ओंजळ

©® परवीन कौसर
दुपारी नमाज पडून जेवण करून साराबी वामकुक्षी घेण्यासाठी आपल्या खोलीत गेली. ती पलंगावर पहुडणार इतक्यात दारावर टकटक झाली. पटकन आपल्या डोक्यावर ओढणीचा पदर घेऊन साराबीने दार उघडले.
समोर एक तरुण मुलगा उभा होता.
साराबी काही बोलणार इतक्यात त्याने पटकन तिच्या पाया पडल्या.
” अरे बेटा पैर नहीं पडते. कौन हो बेटा तुम?” साराबीने पटकन आपले पाय मागे ओढत त्या तरुणाला विचारले.

” भाभी मां….!!! मला ओळखलं नाही का तुम्ही?” त्याने विचारले.
त्याच्या तोंडून भाभी मां ऐकून साराबीचा चेहरा आनंदाने प्रफुल्लित झाला.
तिने ,” बबलू…!!!” असे म्हणत त्या तरुणाकडे अगदीच कौतुकाने पाहिले.
” हो. भाभी मां.” त्याने मंद हास्य करत उत्तर दिले.
” अरे आत ये असा बाहेर उभा राहुनच बोलणार आहेस का?” असे म्हणत साराबीने त्याचा हात धरून आत आणले.

” बस मी पाणी आणते.” असे म्हणत साराबी किचनमध्ये गेली.
हातात बिस्किटाची प्लेट आणि चिप्स घेऊन साराबी किचनमधून बाहेर आली.
” भाभी मां तुम्हाला अजून आठवतं मला हीच बिस्किटे आवडतात.” असे आश्चर्याने विचारत प्लेटमधील बिस्कीट हातात घेत बबलू म्हणाला.
” अरे बाळा आई कधी आपल्या लेकरांच्या आवडीनिवडी विसरते का.” असे म्हणत साराबीने आपल्या पाणावलेल्या डोळ्यांनी बबलूकडे पाहिले.

” अरे पण मला हे सांग तू इतकी वर्षे कुणीकडे होतास.आणि आज अचानक इकडे कसा काय?” साराबीने विचारले.
” सगळे सांगतो तुम्ही बसा इथे .” असे म्हणत बबलूने बोलण्यास सुरुवात केली.
” तुम्हाला आठवतंय न तो दिवस जेव्हा मी पहिल्यांदा तुमच्या समोर आलो होतो.”
” अरे तो दिवस कसा विसरेन मी. नुकतेच लग्न करून आलेली नवी नवरी होती मी तेव्हा. त्यादिवशी शुक्रवार होता आणि माझी पहिली रसोई. मी खीर करत होती.
ड्रायफ्रुट्सचे तुकडे करत असताना समोर एक छोटेसे गोंडस पिल्लू येऊन उभारले होते.

त्याला मी विचारले नाव काय तुझे बाळा तर त्याने हळूच म्हटले बबलू. त्याच्या हातात काजू मनुका दिल्या होत्या मी तर तो इतका खुश झाला होता की नाचत नाचत बाहेर पडला.
नंतर मला कळले की हा आमच्या घरी काम करणाऱ्या मावशीचा मुलगा आहे. आज तोच बबलू इतका मोठा झाला आहे विश्वास बसत नाही माझा यावर.” असे म्हणत साराबीने बबलूच्य डोक्यावर हात फिरवला.
” भाभी मां मला याही पेक्षा तो दिवस खूप आठवतो. जेव्हा आईने माझ्या शाळेच्या फीचे पैसे घरात जमा करून ठेवले होते ते पैसे माझ्या वडिलांनी चोरुन दारू मध्ये उडवले होते. फी भरली नाही म्हणून मला शाळेतून काढून टाकले होते.

तेव्हा मी रडत रडत घरी आलो होतो. आईने सगळा वृत्तांत तुम्हाला सांगितला होता.
सगळे ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आले होते.
तेव्हा तुम्ही तुम्हाला मिळालेली मुंह दिखाई ची सगळी रक्कम आईकडे देऊन माझी फी भरली. जर तुम्ही तेव्हा माझी फी भरली नसती तर आज मी शिकलो नसतो. आज मी जे काही आहे ते तुमच्या मुळे. त्या दिवसापासून मी तुम्हाला भाभी मां म्हणू लागलो होतो.माझे सगळे लाड तुम्ही पुरवले होते.” बबलू म्हणाला.
” हो रे.तू होतासच अगदी लाडका माझा छोटासा बबलू.” साराबीच्या चेहऱ्यावर मातृत्व ओसंडून वाहत होते.

” त्यानंतर रोज शाळेतून घरी आल्यावर आई मला तुमच्याकडे शिकवणीसाठी पाठवायची.” बबलू म्हणाला.
” अरे पण नंतर तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला दारूच्या आहारी जाऊन त्यानंतर तुझ्या मामाने तुम्हा मायलेकरांना आपल्या गावी नेले.तेव्हा पासून आजपर्यंत तुमची काही खबरबात नव्हती.” साराबी म्हणाली.
” हो आम्ही गावी गेलो. मामी काही दिवस आमच्या बरोबर चांगली वागली पण नंतर तिने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. मामा कामाला गेला की मला आणि आईला टोचून बोलायची उपाशी ठेवायची. कधी कधी मला मारायची पण.
शेवटी कंटाळून आईने मामाचे घर सोडले. जवळच्या एका गावात जाऊन आई मोलमजुरी करु लागली.मी पण तिथेच एका शाळेत प्रवेश घेतला.

तुमचे बोलणे आठवत होते काहीही होऊ दे शिक्षण सोडायचे नाही. शिकेल तोच टिकेल हे तुमचे ब्रीदवाक्य माझ्या मनात कोरले गेले होते. मी दहावी पास झालो मला मार्क चांगले मिळाले म्हणून शहरात नामवंत कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला.
स्काॅलरशीपचे पैसे मिळत गेले आणि मी माझे शिक्षण पूर्ण केले.आज मला मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर नोकरी मिळाली आहे.
मी मनात ठरवले होते जेव्हा मी मोठ्या हुद्द्यावर नोकरी करणार तेव्हा जाऊन भाभी मां चा आशीर्वाद घेणार. आणि आज तो दिवस उजाडला. मला माझ्या भाभी मां चा आशीर्वाद मिळाला.

त्यादिवशी जर तुम्ही तुमची प्रेमाची मायेची ओंजळ पुढे केली नसती तर कदाचित मी आज स्वतः च्या पायावर उभा राहिलो नसतो.” असे म्हणत बबलूने हातात असलेल्या पेढ्याच्या बॉक्स मधून पेढा काढून साराबीचा हातात दिला.
साराबीने पेढा डोळ्याला लावून बिस्मिल्लाह म्हणत पेढा खाल्ला.
” भाभी मां भैय्या कुणीकडे आहेत ?” बबलू ने विचारले.
हे ऐकताच साराबीच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तिने पटकन आपल्या ओढणीचा पदर डोळ्याला लावला.हे पाहून बबलू काय समजायचे ते समजून गेला.

” तुम्ही इथून गेलात तेव्हा मला मी आई होणार याची चाहूल लागली. घरात सर्व जण खूप आनंदी झाले होते. तुझे भैय्या तर रोज एक नवीन खेळणे घरात आणत होते. घरात रोज एकच चर्चा बाळ आले की त्याचे नाव काय ठेवायचे. त्याला कोण फिरायला नेणार कोण आंघोळ घालणार कोण खाऊ देणार. या सगळ्यात दिवस कसा जायचा हेच कळायचे नाही.
आता घरात डोहाळे जेवण करायचे ठरले. सर्व नातेवाईकांना आमंत्रण दिले.
डोहाळे जेवणासाठी घर सुंदर सजवले. आईंनी मला नवीन दागिने घडवून आणले होते. हिरव्या साडीवर नवीन दागिने घातल्यानंतर आईंनी माझी दृष्ट काढली होती.

संध्याकाळी डोहाळे जेवण होते. त्यादिवशी तुझ्या भैय्यांना एक अर्जंट मिटिंग साठी आॅफिस मध्ये बोलावून घेतले. लवकर मिटिंग संपवून घरी येतो असे सांगून ते आॅफिसला गेले.
अंगणात सुंदरसा मांडव घातला होता. नातेवाईक मित्रमंडळी कार्यक्रमासाठी आले होते. हे आले नाही म्हणून यांना आईंनी फोन केला तर निघतो थोड्या वेळाने असे म्हणत त्यांनी फोन ठेवला.
त्यांची मिटिंग संपली आणि ते घरी येण्यास निघाले. घराच्या अर्ध्या वाटेवर असताना अचानक जोरात विजा चमकू लागल्या आणि वादळासम जोराची हवा सुटली. हवेचा वेग कमी होत नव्हता. इतक्यात जोराचा वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला.

यांना रस्त्यावर समोरचे काही दिसतच नव्हते. गाडीच्या काचेवर पावसाच्या धारा पडत होत्या. जीवघेणा वादळी वाऱ्यासह पाऊस पडत होता. इतक्यात जोराच्या हवेमुळे रस्त्याच्या कडेला असलेले मोठे झाड तुटून यांच्या कारवर पडले आणि यांचा गाडीवरील ताबा सुटला तसे यांची गाडी समोरच्या दुसऱ्या मोठ्या झाडावर जाऊन धडकली आणि तिथेच हे अल्लाह ला प्यारे झाले…!!!” असे म्हणत साराबी रडू लागली.
बबलू पण तिच्या बरोबर रडू लागला.
” भाभीमां केवढे मोठे आभाळ कोसळेल तुमच्या वर.” बबलू म्हणाला.

हे ऐकून साराबी म्हणाली,” इतक्यावरच माझे दुःख संपले नव्हते बबलू. जेव्हा ही बातमी आम्हाला समजली तेव्हा मी वेड्यासारखी धावत सुटले आणि एका दगडाला ठेच लागून खाली पडले. तिथे माझी शुद्ध हरपली जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मला कळाले की…माझे बाळ पण त्याच्या अब्बुंजवळ निघून गेले.
माझ्या या भरलेल्या ओंजळीत होत नव्हते ते सगळेच निसटून गेले आणि माझी ओंजळ रिकामी झाली रे बबलू रिकामी झाली.” असे म्हणत साराबी रडू लागली.
बबलूने साराबीचे डोळे पुसले तिचे हात आपल्या हातात घेऊन म्हटले,” नाही भाभीमां या ओंजळीतून तुम्ही मला जे काही दिले ते मला भरभरुन दिले आहे. ही ओंजळ कधीच रिकामी होणार नाही.

मी तुमचाच मुलगा आहे भलेही माझी जन्मदात्री आई आहे पण मी तुम्हाला भाभीमां म्हणतोय अगदीं लहानपणापासून. आजपासून तुम्ही माझ्या अम्मी आहात. मी तुम्हाला आमच्या नाही आपल्या घरी घेऊन जाणार भलेही ते घर छोटे आहे पण ते माझ्या भाभीमां चे आहे.ज्या ओंजळीतून तुम्ही मला सावरले आज तीच ओंजळ मला पुन्हा एकदा माझी अम्मी म्हणून हवीये.”
हे ऐकून साराबीने बबलूकडे पाहिले आणि आपले हात उंचावून अल्लाह जवळ दुआ मागत अल्लाह चे आभार मानले.
समाप्त
©® परवीन कौसर

सदर कथा लेखिका परवीन कौसर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी.
कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!