फिटे अंधाराचे जाळे

©® स्मिता दिनेश मुंगळे
नीताला हॉलवर पोहोचायला थोडा उशीरच झाला. ऑफिसमधून कितीही लवकर निघायचे ठरवले तरी ऐनवेळी काम निघालेच.
गेले चार दिवस ती इथे व्याख्यान ऐकायला येत होती. खरेतर व्याख्यान, प्रवचन,आध्यात्म या अशा गोष्टी तिच्या मनाला फारशा पटत नसत, कारण तो तिचा स्वभाव नव्हता.
ती मुळातच अतिशय प्रॅक्टिकल स्वभावाची होती.  पण हल्ली तिची होणारी चिडचिड, मन अस्वस्थ होणं, उगाचच निराश वाटणं यासारख्या अनेक किरकोळ तक्रारींमुळे ती हैराण झाली होती.
वेगवेगळे डॉक्टर, सगळ्या तपासण्या आणि त्यातून काहीच न झालेलं निदान यामुळे तिला आपल्या तक्रारी या शारीरिक आहेत की मानसिक हेच कळेनासे झाले होते.

घरातील मंडळी देखील तिच्या या रोजच्या रडगाण्याला कंटाळली होती. तिला होणारा त्रास दिसत नव्हता अन कमी देखील होत नव्हता. कितीतरी डॉक्टर, अनेक पॅथी झाल्या पण तिचा त्रास काही कमी होत नव्हता.
एके दिवशी तिची ऑफिसमधील मैत्रीण रूपा तिला म्हणाली, “नीता, अग आपल्या ऑफिस पासून जवळच उद्यापासून पाच दिवस एक व्याख्यानमाला आहे.रोज नवीन विषय असणार आहेत आणि सगळेच विषय खरचं छान आहेत.
मला माहिती आहे तुला हे आवडणार नाही पण एक दिवस ऐकून बघायला काय हरकत आहे? आवडले तर पुन्हा जा आणि नाही आवडले तर तुला जबरदस्ती थोडीच आहे जाण्याची. मी रोज जाणार आहे, बघ येतेस का? मी दरवर्षी न चुकता ही व्याख्यानमाला ऐकत असते.”

नेहमी अशा ठिकाणी न जाण्यासाठी हजार कारणं देणारी नीता यावेळी मात्र व्याख्यान ऐकायला जाण्यासाठी लगेचच तयार झाली. रुपाला देखील हा आश्चर्याचा धक्काच होता
.”पाच दिवस मला घरी यायला उशीर होईल ह”….तिने घरात जाहीर करून टाकले.
“अरे व्वा,नक्की जा तू.आणि स्वामीजी काय सांगतात ते घरी आल्यावर आम्हालाही सांग.”….घरातून तिच्या जाण्यावर कोणताच आक्षेप नव्हता.
उलट काही चांगल्या गोष्टी ऐकून तिची चिडचिड कमी होईल या विचाराने घरची मंडळी खुश झाली.

पहिल्या दिवशी ती उत्सुकतेने थोडी लवकरच मैत्रिणीसह हॉलवर पोहोचली. हॉलवर सर्व वयोगटातील श्रोत्यांनी गर्दी केली होती. दारातच व्याख्यानाच्या रोजच्या विषयांची यादी लिहिलेली होती.
सहजच तिने ती वाचली आणि उगाच तिला वाटून गेले की सध्या आपण ज्या समस्यांमुळे हैराण आहोत,ज्या प्रश्नांची उत्तरे शोधायचा आपला प्रयत्न चालू आहे पण उत्तरे सापडत नाहीत आणि ज्यामुळे आपले मन निराश,अस्वस्थ होते या सगळ्याची उत्तरे कदाचित या व्याख्यानाच्या विषयांमधून मिळू शकतील.
ठरलेल्या वेळी स्वामीजी स्टेजवर आले.
त्यांच्या आगमनानेच वातावरण प्रसन्न झाले.

त्यांचा तेजःपुंज चेहरा, चेहऱ्यावरील प्रसन्न, शांत भाव यामुळे श्रोते भारावून गेले. प्रास्ताविक,दीपप्रज्वलन इत्यादी सोपस्कार झाल्यानंतर आयोजकांनी स्वामीजींची ओळख करून देण्यास सुरुवात केली.
नीता स्तब्ध होवून ऐकत राहिली…स्वामीजींची साधना,त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील काम आणि त्यांनी घातलेला आध्यात्म आणि विज्ञान यांचा मेळ.
आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेकांना कितीतरी चिंता भेडसावत असताना सर्वसामान्य लोकांचे जीवन सुखी आणि आनंदी करण्यासाठी मदत करण्याचा जणू वसा स्वामीजींनी घेतला होता.

बरे झाले आपल्याला मैत्रिणीने या व्याख्यानमालेविषयी आपल्याला सांगितले, नाहीतर स्वामीजींचे इतके सुंदर विचार ऐकण्यापासून आपण वंचित राहिलो असतो असा विचार तिच्या मनात येऊन गेला.
सगळेजण ज्याची वाट पहात होते ते स्वामीजींचे मुख्य व्याख्यान सुरू झाले. आपल्या ओघवत्या वाणीत,काहीशा मिश्किल पद्धतीने अवघड विषय सोपा करून सांगण्याची स्वामीजींची हातोटी वाखाणण्यासारखी होती.
शब्दांवर त्यांचे प्रभुत्व होते. फक्त मराठीतच नाही तर मधून मधून इंग्रजी वाक्य वापरत ते तरुण पिढीलाही  आपल्या बोलण्यात गुंतवून ठेवत होते.
देशविदेशात त्यांची अनेक व्याख्याने होत असत.

 आजचा विषय होता देखील सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा……”आनंदाचा शोध”.
ज्याच्या शोधात आपण सर्वजण आहेत तो आनंद म्हंटले तर छोट्या छोट्या गोष्टीत पण तरीही या धावपळीच्या  जीवनात आपल्यापासून लांब जात असल्यासारखा. आधुनिकीकरण,यांत्रिकीकरण या सगळ्यात माणूस माणसापासून लांब जात असल्यासारखे वाटत असताना आणि मुबलक पैसा, भौतिक सुख पायाशी लोळण घेत असताना आनंद मात्र म्हणावा तसा मिळत नाहीये ही आजची शोकांतिकाच म्हणावी लागेल.
पण ‘आनंद बाहेर नाहीये तर तो आपल्या आतच आहे’ नव्हे ‘आपणच आनंद आहोत’ हे उदाहरणांसह स्वामीजींनी सहज, सुंदर, रसाळ वाणीने पटवून दिले आणि श्रोत्यांची मने जिंकून घेतली.

दीड तास संपूर्ण सभागृह स्वामीजींची अमृतवाणी मन लावून ऐकत होते. व्याख्यान संपल्यानंतर भारावलेल्या अवस्थेत सगळेजण कितीतरी वेळ टाळ्यांचा कडकडाट करत राहिले. नीताला तर स्वामीजींचे बोलणे संपूच नये असे वाटत होते.
व्याख्यान संपल्यावर घरी जाताना नीताच्या मनात स्वामीजींचे शब्द घर करून बसले होते.
तिला वाटले…खरचं, म्हंटले तर किती सोपे आहे आनंदी राहणे पण तरी आपल्याला ते जमत नाही. खरचं का स्वामीजी म्हणतात तसे….”द्वेष,मत्सर आणि अहंकार सोडला तर सगळा आनंदच आहे.”
मग का आपण या गोष्टी धरून ठेवतो. सगळे कळतेय पण वळत नाही हाच प्रॉब्लेम आहे.
पुढचा पूर्ण दिवस ती याच विचारात होती.

दुपारी लंचब्रेकमध्ये तिने स्वतःहून रुपाला ती संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर व्याख्यानाला येणार असल्याचे सांगितले.
रुपाला हा आश्चर्याचा धक्काच होता. ती फक्त हसली. लवकर काम आटोपून नीता धावतपळत अगदी वेळेत हॉलवर पोहोचली.
आत जाताना तिने दारातल्या बोर्डवर सहज नजर टाकली आणि आजच्या व्याख्यानाचा विषय पाहिला…..’पुनर्जन्म’…. आणि आज स्वामीजी या विषयावर काय बोलणार याची तिला उत्सुकता वाटली.
आजही स्वामीजी वेळेवर मंचावर आले आणि आपल्या प्रसन्न हास्याने त्यांनी त्या खचाखच भरलेल्या सभागृहातील श्रोत्यांना आपलेसे केले.

त्यानंतर सलग दीड तास सगळेजण भारावल्याप्रमाणे ऐकत राहिले. स्वामीजींचे बोलणे संपूच नये असेच प्रत्येकाला नक्की वाटत असणार. हल्ली नीताच्या मनात येणारे प्रश्न……आपण सगळ्यांसाठी एवढं करूनही कोणालाच त्याची जाणीव का नसते? आपण केलेल्या कामाचे क्रेडिट दुसरेच कोणी कसे काय घेऊ शकतो? सगळ्यांशी चांगलं वागूनही लोकं आपल्याला त्रास होईल असे का वागत असतील?
कितीही केलं तरी एखाद्या गोष्टींमुळे आपण वाईट कसे काय ठरतो?…..अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं नीताला आज व्याख्यानातून आपसूक मिळत गेली. कितीतरी आध्यात्मिक वाटणाऱ्या गोष्टीची विज्ञानाशी सांगड घालत स्वामीजी प्रत्येक मुद्दा समजावून सांगत होते.

व्याख्यान संपल्यावर नीता समाधानाने घरी गेली.गेले दोन दिवस तिचा बदललेला मूड घरच्या मंडळींच्या लक्षात आला होता. बऱ्याच दिवसांपासून काहीतरी हरवले होते ते या दोन दिवसात तिला सापडायला सुरुवात झाली होती.
म्हणूनच की काय तिने उरलेले तीन दिवसही व्याख्यान चुकवायचे नाही असे मनाशी पक्के ठरवून टाकले.
त्यानंतर रोजच्या जगण्याशी निगडित असेच सोपे वाटणारे पण क्लिष्ट असे विषय स्वामीजींनी  आपल्या ओघवत्या भाषेत सहज उलगडून दाखविले. स्वामीजींनी सांगितलेले प्रत्येक वाक्य ह्रदयात जपून ठेवावे असे.
सगळे श्रोते तल्लीन होऊन स्वामीजींची अमृतवाणी ऐकून तृप्त होऊनच घरी जात असत.

आज व्याख्यानाचा शेवटचा दिवस.व्याख्यान संपल्यावर तिला स्वामीजींना भेटायचे होते. म्हणून खरेतर तिला लवकर येऊन पुढच्या रांगेत बसायचे होते पण ऑफिसमधून निघायलाच उशीर झाला.
आज स्वामीजी समारोप करताना खूप काही सांगत होते.
त्यांच्या बोलण्यात गेल्या चार दिवसातील विषयांचा परामर्श तर होताच शिवाय व्यवहारचातुर्य, देवाचा शोध असे अनेक विषय होते. स्वतःला कसे ओळखावे हे स्वामीजींनी खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितले.
रोजच्या जगण्यातील विषय,मिश्किल पद्धतीने विषयाची मांडणी,उदाहरणांसह विषय पटवून देण्याची त्यांची पद्धत यामुळे नीताला स्वामीजींचे बोलणे खूप भावले. मुख्य म्हणजे त्यांची अध्यात्माला दिलेली विज्ञानाची जोड लाजवाब होती.म्हणूनच की काय स्वामीजींचे बोलणे संपूच नये असे वाटे.

व्याख्यान संपले आणि संपूर्ण सभागृहाने उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. भारावलेपण म्हणजे काय हेच जणू नीताने अनुभवले. “कोणाला स्वामीजींना भेटून काही विचारायचे असल्यास रांगेत येऊन विचारु शकता”…असे संयोजकांनी जाहीर केले तसे नीता भानावर आली आणि गडबडीने रांगेत उभी राहिली.
आज तिला घरी जाण्याची गडबड नव्हती ना घड्याळाकडे तिचे लक्ष होते.
उद्यापासून ही बौद्धिक व वैचारिक मेजवानी ऐकता येणार नाही याचे तिला वाईट वाटत होते.
बऱ्याच लोकांनी स्वामीजींना काहीबाही प्रश्न विचारले.

स्वामीजी त्याच्या शंकाचे निरसन करून प्रश्नांची उत्तरे देत होते. शेवटी निताचा नंबर आला. ती स्वामीजींचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या पायावर झुकली आणि तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातील अश्रूंनी स्वामीजींच्या चरणकमलावर अभिषेक केला.
स्वामीजींचे आशीर्वाद घेताना… “काही विचारायचे आहे का?” या स्वामीजींच्या प्रश्नावर तिने मानेनेच नाही असे सांगितले.          स्वामीजींचा आशीर्वाद घेऊन बाजूला होताना तिला वाटले, आणखी काय विचारणार त्यांना?
गेले कित्येक दिवस भेडसावणाऱ्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे त्यांनी देऊन टाकली आहेत.
खरचं देव आहे का आणि जर तो असलाच तर तो आहे हे कसे ओळखायचे? पुनर्जन्म नक्की असतो का? आपण केलेले कर्म पुन्हा आपल्याकडे सव्याज परत येते असे म्हणतात ते यात कितपत तथ्य आहे? ….अश्या कित्येक प्रश्नांनी अस्वस्थ असणारे मन आता त्या प्रश्नांच्या मिळालेल्या योग्य उत्तराने शांत झाले होते.

घरी जाताना तिची अस्वस्थता, चिडचिड, निराशा कुठल्या कुठे पळून गेली होती.
आता मनाला “मीच का?” हा प्रश्न पडणार नव्हता आणि बाकी गोष्टीदेखील छळत राहणार नव्हत्या.
मागे तिला तिचे  आजोबा कधीतरी म्हणाले होते….”आध्यात्म ही मध्यातूनच करण्याची गोष्ट आहे. त्यासाठी म्हातारपण येण्याची वाट बघायची नसते ” याची आठवण येऊन तिला आजही हसू आले.
आज तिच्या मनातील अंधार दूर झाला होता आणि आता अध्यात्म आणि विज्ञान यांचा स्वच्छ, सुंदर प्रकाश तिचे अवघे आयुष्य व्यापून राहणार होता.
©® स्मिता दिनेश मुंगळे
 
सदर कथा लेखिका स्मिता दिनेश मुंगळे  यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी.
कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!