©️®️ सौ.साधना राजेंद्र झोपे
“शशांक,केतकी,तुमची झोप झाली की मला तुमच्याशी थोडं बोलायचे आहे. मी यासाठी तुम्हाला आधी सांगितले की तुम्ही रविवारी बाहेर जायचा परस्पर प्लॅन करता. मग सांगायचे राहून जायला नको.” सुमेधा बोलली.
शशांकने खुणेनेच त्याच्या बाबांना,विजयरावांना विचारले, पण त्यांनी ” काय माहित ” अशा अर्थाने खांदे उडवले.
” आई,तुला काय बोलायचे ते तु आत्ताही बोलू शकतेस”
“नाही आता नको.तुम्हालाही झोप येत आहे आणि मला पण जरावेळ झोपायचे आहे.”
” ठिक आहे ” असे म्हणत शशांक आणि केतकी त्यांच्या रुममध्ये झोपायला निघुन गेले.
ते निघून गेलेले बघून विजयराव सुमेधाला म्हणाले, ” काय सांगायचे तुला? कशाला मुलांना उगाच विचार करत बसायला लावतेस?”
” रावसाहेब, तुम्ही पण जरा धीर धरा. मी पण जरावेळ जाऊन पडते. तुम्हीपण आराम करा.”
इकडे रुममध्ये आल्यावर केतकी शशांकला म्हणाली,” काय सांगायचे असेल आईंना?”
” तु नको विचार करु जास्त.बाबांना पण नाही माहित.बाबा आहेत ना आपल्या बाजूने. आज तु पण सकाळ पासून काम करुन दमली आहेस. झोप तु पण जरावेळ. माझे पण तुझ्या हातची चिकन करी खाऊन पोट खुप भरलय. ती चिकन करी डोळ्यावर आली आहे.”
” शशांक,एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का? आई आज अजिबात किचनमध्ये आल्या नाहीत.”
” हो आलंय लक्षात,पण तु नको लक्ष देऊस.आज नसेल वाटले तीला काम करावस.रोज देते ना आयते!”
” हो पण…”
” नको ना बाई जास्त विचार करू.मला खुप झोप येत आहे.मी झोपतो,तु पण झोप.”
आणि खरच शशांक झोपला पण! केतकीपण विचार करत करत झोपून गेली.
विजय आणि सुमेधा पण झोपले. पण सुमेधाला १० मिनिटातच जाग आली.
असही ती कधीच अर्ध्या तासाच्या वर झोपत नसे. सुमेधा पलंगावरच भिंतीला टेकून बसली. तिच्या मनात विचार आला की,आता रावसाहेब एक दिड तास उठणार नाहीत. ती डोळे बंद करून मनातल्या मनात दुपारी सर्वांशी कसे बोलायचे त्या शब्दांची जुळवाजुळव करत बसली.
तीला सुरुवातीपासूनच कोणालाच असं एकदम बोलायची सवय नव्हती. कुणी तीला बोलले तरी ती उलट उत्तर देत नसे.त्याच्याच फायदा सर्वांनी घेतला.
शेवटी मनाशी एक पक्का निश्चय केला की,आज आपण बोलायचेच काहीही झाले तरी.
त्या हॉलमध्ये आल्या. सकाळी रावसाहेबांच्या हातात पेपर असतो त्यामुळे त्या नेहमीच दुपारी निवांत पेपर वाचत असत.आजही सुमेधा नेहमीसारखी निवांत पेपर वाचत बसली होती. साधारण साडेतीनच्या सुमारास विजयराव आले.
नेहमी रावसाहेब उठल्यावर सुमेधा दुपारचा चहा आणि थोडंफार खायला बनवत असत.
क्रिश त्यांचा नातू त्याला पण खायला हव असायचे काहीतरी. पण आज मात्र सुमेधा निवांत पेपरच वाचत बसली.पेपर फक्त बाजूला करत ती म्हणाली, ” काय झाली झोप?”
” होऽ,पण तुमच काय चालले आहे. निवांत पेपर वाचन सुरू आहे.आज किचनमध्ये काही काम नाही वाटते?”
” माहित नाही.”
” काय? किचनमध्ये काही काम आहे की नाही हे तुम्हाला माहीत नाही?” ते आश्चर्यचकित होत म्हणाले. या त्यांच्या बोलण्यात चार वाजले. घड्याळाकडे बघत विजय म्हणाले, “मॅडम,आज चहा करण्याचा विचार नाही का?”
” थांबा हो जरावेळ,उठू द्या तुमच्या सुनबाईला,ती करेल सर्वाचा चहा.आणि आज काय एकदम मॅडम!”
” मग काय म्हणून, तुम्ही एकदम मॅडमच्या थाटात वावरत आहात आज. काय तुम्ही पण रिटायरमेंट घेतली का? पण नाही तुम्ही तर म्हणता की, आम्ही बायका कधीच रिटायर होत नाही घरकामातून.”
” होच मुळी.आम्ही कधीच रिटायर होऊ शकत नाही घरकामातून,पण सुट्टी तर घेऊ शकतो.”
“चला म्हणजे एकंदरीत तुमची सुट्टी आहे म्हणावी आज. ठिक आहे…”
यावर सुमेधा फक्त हसली.
एक दिवस काम नाही केले तर लगेच बोलून दाखवले.पण रोज अगदी सगळ्यांचे सगळे वेळच्यावेळी व्यवस्थित करते.याचे कधी कौतुक करावेसे वाटले नाही?
” पण मी काय म्हणतो,त्या केतकीला बिचारीला एक दिवस सुट्टीचा मिळतो,एक दिवस आराम करावासा वाटतो.त्याचा साधा विचारही आला नाही का?”
” बरोबर आहे रावसाहेब तुमचे. पण माझे काय? मी एक दिवसही सुट्टी न घेता काम करते.अगदी मला बर नसतांनाही ते नाही कधी लक्षात येत. नोकरी करणारी स्त्री सर्वांना दिसते पण गृहिणीचे काय?”
” आज जरा अतीच होतय.”
सुमेधाला भयंकर राग आला पण नेहमीप्रमाणे ती आताही गप्प बसली. जरावेळाने केतकी आणि शशांक आल्यावर विजयराव केतकीला म्हणाले, ” केतकी,चहा करते का?”
केतकीने किचनकडे बघितले, तर तिथे सगळेच शांत होते आणि सासुबाई निवांत बसलेल्या होत्या.
केतकीने नाराजीनेच चहा केला.
ती चहा पिता-पिता म्हणाली,” आई, तुम्हाला काहीतरी सांगायचे होते ना?”
” हो,आधी निवांत चहा पिऊन घे मग सांगते.”
सर्वाचा चहा पिऊन झाल्यावर सुमेधा बोलू लागली, ” मी आजवर कधी घराबाहेर पडली नाही. तुमचे सर्वांचे काही ना काही कारणाने बाहेर जाणे होते.”
” जास्त प्रस्तावना करु नको,काय ते लवकर सांग.आणि हो आम्ही बाहेर जातो ते कामानिमित्त.”
” बरोबर आहे तुम्ही कामानिमित्त जातात. जरी मित्र, मैत्रीणींसोबत गेले तरी. असो. मला सांगायचे आहे की,आमची महिला मंडळची सहल केरळला जाणार आहे. तिथुन अजून आसपासची काही ठिकाणही आम्ही बघणार आहोत. अशी साधारण येऊन जाऊन १०-१२ दिवस लागणार आहे.”
” माझी परमिशन नाही.आणि पैसे काय झाडाला लागतात.”विजयराव बोलले.
” पैसे झाडाला लागत नाही हे मला पण माहिती आहे. मी परमिशन मागत नाही, सांगते आहे. मी ऑलरेडी पैसे भरलेत.”
” काय? मला न विचारताच. आणि पैसै कमावण्यासाठी कष्ट करावे लागतात.”
” बरोबर आहे पैसे कमावण्यासाठी कष्ट करावे लागतात.आणि मी कधीपर्यंत तुमची परमिशन घेत राहू.न सांगता तर जात नाही.”
” पुरे झाली तुमची हुशारी.ते पैसे परत मागून घ्या.”
” आणि आई क्रिशचे कसे होणार?” एवढा वेळ गप्प बसलेली केतकी बोलली
” अग केतकी,तुझ्या आईला बोलवु.” शशांक म्हणाला
” वा रे शशांक, तिकडे ओजस नाही का?”
” अरे हो.”
” अरे वा,मी जर घरी राहून काहीच करत नाही तर हा प्रश्न यायलाच नको.” आज सुमेधाचा तोल सुटला
” सुमेधा,तु अती बोलतेय. मी एकदा नाही सांगितले म्हणजे नाही.”
” ते शक्य नाही. केतकी,तु सकाळी आरामशीर आवरुन जाऊ शकतेस आणि क्रिशला स्कुल बस पर्यंत पोहचवण्याचे आणि आणण्याचे काम तुझे सासरे करतील.”
” मला शक्य नाही.सकाळी मी फिरायला जातो.”
” अहो,१०-१२ दिवस नका जाऊ.”
विजयरावांना सुमेधाचे बोलणे ऐकून आश्चर्य वाटले, इतकी वर्षे काही न बोलणारी आपली बायको इतके निर्णय घेऊ शकते? आता आपल्यावर काम पडणार या विचाराने केतकी धुसफुसत आपल्या खोलीत निघून गेली.
सुमेधापण बाल्कनीत येऊन बसली. तिच्यापाठोपाठ विजयराव आले आणि त्यांनी रागातच विचारले,” हे काय चालवलं आहेस तू?”
” जे मला फार आधीच करायला हवं होतं. मी माझ्या पदराला बांधून ठेवले होते आणि तो ओढता ओढता मी पार थकून गेले,म्हणून ती गाठ सोडायची ठरवली मी.”
” तु ओढत होती संसार? आणि मी काय माश्या मारत होतो का?”
” नाही हो माझे अजिबात असे म्हणणे नाही.संसार आपल्या दोघांचा आहे. फक्त एवढच की मी गाठ बांधून ठेवली. ती आता फक्त थोडी सैल करायची आहे. मलाही मोकळा श्वास घ्यायचा आहे. जोपर्यंत मी तुमच्या सर्वांच्या गरजा पूर्ण करायचं ठरवल तर सर्वजण माझा एवढा राग का करत आहेत? जरा शांत बसून माझ्या ठिकाणी स्वतःला ठेवून आपल्या आयुष्याचा पुर्ण चित्रपट आठवा.”
विजयराव रागारागाने निघून गेले.सुमेधा बाल्कनीत बसून राहिली.
जरावेळाने क्रिश तीच्याजवळ आला आणि तीला म्हणाला, “आजी,तु पिकनिकला जाते आहे?”
” हो रे बाळा,पण तुझी गैरसोय होईल”
” अग आजी,मी आवरतो की माझे माझे तु नको टेंशन घेऊ, मस्त मजा कर.”
” हो रे बाळा”
क्रीश गेल्यावर संध्याकाळच्या जेवणाचे बघावे या विचारात सुमेधा स्वयंपाक घरात आली.
त्या काम करु लागल्या तर केतकी रागातच आली आणि त्यांच्या हातातले काम घेऊन ती काम करु लागली. शेवटी सुमेधा परत हॉलमध्ये येऊन बसली.
रात्रीचे जेवण मुक्यानेच झाले. पहाटे तीला जाग आली तीने बघितले तर विजयराव बिछान्यावर नव्हते.
ते कुठे गेले हे बघण्यासाठी सुमेधा बाहेर आली तर सकाळी सकाळी केतकी किचनमध्ये काम करतांना दिसली.
त्यांना आश्चर्य वाटले. त्या फ्रेश होऊन तीला मदत करु लागल्या तर ती त्यांना कोणत्याच कामाला हात लावू देत नव्हती.
सुमेधाने मग जास्त लुडबुड न करता हॉल मध्ये येऊन बसली.
विजयराव फिरुन आल्यावर सुमेधा म्हणाली, ” तुमच्यासाठी चहा बनवते.”
सुमेधा उठणार तेवढ्यात ते केतकीला म्हणाले,” केतकी,मी शशांक सोबतच चहा घेईल.”
सुमेधाला वाईट वाटले. तीला जाणवले की,घरातल्या सगळ्यांनी आपल्याशी अबोला धरला आहे.
असेच दोन तीन दिवस गेले. त्या सारख्या विचार करत की, मुलगा आणि सुनचे एकवेळ ठीक आहे, पण नवराही असा वागतो. त्यानंतर सुमेधा जास्तीत जास्त खोलीत राहू लागली नाही तर मंदिरात. पण कुणीच आपली नाराजी सोडत नव्हते.
एकटा क्रीश तेवढा बोलत असे.
शेवटी स्वतः चे मन मारत, घरच्यांच्या समाधानासाठी तीने सहलीला जाण्याचे रद्द करण्याचे ठरवले.
पण सुमेधाची हि विवंचना निर्मलाताई म्हणजे केतकीच्या आईच्या नजरेतुन सुटले नाही. त्यांनी खुप खोदून खोदून विचारल्यावर सुमेधाने आपण सहलीला येण्याचे रद्द करत आहोत असे सांगितले.
कारण सांगितले नाही,पण निर्मलाताईंना एकदंर परिस्थिती लक्षात आली.
दुसऱ्याच दिवशी त्यांनी केतकीला भेटायला बोलावले.
” काय ग केतकी,घरी काही प्रॉब्लेम आहे का?”
” अरे हो ना “
” काय?”
“अग, माझ्या सासुबाईंनी मोठा घोळ करून ठेवला आहे.”
” हो का? पण काय घोळ घातला आहे?”
” अग,त्या म्हणे केरळला सहलीला जायचे त्यांना.पैसे पण भरुन ठेवले आहे.”
” हो का?”
” बघ तर.घरात सगळेच चिडलेय त्यांच्यावर. कुणीच बोलत नाही.”
” अरे वा.खुप छान.होतील सरळ मग.”
” मग काय तर “
” पण केतकी,एक सांगू?”
” अग बोल की”
” त्या सहलीला मी पण जात आहे. पण आमच्याकडे कुणीच हरकत घेतली नाही. तुझी वहिनी तर माझ्यासाठी खरेदी पण करत आहे.”
” काय सांगते?”
” हो. पण तु नको काळजी करू, तुझी सासू सहलीला येण्याचे रद्द करत आहे.”
केतकीला आनंद झाला.
” काय सांगते काय आई, मी आता घरी जाऊन हि बातमी सासऱ्यांना आणि शशांकला सांगते. माझे बाई किती मोठ टेंशन कमी केले तु.”
” हो ग,पण केतकी,तुमच्या घरातले तुम्ही लोक एवढे स्वार्थी असणार असे वाटले नव्हते ग मला.”
” आई”
” हो ,तु आणि शशांक मस्त फिरायला जाता. तुझे सासरे ते पण टूर निमित्ताने फिरायचे. हे का मला माहित नाही.
तुझ्या सासूने मात्र कुणाच्या आनंदात अडथळा आणला नाही आणि त्यांनी सहलीला जायचे म्हटले तर एवढा आकांडतांडव?
का त्यांनी त्यांची हौस पूर्ण करुच नये का?आयुष्यभर त्या घरातल्या सर्वांचे करत होत्या ते दिसले नाही का कधी तुम्हाला कुणाला.
त्या तुमचेच काय पण त्यांनी माझेही खुप केले आहे.
आज मी तुमच्या सर्वासमोर एवढी धडधाकट उभी आहे ती त्यांच्यामुळे.”
” काय?”
” होय, जेव्हा मला मोनोपॉजमुळे डिप्रेशन आले होते. तेव्हा त्या माझ्या मदतीला धावल्या. अग तुम्ही सगळे तर आपापल्या कामावर निघून जायचे. पण त्या घरचे आवरुन माझ्याजवळ तासनतास येऊन बसायच्या. मला मानसिक आधार दिला खुप. तुला आणि कुणालाच माहीत नाही डिप्रेशन मध्ये मी आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता.”
” काय?”
” हो,पण त्या वेळीच मदतीला धावून आल्या आणि मला सावरले. तुम्हाला सगळ्यांना वाटले की, मी डॉक्टरांच्या औषधांनी बरी झाली. पण तसे काही नाही.डॉक्टरांच्या इलाज फक्त रोगावर होतो ग आरोग्यासाठी आपली आधार देणारी व्यक्ती लागते. तो आधार सुमेधा ताईंनी दिला. त्यावेळी तुझे टेन्शन त्यांनी आपले मानले.
तुझ्या सासऱ्यांच्या प्रगतीत अडथळा नको म्हणून त्यांनी घरातील तुझ्या आजी सासु सासरे यांचे मुकाट्याने केले. मग आता का तुम्ही त्यांचा आनंद आपला मानत नाही? तुझ्या सासऱ्यांचा इगो हर्ट झाला आहे.
समजव त्यांना आणि सहलीला आनंदाने पाठवा.बाकी तुमची मर्जी. तुमच्या घरात पडण्याचा मला अधिकार नाही.तुला समजावणे माझे काम होते.”
केतकी घरी आली तोवर सुमेधाने स्वयंपाक करून ठेवला होता. सर्वांची जेवण झाल्यावर सुमेधा आता लवकरच आपल्या खोलीत निघून जायची.
केतकीने शशांक आणि आपल्या सासऱ्यांना सारे नीट समजावले. त्यांनाही पटले.
दुसऱ्या दिवशी केतकीने सुट्टी घेतली.
सुमेधा आवरुन बाहेर जायला निघाली तशी केतकी बोलली, ” आई, मी आणि बाबा बाहेर जात आहे.तुम्ही थांबा.”
” तुझ्याकडे आहे ना एक चावी? मला आज बाहेर जायलाच हवे.”
” आम्ही आल्यावर जा.”
शेवटी नाईलाजाने सुमेधा थांबली. बराच वेळाने केतकी आणि विजयराव परत आले. त्यांच्याजवळ बरेच सामान होते. सुमेधाने काही पिशव्या घेतल्या आणि सोफ्यावर ठेवल्या. कुणी कसेही वागले तरी सुमेधाला त्यांच्यासारखे वागायला जमत नव्हते. ती पाणी घेऊन आली.
नंतर ती आपल्या खोलीत जायला लागली तशी केतकीने त्यांना हाक मारुन बोलवले.
केतकी तीला एक एक सामान दाखवत होती, तेव्हा सुमेधाला आश्चर्य वाटले.
तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
केतकी त्यांचा हात पकडत म्हणाली, ” आई,मला माफ कर.आम्ही खुप स्वार्थी विचार करत होतो. पण माझ्या आईने वेळीच माझे डोळे उघडले. तुम्ही आनंदाने सहलीला जा.खुप मजा करा.”
विजयराव तर काहीच बोलू शकले नाही. त्यांनी फक्त तीचा हात आपल्या हातात घेत तीला आश्वस्त केले.
सुमेधाच्या मनात आले,” आज मला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचे पंख लाभले.”
©️®️ सौ.साधना राजेंद्र झोपे
सदर कथा लेखिका सौ.साधना राजेंद्र झोपे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी.
कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
खूप छान
Thank you very much.