©️®️ साधना गोखले
झिलमिल सोसायटीच्या गेटपाशी वॉचमनला कुणाशी तरी बोलताना हिरवे आज्जी थबकल्या.
“काय रे, कोणाशी बोलत होतास?”
“आज्जी,५ व्या मजल्यावर किर्डेकरांकडे पिझ्झा घेऊन आलेल्या मुलाची चौकशी करत होतो. पण तुम्ही यावेळी कुठे बाहेर गेला होता?”
“वाण्याकडे रे, तांदूळ देताना फसवलंन् मेल्याने.वजनात कमी दिले होते, आता बरोबर केलं.
बरं जाते, उद्या सकाळी भंगारवाला आला की फोन कर, मग मी भंगार घेऊन खाली येईन.”
कुणाचीही मदत न घेता आनंदी जीवन जगणा-या या आज्जींचं वॉचमनला नेहमीच कौतुक वाटायचं….
आज्जी कुलुप उघडून घरात आल्या,हातपाय धुवून देवापाशी दिवा लावला,आणि वरणभाताचा कूकर लावून त्या टी.व्ही.बघायला बसल्या. नेहमीच्या मालिका बघून झाल्यावर जेवून झोपायला गेल्या.
दोनचार दिवस या कोरोनाच्या बातम्यांमुळे त्यांच्याही जिवाला चैन नव्हतं. लवकर झोपही लागायची नाही, मधेच जाग यायची.आत्ताही त्या अशाच जाग्या झाल्या.आणि टी.व्ही.लावला,तर एका खळबळजनक बातमीने त्यांच्या ह्रदयाची धडधड वाढली.
रात्री १२ पासून देशभरात लॉकडाऊन जाहीर झाले होते, सगळ्यांनी आहे तिथेच रहा ,बाहेर जाऊ नका, असे आवाहन केले जात होते. भरपूर दूध आणून ठेवल्याचा त्यांना आनंद झाला. कडधान्य वगैरे सगळं होतंच. पाणी पिऊन परत झोपायला जाणार, इतक्यात मानेला कशाचा तरी थंडगार स्पर्श झाला.
झुरळ चढलं की काय मानेवर? उद्या हिट मारायला पाहिजे, असे म्हणून त्या मागे वळल्या. पण भीतीने त्यांची बोबडी वळली,कारण एक चेहरा झाकलेला काळाकभिन्न माणूस त्यांच्याकडे बघत होता,त्याच्या हातात लखलखता सुरा होता.
“कोण तू? काय पाहिजे? आणि घरात कसा आलास किल्लीशिवाय?”
“मी चोर आहे. मगाशी समोरच्या दिठे काकूंना तुम्ही घराची १ किल्ली बाहेर तुळशीच्या कुंडीखाली ठेवता,असे बोलताना ऐकले,आणि शिरलो घरात,त्या खोलीत लपून बसलो होतो….चला लवकर कपाटाची चावी द्या. नाहीतर तुमचा जीव गमावून बसाल.”
“तू चोरी करून जाणार,चोरी करून जाणार तू? ह्याह्याह्याह्या…काय पण वेळ निवडलीस चोरी करायची? अरे आता १२.३० वाजलेसुध्दा. आत्तापासून सबंध देशात लॉकडाऊन जाहीर झालंय, सगळ्यांनी आहे,तिथेच रहा,असं आवाहन केलं हो टी.व्हीवरून…. आता तू अडकलास,मज्जाच मज्जा….”
“ए,लै टिवटिव करू नको,मी पटकन् चोरी करून पळून जातो,समजलं ना…किल्ल्या दे पटकन्….”
“एवढ्या आडदांड देहातला मेंदू रिकामाच ठेवलाय का तुझा? अरे रस्त्यावर बघ,पोलीसांची गाडी फिरतीय.”
“असं कर, आता इथेच झोप, सकाळी सावकाश उठून चोरी करून जा. पण ७ ते १० याच वेळात बाहेर पडता येईल,असे म्हणून त्या गालातल्या गालात हसू लागल्या. आणि हो. थांब,थांब ,काही खाल्लंयस का?”असं म्हणून तुरूतुरू आत जाऊन त्यांनी २ पोळ्या आणि लोणचं आणून त्याला दिलं.
“खाल्ल्यानंतर ताटली आणि पाण्याचं भांड घासून ठेव,बाई नाही येणारेय…”असा इशारा देऊन त्या झोपायला गेल्या.
आपण म्हातारीकडून किल्ली घेतलीच नाही,हे लक्षात येईपर्यंत आज्जींनी त्यांच्या खोलीचे दार बंद केले होते.
“अगं म्हातारे,हे काय आहे? यासाठी मला कपाट उघडायला लावलंस व्हय…ह्या भंगार बाटल्या,चिरगुटं आनी ह्ये फोटु…ह्याचं काय करू?” फुकटचा येळ गेला.
“ख्याख्याख्या..तू कुठे दागिने पैसे असलेल्या कपाटाची किल्ली दे म्हणालास,नुसती….म्हणून….
अरे रागावू नको.गेले ३-४ दिवस मी हे कपाट उघडायचा प्रयत्न करतेय,पण जमले नाही. यात माझी होमिओपॅथिक औषधे आहेत. आणि माझ्या मुलांचे फोटो आहेत,आणि ती चिरगुटं नाहीत रे मेल्या नातवंडांची दुपटी आणि झबली टोपडी आहेत.
माझी मुलगी कॅनडा आणि मुलगा अमेरिकेत असतो.मुलीला एक मुलगा आहे आयुष…आणि मुलाला मुलगी….शांभवी…गोड आहेत फार..तुझ्यामुळे हे कपाट उघडता आलं हो…”
“आज्जे हे नंतर सांग,आत्ता आधी पैशे दागिने कुठे आहेत ते सांग, नायतर गेम करतो तुझा…”
“वाजले किती बघ,१० आता संध्याकाळी ४ पर्यंत तुला इथेच थांबावे लागेल…”आज्जी म्हणाल्या,इतक्यात बेल वाजली.
“आज्जे….”
“आलं लक्षात, नाही सांगणार तू चोर आहेस ते….”
दारात समोरचा अविनाश होता…
“आज्जी,मी भाजी आणायला चाललोय,तुमची पण भाजी,औषधं आणतो…”आज्जींनी त्याला पिशवी आणि पैसे दिले आणि औषधांची चिठ्ठी दिली.तेवढ्यात त्याचे लक्ष चोराकडे गेले….
“हा कोण?कधी आला? पाहिला नाही इतक्या वर्षात?” चोर आज्जींकडे बघत होता.
“अरे हा माझ्या कोकणातल्या चुलत बहिणीचा नातू…काल इथे आला होता मला भेटायला,आणि अडकला बघ….आत्ताच मी सिंधुला …माझी बहीण रे…फोन करून कळवलेय. आता राहील इथेच,काय करणार?”
” दशरथ,ए दशरथ मला हे लसूण सोलून दे, नखं नाहीत, त्यामुळे जमत नाही.”
चोर रागारागाने लसूण सोलू लागला. आज्जींनी भात लावला, पापड भाजले,आणि छान पिठलं केलं.
चोराला केर फरशी करायला लावली, वर छान काम केलं, म्हणून वाटीत मनुके खायला दिले. चोरही सगळे मुकाट बघत,करत होता. त्याचे सगळे लक्ष घड्याळाकडे होते. साडेतीन वाजले,तशी त्याने परत म्हातारीकडे मागणी केली.आज्जींनी आता त्याला तिजोरीची किल्ली दिली.
चोर तिजोरी उघडायचा प्रयत्न करू लागला, इतक्यात पुन्हा बेल वाजली. आज्जींनी दार उघडले तर समोर बी विंगमधे राहणारे इन्स्पेक्टर माने उभे होते.
“मानेसाहेब तुम्ही,इकडे कसे काय?” ड्युटीवर चाललो होतो तर कळलं की तुमच्याकडे कोणी पाहुणा आलाय, म्हणून चौकशी करायला थांबलो….
‘अहो पाहुणा नाही,माझ्या कोकणातल्या बहिणीचा नातू आलाय मला भेटायला….या लॉकडाऊनमुळे इथेच अडकला बघा ना…”
“ठीक आहे, काळजी घ्या” असे म्हणून माने निघून गेले.
दाराआडून हे सगळे ऐकत असलेला चोर आजींची हुशारी बघून चकीत झाला….
“हायला आज्जे,तू एक नंबर हैस की,मानलं तुला .आज्जे,च्या करू का,तुला नि मला, पेशल,एकदम कडक…आलं-बिलं मारतो मस्त.”
“काय रे भाषा तुझी?आलं मारतात का?किसून किंवा ठेचून टाकतात. ५ वेळा म्हण आलं किसून टाकतो. दशरथने झकास चहा केला. पहिला घोट घेऊन आज्जी रडू लागल्या….
“ए म्हातारे,रडतीस का?चहा चांगला नाय झाला का?ज्यादा गोड झाला का?”
“नै रे,छान झालाय, पण आज कित्येक वर्षांनी आयता चहा मिळाला,म्हणून भरून आलं रे..”
“का,असं का? सून हाय ना? ती येत नाय इथे भेटायला?”
“येते ना,सून येते,लेक येते,पण इथे आल्यावर त्या त्यांच्या नादात असतात,मनभरून बोलायलाही वेळ नसतो कुणाला….माझीच धावपळ चालू असते, चायनीज कर, नै तर पास्ता, मॅक्रोनी…सूप बनवा अशी….
बरेच वेळा मी सगळं बनवते,आणि ते बाहेरून खाऊन येतात…मग….हं जाऊदे,हे रामायण न संपणारं आहे.एरवी मी एकटीच असते,पण आज तू आहेस तर विचारते काय करू जेवायला?”
“काय पन कर,मी कांदा,वांदा चिरून देतो,तू सांग निस्त…”
मग दोघांनी मिळून स्वैपाक केला.
असेच दिवस जात होते,दशरथ आजींची सेवा करत होता. तरीही चोरी करून पळून जायची संधी त्याला मिळत नव्हती.
आजींबरोबर जुने सिनेमे बघायचे,पत्ते खेळायचे,कधीतरी वाद घालायचा…यात वेळ जात होता.
आजींनी त्याला इतक्या वेळा मुलांबद्दल सांगितले होते,की त्याला सगळा इतिहास तोंडपाठ झाला होता.आजींच्या वाढदिवसाला त्यांच्या सुचनेनुसार केकही कापला गेला.
कोरोनाची तीव्रता देशभर वाढतच होती.त्यामुळे लॉकडाऊनची मुदत वाढवली गेली. चोर पक्का वैतागला होता.
एका सकाळी….
दशरथ,भाजी आणि काही वस्तू आणून देतोयस ना,जा लवकर,साडेआठ वाजले,उशीर झाला तर मिळणार नाही.हे बघ,कोथिंबीर,मेथी,बटाटे….नै तर असं कर,टोमॅटोही आण…का कांदेपण आणतोस? थांब,थांब,धुण्याची पावडर पण संपलीय का बघते…..”
“ए,आज्जे,काय डोक्याला ताप देतेयस? एकदा सांग ना काय आणायचंय ते… मायला,कुठून बुध्दी झाली आणि तुझ्याकडे चोरी करायला आलो,असं झालं….”
“आणि लॉकडाऊनमुळे अडकलास हो माझ्या घरी,ह्याह्याह्याह्या….माझी मुलं….”
“माहिती झालंय. निरूपमा कॅनडा आणि संदीप अमेरिकेत असतो….आज्जा,१० वर्षांपूर्वीच ढगात गेलाय….”
“बरं झालं पण तू नेमका इथेच चोरी करायला आलास,मला मदत होईल रे तुझी,या अडचणीच्या काळात…कारण मी एकटी आहे ना.
आमच्या या सोसायटीबाहेर सारखे पोलीस फिरतायत,त्यामुळे पळून जाऊच शकत नाहीस तू….
वॉचमनला मी तू माझ्या भावाचा नातू आहेस असं सांगितलंय. जा आता लवकर बटाटे आणि कोथिंबीर आण. ११ ला वाणी दुकान बंद करेल. दुपारी आपण छान सिनेमा पाहू, यू ट्यूबवर..”.
“किती वेळा तो राजा हरिचंद्र बघायचा आज्जी?”
“हरिचंद्र नाही रे मेल्या हरिश्चंद्र….हरिश्चंद्र….आल्यावर १०० वेळा लिही वहीत…..”
“मायला,ही म्हातारी पण ताप आहे डोक्याला….”
आता लॉकडाऊन संपायला काही दिवस उरले होते. आज्जीही त्यामुळे आनंदात होत्या. मुलांचे व्हिडीओ कॉल्स येत होते…आणि ती घोषणा झाली, ५ दिवसांनी लॉकडाऊन सशर्त उठवले जाणार होते.
आज्जींच्या मनात दशरथबद्दल वात्सल्य निर्माण झाले होते.
तो म्हणाला, “आज्जे,मी आता बंदी उठल्यावरच जाईन. तोवर आपन रोज पत्ते खेळू,तू मला काय काय गोष्टी सांग….”
त्याने दुस-या दिवशी भाजी आणि आवश्यक सामान आणून टाकले…..आणि लॉकडाऊन बंद झाले.
रस्त्यावर तुरळक वर्दळ सुरू झाली. त्यालाही २ दिवस होऊन गेले.
आता आज्जीला सोडून जाणे चोरालाही कठीण वाटत होते,पण काही झालं तरी आज रात्री निसटायचंच असा विचार करून दशरथ जागाच राहिला होता.
रात्री १०.३० वाजता सगळीकडे शांत झाल्यावर त्याने आवाज न करता दरवाजा उघडला, आणि वॉचमनला आज्जीच्या औषधांचे कारण सांगून चुपचाप बाहेर पडला……
दुस-या दिवशी सकाळी समोरचा अविनाश गावाहून परत आला.
सहजच त्याचे आज्जींच्या घराकडे लक्ष गेले आणि तो चकीत झाला. जवळजवळ ३-४ दूधपिशव्या दारात पडून होत्या. काही वर्तमानपत्रेही होती. काही शंका येऊन त्याने वॉचमनला बोलावले, जवळच राहणा-या आज्जींच्या भावाला बोलावून दरवाजा तोडला आणि समोरचे दृष्य पाहून सगळे चकीत झाले.
हॉलमधले लाकडी कपाट सताड उघडे होते. लहान झबली, टोपडी खाली पसरली होती, एक फोटोंचा अल्बम होता.
आज्जी जमिनीवर पडल्या होत्या शेजारी पत्ते विखुरले होते.
त्या़च्या हातात एक वही होती…तिच्या पहिल्या पानावर लिहिले होते…
मी आणि लॉकडाऊन”
समाप्त
©️®️ साधना गोखले
सदर कथा लेखिका साधना गोखले यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी.
कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
Shevat kalala nahi
Thank you for the feedback