पितृप्रेम

©® सौ.हेमा पाटील
धाड धाड धडाम धाड..रेल्वेची चाके रुळांवरून जाताना जो आवाज होत होता त्याकडे तिचे सारखे लक्ष वेधले जात होते.
मन जेव्हा कातर होते, तेव्हा अशावेळी ते मन इकडेतिकडे सैरावैरा पळत असते. त्यामुळे मनाच्या आतील विचारांच्या दाटलेल्या गोंगाटापेक्षा तिचे मन रेल्वेच्या चाकांच्या आवाजाकडे सारखे जात होते.
रेखाच्या वडीलांना हृदयविकाराचा झटका आलाय आणि त्यांना हाॅस्पिटलमध्ये अॅडमीट केले आहे.
ते आय.सी.यु. मध्ये आहेत असा संध्याकाळी फोन आला आणि चित्त थाऱ्यावर नसल्याने तिने मला गाडीला बसवून द्या, माझी मी जाते असा घोशा लावला.
अचानक आईवडीलांना कुठे सोडायचे हा प्रश्न असल्याने विनीत ने इथेच थांबायचे अन् आईवडिलांकडे पहायचे असे ठरवले.

त्यामुळे रेल्वेत जागा मिळाली अगर नाही तरीही जाणे गरजेचे असल्याने विनीत ने तिला नागपूरला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसवून दिले. गाडी बऱ्यापैकी रिकामीच होती, त्यामुळे तिला जागा मिळाली हे पाहून विनीतला बरे वाटले.
गाडी सुटली पण तिचे विचारचक्र काही थांबायचे नाव घेईना. ती मनाने कधीच आपल्या बाबांजवळ पोहोचली होती.
रात्र चढती होती,रात्रीचे बारा वाजून गेले होते. रायगाव स्टेशन आल्यावर गाडी थांबली म्हणून ती बाहेर डोकावली. चहा घ्यावा म्हणजे डोके दुखायचे थांबेल आणि मनाची अस्वस्थताही जरा कमी होईल असा विचार करून ती खाली उतरली.
समोरच चहाचा स्टॉल होता.

पटकन चहा घ्यायचा आणि गाडीत बसून प्यायचा असा विचार करून ती उतरली होती. दहाची नोट देऊन चहाचा कप हातात घेऊन ती वळली, पण तेवढ्यात आपली ट्रेन सुरु झाल्याचे तिला दिसले.
हातातील चहाचा कप तिथेच टाकून ती धावतच ट्रेनकडे आली. पण अचानक धावायला सुरुवात केल्याने धावताना साडीच्या निऱ्या तिच्या पायात आल्या आणि ती कोलमडली. जागेवरच पडल्याने तिला लागले नाही, पण उठून गाडीकडे जाईपर्यंत गाडीने चांगलाच वेग घेतला होता.
गाडी प्लॅटफॉर्मवर असूनही तिला गाडीत चढता आले नाही.आयुष्यात पहिल्यांदा तिला प्रवासात आपल्या साडी नेसण्याचा राग आला.

हताशपणे गाडी पुढे जाताना ती पहात होती. तिचा मोबाईल पर्समध्ये होता व पर्स गाडीतच होती. हातात फक्त पैशांचे छोटे पाकीट घेऊन ती उतरली होती.
एवढ्या रात्री स्टेशनवर कुणी चिटपाखरूही दिसत नव्हते. तो मगाचा चहाचा स्टॉल मात्र सुरु होता. तिने परत तिथे येऊन चहा घेतला. चहा पिल्यावर तिला जरासे बरे वाटले.
आता तिने सभोवताली नजर फिरवली,तर स्टेशनवर कुणीही दिसत नव्हते. हे छोटेसे गाव होते,पण इथे ट्रेन थांबत असे. तिने चहावाल्याकडे नागपूरला जाणाऱ्या गाडीची चौकशी केली.
पण आता सकाळशिवाय गाडी नाही असे त्याने सांगितले.

आता रेल्वेच्या विश्रामगृहात जाऊन बसावे असे तिने ठरवले व ते कुठे आहे हे विचारुन त्यादिशेने ती चालू लागली….
विश्रामगृहाचे दार उघडेच होते. ती आत डोकावली, पण आत कुणीच नव्हते. कुणीच नाही हे पाहून तिला जरा बरे वाटले.
कारण परक्या ठिकाणी अनोळखी पुरुष जर असते तर तिला तिथे बसताना संकोच वाटला असता. तसेच भितीही वाटली असती.
पण कुणीच नाही हे पाहूनही तिला जरा भीतीच वाटली. पण दुसरा इलाजच नसल्याने ती आत बाकड्यावर येऊन बसली.
घड्याळात पाहिले तर दीड वाजला होता.
हातात मोबाईल ही नसल्याने काय करायचे हा मोठाच प्रश्न पडला.

पण शांत बसल्यावर बाबांची आठवण प्रकर्षाने झाली अन् ती आपल्या बालपणीपासूनच्या आठवणींत बुडून गेली. तेवढ्यात काहीतरी हालचाल जाणवली म्हणून तिने वर पाहिले तर एक अतिशय सुंदर ललना विश्रामगृहात आली होती.
तिच्यासोबत आणखी कुणी आहे का म्हणून रेखाने पाहिले पण कुणीच आत शिरले नाही. कुठलीही ट्रेन स्टेशनवर आली नव्हती याचा अर्थ ती इथून जवळपासच्या गावातून आली होती.
तिने आपली बॅग शेजारच्या बाकड्यावर ठेवली व ती तिथेच बसली. कुणीतरी सोबतीला आले म्हणून रेखाला हायसे वाटले.
तिच्याकडे पाहून रेखाने स्मित केले पण तिच्या चेहऱ्यावरच्या रेषा हलल्या नाहीत हे पाहून रेखाला कसेतरीच झाले.

काही माणसे अगदी शिष्ट असतात.इतरांशी बोलायचे म्हणजे त्यांना कमीपणा वाटतो असा विचार करून रेखा शांत बसली.
बसल्या बसल्या रेखाच्या डोळ्यावर पेंग आला. तिला नकळत डुलकी लागली. रोज सकाळपासून धावपळ सुरुच असायची, आणि बाबांच्या तब्येतीबाबत ऐकून तर तिच्या काळजाने ठावच सोडला होता.
पण शरीर आहे,ते दमतेच.. त्यामुळे तिची झोप लागली होती..
अचानक कसला तरी जोरात आवाज झाला अन् रेखाची झोपमोड झाली. जागे झाल्यावर क्षणभर तिला समजेना की आपण कुठे आहोत..मग तिला आठवले की ती नागपूरला निघालीय…

शेजारी बसलेल्या ललनेकडे तिने कटाक्ष टाकला पण ती खाली मान घालून बसली होती की झोपली होती काहीच समजायला मार्ग नव्हता. आवाज कसला झाला हे पाहण्यासाठी तिने संपूर्ण विश्रामगृहावरुन नजर फिरवली पण आत या दोघींव्यतिरिक्त इतर कुणीही नव्हते. एवढ्यात काहीतरी हालचाल जाणवली म्हणून तिने तिकडे नजर वळवली तर त्या ललनेची बॅग चक्क पुढे सरकत होती.
ही बॅग आपोआप कशी सरकतेय याचे रेखाला नवल वाटले आणि त्याचवेळी त्या ललनेने आपली खाली घातलेली मान वर उचलली व रेखाकडे पाहिले.
ती थंडगार नजर पाहून रेखा जागेवरच थिजल्यासारखी झाली. सुंदर लोभसवाणी रुपगर्विता भासणारी तरुणी अचानक अशी विद्रूप अन् भीतीदायक का दिसायला लागली आहे हे तिला समजेना.

तिच्या मनावर भितीचा एक अपारदर्शक पडदा पसरला अन् त्या पडद्याआडून ती समोर काय घडतेय ते पाहू लागली.
इतक्यात समोरच्या भिंतीजवळ असलेल्या बाकड्याखाली काहीतरी हालचाल जाणवली म्हणून रेखाचे तिकडे लक्ष गेले तर बाहुलीसारखी एक फूट उंची असलेली माणसाचीच प्रतिकृती असावी अशा चार बाहुल्या तिथून आपल्या पायांनी चालत डोळे फिरवत बाहेर पडल्या.
ते पाहून रेखाला तात्या विंचू आठवला. पण तो तर सिनेमा होता,तिथले सगळे पडद्यावरचे खोटे होते, पण इथे ती प्रत्यक्षात समोर पहात होती. तरीही विश्वास ठेवणे तिला जड जात होते. फेंगडे चालत त्या चार आकृत्या मधल्या मोकळ्या जागेत आल्या व त्या ललनेकडे पहात काहीतरी अगम्य भाषेत बोलल्या.

त्या ललनेनेही त्याच कुठल्यातरी भाषेत त्यांना काहीतरी सांगितले. त्यापैकी दोन आकृत्या तशाच फेंगड्या चालत बाहेर पडल्या. मनात प्रचंड भिती वाटत असतानाही त्या दोन आकृत्या कुठे गेलेत अशी उत्सुकता रेखाला वाटत होती.
आत असलेल्या दोन आकृत्यां नी तोपर्यंत त्या ललनेची बॅग उघडली होती.
सगळे रेखाच्या नजरेसमोरच घडत होते. पण अजूनतरी ती तेथे आहे याची दखल त्या आकृत्यांनी घेतली नव्हती.
बॅग उघडून काय चालले आहे हे त्या स्थितीतही रेखाला पहायचे होते,पण बॅगचे तोंड विरुद्ध दिशेला होते.
काही वेळाने त्यांनी बॅगेतील एकेक वस्तू बाहेर काढून ठेवायला सुरुवात केली.
त्या वस्तू पाहून रेखा हादरली.

दोन हाडे काढून त्यांनी गुणिले चिन्ह तयार होईल अशी एकमेकांवर ठेवली. मग आतून एका पिशवीत असलेल्या कवड्या काढल्या व काहीतरी उच्चारत त्या हाडांच्या तयार झालेल्या गुणिले भागांच्या चारही कप्प्यात ठेवल्या.
त्यानंतर आतून एक मानवी कवटी काढली व त्या गुणिले चिन्हाच्या बरोबर मधल्या भागावर ठेवली. मग आतून महिलेच्या केसांचा विग काढला व तो हातात धरुन पहिल्यांदाच रेखाकडे मान वळवून पाहिले व आपले दात दाखवत दोन्ही आकृत्या विकटपणे हसल्या. त्यांच्या हसण्याच्या आवाजाने रेखाच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला.
तिच्याकडे पहात काहीतरी उच्चारत त्यांनी तो विग त्या मानवी कवटी वर ठेवला.

एवढ्यात बाहेर गेलेल्या दोन आकृत्या तशाच फेंगड्या चालत आत आल्या व त्या ललनेच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या. त्यांच्या हातात काहीतरी होते. ते त्यांनी ललनेच्या हातात दिले.
तिच्या हातात दिल्यावर रेखाला समजले की ते नोटांचे बंडल आहे..
ते पैसे आपल्या बॅगमध्ये टाकून ती ललना आता खाली बसायला बसकर टाकून त्यावर बसली व तिने बॅगेतून उरलेले सामान काढायला सुरुवात केली.
हळद,कुंकू,गुलाल,अंडी, तांदूळ,सुया,लिंबू,काळ्या कापडी बाहुल्या..आणि अजून काही जे रेखाने आयुष्यात कधीच पाहिले नव्हते…

रात्रीचे अडीच वाजले होते. तो सगळा प्रकार पाहून इथून उठून बाहेर प्लॅटफॉर्मवर जाऊन बसावे असा विचार रेखाच्या मनात आला म्हणून ती उठली, पण तेवढ्यात त्या ललनेने तिच्याकडे पाहिले व खाली बस अशी आॅर्डर दिली.
उठलेली रेखा घाबरुन परत खाली बसली. ते पाहून त्या चार आकृत्या दात विचकत भेसूरपणे हसल्या.
रेखाच्या डोक्यात धोक्याची घंटा वाजली म्हणून ती पुन्हा उठण्याचा प्रयत्न करु लागली. यावेळी त्या ललनेकडे पहायचेच नाही असे तिने ठरवले.
पण ती त्या जागेवरून तसूभरही उठू शकली नाही. आपल्याला जडत्व प्राप्त झाले आहे,आपण हालचाल करु शकत नाही हे रेखाच्या लक्षात आले.

आता त्या ललनेसह त्या चार आकृत्या मोठमोठ्याने हसू लागल्या. रात्रीच्या शांत वातावरणात तो आवाज घुमू लागला.तो आवाज असह्य होऊन रेखाने आपल्या कानावर हात ठेवले..पण तरीही तो आवाज कानांवर आदळतच होता.
आता त्या ललनेने कसलीतरी पूजा करण्यास सुरुवात केली. मंत्रोच्चार करत ती त्या कवटी वर आणि कवड्यांवर हळदीकुंकू गुलाल, तांदूळ आणि काय काय वहात होती.
समोर ठेवलेल्या लिंबात सुया खुपसत होती. ते पहाणे रेखाला नकोसे वाटत होते. पण तिच्यापुढे दुसरा इलाजच नव्हता.
तेवढ्यात विश्रामगृहाच्या दारापाशी कुणीतरी आल्याची चाहूल लागली.

म्हणून रेखाने तिकडे पाहिले तर तिचे बाबा विश्रामगृहाच्या दारात उभे होते. बाबांना पाहून रेखाला फार आनंद झाला.ती उठण्याचा प्रयत्न करु लागली पण ते शक्य झाले नाही म्हणून ती तिथूनच,”बाबा” असे जोरात ओरडली.
बाबांनी स्नेहार्द नजरेने तिच्याकडे पाहिले,आणि ते आत आले. बाबांच्या मिठीत शिरण्यासाठी रेखा आतुर झाली होती. परंतु बाबा तिच्याकडे न येता त्या ललनेने मांडलेल्या पूजेकडे गेले.
रागारागाने त्याच अगम्य भाषेत बोलत त्यांनी ती पूजा उधळून लावली. त्या चार आकृत्यांकडे पहात रेखाकडे हाताने निर्देश करत काहीतरी सांगितले. त्या आकृत्यांनी ललनेकडे एकवार पाहिले.

ती काहीच बोलत नाही हे पाहून त्या चार ही आकृत्या तशाच फेंगड्या चालत जेथून बाहेर आल्या होत्या त्या बाकड्याखाली गेल्या व तिथेच कुठेतरी अदृश्य झाल्या. ती ललना रागाने बाबांकडे पहात काहीतरी उच्चारत होती. पण बाबांच्या पुढे तिचे काहीच चालले नाही.
बाबांनी रेखाला हाक मारली व बाहेर चल असे सांगितले आणि काय आश्चर्य.. बाकड्यावर खिळून बसलेल्या रेखाभोवतीची अदृश्य बंधने दूर झाली होती.
रेखा उठून बाबांच्या सांगण्याप्रमाणे बाहेर पडली. पाठोपाठ बाबाही बाहेर पडले. बाबांनी तिला विश्रामगृहाची कडी लावायला सांगितली.

ती कडी लावण्यासाठी दार ओढून घेताना रेखाने आत कटाक्ष टाकला तर त्या ललनेच्या डोक्यावर अजिबात केस नव्हते. टक्कल असलेली ती ललना खूप भेसूर दिसत होती. रेखाने पटकन दार ओढून घेतले आणि कडी लावली.
बाबा पलिकडे उभे होते. ती त्यांच्याजवळ गेली व म्हणाली,”बाबा, तुम्ही इथे कसे आलात? तुम्हाला कसे कळले मी इथे आहे ते? आणि तुम्ही तर आजारी होता ना? दवाखान्यात अॅडमीट आहात असा फोन आला म्हणून मी तुम्हाला पहाण्यासाठी नागपूरला निघाले होते”.
अगं बाळा, आईवडिलांचा जीव आपल्या मुलांमध्येच अडकलेला असतो. तू इथे आहेस ते मला कसे कळले हे मी तुला उद्या सकाळी सांगेन.आता तू त्या चहाच्या टपरीपाशी जाऊन बस.माझे आणखी एक काम बाकी राहिले आहे ते करुन येतो.तोपर्यंत तिथेच बसून रहा”. आणि तिला पुढे बोलण्याची संधीही न देता बाबा तिथून चालत दूर निघून गेले.

ती बाबांनी सांगितले तिथेच बसली आणि विश्रामगृहात घडलेल्या घटनांचा विचार करु लागली,पऱंतु मानसिक थकवा आल्याने ती आपोआपच झोपेच्या आधीन झाली.
“रेखा ए रेखा”..आपल्याला कुणीतरी हाका मारतेय असा भास होऊन ती जागी झाली पण तिथे कुणीच नव्हते.आता प्लॅटफॉर्मवर माणसे दिसत होती.त्यापैकी एका बाईला तिने नागपूरला जाणारी गाडी कधी आहे विचारले.आता दहा मिनिटात येईल असे तिने सांगितले. बरे आपण जागे झालो असे तिला वाटले.पण बाबा कुठे गेले? ते परत आले तर? पण ही गाडी गेली तर परत लवकर गाडी नाही आणि बाबा मी एक काम उरकायची चाललोय असे म्हणाले होते.

त्यामुळे आपण नागपूरलाच जाऊया असे तिने ठरवले.आणि ती गाडीत चढली.
नागपूरला उतरुन ती रिक्षा करुन घराकडे गेली तर घरासमोर गर्दी दिसली.
का बरं गर्दी झाली आहे असे तिला वाटले. ती पुढे आली तसे सगळे तिच्याकडे पाहू लागले.तिला वाटले बाबा आपल्याआधी इथून पोहोचले असावेत आणि रात्रीच्या प्रसंगाबाबत त्यांनी सांगितले असावे म्हणून सगळेजण आपल्याकडे पहात असावेत.
पण जसजशी ती पुढे येऊ लागली तसतशी उदासी तिला वेढून टाकू लागली.
ती पुढे आली आणि घरातील सर्वजण खाली बसलेले तिला दिसले.

तिला पाहून सर्वांनी मोठ्यानं रडायला सुरुवात केली.तिला काहीच समजेना. पण चार पावले टाकल्यावर तिला त्या सर्वांच्या मध्ये झोपवलेले बाबा दिसले.
ते पाहून तिच्या काळजाचे पाणी पाणी झाले.आपण बाबांना भेटून काहीच तास झाले आहेत अन् तेव्हा तर बाबा अगदी ठणठणीत होते,मग आता काय झाले?..
पण ती जेव्हा तिथे पोहोचली अन् तिच्या दुःखाचा उमाळा थोडाफार शमला तेव्हा तिला समजले की काल रात्रीच बाबांची प्राणज्योत मालवली होती.

ती संकटात सापडली आहे हे पाहून बाबांचा आत्मा तिकडे तिच्या मदतीसाठी आला होता..आणि तो आत्मा असल्यामुळेच त्या सर्व प्रकाराला त्यांनी आळा घातला होता…
त्यांचे शेवटचे तिच्या कानावर पडलेले वाक्य तिला आठवले.. “आपल्या आईवडिलांचा जीव आपल्या मुलांमध्येच अडकलेला असतो”. आणि तिच्या मनाचा बांध फुटला व ती बाबांच्या अंगावर पडून ओक्साबोक्शी रडू लागली…
समाप्त.
©® सौ.हेमा पाटील
सदर कथा लेखिका सौ.हेमा पाटील यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी.
कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!