दाटलेलं आभाळ

©® वीणा विजय रणदिवे 
प्राचीची नजर घड्याळाकडे गेली. छोटा काटा पाचला स्पर्शून पुढे निघाला होता आणि मोठा काटा पाचवर पोचला होता.
“बापरे! साडेपाच वाजायला पाच मिनिट कमी; आता घरून निघायला हवं..”
अमोल आणि अजित झोपले होते. बाबांची चाहूल लागली, म्हणजे बाबा उठले होते. अंथरुणावर बसून त्यांचा पायाचा व्यायाम चालला होता.
तिने बाबांना आवाज दिला,” बाबा…” 
“हं..” म्हणत बाबांनी नजर वळवली.

“गॅसवर भाजी कमी आचेवर ठेवली आहे, कुकर लावून घ्याल.‌..” एवढे बोलून प्राचीने पटकन गाडीची चावी घेतली. आणि खोलीतून बाहेर पडली.
अवघी २२ वर्षाची होती प्राची; आई गेली तेव्हा! कोसळूनच पडायची बाकी होती ती! 
आई म्हणजे सर्वस्व होत तिचं. बाबा सतत कामात व्यग्र. त्यामुळे आईशी जास्त जवळीक. आईलाही तिचं अपार कौतुक!
अभ्यासात प्रचंड हुशार, कॉलेजच्या सेमिनार्समध्ये, वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षीसं…त्यामुळे आईला प्राचीचं भारी कौतुक!
“माझी मुलगी मुलापेक्षा कमी नाही” असं मावशीजवळ बोलताना तिनं ऐकलं होतं. 

तिलाही आईचं खूप वेड. प्रत्येक गोष्ट ती आईला सांगायची. तिची हक्काची मैत्रीण होती आई! आईकरता ती बाबांशीही वाद घालायची; आईला कुणी बोललेलं तिला खपत नसे. अशावेळेस तिची बंडखोर वृत्ती उफाळून येई. 
मात्र हे मायलेकीचं नातं नियतीला बघवलं नाही. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने आईला वेढलं. तिची मन:शक्ती कमी पडली.
मनानं-शरीरानं ती खचली आणि दोनच वर्षात तिने नियतीपुढे माघार घेतली.
आपला संसार अर्ध्यावर सोडून ती अनंतात विलीन झाली.

 प्राची सर्वात मोठी; त्यानंतर अजित आणि छोटा अमोल. अमोल फारच छोटा होता. त्याचा कावराबावरा चेहरा बघवणंही होत नव्हतं. आई जाण्याचा दिवस आठवला की ती आजही हळवी व्हायची.
जबाबदारीची जाणीव तिच्यात निर्माण झाली ज्यावेळेस बाबांनी अक्षरशः तिच्या जवळ येऊन अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती‌. 
तिचे हक्काचे, मायेचे विश्व उद्ध्वस्त झाले होते. आईविना पोरकेपण ती अनुभवत होती.
अशावेळी तिघांचे चेहरे बघून तिच्यातील माया उफाळून येत असे. जणू आईने तिच्या पदरात हे दान टाकून ते सांभाळायला तिला दिले होते. आजही हे आठवतांना तिच्या डोळ्यातील अश्रूंनी वाट मोकळी केली. 

लख्ख उजाडले होते. सगळा सकाळच्या ६ ते २ च्या शिफ्टचा स्टाफ हजर होता. २४ तास चालणारी हॉस्पिटल लेबाॅरटरी होती ती. सकाळी येणाऱ्या सॅंपल्स रिपोर्टच्या नोंदी कॉम्प्युटरमध्ये घेण्यास तिने सुरुवात केली.
बोटं भराभर बटनांवर फिरत होती. तेवढ्याच वेगाने मनातील विचारचक्रही सुरू होते….
“आज घरी फरसाणदेखील नव्हते. नाहीतर डब्यात ते घेऊन आलो असतो आपण..आज तर काहीच आणलं नाही. चहा-बिस्किटवरच दोन वाजेपर्यंत राहावं लागणार कदाचित आज!..” 
नोंदी झाल्या. प्रिंटआऊट काढून प्रत्येक फाइल्स मध्ये तिने त्या ठेवल्या. त्यावर डॉक्टरांच्या सह्या होणे बाकी होते.

तिने आशाच्या टेबलवर सर्व फाईल्स ठेवल्या. एकवार आशाकडे पाहिले. ठेंगणीशी आशा; दिसायला साधारण असली तरी तजेलदार होती. बोलायला अगदी मनमोकळी.
प्राची इथे जॉईन झाली त्याला पंधराच दिवस झालेले. पण त्या दोघींची छान गट्टी जमली होती.
आशाच्या बोलण्यातून तिला समजले की, तिच्या घरी आई, बाबा, दोन भाऊ, ती आणि छोटी बहीण; असा भरगच्च परिवार होता.
तिचे भाऊ रोज अकराच्या सुमारास तिच्याकरता गरमागरम आईने बनवलेला जेवणाचा डबा घेऊन यायचे. 
“दोन वर्षे झालेली तिला इथे काम करून; पण एक दिवसही चुकला नाही की घरून जेवणाचा डबा आला नाही…” मोठ्या मिश्किलीने आणि कौतुकाने ती प्राचीला मोकळ्या मनानं सांगती झाली होती‌.

भडाभडा बोलायची आशा आणि प्राची मूकपणे सगळं ऐकायची. मात्र प्राचीचे बोलके डोळे खूप काही सांगून जायचे.
एकदोनदा तिच्याबद्दल आशाने विचारलेही पण मोजकंच सांगून ती विषय टाळायची. अजूनपर्यंत स्वतःबद्दल खूप काही सांगायचा प्रसंग आला नव्हता‌. निमूटपणे ती आपले काम करायची आणि आपला डबाही आपल्याच डेस्कवर खायची.
कधी एखादं फळ, कधी फरसाण, कधी फोडणीचा भात, कधी एखादी शिळी पोळी आणि भाजी (शिजली तर!), नाहीतर लोणचं…असंच काहीसं डब्यात घेऊन यायची.
आई गेली तेव्हा बाबा रिटायर्ड व्हायचे होते. घराची संपूर्ण जबाबदारी तिने स्वतःकडे घेतली.

इकडे शिक्षणही सुरू होते. पोस्ट ग्रॅज्युएशन झाले होते; सिविल सर्विसेस कडे वळायचा तिचा मानस होता.
आईची खूप इच्छा होती; तिने प्रशासकीय सेवेत रुजू व्हावं.
घरची जबाबदारी आणि अभ्यास; या व्यतिरिक्त तिचे दुसरे विश्वच नव्हते. अल्लड तरुण वयातील साऱ्या अभिलाषा तिने दडवून ठेवल्या होत्या. खूप लहान वयातच ती मनाने पोक्त झाली होती.
आईच्या पुढ्यात उलगडणारे तिचे संवादी भावविश्व, आईच्या निघून जाण्याने शांत स्तब्ध झाले होते.

छोट्या अमोलकडे बघून तिला बरेचदा भडभडून यायचे‌‌. त्याच्या साठी जगण्याची उमेद जागी व्हायची. ती त्याच्याकरता जणू आईच झाली होती. बाबा ऑफिसच्या कामात! त्यामुळे त्याचेही विश्व ताईभोवती फिरायचे आणि ताईच्या मांडीवर डोके ठेवून स्थिरायचे. 
आई आजारी असताना चंदाकाकू भांडीधुणं करायच्या. त्यांना चपात्या करायला आईने सांगून ठेवले होते.
कधी त्या आल्या नाही की कामाचा भार प्राचीवरच यायचा. आई मुकपणे तिच्याकडे बघायची. पण तिचा मजबूत आधार म्हणजे आईचे समोर बसून असणे.
कामं करतानाही तिला समाधान वाटायचं. आईची जवळीक अनुभवता यायची.

तिचे प्रेमाने जवळ घेणे, केसातून हात फिरवणे, तिच्याबरोबर बसून मूव्ही बघणे, तिच्याशी गप्पा मारणे…साऱ्या गोष्टी ती खूप मिस करायची. पदोपदी आई आठवायची.
आई गेल्यावर स्वतःचे मन अभ्यासात एकाग्र करण्याचा ती निग्रहाने प्रयत्न करू लागली. पण पदोपदी आईची आठवण तिला हळवं करून जाई. अजित अकरावीला तर अमोल सातवीला; ती दोघेही आपल्या दैनंदिन रुटीनमध्ये व्यस्त.
बाबांना रिटायर्ड व्हायला वर्ष होते. ते सतत आपल्याच कामात व्यग्र‌. तसाही पूर्वीपासून त्यांच्याशी संवाद कमीच! त्यामुळे ती एकटी पडली होती. आईची उणीव तिला सतत भासे. 

काही दिवस आजी येऊन राहिली. पण जगरहाटी! लहान काकू नोकरीला. त्यामुळे काकाकाकूंच्या मुलांना सांभाळण्याचा प्रश्न निर्माण झाला आणि आजीला परत जायला लागले. साऱ्यांच्या दृष्टीने ती मोठी होती, समर्थ होती सांभाळून घ्यायला!
आईच्या पदराखालचे तिचे लहानपण तिला जेव्हा साद घालायचे तेव्हा मोठेपणाच्या या मुखवट्याखाली ते लहानपण ती थोपवून धरायची आणि आईने पदरात टाकलेले दान समर्थपणे सांभाळायला नव्या दमाने सज्ज व्हायची. 
मन रमवण्याकरता ती क्लासेस घेऊ लागली. तशातच अनुभव म्हणून छोट्या-मोठ्या जॉबकरता मुलाखतीही देऊ लागली. ही नोकरीची संधी चालून आली, तेव्हा ‘घेऊया नवा अनुभव’ म्हणत तिने ती स्वीकारली. सकाळची शिफ्ट मुद्दाम तिने मागून घेतली. कारण सिविल सर्विसेसचा अभ्यास करायला तिला बाकी वेळ मिळायचा.

अमोल बराच समजूतदार झाला होता. आपली स्वतःची कामे तो स्वतःच करायचा. शाळेतून घरी आल्यावर ताईचा सहवास मिळतो, याचीच खुशी त्याला जास्त होती.
पंधरा दिवस होत आले होते, इथे जॉईन होऊन. रोज साडेचारला उठून तिला जमेल तेवढी कामं करून ती लेबाॅरटरी गाठायची. नोकरी करणे बंधनकारक नव्हते तिला पण स्वतःला कामात गुंतवणे तिच्या मनोविश्वाकरता मस्ट होते. त्यामुळे तिने तिचे हे अनुभवविश्व विस्तारले.
आज आशाच्या डब्याची वेळ चुकली होती. त्यामुळे जागेवरून उठून ती प्राचीच्या डेस्कजवळ आली.

” प्राची, खूप भूक लागली गं! अजून डबाही आणला नाही या भावड्याने. तू काय आणलंस डब्यामध्ये..” हे शब्द ऐकताच प्राचीला काय बोलावं सूचेना.
” अगं आशा, आज वेळ झाला ना, त्यामुळे डबाच नाही आणला मी!.”
” का गं? आई उठली नाही वाटतं लवकर, हो ना..”
हे ऐकतांच प्राचीच्या मोठाल्या डोळ्यात अश्रू तरारून आले.
अश्रू बाहेर न येऊ देण्याचे तिचे प्रयत्न विफल ठरले आणि दोन थेंब गालावर उतरलेच.

” आई नाही गं, मला! वर्ष झालं माझ्या आईला जाऊन..” प्राचीच्या तोंडून शब्द बाहेर पडले.
आशाने लगेच खुर्ची ओढली. त्यावर बसत ती म्हणाली,” सॉरी प्राची, मला कल्पना नव्हती; तू कधी साधा उल्लेखही केला नाहीस या गोष्टीचा..”
प्राचीने अश्रू पुसले आणि चेहरा पूर्ववत आणत म्हणाली,”अगं, कधी प्रसंगच आला नाही सांगण्याचा, इट्स ओके! तू वाईट नको वाटून घेऊस‌. चल आपण बाहेर जाऊन काही खाऊया का?..”
आशा मात्र कसल्या तरी विचारात होती. प्राचीने तिला हलवताच ती क्षणभर तिच्याकडे बघतच राहिली.

” अगं नको, येईल एवढ्यातच डबा. आज तू माझ्यासोबत डबा शेअर करायचास; चल..” आणि बळजबरीने ती स्वतःच्या डेस्ककडे प्राचीला घेऊन गेली.
तेवढ्यात डबाही आला. तिने प्राचीला आग्रहाने जेवायला बसवले. पाटवडीची रस्स्याची भाजी होती. प्राचीची फेवरेट! प्राचीची आई खूप रुचकर जेवण बनवायची आणि पाटवडीची भाजी तर आईच्या हातची स्पेशालिटी! प्राचीला तरी अजून तशी पाटवडीची भाजी जमत नव्हती.
तिच्या मनात विचारचक्र सुरू होते. त्या विचारातच प्राचीने भाजी-चपातीचा घास तोंडात टाकला. “अप्रतिम! अगदी आईच्या हातची चव!” बऱ्याच दिवसांनी, ती हे सुख अनुभवत होती. 

आईने लेकीच्या मनातलं ओळखलं होतं. आशाच्या आईच्या रूपात आईनेच तिच्याकरता डबा पाठवला होता. कोणती आई आपल्या लेकराला भुकेलं पाहील?…तिला मनोमन आई आठवली; जेवताना कौतुकानं न्याहाळणारी! तिचा अभिमान बाळगणारी!
दाटलेलं आभाळ मोकळं होत होतं आणि मायेचा हात पाठीवरून फिरत होता‌…
©® वीणा विजय रणदिवे 
सदर कथा लेखिका वीणा विजय रणदिवे  यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी.
कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

2 thoughts on “दाटलेलं आभाळ”

Leave a Comment

error: Content is protected !!