी फक्त हसलो.
त्याला कुठं माहीत होतं की निलू रात्रभर माझ्या शेजारीच झोपली होती म्हणून आणि मी जरी त्याला हे सांगितलं असतं तरी त्याचा माझ्या बोलण्यावर विश्वाससुद्धा बसला नसता.

पाहणाऱ्याला निलूची फोटोफ्रेम नेहमीच रिकामी दिसायची. दिवसा ती मलाही भेटत नव्हती, तर दुसऱ्या कुणाला दिसणार? पण गडद काळोखात ती हमखास येतेच हे तरी कुणाला पटणार..! म्हणून मी गप्प राहिलो.
कशी का कुणास ठाऊक,पण रोहनला माझी काळजी वाटायची. त्याने अनेकांचे पत्ते लिहून घेतले होते. कोणी समुपदेशक होते तर काही मानसोपचार तज्ञ होते. त्यांच्याकडे मला घेऊन जायचा त्याचा इरादा होता.
त्याची ती तडफड पाहून पाहून मला त्याचीच कीव यायची अन् हसूही यायचं. माझ्याकडे माझ्यात काहीतरी दोष आहे,अशी त्याच्या भोळ्या मनाची ठाम समजूत होती.

तो यावून गेला की त्या रात्री मी व निलू त्याच विषयावर भरपूर एकमेकांचे विचार ऐकून घेऊन आपापली मते मांडायचो. पण तिच्या व माझ्या विचारात कधीच मतभेद झाले नाहीत किंवा कधी उगीचच तडजोडही करावी लागली नाही.
ती फोटोफ्रेम रिकामी जरी वाटत असली तरी माझी अनेक दिवस, महिने, वर्षे ती पाहण्यात गेली.
मला प्रमोशन मिळालं होतं. आता मी दामलेच्या टेबलवर बसत होतो.
दामले,काळे,जमदाडे निवृत्त झाले होते. नवीन भरतीच्यामध्ये मीच सिनियर होतो. नवीन भरती झालेले लोक मलाच बॉस म्हणायचे. प्रमोशन झाले त्या दिवशी संध्याकाळी मी खानावळीत न जाता मोठ्या हॉटेलात जेवून आलो.

रात्री लाईट बंद होताच नेहमीप्रमाणे मी फ्रेमकडे पाहिले. त्या दिवशी मिस्कीलपणे हसत खिदळत निलू अंगावरच येवून पडली. खूप उशीरापर्यंत त्या दिवशी आम्ही बोलत होतो.
अन् एक दिवस … हसत हसतच पोस्टमन दारात येवून उभा राहिला.
त्याने एक लिफाफा माझ्या हातात दिला.घरात येवून मी लिफाफा फोडला. त्यात पोस्टकार्ड साईजचा फोटो अन् सोबत एक चिठ्ठी होती. निलूचंच पत्र होतं ते.
मी बारकाईने टक लावून फोटो न्याहाळीत होतो. तिन जाताना मी तुझ्यासाठी फोटो पाठविल असं सांगितल्याचं मला आठवलं.
पण हा तिचा एकटीचा फोटो नव्हता. फोटोत तीन चेहरे दिसत होते.

एक शिंगे रोखून बघणाऱ्या रानटी गव्यासारखा कृष्णवर्णीय मानवी पुरूषी चेहरा. मध्ये थरथरणाऱ्या केविलवान्या पण भित्र्या हरणीसारखी दिसणारी निलू अन् तिसरं बहुतेक त्या हरणीचं पाडस असावं असा मानवी मुलाचा हसरा चेहरा.
मी पुन्हा पुन्हा त्या फोटोकडे पहातच राहिलो. चेहरा तोच होता पण मिस्कील हसू नव्हतं. गालावरची खळीही हरवली होती. डोळ्यातल्या पाणीदारपणाच्या जागी निस्तेजपणा दिसत होता. गालावर येणारी केसाची बटही कुठं दिसत नव्हती. तिच्या चेहऱ्याशी तो फोटो फक्त मला मिळता जुळता वाटला खरा पण मला भेटणाऱ्या निलूचा तो चेहरा नक्कीच नसावा असं सारखं सारखं वाटत राहिलं. फोटोसोबत दिलेली चिठ्ठी उलगडून मी वाचू लागलो.

त्यात तिने लिहिले होते, एकमेकापासून दूर जावून किती तरी वर्ष लोटलीत. एवढ्या मोठ्या कालावधीत तू मला विसरलाही असशील पण मी नाही विसरू शकले तुला. तुला ओळख पटावी म्हणून फोटो पाठविला आहे. माझा संसार सुखात चालला असून मी माझ्या कुटुंबात पूर्ण समाधानी आहे.
एक विनंती … तुझ्या संसारातून, बायको मुलांमधून माझ्यासाठी थोडा वेळ काढ व आपल्या निलूसाठी क्षेम कळव .
सोबत दिलेल्या पत्त्यावर पत्र पाठव.
मी वाट पहाते.
तुझीच निलू.

मी चिठ्ठी वाचून घडी करून ठेवली. पुन्हा तो फोटो निरखून पाहिला. छे ! तो माझ्या निलूचा नव्हताच. मी फोटो दूर भिरकावला. तिच्या फोटोसाठी आणलेल्या फ्रेमपासून खूप खूप दूर.
दिवस विचारात गेला. रात्र झाली.खोलीतला दिवा विझवताच अंधार चोर पावलांनी घरात घुसला.
मी टेबलावरच्या रिकाम्या फ्रेमकडे पाहिलं अन् निलू …. क्षणभरातच माझ्याकडे पाहून ती खुदकन हसली.
तिच्या गालावरची मोहक खळी मी टक लावून पहातच राहिलो. मिस्कीलपणे हसत तिने गालावरची बट मागे सारली.
माफक कपड्यात तिने सौंदर्य लपविण्याचा प्रयत्न केला होता.
मी अवाक् होऊन फक्त तिला अन् तिलाच एक टक बघत होतो.
समाप्त
©️®️ सचिन बेंडभर

सदर कथा लेखक सचिन बेंडभर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखकाची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी.
कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!