©® सौ. अनला बापट
संध्याकाळी भूमिका फार उद्विग्न होती.. काहीतरी वाईट घडणार आहे असे सारखे तिला वाटतं होते. बेचैनी फार वाढल्यावर ती तिच्या आवडत्या सावळ्याजवळ येऊन बसली आणि मनसोक्त रडली.
गेल्या जवळ-जवळ तीस वर्षापासून तोच तर होता तिला समजून घ्यायला.
तीस वर्षापूर्वी भूमिका कशी होती हे तिच्या त्यावेळच्या मैत्रिणींना विचारा आणि आज कशी आहे ते पाहून तिच्या जुन्या मैत्रिणी फारच आश्चर्य करतात …
हा आलेला बदल फारच नकारात्मक होता पण त्याचेही कारण होते.
अगदी लहानपणापासून प्रत्येक गोष्टीत मग ते शिक्षण असो नाही तर अभ्यासासह इतर सगळ्याच बाबतीत पुढे असणारी भूमिका , अचानक त्या एक दिवसापासून सगळ्यातच मागे राहू लागली, त्या दिवशी घडलेल्या त्या घटनेनंतर कधी मनासारखी जगूच शकली नाही. ती जे ठरवते त्यात विघ्न येतातच आणि तिची ठरवलेली कामे होत नाहीत.
तिला आजही तो दिवस चांगलाच आठवतो आहे.
त्यादिवशी तिच्या आजोबांचा तेराव्वा होता. पण तिचा पाळीचा चौथा दिवस ! तिला तिच्या आईने केस धूवून पूजेत यायला सांगितले. तिने तसे केले पण.
पण पाळीचे न धुतलेले कपडे तिने तेव्हा धुतले नाही कारण आपण पुन्हा अस्पृश्य होऊ ही भीती !
सोळा वर्षांचीच तर होती ती, जास्त समज होती कुठे तिला.
पाळीचे कपडे तसेच गाठोडे केलेले कोपऱ्यात होते, त्यावर तिने अंघोळ करून पुसलेला टॉवेल लांबून फेकला आणि ती पळत गेली आजोबांना म्हणजे तेराव्याकरता पूजेत ठेवलेल्या आजोबांच्या फोटोला नमस्कार करायला.
नमस्कार झाला तसे तिला ब्राह्मणांना वाढायला मामीची मदत कार्याला सांगितले गेले. तिने ते पण केले आणि नंतर सगळ्या लहान मुलांबरोबर तिलापण जेवायला बसायला सांगितले गेले.
ती एकदा आईला म्हणाली सुद्धा,”आई माझे कपडे..?” आईने हळूच तिला समजावले, “जेवण कर मग जा.”
प्रसाद घेऊन जेव्हा ती कपडे धुवायला परत आली तेव्हा पाहते काय तर वरचा टॉवेल थोडासा हलवलेला दिसत होता पण आत मधले तिचे न धुतलेले पाळीचे सगळेच कपडे गायब होते !
तिला वाटले की रक्ताच्या वासामुळे मांजर तर घेऊन गेली नसेल नं , “पण मग ती पुन्हा टॉवेल तासाचा कसा ठेवेल?” हा प्रश्न तिला सतावू लागला.
तिने सर्व दूर खूप शोधले पण काही केल्या नेमकी तेच कपडे सापडेना. ती रडकुंडीला आली.
तिने आईला एकाबाजूला घेऊन सांगितले.
आईने तिला तेव्हा काहीतरी समजवून तेव्हा शांत केले, पण नंतर आईच्या लक्षात आले की कुठे हीचे कपडे कुणी काही वाईट करण्याच्या हेतूने म्हणजे काही करणी वगैरे करण्याच्या हेतूने तर नेले नसतील ना?
तिला तसे वाटायाचे कारण पण होते, कारण आजोबांच्या घरात काही लोक हे सगळे प्रकार खूप मानत होते. पण कुणावरपण संशय घेणे हे चुकीचे ठरले असते म्हणून आईने पण मौनच ठेवले.
आणि बहुतेक आईची काळजी खरी ठरली.
तो दिवस आणि आजचा दिवस ती एकही स्पर्धेत ,शिक्षणात कशातही जिंकली नाही.
मनावर अत्यंत परिणाम होत होता तिच्या कारण जो कोणी तिची पत्रिका पाहायचा, हात पाहायचा ते सर्व हीचा राजयोग आहे असे म्हणायचे आणि हिलातर काहीच मिळत नव्हते.
त्या घटनेनंतर जेव्हा तीन चार वर्ष अशी असफल गेली तेव्हा तिच्या आईने एका तांत्रिकाला विचारले आणि त्याने जे सांगितले त्यावर कोणालाच विश्वास बसेना.
त्याने सांगितले,”तुमच्या मुलीच्या भाग्याला कोणीतरी आपल्या भाग्यासोबत बदलले आहे.”
उपाय विचारल्यावर ते म्हणाले ,”ह्याचा उपाय एक महिन्यात केला गेला असता तरच झाला असता आता काहीही होऊ शकत नाही.”
आई आणि भूमिका निराश होऊन घरी आले आणि कोणी केले असेल हे ह्याचा विचार करू लागले.
अचानक भूमिकाला काहीतरी आठवले, “आई मी अंघोळ करून आल्यावर मोठी मामी आत गेली होती.”
ह्याच बरोबर आईच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.
तिच्या मोठ्या मामीची बहिण, प्रीती, भूमिकाहुन वर्षभर मोठी, पण न अभ्यासात हुशार, न दिसण्यात चांगली.
म्हणून त्यांनी सहा महिन्या पूर्वी तिचे लग्न लावून दिले होते आणि ती आता नवऱ्याशी भांडून घरी परतलेली.
“म्हणजे तिचे भाग्य उजळायला ..मामीने ?” यक्ष प्रश्न होता ज्याचे उत्तर नव्हते. पण आता तिला आपले जीवन एक अभिशाप असल्यासारखे वाटू लागले होते.
सगळेच खरे वाटायला कारण होते, ते म्हणजे ती ढ असलेली तिच्या मामीची बहिण आता फर्स्ट क्लास मध्ये बी एड करून नोकरी करायला लागली होती. तिच्या नवऱ्यालापण सरकारी नोकरी लागली होती. आणि मुख्य म्हणजे त्यांच्यातील विकोपाला गेलेले भांडण अगदीच गोड प्रेमात रूपांतरित झाले होते.
एक वर्षातच त्यांचा नवीन बंगला तयार झाला होता. आणि ही इथे भूमिका दिवसेंदिवस वाळत चालली होती
आईला दुसरे काही सुचत नव्हते.
आईने आपल्या गुरुदेवांचे पाय धरले. तिला मनापासूनचे त्यांच्यावर खूप भरवसा होताच.
आईने गुरुदेवांना पदर पसरून विनंती केली,”गुरुदेवा! जे घडून गेले आहे ते उलट नाही होऊ शकत कळतंय मला . पण माझ्या पोरीने तरी कोणाचे काही वाईट केले नाहीये. तिला त्रास होताना बघवत नाहीये मला , मदत कर देवा हिची. हिला त्रास नको होऊ देऊस.मी पदर पसरते देवा.”
ती सुद्धा रोज ईश्वर चरणी प्रार्थना करत होती, आता तिची तब्येत सुधारत होती पण कामं अजूनही होत नव्हती.
विशेष म्हणजे ती कामे तर अगदीच होत नव्हती ज्यांच्या बद्दल ती कोणासमोर वाच्यता करायची. उदाहरणार्थ तिने ठरवले होते कि कॉलेज झाल्यावर ती मास्टर्स करायला जाणार पण हे तिने आपल्या मैत्रिणींना सांगितले आणि तिच्या मास्टर्स करायला जे ग्रहण लागले ते अजूनही तिला मास्टर्स करता आलेलं नाही .
हळू हळू तीचे कॉलेज पूर्ण व्हायची वेळ झाली, त्यावेळीस तिच्या कॉलेजमधे असणाऱ्या एका मुलाला, विकासला , सैन्यात नोकरी मिळाली. विकासला भूमिका फार आवडायची म्हणून नोकरी मिळताच त्याने तिला मागणी घातली.
तिला पण तो आवडत होता पण आपल्याला काहीतरी अभिशाप आहे हे समजणाऱ्या भूमिकेने आपले मन कठीण ठेऊन कधी त्याच्या समोर आपले प्रेम व्यक्त केले नव्हते.
पण त्याने मागणी घातली आणि ती विरघळली. आई पण तिचा निर्णय ऐकून आनंदली.
बघता बघता दिवस निघत होते. लग्नाचा दिवस जवळ येत होता विकास आता सीमेवर होता आणि पुढच्या आठवड्यात येणार होता.
बरोब्बर पंधरा दिवसाने त्यांचे लग्न होणार होते आणि अचानक एक दिवस त्याच्या ऑफिसातून एक फोन आला. फोनवर बोलणाऱ्या माणसाने, दुर्भग्याने विकास सीमेवर शाहिद झाला म्हणून बातमी दिली.
भूमिका त्याच्या मरणांकरता पण आपल्याला असलेल्या अभिशापाला कारण मानून फार दुखी झाली.
त्यानंतर तिने लग्न करायलाच नकार द्यायला सुरुवात केली कारण तिला भीती होती कि पुन्हा असे काहीतरी झाले तर?
पण घरच्यांचा आग्रह आणि घरात असलेल्या दोन लहान बहिणी , त्यामुळे शेवटी तिला लग्न करावे लागले.
हे लग्न व्हायच्या वेळी पण अनेक विघ्न आली. पण कसेबसे लग्न झाले.
लग्न ज्याच्या सोबत झाले होते तो ज्योतिष, पत्रिका वगैरे खूप मानणारा. त्याने हीची पत्रिका राज योगाची म्हणूनच हो म्हटलेले. परंतु हिच्या ह्या अभिशापामुळे त्याला काहीच फायदा होईना. आणि इथे आपल्याला काहीच फायदा होत नाही पाहून वर्ष दोन वर्षातच त्याचे मन पण हिच्या कडून दुःखी झालेले तिला समजत होते. पण तिला काहीच करता येत नव्हते.
दोन्ही बाळंतपणात मरता मरता वाचलेली ती कुणाची पापे भोगत होती कुणास ठाऊक.
पण गेल्या महिन्यात अचानक तिला तिची कुंडली सापडली. आणि तिने असे अजून किती दिवस जगायचे आहे ह्याचे गणित मांडले.
“बस एक महिना !” ती स्वतःशीच बोलली. कोणालाही हे न सांगायच्या निश्चयासह तिने आपली पत्रिका जाळून टाकली.
तिच्या ज्योतिषीय गणना जर तिने कोणाला सांगितल्या नाहीत तर बऱ्या पैकी खऱ्या पडायच्या हे तिला माहीत होते.
आणि आज बरोबर एक महिना पूर्ण झाला आहे.
ती आता कधीही यमराज दर्शन देणार आणि आपण ह्या असह्य पिडेतून मुक्त होणार ह्या विचारात मग्न बसली होती तेवढ्यात मोबाईलवर आईचा फोन आला,”अग वहिनींची बहिण ती प्रीती वारली, म्हणे तिला आज सकाळी हार्ट अटॅक आला.”
“आई म्हणजे तीच होती ती.” ती जोरात किंचाळली.
“माझ्या पत्रिकेत आज मृत्यूयोग होता ! राजयोगाच्या हव्यासापायी त्यांनी माझे अल्प वय आहे हे बघितलेच नाही बहुतेक किंवा बघून नंतर त्याचे दुसरे काही उपाय करू असा विचार केला असेल पण देवाचा न्याय असतो ना. जर भाग्य घेताय कुणाचे तर सगळेच घ्या असे म्हटले असेल देवाने.”
नेहमी त्या लोकांना शिव्या देणारी आई आज मनातल्या मनात त्यांनी केलेल्या कृत्या मुळे आनंदित होती, कारण तिची मुलगी वाचली होती.
भूमिका तिला हे जीवन नकोसे वाटणारे होते कारण ह्यात तिच्या हुषारकीची किंमत नव्हती, नातेवाईक जवळ करत नव्हते आणि पैसा तर टिकतच नव्हता एवढेच काय पण जीवनाला लागलेला अभिशाप शांतपणाने तिला मरू पण दिला नाही !
भूमिका तिच्या सावल्या जवळ येऊन म्हणाली,”जगणे तर सोड देवा माझ्या मृत्यूवरपण माझा अधिकार नाही?” सावळ्याच्या डोळ्यातली उदासीनता तिच्या लक्षात आली.
©® सौ. अनला बापट
सदर कथा लेखिका सौ. अनला बापट यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी.
कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.