उणीव

©® प्रणाली सावंत
आज सकाळपासून सुमनची लगबग चालू होती. सकाळी नेहमीपेक्षा ती लवकर उठली. पूर्ण रात्रभर घरी जाण्याच्या ओढीने तिला झोपही व्यवस्थित लागली नव्हती.
काल रात्री सुहासने झोपताना फोन केला होता, आणि नेहमीच्या लाडिक स्वरात म्हणाला होता, ‘सुमी, उदया तु आल्यावर
मी तुझ्यासाठी काय करु ते सांग. आकाश से तारे बिछाऊ क्या मै तुम्हारे लिये’ त्याचं नेहमीचचं लाघवी बोलणं.
‘छे, छे, इतकं काही करण्याची गरज नाही. आकाशातील तार्यांना आकाशातच चमकू दे, तू फक्त मला न्यायला वेळेवर ये, मला ताटकळत ठेवू नकोस.’

‘हो ग राणी, आठवणीने येतो. तेरी हर बात सर आखो पे, क्या मै…. सुहास आज वेगळयाच मुडमध्ये होता.
स्वारीला आज शेरोशायरी सुचत होती.
‘बरं, मी फोन ठेवते. सुमन त्याला मध्येच थांबवत म्हणाली, उदया ये आठवणीने.’ सुमनने फोन ठेवला.
सुमन हातातील मोबाईल चालू करुन पाहू लागली. स्क्रीनवरील सुहास आणि अमितचा फोटो पाहून तिने त्यावर अलगद हात फिरवला. अमितला कधी एकदा जवळ घेते असे तिला झाले होते ‘कसं राहीलं माझं बाळ माझ्याशिवाय. मला तरी कुठे सोडवत होतं त्याला. सुहासने तेव्हा विश्वासाने माझ्या पाठीवर हात ठेवला होता. त्याच्या आश्वासक स्पर्शामुळे मला अमितला सोडण्याचं धाडस झालं’ अमितच्या फोटोचे चुंबन घेऊन सुमन स्वतःशीच बोलली.

अमितचं रडणं आठवून अजूनही ती कासावीस होते. सुमन अंथरुणावर पहुडली. बर्याच उशिरापर्यंत ती अंथरुणावर कूस पालटत होती. डोळा कधी लागला ते तिला कळलचं नाही.
सकाळी उठल्यावर तिने लगबगीने सारे उरकले. बॅग कालच तिने पॅक केली होती.
अमितला हवा असलेला टी शर्ट तिने आठवणीने भरला होता.
‘मम्मी, मला लाल रंगाचा टी शर्ट हवा. ते पण स्पायडरमॅनच चित्र असलेला’. अमितची मागणी सुमन कशी टाळू शकत होती.
त्या टी शर्टसाठी ती अनेक दुकाने फिरली होती.

‘किती कार्टुन बघतो. आणि त्याच्यासारखा अभिनय करत घरभर दंगा करतो. सगळं घर विस्कळीत करतो. ऑफिसवरुन आल्यावर सगळं लावताना किती दमछाक होत होती माझी. सुहासने हे सगळं कसं मॅनेज केले असणार’. सुमनला घरी गेल्यावर घर कसं असेल याचं चित्र समोर आलं.
‘बाईसाहेब, घरी खूप काम आहे. कंबर बांधा व्यवस्थित.’ सुमन पुटपुटली. तिने घडयाळयात पाहिले.
तिची फ्लाईट दोन वाजता होती. तिच्या गेस्ट हाऊसपासून एअरपोर्टपर्यंत जाण्यास जवळजवळ एक तास लागतो. त्यामुळे लवकर
आवरुन तिने तयारी करायला घेतली.

जाताना घालण्यासाठी तिने गुलाबी रंगाचा टॉप काढून ठेवला होता. ‘सुहासला हा रंग खूप आवडतो, आणि इतक्या दिवसांनी त्याला भेटणार म्हणजे साहेबांची आवड लक्षात ठेवलीच पाहीजे’ ती स्वतःशीच बोलली.
सुमन तयारी करुन आरशासमोर उभी राहीली. आज ती खूप सुंदर दिसत होती. गव्हाळ रंग, काळेभोर डोळे, तिच्या प्रसन्न व्यक्तिमत्वात भर घालत.
वेगळा मेकअप करण्याची तिला फारशी गरज वाटत नसे. तिचं नैसर्गिक सौंदर्य सुहासलाही आवडत असे. स्वतःला आरशात निरखून तिने हलक्या रंगाची लिपस्टिक लावली. छान दिसत होती ती.
‘अगं बाई उशीर झाला’, स्वतःशीच म्हणत सुमनने बॅगस् उचलून बाहेर ठेवल्या.

एका हातात गेस्ट हाऊसची चावी घेऊन ती बाहेर आली. दरवाजा बंद करुन तिने वाचमनला हाक मारली. आपण आठ दिवसासाठी बाहेर जाणार आहोत हे त्याला तिने कालच सांगितले होते.
‘हा मॅडमजी’, असं म्हणत तो हजर झाला.
‘हे बघ, हया बॅगस् टॅक्सीत ठेव, आणि हो, रिया मॅडम आल्या तर त्यांना दरवाजा उघडून दे’
‘हा मॅडमजी’ असं म्हणत त्याने बॅगस् टॅक्सीत ठेवल्या. रिया कंपनीचं सेल्स डिपार्टमेंट पहात होती आणि ती तिची चांगली
मैत्रीणही होती. तिच्या गैरहजेरीत तिची जबाबदारी रिया सांभाळणार होती.
सुमन टॅक्सीत बसली. टॅक्सी एअरपोर्टच्या दिशेने सुसाट निघाली. ती टॅक्सीची काच खाली करुन बाहेरची रहदारी पाहू लागली.

दीड महीन्यापूर्वी तिने जेव्हा हा परीसर पाहिला, तेव्हा तिचे मन किंचीत बावरले होते, कारण प्रथमच ती अनोळखी शहरात दीर्घ काळापर्यंत राहणार होती. अभ्यासात हुशार असलेल्या सुमनला एम. बीए. केल्यानंतर एका नामांकित कंपनीत जाब मिळाला होता. करीयर ओरीयंटेड असली तरी तिच्या आयुष्यात घर, नाती यांना स्थान होते.
आपल्याला समजून घेणारा, प्रेम करणारा एक मित्र असावा असं तिला सतत वाटे. आकाशात भरारी मारताना पक्ष्यांनाही घरटयाची ओढ असतेच. अतिशय भावनाशील माणसे आयुष्यात कितीही यशस्वी असली तरी त्यांच मन हळव्या नात्यांसाठी नेहमीच आसुसलेलं असतचं. सुमनचंही तसचं होतं.

तिला एक मित्र हवा होता, आणि सुहासच्या रुपाने तिला तो मिळालाही होता. सुहासची आठवण आल्यावर तिने मोबाईल पाहीला. स्क्रीनवरील त्याचा फोटो पाहत असताना अचानक रिंग वाजली. सुहासचा फोन होता.
‘हॅलो’, ‘कुठपर्यंत आलीस’, त्याने फोन उचलताच प्रश्न केला
‘बघ, तुझीच आठवण काढत होती. शंभर वर्ष आयुष्य आहे तुला’. सुमन म्हणाली.
‘जितनी भी जिंदगी हो, तेरे कदमोपे दम निकले’ सुहास हसत म्हणाला.
‘आजकाल हिंदी सिनेमा जास्त बघतोस की काय. किती शेरशायरी करत असतोस. काय बरं तू विचारत होतास की, मी कुठपर्यंत आली ते’ सुमन हसतच म्हणाली.

‘भैयाजी, एअरपोर्ट अब कितना दूर है’. आपण कुठपर्यत आलो हे
विचारण्यासाठी सुमनने टॅक्सीवाल्याला विचारले.
‘पावणा घंटा लगेगा’ टॅक्सीवाल्याने उत्तर दिले. ‘अरे सुहास, पाऊण तास लागेल’.
‘फ्लाईटमध्ये बसल्यावर मला फक्त एक मेसेज कर. बरं मी फोन ठेवतो. जरा घाईत आहे. एका क्लायंटला भेटायला जायचे आहे.
‘ठीक आहे, मी मेसेज करीन’. सुहासने कसं केलं असेल मॅनेज माझ्याशिवाय’ हा प्रश्न तिला सतत पडत होता.

येण्याच्या आदल्या रात्री तिने हाच प्रश्न सुहासला विचारला होता ‘मी खरचं जाऊ का रे. तुला सगळं मॅनेज करायला जमेल ना. तुझी खुप धावपळ होणार आहे’.
‘सगळं मॅनेज करीन. तू काही काळजी करु नको. तू निर्धास्त होऊन जा आणि तुझ्या कामाकडे लक्ष दे, आईही कधीतरी येऊन जाईल’. सुहासने धीर दिला. हे सगळं आठवताना सुमनचे डाळे पाणावले. तिने सीटच्या मागे मान रेलून डोळे मिटले.
‘मॅडमजी एअरपोर्ट आया है’ ड्रायव्हरच्या बोलण्याने ती भानावर आली. ती टॅक्सीतील सामान आवरु लागली.
टॅक्सीवाल्यानेही सामान बाहेर काढण्यास मदत केली. बॅगस् एअरपोर्टबाहेरील ट्रॉलीवर ठेऊन ती आत गेली.

डोमॅस्टिक एअरपोर्ट असल्यामुळे पासपोर्ट चेक करण्याची गरज नव्हती. सिक्युरीटी चेकिंग झाल्यावर तिने स्क्रीनवर पाहीले. तिच्या फ्लाईटच्या नावासमोर असलेल्या गेटसमोर ती आली. तिने घडयाळात पाहीले. अजून एक तास होता. तिथे जवळच आसनव्यवस्था होती, त्यातील एका सीटवर ती बसली.
बाजूच्या सीटवर एक स्त्री आपल्या बाळाला घेऊन बसली होती. जेमतेम वर्षाचं बाळ होतं ते. आईला बिलगून झोपलं होतं. त्याला पाहील्यावर सुमनला अमितचं बालपण आठवलं. आपण त्याला वेळ देऊ शकलो नाही ही खंत प्रकर्षाने जाणवली.

लग्नानंतर लगेच बाळ होऊ देणं, हा तिचा निर्णय होता. सुहासबरोबरच्या नात्याला पूर्णता यावी, असं तिला मनोमन वाटत होतं. ती आईवडीलांची एकूलती एक मुलगी होती. लहाणपणी लाड खूप झाले पण एकटेपणामुळे तिची नात्यांची आस वाढली.
तिला तिचं बाळ हवं होतं. मॅटर्निटी लिव्ह नंतर अमितला सोडून कंपनीत पुन्हा रुजू होताना किती जड अंतकरणाने ती बाहेर पडली होती.
सुहासच्या आई त्यावेळी आल्या होत्या म्हणून तिला फारशी चिंता नव्हती, पण काही महीन्यानंतर त्या गावी गेल्यावर अमितला कुठे ठेवावं हा प्रश्न होता.
त्यांच्याच कालनीतील दुसर्या विंगमध्ये विमला साने नावाची महिला आपल्या ब्लॉकमध्ये पाळणघर चालवते असं तिने ऐकलं होतं, आणि जे ऐकलं होतं ते चांगलचं होतं.

त्यामुळे सुमन आणि सुहासने अमितला तिथे ठेवण्याचं ठरवलं. त्यांचा तो निर्णय योग्यच होता. श्रीमती साने बाळांची काळजी
व्यवस्थित घ्यायच्या, पण अमित चार वर्षाचा झाला आणि साने यांनी तब्येतीच्या कारणास्तव पाळणाघर बंद केलं. अमितला कुठे ठेवावं हा प्रश्नपुन्हा उभा राहीला.
सुमन आपला जाब सोडू शकत नव्हती. सुहासने तेव्हा घरी राहायचं ठरवलं. ‘डेटा अॅनालिस्ट’ म्हणून त्याचा चांगलाच जम बसला
होता. अनेक मोठया कंपनींशीही त्याचे चांगले संबंध प्रस्थापित झाले होते, त्यामुळे त्याने फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचे ठरविले. त्यांचा तो निर्णय खरचं योग्य होता. अमितकडे तो लक्ष ठेऊ शकत होता, आणि घरुन कामही करु शकत होता, म्हणून जेव्हा सुमनचे प्रमोशन होऊन त्यांच्या कंपनींच्या बॅगलोर ब्रॅंच मध्ये असिस्टट मॅनेजरची ऑफर कंपनीतर्फे दिली गेली, तेव्हा ती नाही म्हणू शकली नाही.

फक्त वर्षभर तिथे राहायचे होते. सुमनला हा चान्स जाऊ दयायचा नव्हता. सुहासने तो इथलं सर्व हॅन्डल करु शकतो अशी शाश्वती दिली होती, पण तिला धाकधूक वाटत होती कारण सुहास जरी अमितकडे लक्ष ठेऊ शकत असला तरी त्याच्याकडे जरापण व्यवस्थितपणा नव्हता. कोणतीही वस्तु तो जागेवर ठेवत नसे. काम करत असताना आजुबाजूला पसारा असे. अमितची खेळणी सर्वकडे पसरलेली असायची.
सुमनला कामावरुन आल्यावर प्रथम घर आवरावे लागे. कधी कधी वैतागून सुमन बोलायची, ‘तुझ्या आईने खरचं तुला शिकवलं नाही का रे वस्तु व्यवस्थित ठेवायला’.
तेव्हा सुहास तिच्या गळयात हात टाकून म्हणायचा, ‘म्हणून तर तुझ्याबरोबर लग्न केले’. त्याच्या या उत्तराने ती निरुत्तर व्हायची.

त्याचा हसरा, खेळकर स्वभावच सुमनला आवडत असे. कोणत्याही विपरीत परीस्थितीत तो पॅनीक होत नसे. शांतपणे त्या परीस्थितीतून कसे बाहेर पडता येईल याचा विचार करी. त्याच्याउलट सुमन होती. आपल्या बुध्दीमत्तेने स्वतःच्या पायावर जरी ती खंबीरपणे उभी असली तरी ती खूप संवेदनशील होती.
आपल्याशी संबधित प्रत्येक गोष्टींबद्दल, नात्यांबद्दल ती पझेसिव्ह असे. स्वतः त्रास सहन करुन तिचा सर्व गोष्टी जपण्याचा प्रयत्न
असे. सुहास आणि अमित तिचं सर्वस्व होते, म्हणूनच आपण अमितला वेळ देऊ शकत नाही ही खंत तिला सतत व्हायची. सुमन एअरपोर्टवर बराच वेळ बसून होती. काही वेळाने दरवाजे उघडले गेले. सर्व प्रवासी आत लागले.

रनवेवर विमान असल्यामुळे त्यांच्याच मिनी बसने तिथे जावे लागले. विमानात बोर्डिंग पास चेक केल्यानंतर सुमन आपली सीट शोधून बसली. तिची विन्डो सीट होती. खिडकीतून ती बाहेरील विरळ आकाश पाहू शकत होती. आपल्या वेगवेगळया रंगछटांनी सर्वाचे मन मोहून टाकणारा हा विस्तारलेला आकाश तिला खूप आवडे. त्याच्याकडे पाहून तिच्या मनात विचार येई. ‘इतका हा विस्तारलेला आहे, पण त्याला सतत धरणीची ओढ असतेच, कोणत्या ना कोणत्या रितीने तो त्याचे निरोप त्याची सखी पृथ्वीकडे पाठवतच असतो. कधी त्रासदायक सुर्याची किरणे तर कधी गारवा देणारे पावसाचे थेंब. पृथ्वीलाही आकाशाच्या निरोपाची ओढ असतेच.
अगदी त्रास झाला तरी तिची काहीही तक्रार नसते, कारण आकाशावर तिचं नितांत प्रेम असतं. विमानातील खिडकीतून बाहेरच्या विरळ आकाशात डोकावताना तिला सरत्या वर्षागणिक तिचं आणि सुहासचं घट्ट झालेले नातं दिसत होतं.

दोन तासांनी विमान मुंबईत उतरल. विमानतळावरील सर्व प्रक्रिया पार पडल्यावर ती आपले सामान घेऊन बाहेर पडली. बाहेर सुहास उभा होता. सुमन त्याला पहाताच वेगाने त्याच्याकडे गेली.
‘तुझी खुप आठवण येत होती’ त्याला बिलगून सुमन म्हणाली.
‘चल घरी जाऊ, अमित वाट पहात बसेल’. सुहास तिचा चेहरा ओंजळीत घेत म्हणाला. सुमन त्याच्यापासुन दूर झाली. सुहासने आणलेल्या कारमध्ये आपले सामान ठेवून ते घरी आले.
अमितला कधी एकदा जवळ घेतो असे तिला झाले होते. तिने अधीरतेने बेल वाजविली. दरवाजा अमितने उघडला.
सुमनला पहाताच अमित तिला बिलगला. त्याला जवळ घेतल्यावर सुमनलाही रडू आले.

त्याला उचलून घेऊन सुमन म्हणाली, ‘माझी आठवण येत होती का रे’
‘हो’ म्हणत तो अजून बिलगला.
सुमनने तिची नजर घरावर फिरवली. तिने स्वतः हौशीने सजवलेले तिचं घर. ती जसं सोडून गेलेली तसचं अगदी टापटीप. सगळं सामान जिथे असायला हवं तिथे व्यवस्थित लावलेले.
तिच्या मागे असलेला सुहास तिला म्हणाला, ‘काय बाईसाहेब, घर कसं वाटलं’
‘मी येणार म्हणून सगळं लावलं की काय’ सुमन हसत म्हणाली. ‘नाही हं, असं आम्ही रोजच लावतो, हो ना अमित.
‘हा मम्मी, मी पण माझी पुस्तके, खेळणी व्यवस्थित लावतो’ अमित गाल फुगवत म्हणाला.

सुमन प्रवासाने दमलेली होती. लवकरच झोपी गेली. सकाळीही तिला उशीरा जाग आली. बेडरुमच्या बाहेर येऊन पहाते तर सुहास आणि अमित नाश्ता करत होते.
‘फ्रेश वाटतं ना’ सुहासने विचारलं.
‘हो, तुमच्या दोघांचं आवरलं’.
हो, तू तुझं आवरुन ये, नाश्ता तयार आहे.
सुमन आपली आघोंळ वगैरे आवरेपर्यंत दोघांनी आप-आपली कामे आटोपली होती. अमित शाळेत जाण्यासाठी तयारी करु लागला. त्याची शाळेची बस लवकर येई. सुमन त्याची तयारी करण्यासाठी त्याच्याजवळ गेली.

‘मम्मी, मी करतो. आता मी शहाणं बाळ झालो आहे. हो ना पप्पा’ अमित अभिमानाचे भाव चेहर्यावर आणत म्हणाला.
‘आणि मी पण’ सुहास हसत म्हणाला. त्या दोघांचं बोलणं ऐकून सुमनला हसू आलं नाही. आतून काहीतरी तूटत आहे असं तिला वाटू लागलं. त्यानंतरचे चार पाच दिवस ती हेच पहात होती.
नेहमीची सवय झाल्यामुळे ती दोघे स्वतःची कामे स्वतःचं करत होती. त्याचं अशारितीने शहाणं होणं सुमनला त्यांच्यापासून दूर घेऊन
जाणार होतं. माणसाचा स्वभाव किती विचित्र असतो. त्याला सतत नात्यांचे बंधन हवे असते, पण हीच नाती जेव्हा त्यांच्या मनाप्रमाणे वागत नाही तेव्हा त्यांच्यापासून दूर जावेसे वाटते. सुमन त्यांच्यात गुंतून गेली होती.

गेले दीड महीने ती त्यांच्यापासून जरी दूर राहीली असली तरी, त्यांची उणीव तिला सतत जाणवत राहीली. इथे आल्यावर तिला तिच्या अपेक्षेपेक्षा वेगळं चित्र दिसल. दोघांनी आपलं एक विश्व तयार केलं होतं. ते दोघे असं जाणून बुजून करत नव्हते. फक्त सुमनला त्रास होऊ नये एवढंच त्यांना वाटत होतं पण सुमनला हा गोड त्रास हवा होता.
तिने एक वाक्य कुठेतरी ऐकलं होतं, ‘मै अहम था, ये मेरा वहम था’ या वाक्याची गंभीरता ती आता अनुभवत होती. आपली उणीव कुणालातरी भासते ही कल्पनाच माणसासाठी किती सुखावणारी असते. रविवारी ती बॅगलोरला परत जाणार होती.
शनिवारी रात्री बाहेर हाटेलात डिनरला गेल्यावर तिने सुहासचा हात हातात घेतला आणि बोलली, ‘सुहास कंपनीला लेटर देऊन मी माझं प्रमोशन कॅन्सल करायला सांगणार आहे’.

‘का, सगळं तर व्यवस्थित चाललं आहे. काही प्रॉबल्म आहे का’ सुहासने आश्चर्यचकित होऊन विचारलं.
‘नाही, तसं नाही. मला दोघांशिवाय तिथे करमत नाही, आणि कामाचाही त्रास होतो’. सुमन खाली मान घालत म्हणाली.
अमित आणि सुहासशिवाय करमत नाही हे कारण खरं होतं पण दुसरं कारण खोटं होतं. खरं कारण ती सांगू शकत नव्हती. ते कारण कुणीच सांगत नसतं. हीच तर माणसाची कमकूवत बाजू असते.
समाप्त
©® प्रणाली सावंत.
सदर कथा लेखिका प्रणाली सावंत यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी.
कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!