पूर्वज

©® नीरा पटवर्धन 
सोहम अन् श्यामा अजून ऑफिस मधून आले नव्हते. आल्या बरोबर चहा बरोबर कांहीतरी नाश्ता मी करतेच ऑफिस मधून थकून  आल्यावर चहा बरोबर गरम गरम थोड कांही खाल्लं की बरं वाटतं.
तर आज मावशींन कडून सकाळीच मक्याची कणसं किसून घेतली होती. तेंव्हा सगळ्यांच्या आवडीची मक्याची भजी करण्याचा बेत होता. तशी मी तयारी करून ठेवली.
ते दोघेही ऑफिस मधून आले अन् मी एका बाजूला भजी तळायला घेतली आणि दूसऱ्या गॅस वर चहा ठेवला. थो
ड्याच वेळात ईरा ही खेळून आली. आल्या बरोबर तीची गडबड सुरू झाली.  ती घरात आली की घर कसे भरलेले वाटू लागते.

“आजी आज न तुझ्या बरोबर मला रेसीपी करायची आहे. श्शऽऽ आपण सीक्रेट रेसीपी करतोय हं” असे म्हणत माझ्या कानाशी कुजबूजली.
“आज नको ग ईरा आपण उद्या करूया का? आई पापा ऑफिस मधून आले ना की आपण त्यांना सरप्राईज देऊया आज मी छान भजी केलीयेत तु पण खाऊन घे”.
सहा वर्षाची ईरा  खूपच लाघवी अन् शहाणी मुलगी आहे.
कोरोना च्या लॉक डाऊन नंतर कार्यालये तर सुरू झाली होती पण शाळा अजून सुरू नव्हत्या झाल्या. त्यामुळे तीची शाळा ऑनलाईन होती. मग काय ईरा आणि आजी शाळा व्यतीरिक्त पत्ते,दूसरे बोर्ड गेम,अधून मधून तीच्या बरोबर सीक्रेट रेसीपी पण असायची.

तीचं ठरलं होतं आठवड्यातुन तीन दिवस माझ्या कडे व बाकी चार दिवस आई पापांन बरोबर झोपायचं.
त्या प्रमाणे आज शुक्रवार उद्या परवा शाळेला सूट्टी म्हणजे आज,उद्या,परवा ती माझ्या कडे झोपणार. माझ्या कडे झोपायचं म्हणजे रोज नवी गोष्ट. मग ठरल्या प्रमाणे माझ्या बरोबर सूप ची सीक्रेट रेसीपी झाली.
नंतर जेवण झाल्यावर कांही वेळ आई पापांन बरोबर ईंग्लीश सीरियल पाहाणं झालं. मग आली झोपायला.
आता दोन दिवस सूट्टी म्हणजे दूसऱ्या दिवशी उठायची कांही घाई नाही.
आज कोणची गोष्ट सांगु अकबर बीरबल ? त्या अगदी तीच्या आवडत्या गोष्टी. अन् कांही गोष्टी तर रिपीट पण चालतात. 

मग कधी माझ्या किंवा माझ्या आईच्या लहानपणच्या. (ज्या माझ्या आईने मला सांगितलेल्या असत्) बदल म्हणून त्या गोष्टी पण ऐकायला तीला आवडतात. गोष्ट म्हणजे तीचा फर्माइशी कार्यक्रम.
मग ईरा आज कोणची गोष्ट तशी पटकन म्हणाली, “आजी आज न तुझ्या लहान पणी ची गोष्ट सांग.”
“लहानपणीची, बर सांगते पण चूपचाप ऐकत झोपायच.”
“हो आजी आणि आधी गुडनाईट म्हण, नंतर नको म्हणू नाहीतर माझी झोप उडेल.”
“बरं मग आता डोळे बंद कर आणि ऐक. ही सत्तावन वर्षा पूर्वीची गोष्ट आहे.”
“आजी सत्तावन म्हणजे किती?”

“अगं सत्तावन म्हणजे फिफ्टी सेवन. ऐक आता,हं. तर तेंव्हा माझे वडिल म्हणजे आम्ही त्यांना नाना म्हणायचो. 
त्यांची दर तीन वर्षाने बदली होत असे तेव्हा ते बदली च्या गावाला असायचे व आम्ही बहिण भावंड आई बरोबर  इंदोर ला राहात होतो. तर त्या वेळेला ते बडवाह ला होते. तेव्हा उन्हाळ्याच्या सूट्टीत आई व आम्ही सर्व भाऊ बहिणी नानां च्या गावाला म्हणजे बडवाह ला गेलो होतो.
तीथे एक किल्ला होता. चारी बाजू ला कोट म्हणजे भिंत होती. मधल्या आवारात नानांच ऑफिस होतं,शिवाय त्याच्या आसपास ऑफिसर्स क्वार्टर्स होते. एका क्वार्टर मधे आम्ही राहात होतो.

क्वार्टर च्या समोर एक विहिर होती. त्याचच पाणि आम्ही वापरत होतो. कारण तेंव्हा तीथे नळ  नव्हते. पण तीथे मजाच होती सर्व कामाला गडी होते.
मग आम्हाला कांही काम नाही नूसतं खायचं,प्यायच आणि सकाळ संध्याकाळ फिरायला जायचं.
दुपारी खूप पत्ते खेळायचे. रात्री जेवण झालं न की मग गच्चीवर झोपायला जायचं.
तीथे किनई अगं खूप माकडं यायची.  सकाळी त्यांच्या आवाजानेच जाग यायची.
मग आम्ही अंथरूणात बसून त्यांची मजा बघत राहायचो.

त्यांची लहान लहान पील्ल छान खेळायची ऊड्या मारायची त्यांच्या त्या माकडचेष्टा पाहायला खूपच गम्मत वाटायची. मग ते क्वार्टर कडे येऊ लागले की आम्ही खाली यायचो. मग ब्रश करून चहा पीऊन फिरायला जायचो.
फ़िरून आलं की आंघोळ, नाश्ता वगैरे,असा आमचा दैनंदिन कार्यक्रम असायचा.
एक दिवस रोज प्रमाणेच आम्ही फिरून आलो. किल्या च्या भींती वर इथे तीथे माकडं ऊड्या मारत होती. अन् अचानक माकडांची भय आणि चिंता मिश्रीत चीत्कार ऐकु येऊ लागली.
आसपास च्या भिंती वरून खूप माकडं ओरडत पळत होती त्यांच्या त्या ओरडण्यात मदतीची हाक भासत होती. माकडांची संख्या वाढु लागली तसा आवाजही वाढु लागला.

आंगणातल्या भिंती वरून माकडं उड्या मारुन जाउ लागली. त्यांची चित्कार ऐकुन आम्ही सारे पुढच्या ओसरित आलो.
काय झाले असावे बरे ? पुढचे जाळीचे दार खोलले तसे एक मोठे माकड दात काढुन अंगावरच धाउन आले. दार खोलताच ते दात दाखवून आंगावर झेप घ्यायच्या तयारित होते.
घाबरून आम्ही दार बंद केलं व ओसरिच्या जाळीतून त्यांच्या हालचाली बघु लागलो. असंख्य माकडं कल्लोळ करत होते.
काही कोटावर, काही विहिरिच्या आसपास भिंतीवर बसले होते. दोन चार माकडांची विहिरिच्या आसपासच जास्त वर्दळ होती शिवाय ते सतत विहीरित वाकून बघत होते.

एकानी तर रहाटाची रश्शी विहीरित देखिल सोडली त्यावरून आम्ही अंदाज लावला कदांचित त्यांच पील्लु त्यात पडलं असणार. त्यांचा गलका चालला होता पण आता पिल्लाला बाहेर काढणार कोण व कसं काढणार ? याची आम्हाला चिंता.
गडी अजून कामावर आले नव्हते. आम्ही त्यांची वाटच बघत होतो आणि ते किल्याच्या दरवाजातुन आत येताना दिसले.
पण पाहा त्या माकडांची बुद्धि !
आम्हाला वाटलं की माकडं त्यांच्या वर ही धावून जातील. आमच्या वर तर दात दाखवत धाउन येतच होते. पण काय आश्चर्य ते दोघं आत येतांना दिसताच माकडांची हालचाल बदलली,आणि इतकी शिस्त सगळी माकड़े एकदम चुपचाप बसलित.

त्यांचा कल्लोळ बंद झाला. अर्थात त्या दोघांन कडून आपल्याला मदत मिळेल असे त्यांना वाटले असावे त्याच आशेनी दोन मोठी माकडे ज्यांचं पिल्लु विहीरित पडलं होतं, ती गड्यांच्या जवळ जात होती. मग विहिरी कडे, परत त्यांच्या जवळ येत होती परत विहीरी कडे.  गडी आमच्या क्वार्टर जवळ येई पर्यंत त्यांचा हा क्रम चालु होता पण चुपचाप!
दांत  दाखवून त्यांच्या अंगावर झेप घेत नव्हते.
आम्हाला आश्चर्य वाटत होतं कि त्यांना कसं कळलं की यांच्या कडून आपल्याला मदत मिळेल.
तसा गडी माणसांना अंदाज आला की काय झाले असावे. आम्ही पण आमचा अंदाज सांगितला.

मग आम्ही त्यांना  रश्शी बादली दिली. तसे ते रश्शी व बादली घेऊन विहीरि जवळ गेले. त्यांच्या पैकी एक जण विहीरित ऊतरला तर दुसऱ्या ने बादलीला रश्शी बांधुन बादली राहाटा वरून विहीरित सोडली.
मग विहीरित उतरला होता त्याने पिल्लाला बादलीत ठेवले व वरच्याने हळूहळू रश्शी वर खेचली.
वर बसलेली पिल्लाची आई इतकी चौकस होती की बादली केव्हा वर आली व केव्हा ती पिल्लाला घेउन कोटा च्या भिंतीवर जाउन बसली हे सगळं पापणी लवण्या इतक्या वेळेत घडलं कि कोणाला कळलं ही नाही. 

हुश्श झालं आम्हाला, पिल्लु जिवंत होतं अन् आई च्या कुशीत पोचलं होतं आणि मग सुरू झाली शिस्तबद्ध विचारपूस तसे एक एक माकड कुशीतल्या पिल्ला जवळ येऊन काही सेकंद थांबून पुढे निघून जात होतं.
जशी विचारपूस करत असावे. ह्या प्रमाणे हळू हळू सगळी माकडं आपापल्या मार्गाने निघून गेली.
गोष्ट संपली तशी पाहिलं तर गोष्ट ऐकता ऐकता ईरा ला गाढ झोप लागली होती.
तीला नीट पांघरूण घातलं व उरलेली कामं आटपुन  मी  पण झोपण्याची तयारी केली.
ही घटना आमच्या मनात इतकी बिंबली की आजपर्यंत जशी च्या तशी स्मृतीत आहे आणि म्हणूनच वानरांचे हे वात्सल्य, प्रेम, सहानुभूती, शीस्त ही एकजुटता आणि बुद्धिमत्ता पाहून वाटतं उगाच वानरांना माणसाचे पूर्वज नाही म्हणत.
©® नीरा पटवर्धन 

सदर कथा लेखिका नीरा पटवर्धन यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी.
कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!